•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    जुन २०२२ – स्तुहि पर्जन्यम्

    ग्रीष्म ऋतूने काहिली होत असताना, अचानक दाटून येते, आकाशात काळे काळे ढग जमा होतात. वारे वाहू लागतात. आणि हा सोहळा आपण मान उंचावून पाहत असतानाच कपाळावर थेंबांचा अभिषेक होतो आणि नकळत ओठी शब्द येतात, “आला पाऊस आला”. पावसाची महती प्रत्येकासाठी वेगळी. शहरी भागातील पाऊस वेगळा. शेतकर्‍यांसाठी पाऊस वेगळा. तरुणांना त्याचे आकर्षण वाटते ते वेगळे आणि लहान मुलांना वाटते ती मौज आगळी. नेमेची येतो मग पावसाळा, तरी दर वर्षी पावसाचे कौतुक काही कमी होत नाही. जसे ते आपल्याला वाटले तसेच आपल्या पूर्वजांना वाटत आले आहे, अगदी वैदिक काळापासून. पर्जन्यसूक्तात ऋषी वर्णन करतात, “वारे जोराने वाहू लागतात. विजा चमकू लागतात. वनस्पती डोलू लागतात. सर्व प्राण्यांसाठी विपुल अन्न निर्माण करणारा पर्जन्यदेव पृथ्वीवर वृष्टीच्या रुपाने कृपावंत होतो. हे पर्जन्यदेवते, आम्हाला भरभरून थेंबांचे दान दे. नद्या दुथडी भरुन वाहू देत. गायींना प्यायला पुष्कळ पाणी मिळू दे. कारण गायीला चारा मिळाला की दूध-दुभत्याने आमचे घर न्हाऊन जाईल. हे पर्जन्यदेवते, तुझी लीला अपरंपार आहे. ती अवगत करणे कोणाला शक्य आहे? मला तर सृष्टीच्या लीलेचे इतके आश्चर्य वाटते. इतक्या नद्या दुथडी भरुन वाहतात आणि त्या समुद्रात पाणी ओततात पण तो समुद्र काही पूर्णपणे भरत नाही.”

    आकाशातून पडणारा हा पाऊस माणसाला नेहमीच खूप काही सांगत, शिकवत आला आहे. पुढील सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी पडतो पण शेवटी सगळे पाणी वाहून समुद्रालाच मिळते; त्याप्रमाणे वेगवेगळ्या देवाला नमस्कार केला वा पूजा केली तरी ती केशवापर्यन्त म्हणजेच परब्रह्मापर्यन्त पोहचते.

    जे लोक कमी काम करणारे असतात ते खूप बडबड करतात. जसे शरद ऋतूतील ढग नुसतीच गर्जना करतात, गडगडाट करतात, पाऊस मात्र देत नाहीत. मराठीत देखील आपण म्हणतो, “गर्जेल तो वर्षेल काय” !

    ढग पाणी नुसते साठवत नाहीत तर पाणी देतात. म्हणून ते दानी आहेत आणि दानी माणसाचा मान हा केवळ श्रीमंती मिरवणार्‍या माणसापेक्षा निश्चितच अधिक आहे. म्हणूनच सुभाषितकार म्हणतात, गौरव हा दानामुळे प्राप्त होतो, केवळ पैसा साठवून तो मिळत नाही. त्यामुळेच नुसते पाणी साठविणार्‍या पण त्याचा लाभ कुणालाही न देणार्‍या समुद्राचे स्थान खाली जमिनीवर आहे; तर दानी ढगांना मात्र उच्च स्थान प्राप्त झाले  आहे.

    नेमेची येतो मग पावसाळा, असे आपण म्हणतो खरे पण पावसाळ्याचे आगमन ही आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवणारी घटना असते. आपण आयुष्याचे मोजमापही किती पावसाळे पाहिले यावरून करतो,  यातच  ह्या वर्षाऋतुचे महत्त्‌व स्पष्ट व्हावे.  अशा ह्या वर्षाऋतूविषयी प्राचीन काळापासून जे चिंतन संस्कृत साहित्यात करण्यात आले आहे ते आपण पाहिले.

    कालिदास म्हणतो त्याप्रमाणे “मेघालोके भवति सुखिनो पि अन्यथावृत्तिचेत:”. आकाशात ढग दिसू लागले की स्वस्थचित्त माणसाच्या मनातही अनामिक हुरहूर दाटून येते. काहीतरी वेगळे वाटते. मग आपोआपच पावसाचे स्वागत करायला, वर्षा सहल करायला किंवा चहा-भजीचा आनंद घ्यायला सरसावतो. पण “उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी” हेही ध्यानात घ्यायला हवे. म्हणूनच पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्‌वाच्या टिप्स–

    हात – पाय स्वच्छ धुणे – आपल्याला लहान असल्यापासून शिकवलेले आहे, बाहेरुन आल्यावर हात पाय धुणे. आपण प्रवासात, बस, ट्रेन मध्ये चढता- उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, प्रत्येक जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. आजकाल आपल्याला hand sanitizer सहज उपलब्ध असतात. ते जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वापर करा.

    – ताप वा कोणत्याही प्रकारच्या आजाराचे योग्यवेळी निदान व्हायला हवे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर आवश्यक चाचण्या केल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका

    – पाणी तुंबल्यानंतर लेप्टो होण्याचा धोका असतो. त्यामुळे साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे

    – पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे- आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले उकळलेले नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माशी बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

    – डासांपासून सुरक्षित राहा – पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठवणार्‍या क्रीम [mosquito  repellent] चा वापर करा. तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू, मलेरिया सारखे आजार पसरतात

    -पाणी उकळून प्या आणि त्याचे प्रमाण वाढवा – पावसाळ्यात कमी तहान लागते, त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी, शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेवून, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

    – योग्य आहार घ्यावा- पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

    – दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेये घेणे जास्त चांगले. पावसाळ्यात बाजारातील शीतपेय पेय घेणे टाळावे. शीतपेय शरीरातील खनिज साठा कमी करतात, त्यामुळे शरीरातील enzyme activity  कमी होते, ज्यामुळे पचनसंस्थे वरचा ताण वाढतो.

    ह्या बारीकसारीक सवयींची काळजी घ्या आणि निरोगी राहून ह्या वर्ष ऋतूचा मनसोक्त आनंद लुटा.

    Read more

    मे २०२२ – मुहूर्त : समज-गैरसमज !

    “मुहूर्त” पाहून केलेली सर्वच कामे  यशस्वी होतात का? मुहूर्त नसतांना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का? मुहूर्त नसतांना “काढीव” मुहूर्तावर कार्य करणे योग्य आहे का? असे अनेकजण विचारीत असतात.  माणूस आजारी पडल्यावर त्याला मुहूर्त पाहून आपण हॉस्पिटलमध्ये  कुठे घेऊन जातो? अपघात झाल्यावर मुहूर्त पाहून उपाय कुठे करतो? इतर देशातील लोक आपल्यासारखे मुहूर्त कुठे पाहतात? मोठ्या पराक्रमी  लोकनेत्यानी महान कार्य करतांना कुठे मुहूर्त पाहिला होता? “वगैरे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करीत असतो.”

    मी लहान असतांना माझ्या वडिलांना  प्रश्न विचारला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी दिलेले उत्तर आजही माझ्या स्मरणात आहे. मी दिवाळीमध्ये वडिलांना विचारले होते,-“बाबा, दिवाळीत लक्ष्मी पूजन केल्याने आपणास पैसा मिळतो का? तसं जर असतं तर आपले लोक इतकी वर्षे अगदी मुहूर्त पाहून लक्ष्मीपूजन करीत आहेत , मग आपला देश श्रीमंत कसा झाला नाही ? ज्या देशातील लोक लक्ष्मीपूजन करीत नाहीत ते अमेरिकेसारखे देश श्रीमंत कसे झाले ?” यावर माझे बाबा म्हणाले – “अरे, लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी मिळविण्यासाठी करावयाचेच नसते. तर ते लक्ष्मी-संपत्तीप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावयाचे असते. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा याला लक्ष्मी म्हणतात.” मुहूर्ताचेही असेच आहे. आज आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करूया.

    मुहूर्ताचा इतिहास

    पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाचही अंगे जेव्हा शुभ असतील अशा काळाला मुहूर्त म्हटले जाते. हिंदुस्थानात फार प्राचीन काळापासून धार्मिक विधी व इतर शुभ कार्ये करण्यासाठी शुभ दिवस व शुभ वेळ पाहण्याची प्रथा रूढ आहे. त्यावरून शुभ दिवसाचा किंवा दिवसाच्या शुभ कालखंडाला “मुहूर्त” असे नाव मिळाले आहे.  “काल: शुभक्रियायोगी मुहूर्त:  इति कथ्यते।” म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या “विद्यामाधवीय” या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे.  ऋग्वेदात

    “दिवस सुदिन असतांना” असा उल्लेख आढळतो. प्राचीनकाली यज्ञ करतांना मुहूर्त पाहत असत. कधी कधी यज्ञ चालू केल्यावर विघ्ने येत. तशी ती येऊ नयेत यासाठी मुहूर्त पाहिला जात असे. प्राचीन ग्रंथांवरून हे कळून येते. प्रत्येक नक्षत्राची देवता ठरविलेली आहे.”

