तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? एखाद्या मित्र/मैत्रिणीचा मेसेज आला आहे आणि तुम्ही त्यावर भरपूर विचार करून त्याचा वेगळाच अर्थ काढला. प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्या मित्र/मैत्रिणीशी बोलणं झालं तेव्हा ते तुम्हाला म्हणाले की, “अरे ते लिहून पाठवलं होतं तेवढेच मला म्हणायचं होतं. त्यामागे वेगळा काहीही विचार नव्हता.” आणि आपल्या लक्षात येतं हे आपण उगाचच बराच वेळ फालतू विचार करण्यात घालवलेला आहे.

विचार असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्यातून दोनच गोष्टी समोर येतात एक म्हणजे विचार करणे आणि दुसरी म्हणजे अति विचार करणे.

एखादा निर्णय घेताना माणूस जितका जास्त वेळ विचार करण्यात घालवतो ना तितका जास्त वेळ तो स्वत:च्या मनाला त्या निर्णयाबद्दल नकारात्मक विचार करण्यासाठी भरीला घालत असतो.

नकारात्मक विचार किंवा अतिविचार हे फक्त आणि फक्त नुकसानच करतात.

पण मग हे अतिविचार म्हणजे काय? हे सगळं नेमकं सुरू कुठून होतं?

त्यामुळे मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात? आणि ते करणे थांबवायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टींवर मला उत्तरं मिळाली ती समुपदेशक गौरी हर्षल कुलकर्णी (फोन नंबर ९७३०९६१०१४) यांच्या “अतिविचारांबद्दल असलेल्या “ऑनलाईन कार्यशाळे” मध्ये.

त्यातल्याच काही गोष्टी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ – अतिविचार/ overthinking म्हणजे काय?

अति विचार म्हणजे नकारात्मक विचारांची एक अशी साखळी जी सतत भूतकाळात घडून गेलेल्या घटनांभोवती फिरत असते. ही साखळी आपल्याला त्याच त्याच घटनांमध्ये इतकं अडकवून ठेवते की आपण भविष्यकाळात येऊ घातलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा नकारात्मक अति विचार करू लागतो.

सध्याच्या काळात “अतिविचार करणे” ही एक गंभीर समस्या बनली आहे.

अतिविचार करण्याने काय होतं?

१. घडून गेलेली घटना, प्रसंग याबद्दल विचार करणे थांबवता येत नाही. आणि तसं करता न आल्याने ती व्यक्ती प्रत्यक्ष कृती करत नाही.

२. त्याच त्याच घटनांमध्ये अडकून पडल्याने नकारात्मक विचार करण्यामध्ये वाढ होते.

अति विचार करण्यामुळे होणारे परिणाम

१. सतत चिंता करणे

२. डिप्रेशन / नैराश्य येते

३. भीती

४. ताण

५. थकवा

६. निर्णय अक्षमता

७. एकटेपणा

८. व्यसनाधीनता

९. निद्रानाश

१०. आत्महत्येचे विचार मनात येणे.

अति विचार करण्याची कारणे

१.   अतिसंवेदनशीलता

२.   आत्मविश्वासाचा अभाव

३. स्वत:बद्दल योग्य भूमिका नसणे.

४.   भ्रामक कल्पना

५.   अतिकाम ओढवून घेणे

६. नकारात्मक स्व संवाद (निगेटिव्ह सेल्फ टॉक)

अति विचार  करण्याने निद्रानाश आणि थकवा ह्या व्यतिरिक्त इतरही दुष्परिणाम शरीरावर होतात ते खालीलप्रमाणे

१. अतिविचार केल्याने मेंदूवर सतत ताण येतो. आणि त्यामुळे चिंता विकृती (anxiety disorder) आणि मूड खराब होऊ शकतो.

२. पचन संस्थेवर परिणाम होतो.

३. हृदयावर ताण येतो.

४. प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

लहानपणी मनावर झालेले आघात

बर्‍याचदा अतिविचार करण्याचे मूळ हे लहानपणी घडलेल्या एखाद्या प्रसंगांमध्ये सुद्धा दडलेले असू शकते. लहानपणी अपयश आल्यानंतर किंवा इतर कुठल्याही मार्गाने जर कोणी मानसिक खच्चीकरण करणारे शब्द उच्चारले असतील तर त्याचा मनावर होणारा आघात हा दूरगामी परिणाम निर्माण करतो.

उदा. द्यायचे झाले तर….शाळेत एखाद्या शिक्षकांनी तुला जमणार नाही तू ढ आहेस अशा पद्धतीची वाक्य विद्यार्थ्यांसंदर्भात वापरणे किंवा ही अशी वाक्य पालकांकडून वापरली जाणे.

अतिविचार थांबवण्यासाठी उपाय

१. स्टॉप अँड पॉज मेथड

अतिविचारांची साखळी सुरू झाली आहे असे लक्षात येताच स्वत:ला ऐकू येईल अशा पद्धतीने स्टॉप म्हणणे आणि नंतर मनाला दुसरीकडे वळवणे. Pause घेऊन त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलणे.

२. नकारात्मक विचार सुरू होण्यासाठी कारणीभूत गोष्टी (ट्रीगर) निरीक्षणातून ओळखणे. त्यासाठी एका वहीत नोंद करणे.

३. स्वत:च्या भावना जाणून घेणे आणि त्या स्वीकारणे.

४. स्वत:शी बोलताना जाणीवपूर्वक सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करणे.

५. मेडीटेशनचा सराव करणे.

६. निसर्गाच्या, पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात वेळ घालवणे.

७. सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे.

८. मनाला प्रसन्न करणार्‍या गोष्टी करणे.

९. छंद जोपासणे. पुस्तक वाचन, संगीत ऐकणे वगैरे

१०. योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारणे.

आणि सगळ्यात महत्त्वाचे जर हे सगळे जमत नसेल तर योग्य वेळी योग्य तज्ञांची मदत घेणं.

– कल्याणी मोडक