प्रथम आपण व्यसन (Addiction) म्हणजे काय ते जाणून घेऊ या. शब्दकोशाप्रमाणे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होणे म्हणजे व्यसन, ज्याच्यामुळे आपली शारीरिक व मानसिक हानी होते. अलीकडच्या काळापर्यंत व्यसनाचे वर्गीकरण म्हणजे केवळ दारू, जुगार, बेकायदेशीर ड्रग्स इत्यादी म्हणून केले जात होते. जसजसा काळ बदलला आणि गॅझेट्स हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे तसतसे एक नवीन व्यसन समोर आले आहे आणि ते म्हणजे “गॅझेट व्यसन” (Gadget Addiction). गॅझेट्स म्हणजे विशेषत: मोबाईलने संपूर्ण जग एका छोट्या बॉक्समध्ये वेढले आहे, जे प्रत्येकजण आपल्याबरोबर कुठेही बाळगू शकतो. सध्या मोबाईलला दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. हात आणि मणक्याचे आजार यासारख्या आरोग्याच्या धोक्याबरोबर मोबाईलमुळे तुमच्या भावनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. प्रत्येकालाच हे जाणवले असेल आणि प्रत्येक जण हे वाचताना ह्याच्याशी सहमत असाल/ असेल.
गॅझेट्स विशेषत: मोबाईलच्या व्यसनाधीन होण्यापासून तुम्ही स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकता हे मी शेअर करण्यापूर्वी व्यसनाची कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थोडे खोलात जाऊ या. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि भावनिक स्तरावर त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे प्रेम, काळजी, प्रशंसा, करुणा, दया इत्यादी आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे फॉलोअर्स, लाइक्स, कमेंट्स इत्यादीच्या रूपात ही गरज मोठ्या प्रमाणात गॅझेट्स पूर्ण करतात. एकदा का तुम्ही सोशल मीडियावर ते प्राप्त करण्यास सुरुवात केली की ती भावनिक गरज पूर्ण होऊ लागते आणि मनातील पोकळी भरायला सुरुवात होते. गॅझेट्सने प्रदान केलेल्या प्रत्येक लाइक्स व कमेंट्स मध्ये तुम्ही हळूहळू अडकत जाता आणि तुम्हाला समजण्याआधी गॅझेट तुमच्यावर कब्जा करतात. सतत सोशल मीडियावर आपण ऑनलाइन असण्याची शर्यत सुरू होते, यामुळे तुम्ही आपलं खरं आयुष्य जगण्यापासून दुरावता.
पहिले लक्षण म्हणजे फोमो (Fear of missing out) यामुळे प्रत्येक क्षणी तिथे ऑनलाईन (online) असण्याची आणि दिसण्याची गरज निर्माण होते. १०० पैकी ९५ लोक याला बळी पडतात आणि सतत ह्या भीती आणि दबावाखाली असतात की आपण काहीतरी मिस आऊट केलंय. आपण जमावापासून दूर होतोय (fear of being left out) ही भीती मानवाच्या मनातील सर्वांत खोल भीती आहे आणि ती नकळत ट्रिगर होते. तुम्ही आजूबाजूला बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अनेक लोक त्यांच्या जीवनातील विविध पैलूमध्ये “मै रह गयी” ह्या वर्तणुकीचे स्वरूप दर्शवीत असतात. सोशल मीडियाचा वापर करताना अजून एक फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दुर्लक्ष करु शकता, ब्लॉक करू शकता आणि डिलीट ही करू शकता जे तुम्ही वास्तविक जगामध्ये करू शकत नाही पण “अति तेथे माती” ही म्हण अगदी खरी आहे. ज्याक्षणी
गॅझेट तुमच्यावर हावी होतो त्याक्षणी ते व्यसन बनते. ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक गुंतागुंत होण्यास सुरुवात होते.
यावर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्याऐवजी दुसरे काहीतरी तुमच्या जीवनावर हुकुमत गाजवत आहे हे सत्य स्वीकारणे. एकदा जागरुकता आली की छोटे छोटे बदल आणि सोपे लक्ष्य सेट करून सुरुवात करा. आजच्या काळात गॅझेट न वापरणे हा पर्याय नाही तर आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणे ही एक निवड आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण का निवडू इच्छिता याची यादी करा. काही लोकांसाठी ही यादीच प्रेरणा बनू शकते, गॅझेटचा वापर मर्यादित करण्यासाठी. पण बहुसंख्य लोकांसाठी हे घडणार नाही. अशा परिस्थितीत गॅझेट्वर आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामांची यादी करा, जसे की कुटुंब – मित्रांना कॉल करणे, जगातील घडामोडींची महिती, ऑनलाइन व्यवसाय इत्यादि. तुमच्या गरजेनुसार प्राधान्य द्या आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करताना वास्तववादी होऊन करा म्हणजे तुम्हाला हे वेळेचे नियोजन मोडण्याचा मोह होणार नाही. आता स्वत:बरोबर थोडेसे कठोर (strict) राहून या वेळेच्या नियोजनाचे पालन करा, हे बहुतांशी लोकांकरता काम करेल.
आता काही मूठभर लोक शिल्लक राहतील ज्याच्यासाठी हे उपयोगी पडणार नाही. अशा लोकांकरता हे गॅझेट व्यसन कोठून येते हे पाहण्याची आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज येथे आहे, हे विविध उपचार पद्धती वापरून केले जाऊ शकते जसे समुपदेशन, रेकी, प्राणिक हिलिंग, पास्ट लाइफ रिग्रेशन (past life regression), संमोहन थेरपी, थीटा हिलिंग इत्यादि.
प्रत्येक उपचार पद्धतीची स्वत:ची एक स्वतंत्र उपचार करण्याची पद्धत असते आणि ते उपचार घेणार्यांना जे उत्तम आहे तेच देते. कोणत्याही उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या हीलिंगमध्ये विश्वास आणि समर्पण. हीलिंग एक प्रकिया आहे जी तुमच्या आयुष्याला चांगल्या रीतीने कलाटणी देते. उपचार पद्धतीमुळे नवीन संधी चालून येतात, बरे होण्यासाठी जागरुकता निर्माण होते. जी ट्रिगर आणि पोकळी गॅझेट् भरून काढत होती, ती हिल होते.
या अनोख्या तंत्रज्ञाने भावनिक उपचार प्राप्त करणार्यांना त्यांच्या अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन मूळ कारणं शोधण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यास मदत करते. उपचार पद्धतीमुळे दु:ख, पोकळी, एकटेपणा इत्यादीसाठी उत्तरे मिळतात. या उपचारपद्धतीमुळे वरील कारणाचे विविध स्तरांवर हीलिंग होते. जसे ग्रुप कॉन्शिअसनेस, बालपणाचे संस्कार, गर्भातील ट्रॉमा, पूर्वजांचे पॅटर्नस्, मागील जीवन (past life) इत्यादि.
आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. उपचार पद्धती ही ब्रह्मांडाने तुम्हाला प्रदान केलेली साधने आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता. हीलिंगचा उपयोग करून तुमचे जीवन हिल करा.
– निलिमा अमित