आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. त्यात आलं, सुंठ आणि गवती चहा हे पदार्थ महत्त्वाचे आहेत.

आले

  • जेवणात तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट वापरण्याऐवजी आलं वापरणं श्रेष्ठ असतं. आलं वाटून त्याचा वापर केल्याने तो तिखटपणा बाधत नाही.
  • आल्याचा रस हा भूक वाढवणारा आहे.
  • आल्याच्या रसात, लिंबू रस, सैंधव घालून तयार केलेलं पाचक हे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
  • आल्याच्या रसात डाळिंबाचे दाणे व खडीसाखर घालून सेवन केल्याने तोंडाला चव येते. पुष्कळ दिवस ताप येऊन गेल्यानंतर वरील मिश्रण घेतल्यास फायदा होतो.
  • जेवणापूर्वी मीठ व आल्याचा रस पाव चमचा घेतल्यास कोलेस्टेरॉल आटोक्यात राखण्यास मदत होते.
  • दम्याचा त्रास होत असल्यास आल्याचा रस, तूप (गायीचं) व खडीसाखर घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
  • पोट दुखत असल्यास आल्याचा रस व लिंबाचा रस एकत्र करून बेंबी सोडून अवतीभोवती चोळावा.
  • ज्यांना सर्दीचा त्रास असेल त्यांनी आल्याच्या रसात गूळ घालून ते पाण्यात पातळ करून नंतर नाकात घातल्यास फायदा होतो. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वरील प्रयोग करावा. कोणतेही सांधे दुखत असल्यास आल्याचा रस व मीठ यांच्या मिश्रणाने सांधे चोळावे. पायाच्या पोटरीतून गोळा येत असल्यास आल्याच्या रसात हिंग घालून तो रस चोळावा.

सुंठ

  • आलं सुकल्यानंतर सुंठ तयार होते. सुंठ ही उत्तम आम्लपाचक आहे. म्हणजेच शरीरात होणार्‍या फाजिल संचिताचं ती पचन करते. शरीरात जी विषद्रव्य निर्माण होतात ती पचवायला सुंठ मदत करते.
  • सुंठवडा हा रामनवमीला वाटण्याची पद्धत आहे. खरं तर रामनवमी ही वसंत ऋ़तुमध्ये येते. सुंठवडा त्या दरम्यान सेवन केल्याने कफाचा त्रास आटोक्यात राहातो. पण पावसाळ्यात देखील सुंठ, तूप व गूळ यांची गोळी करून ती रोज घेतल्याने पोटाचे विकार होत नाहीत. बरेच वेळा आमांशजन्य शौचाला होते. त्यात सुंठीचं चाटण मध घालून सेवन केल्याने फायदा होतो.
  • पोटात दुखून जर शौचाला होत असेल तर सुंठ, बारशिंग व खसखस पावडर करून त्यात खडीसाखर घालून द्यावं.
  • सुंठ पाण्यात उकळून ते पाणी निम्मं करून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. असं पाणी घेतल्याने तापावर नियंत्रण राखता येतं.
  • वारंवार खोकला येत असल्यास सुंठ व खडीसाखर घ्यावी. पुष्कळ प्रमाणात ढेकर येत असल्यास सुंठ व गूळ घ्यावा. अजीर्ण झाल्यानंतर सुंठ व ताक घेतल्याने फायदा होतो.
  • आम्लपित्त झालं तर सुंठ व आवळा चूर्ण खडीसारेबरोबर घेतल्याने फायदा होतो.
  • कोणत्याही प्रकारची सूज आली असता त्यावर सुंठ उगाळून लेप करावा.
  • सुंठ पावडरचं नस्य केल्याने सर्दी कमी होते. मात्र तज्ज्ञांकडूनच नस्य करावं.

गवती चहा

  • पावसाळ्यात गवती चहा खूप प्रमाणात उपलब्ध असतो. गवती चहाची वाफ घेतल्याने घाम येतो. ताप आल्यानंतर अशी वाफ घ्यावी.
  • सर्दी झाली तर गवती चहा, सुंठ, मिरं व दालचिनी यांचा काढा फायदेशीर होतो.
  • गवती चहाचं तेल हे सांधेदुखीवर लाभदायक असत. गवती चहाचा काढा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते.
  • गवती चहा उत्कृष्ट वातसारक आहे. ह्याचा काढा घेतल्याने पोट फुगणे व या त्रासात फरक पडतो.
  • कंबरदुखीवर गवती चहाचं तेल लावल्यास फायदा होतो.
  • थोडक्यात, पावसात होणार्‍या छोट्या-मोठ्या त्रासांना जर वेळीच अटकाव करायचा असेल, तर घरातच उपलब्ध असणार्‍या या सोबत्यांचा नीट उपयोग करायला हवा.