दिवसेंदिवस मधुमेहींची संख्या वाढत चालल्याचं आपण ऐकतो आहोत. आपला देश मधुमेहाची राजधानी होतेय हेही आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण याचा नेमका अर्थ काय लावायचा हे कधी कधी आपल्याला कळत नाही. आज आपण याच विचाराचा मागोवा घेणार आहोत.
यातला पहिला प्रश्न म्हणजे आपलं असं काय चुकलंय म्हणून आपल्यापैकी अनेकांची शुगर वाढायला लागली आहे? याचं उत्तर तितकंसं कठीण नाही. संपूर्ण आशिया खंडाच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित आहे. आपणही आशिया खंडाचा भाग असल्यानं आपल्याला हा नियम लागू होतो.
तुम्ही आम्ही जन्मलो तेच शेतकर्याचे जीन्स घेऊन. सगळं काही शेतीवर अवलंबून होतं. शेतकर्याचं उत्पन्न म्हणजे शेतमाल. कुटुंबाची उपजीविका करताना आपली मारामार व्हायची सगळंच तुटपुंजं साहजिकच कमी अन्नात गुजराण करावी लागायची. याला उत्तर म्हणून आपल्या जीन्सना स्वत:त तसे बदल करावे लागले. गेल्या काही दशकांमध्ये यांत्रिक शेती आणि त्या क्षेत्रातली एकंदर प्रगती यामुळं अन्नाची उपलब्धता वाढली. आपण प्रमाणाबाहेर खाऊ लागलो. त्याचा परिणाम म्हणून मधुमेह वाढला. अचानक खूप लोकांना हा त्रास व्हायला लागला.
ही प्रगती खूप जलद होती. जीन्स बदलायला जो वेळ लागतो तो न मिळताच अन्नाची उपलब्धता आणि त्यावर मारलेला ताव याने आपली शरीराच्या आतली रासायनिक घडी बिघडली. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा लांब पल्ल्याच्या आजारांनी आपण त्रस्त व्हायला सुरुवात झाली. नुसतंच इतकं असलं असतं तरीही ठीक होतं. आपण घरचं सोडून परदेशी जीवनशैलीला जवळ केलं. तेही आपला घात करून गेलं. अचानक गेल्या काही दशकांमध्ये मधुमेह होणार्यांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली.
तरीही मुबलक अन्न मिळणारी पहिली पिढी तशी नशीबवान म्हणायला हवी. त्यांना मधुमेह झाला पण उतार वयात. पण पुढच्या पिढीत मधुमेहासाठी पोषक जीन्सदेखील उतरले. अन्नाची उपलब्धता होतीच. व्यायामाला फाटा देणारी, व्यायामाची गरजच नाहीशी करणारी वाहनं आणि इतर यंत्रं लोकांना परवडू लागली. लोक ती मोठ्या प्रमाणात वापरू लागले. परिणाम असा झाला की शरीराची गरज आणखी कमी होत असताना खाणं मात्र बेसुमार व्हायला लागलेली पुढची पिढी अधिक कमी वयात जीवनशैलीच्या आजारांना बळी पडू लागली. जग बदललं. जास्त गुंतागुंतीचं बनलं. तणाव वाढले. त्या तणावांचा सामना करायला आवश्यक असलेली मोठी कुटुंबं संपली. व्यसनाधीनता वाढली. सगळं एकत्र येऊन त्याचा जो स्फोटक परिणाम अपेक्षित होता तो झाला. आता आपल्याला कमी वयात रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राल, हृदयरोग आपल्या बोकांडी बसले. आज जी तरुण मंडळी कमी वयात हृदयरोगाला बळी पडताहेत, स्रियांना गरोदरपणात मधुमेह होतोय, मोठ्या प्रमाणात पाय कापले जाताहेत. मूत्रपिंडं निकामी होताहेत, यकृतात चरबी साठल्यानं फॅटी लिव्हरसारखे प्रश्न निर्माण होताहेत, हे काही अचानक घडलेलं नाही. गेल्या काही दशकातल्या आपल्या चुकांचा तो परिणाम आहे.
मूळ प्रश्न आहे तो आपण यातून काही शिकतो आहोत का?