    (१) अश्विनी- अश्विनीकुमार.

    (२) भरणी- यम.

    (३) कृत्तिका-अग्नी.

    (४) रोहिणी-ब्रह्मा.

    (५) मृगशीर्ष – चंद्र.

    (६) आर्द्रा – शंकर.

    (७) पुनर्वसू- अदिती

    (८) पुष्य- बृहस्पती,

    (९) आश्लेषा- सर्प.

    (१०) मघा- पितर.

    (११) पूर्वाफाल्गुनी- भग

    (१२) उत्तराफाल्गुनी-अर्यमा

    (१३) हस्त- सूर्य

    (१४) चित्रा- त्वष्टा.

    (१५) स्वाती- वायु.

    (१६) विशाखा- इंद्राग्नि.

    (१७) अनुराधा – मित्र.

    (१८) ज्येष्ठा-इंद्र.

    (१९) मूळ- निऋति

    (२०) पूर्वाषाढा – उदक.

    (२१) उत्तराषाढा- विश्वदेव.

    (२२) श्रवण- विष्णू

    (२३) धनिष्ठा-वसु.

    (२४) शततारका – वरुण

    (२५) पूर्वाभाद्रपदा- अजचरण.

    (२६) उत्तराभाद्रपदा-अहिर्बुध्न्स.

    (२७) रेवती-प्रूषा.

     यावरून आणि इतर अनेक गोष्टींवरून हे मुहूर्त ठरविण्यात आले आहेत.

    महत्त्‌वाची गोष्ट ही की प्रत्येक शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन कालापासून  हिंदुस्थान हा शेती प्रधान देश आहे.  काही शुभकार्याच्या मुहूर्ताचे नियम हे शेतीकार्याशीही निगडीत असल्याचे आढळून येते. विवाह मुहूर्तांचे नियम खूप होते. त्याला अपवादही सांगण्यात आले होते. ते अपवाद गृहीत धरून काही पंचांगात विवाह मुहूर्त देण्यात येतात. श्रौत, गुह्य व धर्मसूत्रात अनेक धार्मिक विधींसाठी शुभकाल सांगितलेले आहेत.मुहूर्तमार्तंड, मुहूर्तचिंतामणी इत्यादी अनेक ग्रंथांमधून केवळ मुहूर्तविषयक सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

    इथे माणसाच्या मनाचे खूप महत्त्‌व आहे. कार्य करतांना ते निर्विघ्नपणे पार पडून फलप्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ज्याठिकाणी कार्याचा प्रारंभ कधी करायचा हे ठरविणे आपल्या हाती असते तेथे इतर गोष्टींची अनुकूलता पाहतांना मुहूर्ताची कार्यारंभाची वेळ पाहून कार्य केले जाते. म्हणजे कार्य करतांना मन शांत राहते. अपघातासारख्या आपद्‌कार्याच्यावेळी मुहूर्त पाहू नयेत, माणूस आजारी पडल्यावर औषधोपचार करण्यासाठी मुहूर्त पाहू नयेत, असेही सांगण्यात आले आहे. कालानुरुप मुहूर्तांचे कोणते नियम पाळावेत हे प्रत्येकाच्या मनावरच अवलंबून असते.

    महाराष्ट्रात आपण दिवसा विवाह मुहूर्त पाहून विवाह कार्य करतो. यासाठी आपण सर्व भरपूर वेळ खर्च करतो. परंतु काही व्यापारी समाजात दिवसाचा मौल्यवान वेळ खर्च होऊ नये म्हणून रात्रीच्या मुहूर्तावर विवाह लावतात. काही वेळा अमुक दिवशीच कार्य करणे अनिवार्य असेल तर “काढीव” मुहूर्तावर कार्य केले जाते. मुहूर्तावर केलेले कार्यच यशस्वी होते का ? याविषयी कोणीही संशोधन केले नाही. पराक्रमी लोकांचे मनोबल इतके मोठे असते की कार्य करीत असता मुहूर्त पाहण्याची त्यांना जरूरी नसते. मुहूर्तावर कार्य केले तर मन निश्चिंत राहते. म्हणून कोणतेही कार्य करतांना मुहूर्त पहायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न राहतो.

    दा. कृ. सोमण

    Read more

    एप्रिल २०२२ – शतदा प्रेम करावे!

    “या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!”

    तुम्ही कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायक अरुण दाते यांनी गायलेले हे सुंदर गीत नक्कीच ऐकले असेल. तरीही माणसे नवस फेडण्यासाठी, धार्मिक(?) रूढी- परंपरा पाळण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी जेव्हा शरीराला क्लेश करून घेतात, जीवन धोक्यात घालतात किंवा ते संपवतात हे पाहून खूप वाईट वाटते. सर्वात महत्त्‌वाची गोष्ट म्हणजे “आपले जीवन आणि त्यासाठी आरोग्यसंपन्न शरीर” हे आहे, हे समजून घेतले पाहिजे.

    मध्यंतरी  फेसबुकवरती एक पोस्ट पाहत होतो. एका बाईने मुलागा व्हावा यासाठी देवाला नवस बोलला. “जर मुलगा झाला तर मुलगा चालायला लागताच देवा, तुझ्या दर्शनासाठी त्याला चालवीत घेऊन येईन! “झाले, काही दिवसांनी त्या बाईला मुलगा झाला, तो चालायला लागला, लगेच त्या बाईने नवस फेडण्यासाठी त्या लहान मुलाला चालवीत मंदिरात नेले. चालतांना दमलेल्या, रडणार्‍या त्या लहान मुलाचा फोटो फेसबुकवर टाकला.

    अशीच आणखी एक गोष्ट नवरात्रातील! एका सासूने नवीनच लग्न होऊन आलेल्या आपल्या सुनला नवरात्रातील नऊ दिवस कडक उपवास करण्याची सक्ती केली. त्यामध्ये त्या दुर्दैवी सूनेचा मृत्यू झाला. मध्यंतरी दिल्लीमध्ये ‘मोक्ष (?) प्राप्तीसाठी एका कुटुंबातील प्रमुखाने कुटुंबातील सर्वांचे जीवनच संपविले होते.

    यावर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना २५ गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुंबईतील एका गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्यावेळी पाण्यात एक बोट उलटली आणि एक मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये तर रावणाची मूर्ती जाळण्याच्यावेळी ट्रेन अंगावरून गेल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले. यात्रेमध्ये गर्दीचे व्यवस्थापन संयोजकांनी नीट न केल्यामुळे तसेच भाविकांनी शिस्त न पाळल्याने माणसे चेंगराचेंगरीत मृत्यू पावल्याच्याही अनेक घटना घडलेल्या आहेत.

    वास्तव काय सांगते ?

    या सर्व घटना पाहिल्या की खूप वाईट वाटते. एवढे का आपले जीवन कमी महत्त्‌वाचे व क्षुल्लक आहे? सध्याचे हे कलियुग आहे. देव नवसाला पावत नसतो. साधा विचार करूया. जर देव नवसाला पावत असता तर मुलांना अभ्यास करण्याची जरूरी नव्हती. नवस बोलून पास होता आले असते.
    हॉस्पीटल्सची जरूरी नव्हती, नवस बोलून रोग बरा करता आला असता. देशाच्या सीमेवर सैन्य ठेवण्याची जरूरी नव्हती. देवाला नवस बोलून शत्रूला नष्ट करता आले असते.

    केवळ उपवास करून जर पुण्य मिळत असते; तर गरीब लोकांचा अन्न न मिळाल्याने अनेक दिवस उपवास घडतो. म्हणजे ते अधिक पुण्यवान व्हायला पाहिजे होते. आत्महत्या करून जर मोक्ष मिळत असता तर मग त्या मोक्षाचा उपयोगच काय ?

    गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना या वर्षी पंचवीस लोकांना आपले प्राण जर गमवावे लागले तर त्या गणेशभक्तीचा उपयोगच काय? तो तर विघ्नहर्ता, सुखकर्ता आहे, आपणच आपली काळजी न घेतल्याने विघ्न व दु:ख ओढवून घेत असतो नाही का? आपण विज्ञानयुगात वावरतो. आपण कलियुगात जगतो. ईश्वर म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? या गोष्टी समजून घ्यायला नकोत का? सेल्फी काढतांना जर आपण मृत्यू पावलो तर ती काढलेली सेल्फी पाहणार कोण?

    हे सर्व पाहिल्यानंतर असे वाटते की प्रत्येक माणसाने वास्तवाचे भान थोडेतरी ठेवायला हवे. आपले जीवन सुंदर करणे, समृद्ध , आनंददायी करणे आपल्याच हाती असते. म्हणून आपण आपल्या जगण्यावर, आपल्या जन्मावर, आपल्या आरोग्यसंपन्न शरीरावर शतदा प्रेम करायला हवे.

