संस्कृत भाषा ही देववाणी. गीर्वाण भारती. पाठांतरासाठी सोपी भाषा. संस्कृत भाषा सर्व भारतीय प्रादेशिक भाषांची जननी म्हणून मानली गेली आहे. पूर्वी बहुसंख्य शिक्षित लोक संस्कृत भाषा बोलत असत. सर्व ग्रंथरचना संस्कृत भाषेमधून होत असे.वेद उपनिषदादि वाङ्‌मय संस्कृत भाषेचं अनमोल लेणं आहेत.

वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचा अभ्यास करणे कोणालाही एका जन्मामध्ये शक्य झाले नसते असा मोठा वेदसमूह होता. पण जगद्‌गुरु  व्यास महर्षी यांनी वेदांचे विभाजन केले. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि समुन्तु या चार शिष्यांना त्यांनी वेदराशीमधील ऋचा वेगवेगळ्या करून अभ्यासासाठी दिल्या. आणि देवदेवतांच्या स्तवनाच्या प्रार्थना, ऋचा, ऋग्वेद या नावाने एकत्रित केल्या. यज्ञविषयक मंत्र प्रार्थना वगैरे ऋचा या नावाने एकत्र केल्या. संगीत गायनाविषयीच्या ऋचा सामवेद या नावाने आणि मंत्र तंत्र जारण मारण वगैरे विषयीच्या ऋचा अथर्व वेदात समाविष्ट केल्या.

वेदानंतरचा उपनिषदांचा काळ हा बराच प्रगल्भ विचारांचा काळ होता.

गुरुजवळ बसून अत्यंत श्रद्धेने जी परमार्थ विद्या शिष्य गुरुकडून प्राप्त करतो, त्या विद्येला उपनिषद असे म्हणतात. याला वेदान्त असे म्हणतात. ब्रह्म हा उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय आहे. म्हणून याला ब्रह्मविद्या पराविद्या श्रेष्ठविद्या असेही म्हटले आहे. उपनिषदे संख्येने १०८ आहेत. काही विद्वानांच्या मते ती सुमारे २५० आहेत. ईश केन, कठ, प्रश्न, मांडुक्य, तैतरिय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदाख्यक नृसिंहपूर्वतापिनी अशी उपनिषदे महत्त्वाची मानली जातात. उपनिषदात सांगितलेले विचार आजच्या जीवनातही महत्त्वाचे आहेत.

ईशावास्योपनिषदात म्हटले आहे.

ईशावास्यमिदं सर्वं यत्‌ किॅञ्च जगत्या जगत्‌ ।

तेज त्यक्तेन भुग्जीषा: मा गृध: कस्यचित्‌ धनम्‌ ॥

हे जग ईश्वराने भरलेले आहे. म्हणून त्या ईश्वराला साक्षी ठेवून त्याग करीत उपभोग घ्यावा. कोणाचेही धन हिसकावून घेऊ नये.

प्रामाणिक कष्ट करून धन मिळवावे. कोणाचेही धन लुबाडून घेऊ नये. आणि धनाचा उपभोग घेताना समाजाला, गरजूंना मदत करीत त्या धनाचा उपभोग घ्यावा. अशा तर्‍हेचा सामाजिक भान असलेला संदेश या ऋचेमधून देण्यात आला आहे. भ्रष्टाचाराने दुसर्‍याचं धन शोषून घेणार्‍यांना या ऋचेमधून योग्य तो संदेश मिळेल.

अठरा पुराणे

व्यास महर्षींनी एका मोठ्या पुराणसंहितेचे अठरा भाग निर्माण केले. व्यावसायिक रोमहर्षण माने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नि, भविष्य ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड पुराण अशी अठरा पुराणे तयार केली आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार केला.

पुराणे ही सामान्य माणसाला कैवल्याची प्राप्ती करून देतात. असे पद्मपुराणात म्हटले आहे. या अठरा पुराणांचे सार एका श्लोकातच व्यासांनी सांगितले आहे.

अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्‌ ।

परोपकार: पुण्याय पापार्थ परपीडनम्‌ ॥

अठरा पुराणांमध्ये व्यासांचे वचन प्रसिद्ध आहे. परोपकारामुळे पुण्य मिळते. आणि दुसर्‍याला त्रास देण्यामुळे पाप घडते.

