आपल्याकडे “आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम्‌ । अधनस्य कुतो मित्रम्‌, अमित्रस्य कुत: सुखम्‌” असं म्हटलं जातं. आळशी माणसाला कधीच विद्या प्राप्त होत नाही. विद्या नाही तर पैसा नाही, पैसा नाही तर मित्र नाहीत आणि ज्याला मित्रच नाहीत, अशी व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात, ज्यांच्या अंगी अनेक गुण असूनही ती अयशस्वी होतात, यामागे तीन गोष्टी दडलेल्या असतात, एक आळस आणि दुसरा “चालढकलपणा” आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे “आपल्याला काय करायचं आहे, हेच माहिती नसणं”. हल्ली इंटरनेटचा स्पीड थोडा जरी कमी झाला, तरी मुलं चिडचिड करतात, इतक्या वेगाने त्यांना गोष्टी घडणं अपेक्षित असतं, परंतु काही गोष्टींना वेळ द्यावाच लागतो. निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर वरील तिन्ही बाबींवर काम करणं गरजेचं आहे.

दहावीनंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, की खर्‍या अर्थाने करियरची सुरुवात होते. हा काळ करियरच्या जडणघडणीचा असतो, व्यक्तिमत्त्व खुलवणारा असतो, त्यामुळे या काळात योग्य दिशेने केलेली वाटचाल तुम्हाला अपेक्षित ध्येय गाठायला मदत करते. “आपल्याला काय करायचं आहे?”  या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि मेहनत घ्यायलाच हवी. मानसशास्रातील ‘APTITUDE TESTS’ तुम्हाला मदत करू शकतात.  तुमचा कल कोणत्या विषयाकडे आहे याची तुम्हाला थोडी कल्पना असेल, तर कॉलेज सांभाळून तुम्ही त्या क्षेत्रात थोडंफार काम करून बघा. त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना संपर्क करा त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचे अनुभव लक्षात घ्या. हे सगळं करत असताना मनात कधीच “मला हे जमेल का?” “मी त्यांना कसं भेटू?” हे विचार आणू नका. चार लोकांशी संपर्क साधल्याशिवाय, प्रत्यक्ष काम कसं केलं जातं हे अनुभवल्याशिवाय तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार नाही. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, पण एकदा निर्णय घेतलात, की तो योग्यच आहे हे मनाशी पक्कं ठरवून त्यादृष्टीने पावलं उचलायला सुरुवात करा. निर्णयाबद्दल साशंकता बाळगू नका. माझ्या एका मैत्रिणीला
हॉटेल मॅनेजमेंट करायची इच्छा होती. नृत्यविशारद आहे. शिवाय भाषेवरही प्रभुत्व असल्याने तिला मीडियातही काम करावंसं वाटत असे, पण वेळीच योग्य निर्णय न घेतल्याने आज यातील कोणत्याच क्षेत्रात ती स्वत:च नाव कमावू शकली नाही, अंगी १० गुण असूनही!

तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अजून एक गोष्ट तुम्ही कमवू शकता, ते म्हणजे “सुदृढ शरीर”! व्यायामासाठी वेळ राखून ठेवा. आज तुम्ही व्यायामासाठी दिलेला वेळ तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. टिळकांची एक सुंदर गोष्ट आहे. टिळकांची प्रकृती तारुण्यात खूपच नाजूक होती, ते सतत आजारी पडत. शरीराला सुदृढ करण्यासाठी त्यांनी इतर कामांमधून स्वत:ला बाजूला सारत काही काळ फक्त शरीर कमावण्यासाठी दिला. या काळात त्यांनी भरपूर व्यायाम केला आणि शरीरयष्टी कमावली. एक लक्षात घ्या, तुमचं शरीर सुदृढ असेल, तरच तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करू शकता, मज्जा करू शकता. जंक फूडसारखी अनेक प्रलोभनं आपल्या आजूबाजूला असतात, कॉलेजमध्ये सतत पार्टीज करणं, वेळी-अवेळी जेवणं, वाट्टेल ते खाणं या गोष्टी काळात नकळत तुमच्या शरीरावर परिणाम करतात आणि गंमत म्हणजे या सगळ्याचे दुष्परिणाम तुम्हाला लगेच कळत नाहीतच, काही वर्षांनी दिसतात. म्हणूनच या बाबीकडे दुर्लक्ष करू नका.

अभ्यास करताना आपल्याला सगळे विषय आवडतातच असं नाही. काही विषय हे आपल्या नावडीचे असतात. अशावेळी ते विषय टाळण्याने प्रश्न सुटणार नाही हे ध्यानात ठेऊन आपल्याला या विषयाला सामोरं जायचं आहे हे मनाशी ठरवा. हा विचार तुम्हाला भविष्यातही प्रश्न सोडवायला मदत करेल. मनातल्या इच्छाशक्तीच्या जोरावर, स्वअध्ययन करत, गरज पडल्यास शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्या विषयाला सामोरे जा. तुम्हाला यश मिळेलच. कमी मार्क्स त्या विषयात मिळाले, तरी उदास होऊ नका. तुम्ही प्रयत्न केलेत आणि कठीण असूनही तो विषय न टाळता तुम्ही त्या विषयाला सामोरे गेलात, याबद्दल स्वत:चं अभिनंदन करा. एकदा तुम्ही नकारात्मकेतच्या विळख्यात अडकलात, की तशीच कृती घडायला सुरुवात होते. बर्‍याचदा भीती अनाठायी असते, आपण त्या विचारांमध्ये अडकून तिला उगाच मोठं करत असतो. त्यामुळे, स्वत:च्या समजुती वास्तवाला धरून आहेत ना, याची कायम पडताळणी करा.

कोणतीही नवीन गोष्ट करताना, स्वत:ला आधी एक हलका चिमटा काढा आणि तुम्ही ती गोष्ट का करत आहात, याविषयी १० सेकंद चिंतन करा. आयुष्यात सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही. नको त्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. ती गोष्ट किती गरजेची आहे, त्याने तुम्हाला आनंद मिळणार आहे का, भविष्यात त्याचा किती उपयोग आहे याचा सारासार विचार करा. हा एक चिमटा तुम्हाला भानावर आणेल आणि तुम्हाला अयोग्य गोष्टींपासून, चुकीचं पाऊल उचलण्यापासून कायम लांबवेल.

तारुण्याचा उंबरठा ओलांडून तुम्ही एका नवीन पर्वाची सुरुवात करणार असता. हा उंबरठा धडपडण्यासाठीच असतो. इथे काही चुका झाल्या, तरी त्या सुधारता येतात. अयशस्वी झालात, तरीही न हरता प्रयत्न करता येतात. वेळ, उत्साह, मज्जा-मस्ती, अभ्यास यांचा योग्य मेळ साधलात, तर हा काळ तुमच्या आयुष्यातला “सुवर्णकाळ” ठरेल.

– देविका गोखल