    पापपुण्य

    माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागावे असे आपला धर्म सांगतो. चराचरात असलेले चैतन्य म्हणजे ईश्वर! मुंगी चालते, पण समजा ती चिरडली गेली तर तिच्यातून काय निघून गेले? ते चैतन्य, तोच ईश्वर ! माणूस जिवंत असतांना त्याच्यामध्ये चैतन्य असते, तोच ईश्वर! प्रत्येक प्राणिमात्रात हा ईश्वरी अंश असतो. संपूर्ण सृष्टीमध्ये हा ईश्वर असतो. म्हणूनच आपण मानवसेवा ही ईश्वरसेवा मानतो. सामान्य माणसाला हा निर्गुण निराकार ईश्वर समजणार नाही, म्हणून आपण सगुण – साकार ईश्वराला मानून मूर्तीपूजा करतो. महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची सोपी व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य! म्हणूनच आपण जगत असतांना इतर गरीब- गरजू लोकांना मदत करून पुण्य मिळविले पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्‌रिपूंवर नियंत्रण ठेवून आपण स्थितप्रज्ञ राहून जिवंतपणीच मोक्ष मिळवता येतो.

    म्हणूनच मित्रानो, आपले शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य हेच सर्वात महत्त्‌वाचे आहे. तेच आपण प्रथम जपले पाहिजे. ते असेल तरच आपण ईश्वरपूजा करू शकतो. इतरांना मदत करून आपले व त्यांचे आयुष्य आनंदी व सुखी करू शकतो.

    दा. कृ. सोमण

    सन २०२२ शास्त्रार्थासंबंधी खुलासा

    चैत्र शुक्ल कामदा एकादशी पंचांग – दिनदर्शिकेत मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२ रोजी कामदा एकादशी दिलेली आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ६.०५ नंतर सूर्योदय होत असलेल्या गावी दशमीवेध होत नसल्याने मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे. ज्या गावी सकाळी ६.०५ पूर्वी सूर्योदय होईल त्या गावी मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी कामदा स्मार्त एकादशी व बुधवार १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी अशा दोन एकादशा असतील.

    (१) मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी एकच एकादशी असलेली गावे : मुंबई, पुणे, सोलापूर, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, जळगांव, ठाणे, संपूर्ण कोकण, धुळे, नाशिक, नांदेड, बीड, परभणी, लातूर, भुसावळ, सांगली, सातारा, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन वगैरे भाग येथे १२ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे.

    (२) मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी स्मार्त आणि बुधवार १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी असलेली गावे – नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, मध्यप्रदेशातील काही भाग, दिल्ली, हैद्राबाद, तेलंगणा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा येथे १२ एप्रिल रोजी स्मार्त व १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी असेल.

    Read more

    मार्च २०२२ – आयुर्वेदिक मानस-विचार: आरोग्याची गुरुकिल्ली

    प्रास्ताविक

    मन करा रे प्रसन्न  सर्व सिद्धीचे कारण,  मोक्ष अथवा बंधन,  सुख समाधान, इच्छा ते आयु, म्हणजे जीवन आणि त्यासंबंधीचं ज्ञान म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद आपल्याला योग्य आणि आरोग्ययुक्त आयुष्यासाठी मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन, आपला आहार कसा असावा, आपला विहार म्हणजे आपलं आचरण कालानुरूप, परिस्थितीनुरूप कसं असावं, याबद्दल प्रामुख्याने असतं. परिपूर्ण आणि प्रदीर्घ आयुष्य जगण्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, सुखकर काय, दुःखकर काय याबद्दल ज्ञान देणारं शास्र म्हणजेच आयुर्वेद.

    आयुर्वेदोक्त मानसविचार

    आयुर्वेद हे वैद्यकशास्र असलं तरी त्याची स्वतःची अशी काही तत्त्‌वं आहेत, संकल्पना आहेत आणि सिद्धान्तही आहेत. या अर्थाने आयुर्वेद स्वतःच एक तत्त्‌वज्ञान आहे. आयुष्याशी संबंधित शरीर इत्यादि घटक कसे निर्माण झाले, त्यांचे गुणधर्म कोणते, त्यांची कार्यं काय आहेत, ती कशी घडतात, अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आयुर्वेदामध्ये केलेला आहे. याच धर्तीवर आयुर्वेद “मन” या महत्त्‌वपूर्ण घटकाबद्दलही विचार व्यक्त करतो. मनाचं स्वरूप, त्याची निर्मिती, गुणधर्म, कार्य इत्यादि विषयांबद्दल आयुर्वेदाने शास्रीय दृष्टीने व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. यालाच “आयुर्वेदोक्त मानसशास्र” किंवा “मानस-विचार” असं म्हणतात.

    मनाचे स्वरूप आणि कार्य 

    आयुर्वेदानुसार “मन” हा आयुष्याचा, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सजीव जीव-सृष्टीच्या निर्मितीचा एक भाग म्हणूनच मन निर्माण होतं. सत्त्‌व-रज-तम या त्रिगुणांनी युक्त अशा प्रकृतीपासूनच मन या द्रव्याची निर्मिती होत असली तरी मनाच्या निर्मितीमागे प्रकृतीमधील स्वयंभावी सात्ति्‌वक आणि राजसिक गुणांचा महत्त्‌वपूर्ण सहभाग असतो. यांच्यापासून मनोत्पत्ती होत असताना सोबतच पाच ज्ञानेन्द्रिय (कर्ण, त्वव्‌À, चक्षु, रसना, नासा) आणि पाच कर्मेन्द्रियंही (हस्त, पाद, पायु, उपस्थ, जिठा) निर्माण होतात. आयुष्य म्हणजे जीवन सुरू होत असताना, गर्भावस्थेतील नवीन शरीरामध्ये आत्मा, मन आणि ज्ञानेन्द्रियांचं त्रिकूट प्रवेश करत असताना, या समूहातील मन, नव्या शरीरातील सत्त्‌व-रज-तमाच्या प्रमाण आणि गुणवत्तेनुसार तिथे नव्या मनाची निर्मिती करतं, असं आयुर्वेद संहिता प्रतिपादन करतात.

    आयुर्वेदानुसार मन स्वतःदेखील एक इन्द्रियंच आहे. मात्र ते उभयेन्द्रिय म्हणजे ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेन्द्रिय दोन्ही आहे. यामुळे इन्द्रिये मनाच्या नियंत्रणाखाली कार्यकारी होतात. सर्व ज्ञानेन्द्रिये, त्यात मनही आलं, ही ज्ञानाची साधनं आहेत. आपल्या सभोवतालच्या आणि त्याबरोबरच शरीरान्तर्गत परिस्थितीबद्दलचं ज्ञान ज्ञानेन्द्रिये करून देतात. प्रमुख पंच ज्ञानेन्द्रियांच्या द्वारे प्राप्त झालेलं ज्ञान मन आत्म्यापर्यंत पोहोचवतं आणि त्या ज्ञानानुसार कर्मेन्द्रियांकडून जे कार्य घडवून आणायचं असतं, त्याबद्दलची आज्ञा कर्मेन्द्रियांना देण्याचं कार्य मन करतं. या उभयेन्द्रियत्वामुळे मन हे दहा इन्द्रियांवर नियंत्रण करण्याचं महत्त्‌वाचं कार्य करतं. त्याबरोबरच स्वतःवर नियंत्रण राखण्याचं कार्यही मनाकडून घडतं; किंबहुना, केवळ मन स्वतःच स्वतःवर नियंत्रण राखण्यास सक्षम असतं. इतर कोणतंही तत्त्‌वं मनावर नियंत्रण करू शकत नाही. म्हणून स्वनियंत्रण हे मनाचं महत्त्‌वाचं कार्य आहे.

    “विचार करणं” हे मनाचे आणखी एक महत्त्‌वाचे कार्य असते. मनामध्ये कोणकोणते विचार येऊ शकतात, याबद्दल आयुर्वेद माहिती देतो. चिन्तन, विचार, ऊह (कारणमीमांसा), ध्येय आणि संकल्प या स्वरूपांमध्ये येणार्‍या विचारांना आयुर्वेद मनाचे विषय मानतो. या विषयांचं योग्य ते ग्रहण करून त्यानुसार कृती करण्याचं आणखी एक महत्त्‌वाचं कार्य मनाद्वारे होत असतं. उपरोल्लेखित मन-विषयांच्या अनुषंगाने मन हे मीमांसा करणं, समजून घेणं, ज्ञान मिळवणं, विचार करणं, विचार नष्ट करणं अशा प्रकारची कार्यं करतं.