सामान्य माणसांनी पापकर्मा-पासून दूर रहावे. यासाठी व्यासांनी असा ठाम विचार दिला आहे.

कसे जगावे? याचे मार्गदर्शन वाल्मिकींचे रामायण सांगते तर जग कसे आहे? जगताना सावधपणे कसे जगले पाहिजे याची जाणीव महाभारत ग्रंथ करून देत असतो.

कौरव पाण्डव युद्धाच्या निमित्ताने भगवान कृष्णांनी कर्मयोगाचे महत्त्व सांगितले. व्यासमहर्षिंनी तो कर्मयोग त्याचबरोबर ध्यानयोग भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचेही महत्त्व विशद करून ७०० श्लोकांचा श्रीमद्‌भगवद्‌गीता हा ग्रंथ लिहिला.

आजही यशस्वी जीवनाचे सारभूत तत्त्व गीतेमधूनच वाचकांना समजून घ्यावे लागते.

संस्कृत वाङ्‌मय

संस्कृत वाङ्‌मयात अनेक कवी – नाटककारांनी आपल्या अलौकिक साहित्यकृतींनी संस्कृत भाषेला भूषविले आहे. कविकुलगुरू कालिदासांनी मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीम्‌, शाकुंतल ही तीन नाटके कुमारसंभव आणि रघुवंश ही महाकाव्ये आणि मेघदूत आणि ऋतुसंहार ही खण्डकाव्ये संस्कृत भाषेची अनमोल अशी देणगीच आहे. याचबरोबर माघकवीचे शिशुपालवध, श्रीहर्षकवीचे नैषधीचरित आणि भारवीकवीचे किरातार्जुनीय अशी पाच महाकाव्ये संस्कृत भाषेला ललामभूत अशी आहेत. संस्कृत भाषेत कालिदासासारखेच आणखी भवभूती, बाण, दण्डी, भास वगैरे कवीच्या साहित्यकृती अजरामर झाल्या आहेत.

भर्तृहरी कवीने “शतकत्रयम्‌” .लिहिले. त्यापैकी नीतिशतकम्‌ यामध्ये शंभर सुभाषितांचा संग्रह एकत्र केलेला आहे. सज्जनांविषयी आदर, दुर्जन आळशी माणसांविषयी तिटकारा, उद्योग, परिश्रमांविषयीची तळमळ, नीती-परोपकार-दान या मूल्यांविषयीचा आग्रह या सुभाषितांमधून व्यक्त झाला आहे. संस्कृत भाषेला सुंदर, सुमधुर, अल्पाक्षरी, गेय सुभाषितांनी भूषविले आहे. अनेक सुभाषितकारांनी विविध विषयांवर सुवचने लिहिली पण त्यांचे नाव मात्र माहीत नाही. आकाशात जशा चांदण्या सर्वत्र चमचमत असतात तशी संस्कृत वाङ्‌मयात सर्वत्र विखुरलेली ही सुभाषिते माणसांचे मन आकर्षून घेतात.

पंचतंत्र

निसर्गातील पशु पक्षी प्राणी माणसे यांच्या कथा पंचतंत्र या नावाने संकलित केल्या आहेत. सुदर्शन राजाच्या संस्कारहीन, आळशी, अव्यवहारी, अकुशल मुलांना सहा महिन्यांच्या आत संस्कारशील उद्योगी, व्यवहारी आणि कुशल बनविण्याचे अवघड काम विष्णुगुप्त शर्मा या विद्वानाने या कथा सांगून केले. इतरांच्या आग्रहाखातर या कथा एकत्रित केल्या गेल्या. हा विद्वान म्हणजेच आर्य चाणक्य होय. आज ह्या कथा भारतीय प्रादेशिक भाषांमधूनच नव्हे तर जागतिक अनेकानेक भाषांमधून भाषांतरीत झाल्या आहेत.

केवळ नाटके-काव्य आणि त्याग दान प्रेम नीती परोपकार, प्रामाणिकपणा वगैरेंची शिकवण शतकापुरतीच संस्कृत भाषा मर्यादित राहिली नाही.

रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, गणितशास्त्र, खगोल शास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्य शास्त्र, वास्तु शास्त्र, संगीत शास्त्र, व्याकरण शास्त्र अशा विविध विषयांवरील ग्रंथ संस्कृत वाङ्‌मयात आजही अभ्यासकांना मार्गदर्शन करीत असतात.