“दस्तुरखुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे, वेळ खर्च जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे.

मोठ्ठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही, देवाशप्पथ खरं सांगतो, मल्लखांबाला पर्याय नाही”.

भारताने जगाला अनेक रत्ने दिली, गणितामध्ये शून्याची संकल्पना, सर्व भाषांची जननी संस्कृत भाषा, जगातील पहिलं विश्वविद्यालय तक्षशिला, महामुनी पतंजलींचं योगशास्त्र, त्यातील एक अमूल्य रत्न आहे मल्लखांब!

उगम आणि तात्कालिक खंड:

“मल्ल” म्हणजे कुस्ती खेळणारा पैलवान आणि “खांब” म्हणजे एक उभा लाकडी खांब. मल्लखांबाचा उगमही रामायण – महाभारत काळातला कारण महाबली हनुमान मल्लखांबाचे आद्यदैवत मानले जातात. कुस्ती खेळणारे पैलवान जोडीदाराच्या अभावी लाकडी खांबावर कुस्तीच्या डावांचा सराव करीत. सुमारे २०० वर्षांपूर्वी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांच्या दरबारात हैद्राबादच्या निजामाकडून आलेल्या “अली”  आणि “गुलाब”  या पैलवानांचा पराभव करणार्‍या बाळंभट्टदादा देवधर यांनी, “आपल्यापेक्षा ताकदीने, कौशल्याने, वजनाने व वयाने मातब्बर असलेल्या पैलवानाला चीतपट करण्याचे तंत्र शिकविणारा खांब म्हणजे मल्लखांब”, असे तंत्रशुद्ध स्वरूप दिले. त्यांना मल्लखांबाचे आद्य जनक म्हणतात. गुरुवर्य दादांनी अनेक ठिकाणी आखाडे सुरू केले. दुर्दैवाने दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या राज्यात अनेक अस्सल भारतीय ललामभूत गोष्टींप्रमाणेच मल्लखांबही हळूहळू लयाला गेला.

स्पर्धात्मक मल्लखांब:
कै. रामदास कल्याणपूरकर,
श्री. सुहास पाठारे व त्यांच्या सहकार्‍यांच्या प्रयत्नांनी १९६१-६२पासून ‘जिम्नॅस्टिक्स फेडरेशन
ऑफ इंडिया”ने आपल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये “जिम्नॅस्टिक्स” बरोबरच मल्लखांबाच्याही स्पर्धा घेतल्या. १९७६ नंतर “वन गेम वन फेडरेशन” नुसार त्यांनी मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेणं बंद केलं. उज्जैन येथील डॉ. बमशंकर जोशी, श्री. राकेश व राजेश श्रीवास्तव व त्यांच्या सहकार्‍यांनी “न्यू स्पोर्टस्‌ असोसिएशन” च्या वतीने १९८१मध्ये उज्जैन येथे पहिली अखिल भारतीय निमंत्रित मल्लखांब स्पर्धा भरविली, तीच पहिली राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा. त्याचवेळी “मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया” ची स्थापना झाली. आज भारतातील जवळ जवळ सर्व राज्यांमध्ये मल्लखांब प्रचलित आहे. ग्वाल्हेरच्या कै. अच्युतराव साठ्ये यांच्या प्रयत्नाने १९६८-६९ साली अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा व भोपाळचे कै. शंकरराव मोघे यांच्या पुढाकाराने २००८ पासून राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धा सुरू झाल्या.

मल्लखांबाला राजमान्यता: गंमत म्हणजे २५ वर्षे मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा प्रतिवर्षी वेगवेगळ्या राज्यात घेऊनसुद्धा केंद्र शासन मल्लखांबाला दंड-बैठकांप्रमाणेच एक व्यायाम मानत होते. मल्लखांबाला केंद्र शासनाची मान्यता मिळविण्यासाठी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील ९० खासदारांकडून शिफारसपत्रे गोळा करून ती मी तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना दिली होती. अथक प्रयत्नांनंतर १९९६ साली मुंबईचे खासदार श्री. मोहन रावलेजी यांच्या पुढाकाराने तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री श्री. मुकुल वासनिक यांनी केंद्र शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे मल्लखांबाला मान्यता दिली.
श्री. सुरेश कलमाडी यांनी रेल्वेकडून मल्लखांब खेळाडूंना प्रवास शुल्कातही सवलत दिली, भारतीय ऑलिंम्पिक महासंघानेही १९९८ साली मल्लखांबास मान्यता दिली.

मल्लखांब प्रत्येकासाठी:

आपल्याला आश्चर्य वाटेल, पाच ते पंच्याऐंशी वर्षांपर्यंत कोणालाही मल्लखांब करता येतो. “समर्थ” मध्येही श्री. शांतीलाल संघवी यांनी ८२ व्या वर्षी मल्लखांब शिकायला सुरुवात केली होती. रोज सकाळी ७ ते ८ समर्थ मध्ये माझ्या विनामूल्य मल्लखांब वर्गात शीला शर्मा,
डॉ. रुपीन शहा हे ज्येष्ठ नागरिकसुद्धा युवकांना लाजवतील असे प्रकार मल्लखांबावर करतात. मूक बधीर, अंध, अपंग, अशा दिव्यांगांनासुद्धा मल्लखांब चांगला जमू शकतो. मुंबईतील तीन अंध शाळांमधील दृष्टीहीन विद्यार्थीसुद्धा मल्लखांबाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके करतात.