    मन आणि आरोग्यअनारोग्य

    आयुर्वेदाने, शरीरातील कार्यकारी शक्तीमध्ये होणारी विकृती ज्या लक्षणांनी शरीरावर दिसते, त्या लक्षणसंग्रहाला रोगावस्था किंवा अनारोग्य असं म्हण्टलं आहे. हीच कार्यकारी शक्ती जेव्हा प्राकृतावस्थेमध्ये असते तेव्हा शरीरातील सर्व क्रिया सुयोग्य पद्धतीने घडत असतात, भूक नीट लागत असते, अन्नपचन व्यवस्थित होत असतं, सर्व इन्द्रिये आपापली कार्य व्यवस्थित करत असतात. मन आणि आत्मा प्रसन्न असतात. त्याबरोबरच शरीरावर इतर कोणतीही वाईट लक्षणं दिसत नसतात. या अवस्थेलाच आयुर्वेद, “स्वास्थ्य किंवा आरोग्य” असं म्हणतो. या वर्णन केलेल्या बाबी अशा होत नसतील, त्यात काही अडचणी असतील तर ते “अस्वास्थ्य किंवा अनारोग्य” होय.

    या विवेचनावरून आपण म्हणू शकतो की आयुर्वेद रोगांचे सामान्यपणे शारीरिक रोग आणि मानसिक रोग असे दोन प्रकार मानतो. शारीरिक रोगांची कारणं शरीरातील घटकांमध्ये उपस्थित असतात तर मानसिक रोगांची कारणं मनाशी निगडित असतात. त्यांची लक्षणंही शारीरिक म्हणजे शरीरव्यापाराशी संबंधीत आणि मानसिक म्हणजे मनोव्यापारांशी संबंधित अशा प्रकारची असतात. असं असलं तरी, शारीरिक रोगांचा मनावर परिणाम होतो आणि त्याच वेळी मानसिक रोगही शरीरावर विशेष परिणाम करतात. लक्षणांच्या स्वरूपांमध्ये याचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. असं असल्यामुळे रोगावस्था शारीरिक असो किंवा मानसिक, “मनाचं रक्षण करणं, मनाला उभारी येईल अशी चिकित्सा करणं”, हा कोणत्याही प्रकारच्या रोगावस्थेला दूर करण्याकरिता केलेल्या उपायांमध्ये महत्त्‌वाचा भाग ठरतो.

    आयुर्वेद चिकित्साविचार

    आयुर्वेदानुसार कोणत्याही रोगाची चिकित्सा करत असताना रुग्णाच्या शारीर आणि मानसिक भावांचा विचार केलेला दिसून येतो. रोगचिकित्सा म्हणजे केवळ रोगाच्या लक्षणांची चिकित्सा करणं नसून त्याबरोबरच रुग्णाचं शरीर आणि मन या दोहोंची चिकित्सा असल्याचं आयुर्वेद मानतो. यामुळेच कोणत्याही रोगाची चिकित्सा करताना रुग्णाला धीर देण्याची आवश्यकता आयुर्वेद प्रकर्षाने सांगतो. रुग्णाचं धैर्य टिकून राहावं यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना आयुर्वेदाने केलेली आहे. हे करण्यासाठी आवश्यक असलेली कृती ही त्या “रुग्णाच्या बुद्धीनुरूप म्हणजे त्याला कळेल अशा भाषेमध्ये करण्याची उपसूचनाही”, दिलेली आहे. या प्रक्रियेलाच सध्या “काऊन्सिलिंग” म्हणून ओळखलं जातं.

    डॉ. प्रसाद अकोलकर,

    आयुर्वेदाचार्य, एमए, पीएचडी (मुंबई)

    Read more

    फेब्रुवारी २०२२ – भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी

    संगीततज्ञ अशोक रानडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे कर्नाटकाने महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या, ज्या महाराष्ट्राच्याच होऊन गेल्या. या मध्ये कर्नाटकाने जसा विठ्ठल दिला, तसा विठ्ठलभक्त स्वरही दिला, शास्रीय संगीत जाणणार्‍या जाणकारापासून दुर्गम भागातल्या एखाद्या खेडूतापर्यंत सर्वांना प्रभावित करणारा हा स्वर म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी.

    ४ फेब्रुवारी १९२२ रोजी त्यांचा जन्म कर्नाटकात झाला.  गदग हे त्यांचे गाव. आजोबांच्या नावावरून त्यांचे नाव भीमसेन ठेवण्यात आले. त्यांच्या गायकीच्या अफाट आवाक्याने त्यांनी हे नाव सार्थ केले. किराणा घराण्याच्या गायकीचा त्यांचा आविष्कार अभूतपूर्व होताच. त्यांच्या अभंग गायनाने सारेच नादावले. वारकरी संप्रदायाच्या गायन परंपरेला एक वेगळाच आयाम त्यांनी मिळवून दिला. जेष्ठ संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी गायलेल्या  अभंगांनी  लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. भारतीय संगीत ऐकणारे कान त्यांनी जगभर निर्माण केले. पु. ल. देशपांडे त्यांचा परिचय करुन देताना गमतीने म्हणायचे हे सवाई गंधर्वांचे शिष्य पण यांना “हवाई गंधर्व” हीच उपाधी शोभून दिसेल. अर्थात परदेश प्रवासाबरोबर संपूर्ण भारतभर त्यांचे गायन झाले. आपल्या गुरुच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी “सवाई गंधर्व महोत्सव” सुरू केला. आज देशभरातली शास्रीय संगीताच्या चाहत्यांसाठी आणि कलाकारांसाठी सवाई महोत्सव म्हणजे “गानपंढरी” आहे.

    भीमसेन लहान असताना आईच्या गोड गळ्यातून भजनं ऐकून त्यांच्या मनात सुरांची गोडी निर्माण झाली. पण आपण गाणं शिकलंच पाहिजे हा ध्यास त्यांच्या मनाने घेतला तो अब्दुल करीम खांसाहेब यांची “पिया बिन” ही रेकॉर्ड ऐकल्यानंतर! त्यांच्या गावातील एक दुकानदार ही रेकॉर्ड आपल्या दुकानात सतत वाजवायचा. मोहिनी पडल्यासारखे भीमसेनही ती रेकॉर्ड तासन्‌ तास ऐकायचे. शाळा सोडून तिथेच जाऊन बसायचे. आपल्यालाही असे गाता आले पाहिजे असा त्यांच्या मनाने निश्चय केला. तो काळ असा होता की मुलाने नाटकात जाणे, गाणे गाणे ह्या गोष्टींना प्रतिष्ठा नव्हती. भीमसेनजींच्या वडिलांची इच्छा देखील त्यांनी आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे अशी होती. पण स्वरवेड्या भीमसेनला इतका धीर धरणे शक्य नव्हते. बारा-तेरा वर्षांचा भीमसेन चक्क घरातून पळून गेला. जवळ पैसे नाहीत, कुठे जायचे ठाऊक नाही. पण संगीतावरील प्रेमापोटी त्याने हे धाडस केले होते.  गदग ते ग्वाल्हेर असा प्रवास त्यांनी रेल्वेने लपतछपत, विदाऊट तिकीट प्रवास करत केला. प्रवासात ते गाणे म्हणत. लोक गाणे ऐकून पैसे देत, जेवण देत. एकदा तर विनातिकीट प्रवास करताना त्यांना पकडण्यात आले. शिपायाने त्यांचे गाणे ऐकले मात्र आणि खुश होऊन त्यांना सोडून दिले. असा त्यांचा गाण्यासाठीचा प्रवास सुरू होता. त्यांना शोध होता तो गाण्याची दीक्षा देऊ शकेल अशा गुरूचा.  असाच प्रवास करत ते पंजाबमध्ये जालंदरला पोहचले. तिथे “आर्य संगीत विद्यालय” होते. तिथे भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. त्यांच्याकडे शिकायला त्यांनी सुरवात केली. तिथे “हरी वल्लभ का मेला” नावाचा संगीत महोत्सव भरायचा. देशभरातून तिथे गायक येत. महाराष्ट्रातूनही येत. तिथे भीमसेन गायकांच्या मागे साथीला तंबोरा घेऊन बसत. एकदा जेष्ठ शास्रीय गायक विनायकबुवांनी त्यांना पाहिले. ते म्हणाले, “अरे गाणंच शिकायचं असेल तर इथे काय करतोस? तुझ्या घराजवळच तर गुरु आहेत.” अशाप्रकारे गुरूचा शोध पूर्ण होऊन ते  कुंदगोळला रामभाऊ म्हणजेच सवाई गंधर्व ह्यांच्याकडे गाणे शिकू लागले. अर्थात तो काळ गुरुशिष्य परंपरेने शिकण्याचा होता. आजच्या क्लासेस मध्ये गाणे शिकण्याच्या काळात त्यावेळेसच्या वातावरणाची कल्पना करता येणेही अवघड आहे. पहाटे विहिरीवरून पाणी भरण्यापासून दिवसाला सुरवात व्हायची. ह्या गुरुसेवेतून तोच ताऊन सुलाखून बाहेर पडायचा, ज्याची गाण्याची जिद्द तशीच प्रचंड असायची.