दुर्दैवानं याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. आपण आजही आजारी पडू तेव्हा बघू, तेव्हा डॉक्टरांना दाखवू हाच विचार बाळगून आहोत. मधुमेहाची प्रत्यक्ष लक्षणं दिसतील तेव्हाच रक्त तपासून घेतोय. या आजारात दुखत नाही खुपत नाही म्हणून डॉक्टरांनी एकदा चिट्ठी लिहून दिली की त्याच चिठ्ठीवर कित्येक वर्षं औषध घेत राहतो. मनाला वाटेल तेव्हा औषधं बंद करतो. कुठल्याही बाबा, भगताचं ऐकतो. गूगल,
वॉट्सअॅप वर फिरणार्या संदेशांना आपलंसं करतो. कोणी काहीही सांगितलं तर त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. पाय, मूत्रपिंड, कोलेस्ट्रॉल, डोळे, रक्तदाब तपासून घेत नाही. खाण्यापिण्याचे, व्यायामाचे नियम पाळत नाही. प्रत्येक गोष्ट औषधांनी केली पाहिजे यावर विसंबून राहतो.
आज आपल्याला हे नक्कीच बदलावं लागेल. ती काळाची गरज आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा उंबरा झिजवण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे. साहजिकच प्रश्न येईल की नेमकं काय करायचं?
पहिली गोष्ट अर्थातच पुढच्या पिढीला हे जीवनशैलीचे आजार होऊ नयेत याबद्दल आग्रही असलं पाहिजे. सुदैवानं हे आजार काही दोनचार दिवसात होत नाहीत. म्हणजेच आपल्याला भरपूर वेळ मिळतो. उदाहरणार्थ, प्रत्यक्षात मधुमेह होण्याच्या किमान दहा बारा वर्षं आधी त्या पोषक असं वातावरण शरीरात तयार होत असतं. याचा अर्थ आपल्या हातात दहा बारा वर्षं असतात. हृदयरोगाचा प्रत्यक्ष झटका येण्याच्या काही वर्षं अगोदर कोलेस्ट्रॉल वाढत असतं, हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागलेल्या असतात. एकंदरीत या सर्व आजारांमध्ये ते आजार होऊ नयेत म्हणून प्रयत्न करायला भरपूर वाव असतो. त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करणं आपल्याला शक्य असतं.
अर्थात प्रथम आपल्याला काहीच होणार नाही हा विचार बाजूला ठेवून ही कास धरायला हवी. हे आजार चिकटले की, आयुष्यभर साथ सोडत नाहीत याची जाणीव धरून कमी वयातच जीवनशैली बदलायला सुरुवात करायला हवी. आईवडिलांपैकी एकाला मधुमेह असल्यास विशी पंचविशीत आणि दोघांनाही असल्यास पंधरा वीस वर्षांचे असतानाच सुरुवात करायला हवी. कारण सध्या पस्तीस चाळिशीत मधुमेह झालेल्यांची संख्या खूप जास्त आहे. तेव्हापासून खाण्यापिण्याच्या सवयी बदलता येतील. व्यायामाच्या संधी शोधून त्या प्रयत्नपूर्वक उपलब्ध करायला हव्यात.
एका गोष्टीचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. वैद्यकीय वंशावळ हा माझा आवडीचा विषय. कारण जीन्समध्ये काही दोष असला तर त्याचा सुगावा खूप लवकर लागण्याची शक्यता या एका गोष्टीने वाढते. याला खर्च देखील नसतो. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी बोलतात की झालं.
ती शक्यता वाटलीच तर उद्याची वाट ना पाहता आजच जीवनशैलीतल्या बदलांना सुरुवात करता येईल सवयी सुधारणं सहज शक्य आहे. पार्ट्या कमी करून घरचं खाणं, त्यातही भाज्या, फळं, कच्च्या पदार्थांपासून बनवलेली सॅलड, सुका मेवा, पालेभाज्या अशांवर भर द्यावा. थंड पेयं, ड्रिंक्स, गोड पदार्थ कमीत कमी करता येतील. तळलेले तुपकट पदार्थ टाळता येतील.
व्यायाम करायला जिममध्येच जायला हवं असं नाही. चालणं फुकट असतं. दिवसातून त्यासाठी नियमित वेळ काढता येईल. रिक्षासाठी धावपळ करण्यात जो वेळ त्या वेळेत चालत घर गाठणं सहज शक्य आहे हे लक्षात ठेवायला हवं. वाईट सवयी सांभाळण्यासाठी खर्च येतो. त्या करून आणखी औषधांचा खर्च वाढवण्यात काय अर्थ असतो?
इतकं करूनही असले आजार वाट्याला आलेच तर वेळीच उपचार करून, नियमित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या आजारांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणार नाहीत याची काळजी घेता येईल.
– सतीश नाईक