मल्लखांबाचे शारीरिक व मानसिक फायदे: मल्लखांब एक व्यायामप्रकारही आहे. कोणत्याही “जिम” मध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांसाठी, वेगवेगळी मशीन्स असतात, पण मल्लखांबात एकच लाकडी खांब किंवा सुती दोरी यामुळे “हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात, बाह्य स्नायुंबरोबरच अंतर्गत संस्थांनाही परिपूर्ण व्यायाम मिळतो. रोगप्रतिकारक शक्ती, आत्मविश्वास वाढतो. डॉ. नीता ताटके यांच्या संशोधनात हे सिद्ध झाले की, मल्लखांबाचा सराव करणार्‍या व्यक्तींची “भावनिक बुद्धिमत्ता” जास्त चांगली असते, त्यांचा दृष्टीकोन “सकारात्मक” असतो. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “कणखरपणा म्हणजेच जीवन, कमकुवतपणा म्हणजे मृत्यू!” मल्लखांब मनाला व शरीराला बळकट बनवतो. मल्लखांबाच्या प्रसारामुळे “समर्थ आणि सशक्त”  भारताच्या निर्माणाचे स्वप्न निश्चितच साकार होईल. “फिट इंडिया” , “खेलो इंडिया” हे केंद्र सरकारचे अलीकडील स्तुत्य उपक्रम. पण मल्लखांब हे पवित्र काम गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे करीत आहे.

मल्लखांबाचा विदेशी संचार:

मल्लखांबाने परदेशातही भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. १९३६ मध्ये मुंबईचे डॉ. डी. एम. कल्याणपूरकर यांचे पट्टशिष्य कै. दत्ताराम लाड व कै. गोविंद नर्डेकर यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संघातून बर्लिन ऑलिंम्पिक्समध्ये दाखविलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांचे हिटलरनेही कौतुक केले. १९८७ मध्ये भारत सरकारनेही “फेस्टिव्हल ऑफ इंडिया इन यू.एस.एस.आर.”च्या अंतर्गत कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या, मल्लखांबाची प्रात्यक्षिके रशियामध्ये सादर केली. आता जगभरात विविध कार्यक्रमांतर्गत मल्लखांबांच्या प्रात्यक्षिकांना मागणी येऊन मल्लखांबपटूंना परदेशवारीची संधी व आर्थिक प्राप्ती होऊ लागली आहे. मी स्वत: जपान, इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, झेक रिपब्लिक, री युनियन आयलंड, मॉरिशस, इटली, हाँगकाँग, स्पेन, सिंगापूर, व्हिएतनाम, मलेशिया, ऑस्ट्रिया, कझाकिस्तान, क्रोएशिया, चीन, कंबोडिया, नेपाळ, या देशांमध्ये मल्लखांबाचे बीज रोवले आहे. आणि विशेष म्हणजे परदेशात शिकविताना मल्लखांबावरील उड्यांची सर्व मूळ मराठी नांवे – साधी उडी, बंदरी, खांदा उडी, तशीच शिकविली आहेत. जगभरातील ५२ देशांमधून पाचशेहून अधिक परदेशी व्यक्ती “समर्थमध्ये” आल्या आहेत. युरोप, अमेरिका व आशिया या खंडांमध्ये मल्लखांबाचे नियमित प्रशिक्षण वर्गही सुरू झाले आहेत, परदेशात “मल्लखांब फेडरेशन्स” स्थापन होत आहेत.

मल्लखांबाचा ऑलिम्पिक्समध्ये समावेश होण्याचे स्वप्न साध्य व्हायला सुरुवात झाली आहे.

सन २०१६ मध्ये भरतपूरच्या श्री. कृष्णकुमार
अॅडव्होकेट यांच्यासोबत मी “विश्व मल्लखांब संघटनेची” स्थापना केली. योजनाबद्ध पद्धतीने “पहिली विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा” २०१९ मध्ये मुंबईत तर दुसरी स्पर्धा २०२३ मध्ये आसाममध्ये झाली, २०२५ मध्ये होणार्‍या तिसर्‍या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धांसाठी अमेरिका, नेपाळ व व्हिएतनाम या देशांनी इच्छा व्यक्त केली आहे.

एकूणच येणारा भविष्यकाळ मल्लखांबासाठी अधिक सोनेरी असणार आहे.

मल्लखांबाची सगळी वैशिष्ट्ये ठळकपणे आली आहेत ती मल्लखांबाची आरती, जय जय जी मल्लखांब, आयुर्बल दाता, धन्य संस्कृती रक्षक, समस्त खेल पिता. महाबली हनुमान प्रकट दर्शयिता, मानस उल्हासीता चालुक्ये रचिता.गुरु बालंभटदादा, प्रथम अभिव्यक्ता,

मल्लयुद्ध कुलदीपक, दैवी उद्‌गाता. शरीरस्वास्थ्य सुधारक क्रीडा कौशलता, मनरंजक उपचारक अल्प व्यय क्षमता. शारीरिक स्थित्यंतर योग मनोबलता, हर दिन अभ्यासीता, प्रसाद फलदाता.

राम, रहीम, येशुगण, बुध, सीख, पददलिता, सकला प्रसन्न वर दे, मंगल जगत्राता.

– उदय वि. देशपांड