• भारी आणि किंमती साड्या, काठा-पदराच्या साड्या नेहमी उलटी घडी घालून सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. या साड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवू नका. त्यामुळे जर काळी पडते. या साड्यांना नेहमी ड्रायक्लिनिंग करा. वेळोवेळी त्यांच्या घड्या बदला.
  • ऑरेगंजा, टिश्यू, चंदेरी या साड्यांना दाबून ठेवू नका त्यामुळे घडीच्या ठिकाणी या साड्या फाटण्याची शक्यता असते. जर साडीवर काही सांडलं, पडलं तर लगेच स्वच्छ करा. पूर्ण साडी धुवू नका. कारण संपूर्ण साडी खराब होण्याची शक्यता असते. साडीवर पातळ कपडा ठेवून मगच अशा साड्यांना इस्त्री करा.
  • जरीच्या साड्यांना एकदा नेसल्यानंतर धुवू नका. या साड्यांना घरातच धुणे योग्य. धुताना पाण्यात थोडसं मीठ घाला व स्ट्राँग डिटर्जंटचा वापर टाळा. धुतल्यानंतर अशा साड्या न पिळता निथळायला ठेवा आणि पाणी निघून गेल्यावर वाळत टाका.
  • नेसलेली साडी काढल्यानंतर लगेच घडी घालून ठेवू नका किंवा धुवायलाही टाकू नका. आधी ती वाळत घाला, जेणेकरून घाम सुकून जाईल.
  • शालू वापरून झाल्यानंतर चांगला सुकू द्या, जेणेकरून घामामुळे तो खराब होणार नाही. शालू काही तासांपुरता तुम्ही वापरला असाल, पण वापरून झाल्यानंतर तो ड्राय-क्लिनिंगला देणं जास्त महत्त्वाचं आहे. ड्राय-क्लिनिंग करून झाल्यानंतर शालू वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवू नका. शालूच्या घड्या घालताना बटर पेपरचा वापर करा. नेहमी महागड्या साड्या सुती कपड्यात बांधून ठेवा. साडी सुती कपड्यात बांधून ठेवताना त्यात इतर कोणत्याही साड्या ठेवू नका. महागड्या व सिल्कच्या साड्यांवर इस्त्री करताना त्यावर पाणी मारून इस्त्री करणं टाळा. मोती किंवा खड्याची कलाकुसर केलेल्या साड्या घडी करून ठेवताना त्यातला कलाकुसर केलेला भाग आत ठेवा. आणि उलट्या बाजूने घडी करा. यामुळे मोती किंवा खडे दुसर्‍या साड्यांना अडकून निघणार नाहीत.
  • घडी करून ठेवलेल्या साडीची काही महिन्यांनी घडी उसवा असं केल्याने साडीवर सुरकुत्या पडणार नाहीत.
  • सिल्कच्या साड्यांची चमक काही काळानंतर जाते किंवा त्यावर काळसर रंगाची छटा येते, त्यामुळे त्या पॉलिश करून घ्या. घरच्या घरी साडी धूत असाल तर गरम पाण्याचा वापर करू नका.
  • प्रत्येक स्त्रीकडे साड्यांचा भरपूर स्टॉक असतो. पण वेळेअभावी त्यांची देखभाल करणं, काळजी घेणं जमत नाही आणि मग आपल्या आवडत्या साड्या खराब होतात. पण थोडासा वेळ काढलात आणि थोडीशी काळजी घेतलीत तर निश्चितपणे तुमच्या जुन्या साड्या वर्षानुवर्षे नव्यासारख्या राहतील..