    आजही त्यांच्या पहिल्या जाहीर बैठकीची आठवण जुने जाणते सांगतात. ती बैठक पुण्याला झाली होती. पंडितजींनी मियामल्हार सुरू केला आणि बाहेर धो धो पाऊस पडू लागला. तानसेनची कथा खरी झाली असेच त्यावेळेस श्रोत्यांना वाटले. त्या पावसाळी मेघांआडून एका स्वरभास्कराचा उदय होत होता. आज कल्पना केली तरी रोमांचित व्हायला होते की ह्या मैफिलीला पेटीवर पु. ल. देशपांडे होते. वसंतराव देशपांडेही तिथे होते. ह्या तिघांचे विलक्षण मैत्र होते. ह्या त्रिकूटाचे गाणे म्हणजे ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले “इंद्रायणी काठी देवाची आळंदी” भीमसेनजींनी गायलेल्या ह्या अभंगाला चाल
    पु. ल. देशपांडे यांची तर ऑर्गन साथ वसंतराव देशपांडे यांची. वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी ह्यांच्या मैत्रीचा हा किस्सा तर निव्वळ अफलातून म्हणावा असा. “कट्यार काळजात घुसली” या नाटकात वसंतरावांना तबला-साथ करायचे नाना मुळे. एकदा पंडितजी त्यांना आपल्या साथीला मंगळुरला घेऊन गेले. दुसर्‍या रात्री सोलापूरला कट्यारचा प्रयोग होता. मंगळुरमध्ये मैफल संपल्यावर त्यांनी नाना मुळेना घेऊन गाडी सुरू केली. स्वतः
    नॉनस्टॉप गाडी चालवत मित्राच्या तबलजीला सोलपुरात आणून सोडला. इतकंच नव्हे तर हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे मडके, तिळकूटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन “ए बुवा, येता येता हुबळीला ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा आणि रात्री हे चेपा पोटात.” असा दम भरून ते पुण्याला रवाना झाले.

    जेष्ठ संगीतकार पद्मविभूषण श्रीनिवास खळे यांनी दोन भारतरत्न अर्थात पं. भीमसेन जोशी आणि गान सरस्वती लता मंगेशकर ह्यांना “राम शाम गुण गान” ह्या ध्वनीमुद्रिकेच्या निमित्ताने एकत्र आणून रसिकांना आनंद ठेवा प्राप्त करुन दिला. शिवाय “सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, जे का रंजले गांजले, आरंभी वंदिन अयोद्धेचा राजा” अशा सुंदर संत रचनांनी महाराष्ट्र भक्तिरंगी रंगून गेला.

    जेष्ठ संगीतकार राम फाटक यांनी पुणे आकाशवाणीवरील स्वरचित्र ह्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” हा अभंग गाऊन घेतला आणि संतवाणी ह्या अजरामर कलाकृतीचा जन्म दिला. त्यांनी पंडितजींकडून “सखी मंद झाल्या तारका” सारखे भावगीतही गाऊन घेतले. पंडितजींनी चित्रपटासाठी पार्श्वगायनही केले. “रम्य ही स्वर्गाहून लंका” हे त्यांनी गायलेले गीत सुप्रसिद्ध आहे. त्यांनी “मिले सूर मेरा तुम्हारा” केवळ गायले.

    त्यांच्या गायनकलेचा सन्मान संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, याचबरोबर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन करण्यात आला.

    आज भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतीला वंदन करताना महाराष्ट्राला लाभलेल्या ह्या संपन्न सांगीतिक वारशाची आठवण होते. आजची तरुण पिढी आवडीने शास्रीय संगीत ऐकते आहे, गाणे शिकते आहे, हे संस्कार ह्या पिढीवर करण्यात पंडितजींचे योगदान अतुलनीय आहे.

    Read more

    जानेवारी २०२२ – नवे वर्ष नवे संकल्प

    नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आपण निश्चितच मनाशी संकल्प करतो. हे वर्ष कसे जावे, त्यामध्ये आपल्याला काय काय साध्य व्हावे याविषयी मनात आखणी करतो. अनेकदा ते कागदावर मांडतो. हे करणे योग्यच आहे कारण आपले ध्येय निश्चित केल्याशिवाय आपण त्यापर्यंत पोहचण्याचा रस्ता कसा ठरवणार? हे नवे वर्ष म्हणजे एक नवी संधी आहे. गेल्या वर्षी काय काय कमावले ह्याचा आनंद आहे आणि तो आपण साजरा करतो आहोत. त्याच बरोबर काय राहून गेले किंवा नव्याने काय हवे आहे ह्याचाही वेध घेत आहोत.

    नवीन वर्षाचे संकल्प काय असावेत? असा जर विचार केला तर प्रामुख्याने ते तीन घटकात विभागता येतात. १. व्यक्तिगत संकल्प  २. कामाशी निगडीत किंवा विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासाशी निगडीत संकल्प आणि  ३.  कौटुंबिक संकल्प

    अनेकदा आपला अनुभव आपल्याला हे सांगतो की वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहाने केलेले संकल्प वर्षभर काय पहिला महिना संपता संपता विरुन जातात. प्रयत्न, त्यातील सातत्य कमी पडते. आणि काही महिन्यांनी आपण निराश होतो आणि तो विचारच सोडून देतो. मग वर्षभर लिहिण्यासाठी आणलेली डायरी धूळ खात पडते, उत्साहात घेतलेली जिमची अॅन्युअल मेंबरशिप वाया जाते, कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा ठरवलेला असतो पण ऑफिसमध्ये सतत काहीतरी घडत राहते आणि ठरवलेले प्लॅन्स कॅन्सल होत राहतात. कुठल्या तरी एखाद्या अवघड प्रसंगात लक्षात येते, अरे ती वर्षाच्या सुरवातीला ठरवलेली गोष्ट केली असती तर?….तुमचाही अनुभव थोड्याफार फरकाने असाच आहे ना? नो प्रॉब्लेम. हे वर्ष अपवाद ठरवू या. या वर्षीचे संकल्प प्रत्यक्षात उतरवू या. स्वप्न साकार करू या. आता तुम्ही विचाराल, ही जादू कशी घडणार आहे? तर जादू नाही आपण सवयींचे शास्र समजून घेऊया. कारण आपल्या संकल्पाच्या यशासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करणे अपेक्षित असते. म्हणजेच दुसर्‍या शब्दात आपल्या काही जुन्या सवयी सोडायच्या असतात आणि काही नवीन सवयी लावून घ्यायच्या असतात. ह्या साठी आधी आपण सवयी कशा अंगी बाणवायच्या ह्याचा विचार करूया. या संदर्भात आपण सर्वसामान्यपणे काय चुका करतो त्याचाही विचार करूया.

    छोटी सुरवात 

    आपल्या डोळ्यासमोर जरी मोठे ध्येय असले तरी आपल्याला एकदम शिखरावर झेप घेणे शक्य नाही. पण शिखराच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल महत्त्‌वाचे आहे. ह्या बेबी स्टेप्सचे महत्त्‌व आपण ओळखले पाहिजे. अनेकदा आपण इथेच गल्लत करतो. म्हणजे मी रोज एक तास व्यायाम करेन असे आपण ठरवतो. सवय नसल्यामुळे अर्ध्या तासात दमतो. मग एक तर आपण तिथेच थांबतो किंवा कसाबसा रेटून त्या दिवशी तास पूर्ण करतो. मग दुसर्‍या दिवशी अंग दुखते. मग जायचा कंटाळा. हो न? आता हेच जर आपण छोट्या गोष्टीपासून सुरवात केली तर रोज अर्धा तास व्यायाम करुन सुरवात केली तर? एक तर ते सोपे वाटेल. हळूहळू

    स्टॅमिना वाढेल. मग तीस मिनिटाची पंचेचाळीस मिनिटे करणे फार अवघड जाणार नाही. आणि आपण तासभर व्यायामाला कधी स्थिरावलो हे लक्षातही येणार नाही.

    हे सगळ्याच बाबतीत लागू करता येते.

    तुम्हाला वाचन करायचे आहे. रोज दहा पाने वाचून सुरवात करा.

    लिखाण करायचे आहे. एकदम दहा हजार शब्द एका दिवसात नाही लिहून होणार. ३०० शब्द रोज लिहून सुरवात करता येईल.

    गाण्याचा / नृत्याचा रियाज करायचा आहे. अभ्यास करायचा आहे. दिवसभरातली २० मिनटे निश्चित करा.

    कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तर मोठ्या कौटुंबिक सुट्टीचा विचार करताना रोज दहा मिनिटे एकत्र काढता येतील का हे तपासा.

    म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबाचे मोल लक्षात घ्या. सुरवात छोटी असेल पण परिणाम मोठा साधला जाणार आहे.

    स्वतःचे कौतुक करा

    आपण अनेकदा स्वतःचे सगळ्यात वाईट निंदक असतो. स्वतःच्या चुका आपल्याला ठळकपणे दिसतात. त्यासाठी आपण मनातल्या मनात स्वतःलाच दोषही देतो. पुष्कळवेळा स्वतःचे कौतुक करायला मात्र विसरतो. स्वतःचे कौतुक करुन बघा.

    जेव्हा आपण एखादी गोष्ट केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटतो तेव्हा किती छान वाटते ह्याचा अनुभव घ्या.

