आपला रोजचा आहार हा फळं आणि भाज्याने भरपूर असायला हवा. त्याचं मुख्य कारण हे – की त्यांच्यातील रेषेमय पदार्थ आपल्या आतड्यांची हालचाल होण्यासाठी उपयोगी पडतात.

) फळं खाण्याबद्दलचे नियम:-

सामान्यत: फळं ही रिकाम्या पोटी खावीत. त्याचं कारण असं की, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या पोटामध्ये येणार्‍या अन्नाच्या स्वागतासाठी पाचक रस हे तयार झालेले असतात. आणि हे पाचक रस, पित्त स्वरूपामध्ये असतात त्यामुळे त्यांना शमन करण्यासाठी किंवा त्यांना पचन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पित्तशामक असं अन्न जर घेतलं तर दिवसभर आपल्या शरीरामध्ये हे पित्त आपलं कार्य नीट करत राहतं.

आपण खाल्लेले फळांचे तुकडे  अशा रसामध्ये परिवर्तित केले जातात. आता हा रस बनत असताना पोटाची थोडीशी जी हालचाल होते त्याचा परिणाम आपल्या पोटामागे असलेल्या आपल्या मोठ्या आतड्यावर होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला शौचास होण्याससुद्धा मदत होते.

) फळांचा अतिरेक झाला की काय होतं

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. आपण कधीतरी नुसती फळं खातो. की खरंच आपल्याला दुपारी जेवण खूप जड झालंय आणि आपल्याला संध्याकाळी काही खायचं नाहीये. अशावेळी आपण विचार करतो की आपण फक्त फळं खाऊ अशावेळी नुसती फळं खाल्ली तरी चालेल. पण नुसतीच फळ खाणं आणि बाकी काही न खाणं याच्यामुळे आपल्याला सकस आहार किंवा पौष्टिक आहार मिळत नाही. कारण फळांमध्ये जरी चांगले रस आणि आपल्याला पाहिजे ती विटामिन्स छोट्या प्रमाणामध्ये असली, तरी प्रोटीन्स किंवा प्रथिनं ही त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे त्याच्या जोडीला तुम्ही थोडे अक्रोड, बदाम, किंवा एखादा उकडलेलं अंडं, शेंगदाणे, चणे असं खाल्लं तर खूप चांगलं.

फळांमध्ये पपई, अननस ही दोन्ही फळं उष्ण असतात. त्यामुळे ती उष्ण काळात टाळावीत.

आता कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं?

ज्या ऋतूंमध्ये ज्या भाज्या होतात त्या ऋतूमध्ये त्या भाज्या खाव्यात. हल्ली आपल्याकडे खूप चंगळ असल्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मिळतात. पण एक छोटासा आपण विचार केला तर चातुर्मासामध्ये आपण काही भाज्या वर्ज्य ठेवतो. त्या तशा खाल्ल्या नाहीत तर आपल्या शरीरामध्ये वातपित्त कफाचं संतुलन राहतं आणि नाही तर पित्त वाढणं किंवा वात वाढणं हे त्रास आपल्याला होऊ शकतात. ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे जसे दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, काकडी या सगळ्या भाज्या रात्री खाल्ल्याने आपलं पोट हलकं राहतं. आणि इतर भाज्या आपण सकाळी खाऊ शकतो. त्यामुळे ऋतूप्रमाणे मिळणार्‍या भाज्या जर आपण खाल्ल्या तर हे खूप चांगलं. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या टाळाव्यात, कारण पावसाळ्यामध्ये या पालेभाज्यांच्या वर अनेक किडे त्यांची अंडी घालतात आणि ती इतकी छोटी असतात ती आपल्याला ती डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्यामुळे दिसायला जरी ती भाजी चांगली आणि ताजी दिसली तरीसुद्धा त्याच्यावर किड्याने घातलेली अंडी असू शकतात. म्हणून पालेभाजी ही पावसाळ्यामध्ये टाळलेली चांगली.

अशा पद्धतीनेच आपल्याला काही भाज्या- पालेभाज्या अशा असतात की ज्या पावसाळ्यामध्ये खाव्या. अशा भाज्या जर तुमच्या आजूबाजूला मिळत असतील तर त्या अवश्य आणाव्यात. फळंसुद्धा त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी खाल्ली तर त्या फळांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि त्याच्यातील रेषा ह्या आपल्या आतड्यांची क्रिया आणि आतड्यांची हालचाल चांगली ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आतड्यांच्या हालचालीबद्दल थोडंसं परत सांगते – हल्ली लोकं खूप उशिरा जेवतात. जर आपण दहा वाजता जेवलो आणि नंतर थोडं शतपावली किंवा घरातल्या घरात हालचाल करून झोपलो नाही, तर सकाळी सहा वाजता उठल्याबरोबर आपलं पोट साफ होईल म्हणजेच आपल्याला शौचाला होईल, ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. पण ही अपेक्षा लोकांची असल्यामुळे आणि मग पोट साफ झालं नाही म्हणून त्यांना वाटतं की, आपल्याला
कॉन्स्टिपेशन आहे आणि म्हणून मग रेचक औषधं अतिप्रमाणामध्ये घेतली जातात हे चुकीचं आहे.

आपलं अन्न पचायला आणि ते पचून आतड्यांमध्ये पुढे जाऊन मोठ्या आतड्यामध्ये येऊन ते शौच रूपामध्ये आपल्याला त्याची संवेदना व्हायला किमान आठ तास तरी आपण द्यायला पाहिजेत. त्याचबरोबर जर आपण दहा वाजता जेवण जेवलो, आणि त्याच्या अगोदरचेसुद्धा जेवण आपण आपल्याला पचेल ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर घेतलेलं असतील तर ती सगळाच भार आपल्या पचनशक्तीवरती येतो.

म्हणूनच जरी आपल्याला आज- उदाहरणार्थ कलिंगडं – टरबूज ही फळ थंडीमध्येही मिळत असली तरीसुद्धा आपण सारासार विचार करून ही फळ उन्हाळ्यात खाण्याची फळं आहेत, त्यामुळे ती आपण थंडीमध्ये टाळायला पाहिजे, असा विचार करून, आपण आपलं पूर्ण दिवसाच्या डायटचा एक प्लॅन तयार करावा. त्या डायट प्लॅनमध्ये प्रमाणबद्ध जेवण आणि ते जेवण पचेल याच्यासाठी प्रमाणबद्ध व्यायाम हे करणं अतिशय आवश्यक आहे.

जाता जाता आहाराबद्दलच बोलत असल्यामुळे थोडं आणखी- आपण फळभाज्यांबद्दल बोललो, पण आयुर्वेदाप्रमाणे आपल्या जीवनात मांसाहारसुद्धा असणं आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितले की तुम्ही हित आहार घ्या, मित आहार घ्या, आणि शाकाहारी व्हा. म्हणजे नुसतंच शाकाहारी खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये हवी असलेली तत्त्वं तुम्हाला मिळत नाहीत.

 याचा नीट विचार करा, कारण आयुर्वेद हा आपला धर्मग्रंथ नव्हे. आयुर्वेद हा आपल्याला आपलं आयुष्य कसं चांगलं आपण घालवावं याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करणारा असा एक वेद आहे म्हणजे सत्य असं एक ज्ञान आहे.

– डॉ. नियती चितलिया- बढे