१) मनाचे ऐका : लोकांच्या सल्ल्यांकडे किंवा मतांकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही दीर्घायुष्य जगू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या मतांचा विचार करता तेव्हा तुम्ही अधिक संयमी, कमी अंतर्ज्ञानी आणि जास्त वेळ चिंताग्रस्त राहता.
२) वर्तमानात जगा : घडून गेलेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही. म्हणून त्यावर विचार करत बसून वेळ घालवण्यापेक्षा आपण भविष्यात अधिक चांगले काम कसे करू शकतो याकडे लक्ष द्या.
३) बॅड पॅचच्या काळात खंबीर राहा : प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येत असतो. अशा प्रतिकूल, निराशाजनक परिस्थितीमध्ये धीर सोडू नका. चिकाटी आणि प्रयत्न करण्याची तयारी असल्याने भविष्यात निश्चित चांगले घडेल हा आशावाद कायम ठेवा. आपल्या आवाक्यात कोणत्या गोष्टी आहेत याचा विचार करून त्यावर काम करत राहा. मार्ग निश्चितपणे सापडतो.
४) प्राधान्यक्रम ठरवा : एक ना धड भाराभर चिंध्या, अशा पद्धतीने काम न करता, आजच्या दिवशी कोणती कामे प्राधान्याने करायची आहेत याची यादी करा. म्हणजे विचलित न होता तुम्ही रोजची कामे पूर्ण करू शकाल.
५) बदल हा निसर्गाचा स्थायीभाव: आपण सदासर्वकाळ एकसारखे राहू शकत नाही. सतत बदलत राहणे हीच जीवनाची प्रवृत्ती असते. आपले वय, अनुभव, शारीरिक क्षमता, बदलणारी परिस्थिती यानुसार बदलणे अपरिहार्य असते. त्यामुळे तू पूर्वीसारखा राहिला नाहीस, असे कुणी म्हणाले, तर मी आता पूर्वीपेक्षा अनुभवी, शहाणा, समजदार आणि मनाने खंबीर झालो आहे, याचा मला अभिमान वाटतो असे समोरच्या व्यक्तीला सांगा.
६) वर्तमानात जगा : अनेकांना पुढे काय होणार, कसे होणार, हे नाही झाले तर, असे नाही झाले तर, अशा अनेक चिंता किंवा भूतकाळातील चुका सतत सतावत राहतात. तेव्हा मागे काय घडून गेले किंवा पुढे काय घडणार आहे याची फारशी चिंता न करता, वर्तमानात जगण्याचा प्रयत्न तरा.
७) प्रेम व्यक्त करा : घरातील व्यक्ती, प्रिय व्यक्ती असो किंवा नातेवाईक इतरांबद्दल वाटणारे प्रेम खुलेपणाने व्यक्त करा. तेव्हा दिवसातील काही वेळ आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवा. तुम्ही देत असलेल्या प्रेमाच्या बदल्यात कसलीही अपेक्षा करू नका. तुम्ही जितके प्रेम इतरांना द्याल तितकेच तुम्हालाही परत मिळेल.
८) रोज लिखाण करा : आपल्या विचारात सुसूत्रता असणे गरजेचे आहे. रोज लिहिण्याची सवय लावून घेतल्याने तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. आपल्या विचारांनादेखील शिस्त लागते.
९) बचत करा : किमान तुमच्या मिळकतीतील ३० टक्के रक्कम तरी बचत करा, एवढी रक्कम बचत करणे शक्य नसल्यास १० टक्के रक्कम तरी, तुम्ही वाचवू शकता. छोट्या छोट्या गोष्टींवर होणारा खर्च तुम्ही टाळला तरी, मोठी रक्कम बचत होऊ शकते.
१०) नवीन गोष्टी शिका : गोष्ट अवघड आहे, सोपी आहे, तुमच्या क्षेत्राशी निगडीत आहे किंवा नाही याचा विचार न करता, रोज किमान एक तरी नवी गोष्ट शिकण्याचा निश्चय करा.
११) हिशेबी जोखीम स्वीकारा : एखादे काम करण्यात धोका किंवा जोखीम आहे, असे वाटत असल्यास ती जोखीम उचलण्याची तयारी ठेवा. अपयशापेक्षाही एखादी गोष्ट करण्याची संधी दवडल्याने जास्त पश्चात्ताप होतो.
१२) एकांतात वेळ घालवा : दिवसातील काही वेळ तरी एकांतात घालवा. त्यामुळे तुम्हाला थोडा आनंद मिळेल आणि तुमच्यातील कार्यक्षमता वाढेल. दिवसातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा.
१३) कुतूहल जागृत ठेवा : उत्सुकता दाखवणे हे चांगले कौशल्य आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित नवनवीन गोष्टी शिकल्याने तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होऊ शकते. म्हणून चांगल्या गोष्टी शिका आणि त्यासाठी प्रश्न विचारण्याची तयारी ठेवा. प्रश्न विचारल्याने चांगले रिलेशन तयार होऊ शकतात.
१४) ऐकण्याची कला : आयुष्यातील समतोल राखण्यास आणि नात्यातील लवचिकता कायम ठेवण्यास आवश्यक असणारी बाब म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मत, विचार शांतपणे ऐकून घेणे. ज्याप्रकारे आपण इतरांना समजून घेतो त्याच पद्धतीने त्यांना देखील आपल्याला समजून घेणे सोपे जाते.