    हे कौतुक करण्यातला एक अंतर्गत मुद्दा हा की त्यासाठी स्वतःची प्रगती तपासा त्याचा रेकॉर्ड ठेवा. आजकाल ह्यासाठी अनेक अॅपस्‌ आपल्या मोबाईलवर विनामूल्य उपलब्ध असतात. आपण आठवडाभर एखादी गोष्ट सतत केली की तो आठवड्याचा आलेख बघताना काही मिळवल्याची जी अनुभूती आहे तीच तुमची पुढील आठवड्याची प्रेरणा ठरणार आहे.

    –  डॉ. समिरा गुजरजोशी


     

    मकर संक्रांती

    श्रीगणेशाय नम:

    श्री सरस्वत्यै नम:

    श्री शके १९४३ प्लवनाम संवत्सरे, विक्रम संवत २०७८ पौष शुक्ल द्वादशी, रोहिणी नक्षत्रात, ब्रह्मा योग सुरु असताना, बालव करण सुरु असताना शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ शुव्रÀवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २.२८ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. ही मकर संक्रांती बालव करणावर होत आहे. म्हणून वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. दूध पीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारना व मिश्रा असून नक्षत्र नाव नंदा आहे. सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे. आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे.

    संक्रांतीपर्वकाळामध्ये दान प्रकार : संक्रांतीच्या पुण्यकाळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ भरलेले भांडे, तीळ, लोकरीचे वस्र, तूप, सोने, भूमी, गाई, कपडे इत्यादी दाने द्यावीत असे सांगण्यात आले आहे.

    नम्र विनंती : दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी काही चुकीच्या अफवा पसरविल्या जातात. तरी कुणीही त्यावर विश्वास ठेवू नये आणि अशा अफवा पसरवू नयेत.

    Read more

    डिसेंबर २०२१ – गर्भसंस्कार

    . नंदिता पालशेतकर

    गेलं वर्ष अनेक बाबतीत करोनानं गिळलं खरं, पण म्हणून काही निसर्गाचं चक्र थांबत नाही. फुलं फुलत होती, फळांनी झाडं लगडत होती. पशुपक्षांची पिल्ल जन्माला येत होती तसंच या काळात अनेक कुटुंबात नव्या पाहुण्याची देखील चाहूल लागली. घरात बाळ येणार याचा आनंद काही वेगळाच असतो. पण या काळात त्या आनंदाला एक धास्तीची, भीतीची किनारही होती. गर्भधारणा झालेल्या स्त्रीला किंवा नव्यानं जन्माला आलेल्या बाळाला करोना पासून दूर ठेवण्याचं मोठ आव्हान डॉक्टरांपुढे तसंच कुटुंबियां पुढेही होतं. घरामध्ये स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणे गरजेचे होते. गर्भवती स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं होतं. एरवी सर्वसाधारण परिस्थितीत स्वच्छतेचे वा आहाराचे नियम इतके काटेकोरपणे पाळले जात नव्हते जे या काळात पाळले गेले. त्यामुळे या काळात जन्माला आलेली बाळं कदाचित्‌ अधिक निरोगी असू शकतील.  जर हे खरं असेल तर हे नियम पुढे कायम पाळले जाणे अत्यंत आवश्यक आहे.

    काहीही खाण्­यापूर्वी  हात स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्­या किंबहुना बाहेरून कुठूनही घरी आलात की हात–पा­य स्वच्छ धुतलेच पाहिजेत.

     गर्भधारणा प्लॅन करण्यापूर्वी किमान ३ महिने आधी शरीराला आसनांची, मनाला ध्­यानाची सवय लावावी. सकाळी शक्य तितक्या लवकर रोज किमान पंधरा मिनिटं योगासनं आणि ध्­यानधारणेमुळे शरीर आणि मन ताजेतवाने होऊन स्नायूंना शक्ती मिळते.

      गर्भधारणेपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून बघावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२% किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. थॉयरॉइडची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह, रक्तदाब यासारख्या अचानक अणि कधीकधी तत्कालीन उद्‌भवणार्‍या रोगांचीही तपासणी करुन घ्यावी.

     स्त्रीने वजनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. जर लग्नानंतर काही कारणाने वजन  खूप वाढले असेल तर ते आटोक्यात आणून मगच बाळाचा विचार करावा.

     बाळाची चाहूल लागली की डॉक्टर कोण असावा या गोष्टीचा सगळ्यात पहिल्यांदा विचार केला पाहिजे. गर्भवती स्त्रीमध्ये आणि
    डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणं अतिशय आवश्यक आहे. जे
    डॉक्टर संवाद साधणं टाळत असतील किंवा प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देत नसतील त्या डॉक्टरांकडे आपले पूर्ण नऊ महिने सोपवतांना दहा वेळ विचार करा.

     प्रसूतीगृह स्वच्छ असावेच; त्याचबरोबर तिथला स्टाफही कार्यतत्पर असावा. प्रसूतीगृहात जास्तीतजास्त आधुनिक सोयी असाव्यात. होणार्‍या आईची तसेच बाळाची योग्य तपासणी व काळजी घेतली जाईल अशाच प्रसूतीगृहाची निवड करावी.

     गर्भधारणेनंतर आरोग्य उत्तम राखण्यासाठी पचनसंस्था उत्तम असावी त्यासाठी पचनसंस्थेबरोबरच दातांच्या आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे. श्वसनक्रिया उत्तम राहाण्यासाठी नियमित प्राणायाम करावा. रक्ताभिसरण उत्तम राहावे म्हणून नियमित योगासने करावी.

    हाय प्रोटीन आणि कॅल्शियम रिच अन्नाचे सेवन.

     गर्भावस्थेत मातेकडून मुलाला जो अन्नपुरवठा होत असतो, जी पोषक मूलद्रव्य, संरक्षक पेशी त्याच्याप­र्यंत पोहोचण्याची प्रक्रि­या घडत असताना ती स्त्री जर आनंदी असेल, तिच्या मनात सुखाची भावना असेल तर अशी सुखाची भावना मनात निर्माण करणारी जी रासायनिक द्रव्­यं असतात तीसुध्दा आईकडून मुलाकडे जातात.

     आई होण्याचा विचार केल्यावर करियरला दुय्यम स्थान देऊन येणार्‍या बाळाला अग्रक्रम दिला पाहिजे. तुमच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधनं येतात, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात म्हणून चिडचिड करुन मानसिक तोल ढळला तर याचा परिणाम गर्भावर होणार असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.

     बाजारातलं किंवा
    हॉटेलमधलं काहीही खाऊच नका. रेस्टॉरंटमध्ये खावंस वाटलंच तर ते रेस्टॉरंट स्वच्छ असावं याची खबरदारी घेतलीच पाहिजे. किंवा बाहेरचे पदार्थ घरी आणून अग्नीवर ठेवून पूर्ण गरम करा…
    मा­यक्रोवेव्हमध्ये  नाही…मगच खा.

     भुकेपेक्षा खूप जास्त खाऊ नये तसंच खूप कमीही खाऊ नये. त्यापेक्षा गरम भात, वरण, साजुक तूप, कोशिंबीर, तूप
    लावलेल्­या पोळ्­या, हिरवी भाजी, एखादे कडधान्य, ताक असा सात्विक आहार सगळ्यात उत्तम.

     आहारात भिजवलेले अंजीर, काळ्या

     मनुका, बदाम, खजूर, डाळिंब याचाही समावेश करावा. रात्रीच्­या आहारात पण हलकी मुगाची खिचडी किंवा फळे, दूध…. शक्यतो गायीचे असावे…. यांचा समावेश करावा.

     शारीरिक विधींना (लघवी/शौच) थांबवून ठेऊ नये. बर्‍याच स्त्रियांना या काळात जास्त वेळा लघवीला जावे लागते. याची त्यांना लाज वाटते अशीही उदाहरणे बघण्यात आहेत. अशा वागण्याचा परिणाम गर्भावर होत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.

     वेड्यावाकड्या ठिकाणी, वेडेवाकडं बसणं, ताडताड चालणं वा धावणं, वेडवाकडं वाकणं, अती वजन उचलणं, उंचावर चढणं, उगाचच दमणं, कोणत्याही वाहनातून वेडावाकडा प्रवास करणं, अती व्यायाम करणं किंवा पोहोणं या सारखे कोणतेही शारीरिक श्रम कटाक्षाने टाळलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे सतत झोपून किंवा बसून राहाणं हे ही योग्य नाही. आपल्याला झेपतील तशी आणि तितकीच कामं करावीत.

      घट्ट कपडे वापरु नयेत. कपडे स्वच्छ, कोरडे, सैलसर आणि मऊ कपडे वापरावे.  बाहेरून आल्यावर कपडे बदलण्याची सवय ठेवावी. तसेच रात्री झोपतांना दिवसभराचे कपडे बदलून झोपावे.

     या काळात शरीरातली उष्णता वाढते. त्यामुळे स्रि­यांना सतत ए.सी. मध्ये किंवा फुलस्पीड फॅन खाली बसावंसं वाटतं. थंड पाण्याने अंघोळ करावीशी वाटते, जे अजिबात योग्­य नाही. हातपाय उबदार राहिले पाहिजेत. दिवसातून दोनदा अंघोळ केलीत तरी पाणी किमान कोमट तरी असलेच पाहिजे.

     डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवडाभराचा जेवणाचा
    प्लॅन आखा. नियमीतपणे व्­यायाम, योगासने करा. कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ देऊ नका. मातृत्वाशी ओळख करून देणारा हा काळ खूप अद्‌भुत असतो. त्­याचं मनापासून स्वागत करा, आनंदाने अनुभवा म्हणजे हे नऊ महिने अजिबात जड जाणार नाहीत.

    Read more

    नोव्हेंबर २०२१ – होमिओपॅथीक उपचार: एक वरदान

    . अपर्णा जोशी एम्‌.डी.(होमिओपाथी)

    आयुष मंत्रालयाने कोरोना पासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक आर्सेनीक अल्बम ३०, औषधांचा डोस घेण्याची शिफारस केली आणि नव्यानं होमिओपॅथीविषयक चर्चा सुरु झाली. कोरोनाच्या रोग्यांसाठी शासनाने फक्त अ‍ॅलोपाथीचा उपचार करणार्‍या डॉक्टरांचा विचार केला होता. या पार्श्वभूमीवर जेव्हा होमिओपॅथीक आर्सेनीक औषधांचे महत्त्व समोर आले तेव्हा आम्ही होमिओपाथी
    डॉक्टरांनीही कोरोनावरील उपचारांचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवली.

    होमिओपाथी औषधांच्या प्रभावाविषयी जाणून घेण्याआधी होमिओपाथीने विविध आजारांच्या काळात जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तब्बल २००वर्षांपूर्वी डॉ.सॅम्युअल हानेमान यांनी होमिओपाथीचा शोध लावला. त्यानंतर जेव्हा जेव्हा अशा काही महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा होमिओपाथीने प्रभावकारी काम केले आहे याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. जसे १८३०साली आलेल्या कॉलरा महामारीच्या काळात इतर वैद्यकशास्रांच्या तुलनेत होमिओपाथी उपचार घेणार्‍या रोग्यांमध्ये मृत्युदर फक्त १०० : ७ होता. याच प्रकारची सरासरी यलो फिव्हर, स्पॅनिश फ्लूपासून नुकतंच तोंड द्यावं लागलेल्या स्वाईन फ्लू, डेंग्यू पर्यंतच्या आजारांमधली आहे.

    तसाच होमिओपाथीमधील किलेशन उपचार हे ही एक वरदानच आहे. वातावरणात जे जड धातू असतात त्याच्याशी मानवाचा सहज संपर्क होत असतो. आणि ज्या ठिकाणी हे प्रमाण खूप जास्त असते त्या ठिकाणी अन्न, पाण्यातूनही विषबाधा होऊ शकते. वाढत्या उद्योगधंद्यामुळे, रहदारीमुळे प्रदूषणाचा त्रास वाढू लागला आहे. या प्रदूषणाबरोबर जेव्हा जड धातूंचा संयोग होतो तेव्हा हे विषारी घटक क्रिया घडवून आणतात आणि माणूस आजारी पडतो. या विषारी घटकांचे बंध मोकळे करण्याचे कार्य किलेशन उपचार पद्धती करत असते.  होमिओपाथीतील ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे हे सिद्धही झाले आहे.

    कोव्हिड-१९च्या काळात आयुष मंत्रालयाने आर्सेनिक औषधाची शिफारस केली आणि तो डोस अनेकांनी घेतला देखील. त्याचा कोणाला किती आणि कसा फायदा झाला याविषयी तर काही पुरावा उपलब्ध नाही. आर्सेनिकचा उपयोग रुग्णाच्या शरीरातील आरोग्यास घातक  अशा लेड, आर्सेनीक अशा विषारी द्रव्यांचा निचरा करण्यासाठी केला जातो. अर्सेनीक औषधात जे विषारी गुणधर्म असतात तेच शरीरातील विषारी घटकांचा नायनाट करतात. म्हणूनच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रायलाने आर्सेनिकची शिफारस केली.

     पण एक मात्र नक्की की होमिओपाथीत असं एखादं औषधं सर्वसाधारणपणे सगळ्यांसाठी गुणकारी ठरेलच असं अजिबात नाही. होमोओपाथी हे व्यक्तिगत उपचारांवर आधारीत आहे. चार रोगी जरी एकाच प्रकारच्या सर्दी-पडश्याने आजारी असतील तरी त्या प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार औषोपचार केला जातो.

    हाच नियम आर्सेनीक अल्बम ३०च्या बाबतीही लागू पडतो. जोपर्यंत रोग्याच्या प्रकृतीस कोणती आणि कशी औषधे आवश्यक आहेत; तोपर्यंत हे एक औषध अमूक एका रोगाची लागण होण्यापासून तुम्हांला सुरक्षित ठेऊ शकते म्हणणे योग्य नाही. त्यासाठी या रोगाची लागण झालेल्या रोग्याला पहिल्या दिवसापासून होमिओपाथीचे उपचार सुरु करणे गरजेचे आहे.

    मुळात कोव्हिड-१९च्या काळात रोगाची लागण होऊच नये यासाठी बहुतांश लोकांनी…… रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, स्वच्छता आणि योग्य अंतर पाळण्याचे नियम अंगिकारणे, गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर करणें….. यासारखी आधीच काळजी घेतली होती. या काळजी बरोबरच होमिओपाथी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार त्या काळात अनेकांनी केला नसेल. जो आता करण्यास काहीच हरकत नाही. म्हणतातच ना देरसे आए पर दुरुस्त आए….

    Read more

    ऑक्टोबर २०२१ – निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

    गेल्या वर्षाने आपल्याला रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व शिकवलं. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर योग्य आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दिनचर्येचा अपरिहार्य भाग असल्याच पाहिजेत. रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळच मिळत नाही, या सबबीखाली व्यायाम टाळणं हे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही हे कायम लक्षात ठेवावे.

    आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत, याबद्दल…

    व्यायामामुळे होणारे फायदे :

    १)  व्यायाम केल्यामुळे कार्यक्षमता वाढते, कारण व्यायामामुळे शरीराला आणि सर्व अवयवांना प्राणवायू म्हणजेच
    ऑक्सिजन जास्त प्रमाणात पोचवला जातो. ज्यामुळे शरीरातील उत्साह व चैतन्य वाढते.

    २)  व्यायामामुळे वाढलेले वजन कमी करण्यास आणि वजन कमी असल्यास ते वाढण्यास मदत होते. व्यायामामुळे वाढलेल्या कॅलरी वापरल्या जातात.

    ३)  व्यायामामुळे शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे शारिरीक स्वास्थ्य टिकून राहते, मनाची स्थिती सुधारते, आत्मविश्वास वाढतो. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती सुधारते आणि काम करण्याची सहनशक्ती वाढते.

    ४)  व्यायामाने लवकर आणि शांत झोप लागते.

    ५)  व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि ¿दय, मेंदू  यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळे ¿दयाचे विकार, रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो..

    ६)  स्त्रियांमध्येही अनेक रोगांसाठी व्यायाम महत्त्वाचे आहेत. गर्भावस्थेतसुध्दा नियमित व्यायाम केल्यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते.

    ७)  त्वचा हा एक शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. व्यायामामुळे त्वचेलासुध्दा रक्तपुरवठा वाढविला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात आणि त्वचेला पोषक घटक पोचवले जातात.

    काही दररोज करण्यासाठीचे व्यायाम :

    सूर्यनमस्कार

    अ) सूर्यनमस्कारामुळे पचनसंस्थेचे काम व्यवस्थित होते.

    ब) यामुळे पोटावर ताण आल्याने पोटाची जाडी कमी होण्यास मदत होते.

    क) सूर्यनमस्कारामुळे झोपेच्या समस्या कमी होऊन झोप शांत लागते.

    ड) सूर्यनमस्कारामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो.

    इ) यातील स्थितीमुळे शरीरामध्ये लवचिकता येते.

    फ) सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे अनियमित मासिक धर्म नियमित होण्यास मदत होते.

    ग) तसेच सूर्यनमस्कारामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे समस्यांमध्ये देखील फायदा होतो.

    वेगाने चालणे

    वेगाने चालणे हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. दररोज चालण्यामुळे रक्तदाब, डायबिटीज, वजनच्या समस्या, मानसिक ताणतणाव वगैरे समस्यांवर रोज चालण्यामुळे फायदा होतो.

    सायकलिंग

     कोलेस्टेरॉल वाढणे यांसारख्या समस्येवर सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे.

     सायकलिंग केल्याने ह्यदयरोगाचा धोका या व्यायामुळे टाळला जाऊ शकतो.

    सायकलिंग हा व्यायाम दररोज केल्यामुळे श्वास संस्थेतील स्नायूंचे कामसुध्दा उत्तम प्रकारे होते.

    सायकलिंग केल्यामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि त्यामुळे हातापायातील स्नायूंचे कार्य सुधारते आणि हालचाली करण्यामध्ये सोपेपणा येतो.

