चैत्र महिना हा हिंदू पंचांगातील पहिला महिना. नवीन वर्षाची सुरवात होते ती इथूनच. नवीन वर्षाचे स्वागत आपण चैत्र प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा करून करतो.
चैत्र प्रतिपदा ही तिथी फार महत्त्वाची मानली जाते. गुढी पाडवा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टिनिर्मितीला प्रारंभ केला असे म्हणतात. आधुनिक शब्दात सांगायचे तर हा सृष्टीचा वर्धापन दिवस किंवा वाढदिवस. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एका उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक मराठी घरात उत्साहात हा सण साजरा होतो. पण आपण गुढी का उभारतो? चैत्र महिन्याचे काय महत्त्व आहे? ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरे अनेकदा ठाऊक नसतात. म्हणूनच ह्या लेखात वाचू या “चैत्रमहिमा.”
चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा शालिवाहन शकाची सुरवात मानण्यात येते. त्याविषयी कथा सांगण्यात येते की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर मंतरलेले पाणी शिंपडले. त्यामुळे मातीच्या त्या बाहुल्या जीवंत झाल्या. त्या सैन्याच्या जोरावर त्याने शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाच्या ह्या पराक्रमाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू करण्यात आले. शालिवाहनाने मातीचे सैन्य जिवंत केले, म्हणजे काय केले? आज आपण याचा अर्थ घ्यायचा तो हा की त्याकाळातील लोक पराक्रमहीन, चैतन्यहीन झाले होते. शालिवाहनासारख्या नेत्याने त्यांना जागे केले. त्यांना लढण्याचे बळ दिले. अर्थात विजयाची प्रेरणा देणारा असा हा सण आहे. गुढी म्हणजे तर विजयपताका. सुप्रसिद्ध भावगीत गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले हे गीत आठवते ना ?
विजयपताका श्रीरामाची
झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी
श्रीराम वनवासातून पुन्हा
अयोध्येला परत आले ते याच दिवशी म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढी म्हणजे इंद्रध्वज असेही म्हणतात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले. म्हणजेच गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रातील संतांनीही गुढीचा उल्लेख केलेला दिसतो. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य आपल्या परिचयाचे आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं” समाजात सज्जनांचा विजय व्हावा, यासाठीच ही प्रार्थना. संत एकनाथ महाराजांच्या साहित्यात तर अनेकदा गुढीचा उल्लेख आढळतो. “सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था” यासारख्या उल्लेखावरून गुढी विजयाचे प्रतीक असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते. तुकाराम महाराजही म्हणतात “पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”
प्राचीन काळापासून ही जी गुढी उभारण्याची परंपरा सुरू आहे त्यापासून आपण नक्की काय बोध घ्यायचा हे आपल्याला कवयित्री बहिणाबाई किती छान सांगतात बघा.
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
नवीन वर्षाचे स्वागत मोकळ्या मनाने करायचे, मागच्या वर्षात झालेली भांडणे, रुसवे-फुगवे तिथेच सरत्या वर्षाबरोबर विसरायचे आणि प्रेमाची गुढी उभारायची.
वटवृक्ष
एक झाड वादळ वार्यातही आपल्या मुळांना घट्ट धरून उभ असलेलं. जाणार्या – येणार्या वाटसरूला आपल्या सावलीनं कुशीत घेणारं, पिल्लांना आपल्या अंगा-खांद्यावर घरटी बांधायला आसरा देणारं. भूकेलेल्यांची भूक भागवणारं. असं प्रेमळ, परोपकारी, उदार मनाचं, सर्वांना सुख देणारं ते झाड आज अगदी एकाकी झालंय.
जोवर त्याला पालवी होती, ते फळं देत होतं तोवर सर्व त्याच्या आश्रयाला येत होते. आज कुणी पिल्लही आपली घरटी बांधत नाहीत. कुणी वाटसरूही तिकडे फिरकत नाही. का तर पहिल्यासारखी हिरवीगार पाने त्या झाडाला नाहीत. गोड रसाळ फळे नाहीत, गार सावली नाही. पण आज जेव्हा खरी गरज त्या झाडाला आहे. तेव्हा सर्वांनी आपली पाठ फिरवली. कुणी आपुलकीने, माणुसकीच्या नात्याने जर त्याला पाणी घातलं असतं तर ही वेळ त्या झाडावर आली नसती. उनाड ओसाड रानात उगवल्यासारखं आज ते वाटतय. पिल्लांची वाट बघतयं. कुणीतरी आपल्या कुशीत निजावं या आशेने जगतय. खरंच झाड आणि माणसाच्या आयुष्यात तरी काय फरक आहे? जोवर आपल्याकडे पैसा असतो. कुणाला द्यायला काहीतरी असतं तोवर सगळे जमा होतात. प्रेमाचा खोटा भास दाखवतात. पण ते प्रेम आपल्यावरचं नसून आपल्याकडे असलेल्या पैशावरचं असतं. मग पैसा मोठा की प्रेम. म्हणून सर्व काही विकत घेता येतं म्हणून पैशाला महत्त्व द्यायचं की प्रेमानं जग जिंकता येतं म्हणून प्रेमाला महत्त्व द्यायचं. पण प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. नात्यांमध्ये असलेला ओलावा हा कायम असावा. आपलं म्हणून विचारणांर, मायेनं जवळ घेणारं प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम ही बाजारात विकणारी वस्तू नव्हे, माणसाच्या हृदयातील भावना आहे. जी आपोआप निर्माण व्हावी लागते. म्हणून आपल्या घरातल्या वटवृक्षांना आपुलकीचं पाणी पाजा. प्रेमाचा स्पर्श करा, मायेनं जवळ घ्या. त्यांच्या सावलीतच मोठे व्हा. आपलं स्वत:च अस्तित्त्व निर्माण करा पण त्यांच्या अस्तित्त्वाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्या.