आसपास असलेल्या वेदना, समस्या, ताण, तणाव यांमध्ये महत्त्वाचे असते ते आनंदी राहणे. समस्त मानसिक विकारांवर ‘‘आनंदी राहणे” हा एक उत्तम इलाज आहे.
आनंदी राहणे म्हणजे काय?
आनंद सर्वांना हवाहवासा असला तरी तो बाजारात विकत मिळत नाही. तो सकारात्मक विचारशैलीतून निर्माण होतो.
रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे!” प्रत्यक्ष जीवनात सर्वसुखी कोणीच नसते. प्रत्येकाला दु:खाचा सामना करावा लागतोच. काहींना त्यांच्या समस्यांचा सामना करायला आवडते तर काहींना त्यांपासून पळ काढायला. या समस्यांना सक्षमपणे तोंड देणार्या व्यक्तींमध्ये निराश न होता संघर्ष करण्याची कुवत असते.
एका बाजूला संघर्ष करून समस्यांवर विजय मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणार्या व्यक्ती असतात तर दुसर्या बाजूला क्षणिक दु:खाने कोलमडून जाणारी, सतत गांजलेला, भविष्यातील समस्यांचा ताण वर्तमानात घेऊन वावरणारी कायम चिंतातूर राहणारी मंडळीही आसपास दिसतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता यावर तुमची क्षमता ठरते आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रत्येकात असते. मात्र समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची काही जणांची तयारीच नसते.
स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे ठरते. या विश्वासाच्या बळावरच आयुष्यामध्ये मोठा पल्ला गाठणे शक्य होते. यासाठी काही सहज साध्य नियम पाळणे गरजेचे ठरते.
लोकं काय म्हणतील या लोक लज्जेचे भय बाळगू नये.
आयुष्यात नेहमीच शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारे लोक लज्जेचे भय बाळगून आनंदी राहता येत नाही.
माणूस समाजशील प्राणी आहे. त्यामुळे बव्हंशी तो समाजावर अवलंबून असतो मात्र तरीही त्याला स्वत:चं अस्तित्वही असतं. ते विसरून तो जेव्हा फक्त लोकांचाच विचार करू लागतो तेव्हा तो इतरांना काय वाटेल या विचाराने स्वत:मध्ये तसा बदल करू लागतो. कधी-कधी स्वत:चं मन मारतो. अखेर दु:खी होतो. प्रत्येक कृतीचे उत्तर तुमच्याकडे असल्यास इतरांचा विचार करून दु:खी होण्याची गरजच काय? खरंतर सतत टीकेचा स्वर काढणार्यां पासून दोन हात दूर राहणेच उत्तम! कधीही कोणीही तुमच्यावर टीका केल्यास त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे व्यक्त व्हा. या जगात सर्वांचे समाधान करण्याची चूक करू नका. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे सगळ्यांना वाटेल तसे करता येणे अवघडच आहे. त्यामुळे जे तुम्हांला योग्य वाटते तेच करा.
आनंदी राहाणार्यांबरोबर रहा नकारात्मक विचार करणार्यांपेक्षा सकारात्मक विचार करणार्या व सदैव आनंदी राहणार्या व्यक्तीं बरोबर रहा. यामुळे येणार्या प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्यासोबत राहण्यामुळे संगतीचा परिणाम होऊन आपली विचारसरणी देखील सकारात्मक होऊ शकते.
सकारात्मक असणे म्हणजेच समस्या स्वीकारणे. त्यातून वाट काढणे होय. आपले निर्णय नेहमीच योग्य ठरतील असे नाही. कोणतेही निर्णय त्यामुळे होणार्या परिणामांवर अवलंबून असतात. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयाचे परिणामही चांगले वाईट असू शकतात.
तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर तुमचा मूड ठरू शकतो. विचार एक केंद्री होऊ नकारात्मक होऊ लागले तर मूडही वाईट होईल. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा. प्रत्येक गोष्टीचे चांगले-वाईट परिणाम होणारच. त्यामुळे वाईटातूनच चांगले शोधण्याचा प्रयत्न करा.
आनंदाची वाट पाहत राहू नका लहान-सहान गोष्टींमधून मिळवण्याचा प्रयत्न करा. आनंदी रहा. आनंद ही मनोवस्था असून, ग्लास अर्धा रिकामा आहे किंवा अर्धा भरलेला आहे, असे म्हणणार्या दोन मनोवस्थांच्या प्रकारच्या सकारात्मक व नकारात्मक विचार करणार्या व्यक्ती असतात. आनंद मिळविण्यासाठी धडपड केली तर पदरी निराशाच येईल. छोट्या-मोठ्या घटना किंवा प्रसंगांमुळे तुम्ही घाबरून गेलात तर आनंदा पासून खूपच दूर निघून जाल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंद तुमच्या जवळ राहील अन्यथा तुमच्यापर्यंत येणारही नाही.
सख्य संबंध अथवा मैत्रीसंबंध जोडा. एकही मित्र-मैत्रीण नसलेल्या व्यक्तीस दरिद्री म्हणतात. कारण अशा व्यक्तींजवळ त्यांच्या उरातील दु:ख, वेदना व्यक्त करून हलकी करण्यासाठी एकही व्यक्ती नसते. आनंदी व्यक्ती नेहमीच नवीन मित्रमंडळाच्या शोधात असतात. त्यांच्याशी प्रेमाचे, मायेचे सख्य संबंध प्रस्थापित करतात. ही एक सापेक्ष क्रिया आहे. जर तुम्ही एखाद्याला आनंद दिलात तर तो तुम्हांला आंनदी ठेवील. त्यामुळे चांगले, मित्रत्वाचे, सख्य संबंध जोडा व आनंदी व्हा.
परिस्थितीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा :
परिस्थिती मग ती कोणतीही असो कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अवघड परिस्थितीतून मार्ग काढणे होय. तुमच्या कठीण काळातही हसू शोधा, हसवा, हसत रहा. यामुळे चांगले विचार तुमच्या मनात निर्माण होतील आणि या विचारांच्या आधारे तुम्ही दु:ख, वेदना व प्रतिकूलता यांमधून वाट काढू शकाल. तुमच्या डोक्यात नकारात्मक विचारांनी गर्दी केली असेल तर थंड डोक्याने प्रतिकूलतेतून मार्ग काढणे शक्य होणार नाही.
स्वत: हसा व इतरांना हसवा :
‘‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते”. त्यामुळे एखाद्या हसतमुख व्यक्तीकडे पाहून त्याला कसलेही दु:ख नाही, असे म्हणून चालणार नाही किंवा सतत रडारड करणार्या व्यक्तींचे दु:ख मोठे आहे, असे समजूनही चालणार नाही. त्यामुळे हसत राहण्याची कला अवगत करा ती कोणत्याही भीतीचा सामना करण्यास आपल्याला सक्षम करते तसेच हसत राहण्याने मूडही आनंदीच होतो आणि अवघड प्रसंगातही तरून जाण्याचे बळ आपल्याला येते.भरपूर परिश्रम करा, स्वत:वर विश्वास ठेवा कोणीही तुमच्यापासून आनंद हिरावून घेऊ शकणार नाही.
पूर्वानुभवांपासून धडा घ्या
जर तुमच्या मनात काही कडू आठवणी असतील तर चांगल्या विचारांनी त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करा. आपल्या हातून घडलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. तुमच्या मनातील राग तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत परावर्तित करा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आत्मविश्वासाने पुन्हा कामाला लागा. जर तुमच्या निर्णयक्षमतेतून तुम्ही मानसिकदृष्ट्या सबळ असल्याचे सिद्ध करून दाखवा.