    प्रत्येकाने आपल्या आवडी व निवडीनुसार दररोज करण्याचा व्यायाम ठरवावा. आठवड्यातून  कमीत कमी पाच ते सहा दिवस तरी अर्धा तास व्यायाम करावा. एकाच प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा दिवसाआड वेगळ्या पध्दतीचा व्यायाम करावा. आपण त्रÝतुमानानुसार देखील व्यायाम बदलू शकतो.

    Read more

    सप्टेंबर २०२१ – लॉकडाऊन डायरी

    अनिकेत परशुराम आपटे

    ‘आज रात बारा बजे से… संपूर्ण देश लॉकडाऊन होने जा रहा है। जो जहाँ है, वही रहे  बाहर नहीं निकलना है“ । २२ मार्च या दिवशी मोदीजींचे हे शब्द कानी पडले आणि माझ्यासह जवळ जवळ सर्वांचंच धाबं दणाणलं.

    लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कामासाठी बाहेर पडणार्‍यांनीच त्या काळातली खरी परिस्थिती अनुभवली…….

    एकमेकां सहाय्य करू

    सुट्टी कोणाला नको असते..!! पण अशी जबरदस्तीची सुट्टी… बरं, घरातल्या बायकांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कामवाल्या बायका येणं बंद झालं. झाड-लोट, कपडे-लत्ते, भांडी-कुंडी आणि स्वयंपाक, असे चार सामने त्यांच्यासमोर उभे ठाकले. कामाचं विभाजन हा उत्तम आणि एकमेव पर्याय समोर होता. आई व बायकोने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर झाड-लोट आणि कपडे-लत्ते ही जबाबदारी माझ्यावर आली.

    ‘एकमेकां सहाय्य करू…“ हे वचन जसं घरात दिसू लागलं, तसं ते सोसायटीतही जाणवलं. २२ मार्चला ती घोषणा झाल्या झाल्या सोसायटीच्यों प्aूेAज्ज्ु rदल्ज् वर चर्चा सुरू झाली. काय करायचं… सामान कसं काय आणायचं… सुरक्षेचं कसं करायचं… हे विषय ओघाने आलेच. माझ्यासह सोसायटीतल्या अजून दोघांनी ही जबाबदारी स्वीकारली.

    बदललेला दृष्टिकोन

    अत्यावश्यक सेवांमध्ये बँकांचाही समावेश होता. त्यामुळे काहीही झालं तरी बँका सुरूच राहणार होत्या. मी बँक कर्मचारी असल्याने मला काही झालं तरी कामावर जावंच लागणार होतं.  लॉकडाऊनचं कडक पालन सुरू असल्याने येणार्‍या ग्राहकांची संख्या जवळ जवळ नगण्यच होती. पण आमच्याबरोबरची  ग्राहकांची बदललेली वागणूक नक्कीच जाणवत होती. मेलेले उंदीर पकडावे तसे काही ग्राहक आम्ही दिलेल्या नोटा, कागद हाताळायला लागले; तर भिकार्‍यासमोर पैसे फेकावेत तसे काही ग्राहक पैसे व कागद आमच्यावर लांबूनच फेकू लागले. अशा वेळी वाटायचं, ‘या अशा अपमानित करणार्‍या, हेटाळणी करणार्‍या ग्राहकांसाठी का आम्हाला बसवलं इथे…“ पण यातही काही ग्राहक आमची काळजीही करत होते. ‘स्वत:ची काळजी घ्या… लवकर घरी जा… आज काम नाही झालं तरी चालेल, माणसं कमी आणि काम जास्त हे मला माहीत आहे…“ अशी वाक्य ऐकताना नवा हुरूप यायचा कामाचा…

    अपेक्षाभंग आणि कानगोष्टी

    काहींच्या मते २१ दिवसांचा हा कैदवास होता. तो संपत येण्याची तारीख जशी जवळ येत होती, तसे सगळे आनंदीत होऊ लागले. एका बाजूला जिथे लॉकडाऊन संपणार ही चर्चा होती तिथेच दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्याही बातम्या येत होत्या. अशातच आपल्या सर्वांच्या अपेक्षांना सुरूंग लावणारा, लॉकडाऊन वाढल्याचा निर्णय समोर आला. इतके दिवस एक सुट्टी  म्हणून घेतलेले हेच दिवस लॉकडाऊन वाढल्याने आता वेगळेच वाटू लागले. कोरोनाबद्दलची भीती आता वाढू लागली होती. त्यातच कानगोष्टींना ऊत आला. कोणी सांगत होतं, ‘कोरोना काही जात नाही… आपण सगळे मरणार यामुळे…“ कोणी बोलत होते, ‘हा कोरोना आता आपलं शरीरच नाही तर पैसाही पोखरणार… नोकर्‍या जाणार… खायची भ्रांत पडणार…“ अफवांना ऊत येत होतां.

    अंगवळणी पडले सारे… दारात आले कोरोनाचे वारे…

    हे लॉकडाऊन आता माझ्यासह सर्वांच्याच अंगवळणी पडलं होतं. जसं लॉकडाऊन वाढत गेलं तसे ग्राहकांच्या काळजीचे सूरही बदलत गेले. ‘मिळतात ना इतक्या सवलती, मग करा की जरा जास्तीची कामं…“

    अचकत-बिचकत का होईना, पण धीम्या गतीने आणि योग्य ती काळजी घेऊन आयुष्य सुरू होतं. असं असतानाच एक दिवस मी ऑफीसच्या कामात व्यस्त होतो तेव्हा घरून फोन आला. बातमी ऐकून शॉकच बसला. आमच्या सोसायटीत एकाच परिवारातल्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. इतकी दक्षता घेऊनही, स्वच्छतेबाबत पूर्ण निगा राखूनही कोरोनाचं संकट सोसायटीत शिरलंच होतं. यामुळे आम्ही सर्वचूा हेग्दह मध्ये होतो. आठवड्याभरात ती तिघं परत देखील आली. त्या परिवाराची गाडी पूर्वपदावर येईपर्यंत सर्व बिर्‍हाडकरूंनी आळी-पाळीने त्या परिवाराच्या दिवसभराची खान-पान व्यवस्था आपल्या हाती घेतली…

    वागणुकीतला बदल

    सोसायटीतल्या सर्वांनी त्या बाधित परिवाराला सावरायला आणि पुन्हा उभं रहायला मोलाची मदत केली खरी; पण बाहेरच्या जगाची आमच्याशी असलेली वागणूक मात्र बदलली. आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी आस-पासच्या दुकानांमध्ये, वसाहतींमध्ये वार्‍यासारखी पसरली. त्यावेळी सामान देताना, ते आमच्याकडे टाकल्यासारखं करणे, ‘त्या परिवाराला काही दिवस दूर का पाठवत नाही तुम्ही…“ अशी सतत विचारणा करणे, ‘तुमच्याकडून कॅश किंवा कार्ड पेमेंट आम्ही घेणार नाही… गूगलपे फोनपे नसेल तर सामान घेऊ नका…“ असं सांगणे, हे प्रकार काही दुकानदारांकडून व्हायला लागले. शिवाय परिसरातील काही राहिवासी तर, आम्ही कोणी अस्पृश्यच आहोत असे वागत होते आमच्यासोबत…

    इतकंच कशाला, मी ज्या शाखेत काम करतो तिथल्या काही ग्राहकांपर्यंतसुद्धा ही बातमी पोहोचली. तेव्हा काही ग्राहक तर माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करू लागले. एक-दोन ग्राहकांनी तर चक्क त्यांची खाती बंद करून शाखेतून काढता पाय घेतला. हे सर्व पाहून मन खूप व्यथित झालं. या लोकांमधले अर्धे-अधिक लोक मी राहतो त्याच परिसरातले असल्याने, मी अगदी लहान असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते काका, ती मावशी, ते दादा, लहानपणापासून इतके मोकळे वागले माझ्याशी, आणि आज ही अशी तिरस्काराने भरलेली वागणूक… आणि तीही माझीच नाही, तर सोसायटीतल्या कोणाचीच काहीच चूक नसताना… पण करावे काय… शेवटी, ‘आलिया भोगासि…“ असंच म्हणावं लागेल आता… कोरोनाने  नुसती मानवी शरीरंच नष्ट केली असं नाही, तर जिवंत व धडधाकट व्यक्तींची बुद्धीही भ्रष्ट केली हेच खरं…

    संकट काही थांबणार नाहीजगरहाटी चालू राही

    पहिला लॉकडाऊन, मग दुसरा, तिसरा, चौथा… गेले साडेपाच महिने हेच चक्र सुरूच राहिले. मला खात्री आहे, भाईंच्या  ‘असा मी आसा मी“ मधले भिकाजी कडमडेकर जोशी आज असते तर नक्कीच म्हणाले असते, ‘तूंस सांगतो मी बेमट्या…  हा कोरोना नावाचा विषाणू, सावकाराच्या व्याजासारखा आहे हो… व्याज जसें कर्ज घेणार्‍याची पाठ सोडीत नाही, तसेंच हा विषाणूदेखील आता आपल्याला चिकटला आहे हो… तेंव्हा, घाबरत बसण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यायची आणि कामाला लागायचे, कसें…

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter