हिंदूधर्मात तिलक वा टिळा लावणे ही बाब बहुतांशी धार्मिक मंगलविधी अथवा समारंभाशी निगडित असते. प्रत्येक मंगलसमयी असे करणे प्रसन्नता, सात्त्विकता आणि यशस्वितेचे प्रतिक मानले जाते. एखाद्या महत्त्वाच्या कामगिरीवर निघताना हळद, चंदन वा कुंकवाचा टिळा लावला जातो. उपासनेत षट्कर्मामधला हा एक अविभाज्य भाग आहे. वैज्ञानिकदृष्टया म्हटले तर कपाळावर ज्या स्थानावर किंवा ठिकाणावर हा टिळा लावतात ते स्थान दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने या ठिकाणी पिनियल ग्रंथी असते. प्रकाशाचा याच्याशी गहन संबंध आहे. ध्यानधारणा प्रक्रियेत जे आज्ञाचक्र प्रकाशमान होते, त्यात कपाळोवरील या स्थानाचा कोणतातरी संबंध निश्चित आहे. ऋषमुनींनी ही गोष्ट जाणूनच अशी टिळा लावण्याची ही पद्धत पूजा-उपासनेसोबत जोडून त्याला धार्मिक संदर्भ, अर्थ प्राप्त करून दिला. त्यामुळेच नियमितपणे त्या स्थानाच्या स्पर्शाने उद्यिप्त होऊन तेथून योग्य ती जागृती संबंधित अवयवामध्ये निर्माण होते. टिळा पद्धतीने सर्वसाधारण माणसाच्या कलास धार्मिक रंग व प्रतिष्ठा देऊन आत्मिक प्रगतीकडे वाटचालीचे पहिले पाऊल टाकले. तिलक लावणे वा धारण करणे हे वस्तुत: तृतीय नेत्र उन्मीलनाच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रवास आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले कपाळाच्या वरचे क्षेत्र (स्थान) काही अंशी संवेदनशील असते. त्याची योग्य ती परीक्षाही घेतली जाऊ शकते. या ठिकाणी जेव्हा टिळा लावला जातो तेव्हा आज्ञाचक्र नियमितपणे उत्तेजित होत असते. त्याची आपल्याला वैयक्तिकरित्या जरी खास जाणीव नसली तरी प्रत्यक्ष अनुभवांमुळे आपल्याला त्याचे प्रत्यंतर जाणवते. मंत्रतंत्र शास्त्रांतील असा टिळा लावणे हे जरी परंपरागत नसले तरी त्याला गूढ अर्थ व नियोजित अर्थ असतो. माथ्यावर हे इष्टशक्तीचे प्रतीक मानले जाते. यासंदर्भात स्मृती सदैव चैतन्यमय राहावी, भलेही संपूर्ण शरीर याबद्दल विशेष जागरूक वा लक्ष देणारे नसेना का, परंतु या मानसिक बैठकीमुळे मन सदैव त्या केंद्रबिंदूकडे आकर्षित असते. याचा प्रत्यक्ष परिणाम असा दिसून येतो की, शरीरव्यापी चेतना हळूहळू आज्ञाचक्रावर केंद्रित होत जाते. याला समर्पक उपमा म्हणजे भिंगातून सूर्यकिरणांना एकत्रित करून कागदावर लक्ष बनवायचे. यामुळे तिसर्या नेत्राचा जागृतीचा मार्ग मोकळा होतो. योग विज्ञान शास्त्रानुसार ईडा, पिंगळा व सुषुम्ना या तीन प्रमुख प्रकाराच्या मिळून एकूण बाहात्तर हजार नाड्या असतात. या तीनही नाड्या मज्जातंतूद्वारे डोक्याकडे जाऊन तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करतात. नंतर त्या एकत्रित होऊन (दोन याप्रमाणे एकत्रित) कपाळाच्या प्रदेशातून वरून खाली येतात. यातच दोन्ही भुवयांमधील भागावर त्याचा परिणाम आढळतो. सुषुम्ना नाडी आज्ञाचक्र वा तिसरा नेत्र या ठिकाणी आपला प्रवास संपवून पूर्ण करते. त्याच वेळी ईडा व पिंगळा या दोन्ही नाड्या डोळ्यांच्या दिशेस स्पर्श करून रक्तवाहिन्यांच्या रूपाने तेथे विसर्जित होतात. या दोन्ही नाडयांचा डोळ्यांद्वारे जागेपणी व झोपेत स्वप्नावस्थेशी संबंध असतो. याच्यापेक्षा वैशिष्टयपूर्ण सुषुम्ना नाडीचा संबंध तृतीय नेत्राद्वारे सुषुप्ति, तुरचि आणि तरी यातील अवस्थांशी असतो. टिळा लावल्याने साधकाला दैनंदिन उपासनेशिवाय अशी स्थिती सहजगत्या काही अंशी प्राप्त होते आणि तिलक लावणे हा आत्मोकर्षाचा एक निश्चित आधार बनतो आणि साधना अभ्यासात उपयुक्त ठरतो.
तिलक तात्त्विकदृष्टया अनेक प्रकारे प्रेरणायुक्त असतो. तिलक बर्याच वेळा चंदनाचा असतो. चंदन शीतल किंवा थंड मानले जाते. चंदन डोक्याला म्हणजे कपाळावर लावल्यामुळे मेंदूतील महत्त्वपूर्ण चिंतन केंद्र हे सदैव नेहमी थंड, शांत राहते. त्या शांतपणामुळे मनातील भाव व विचार इतके चांगले राहतात की त्या माणसाचे इतरांशी जे वागणे असते त्यात प्रसन्नता, सौम्यपणा व शांती दिसून येते.
विवाहित स्त्रिया भांगामध्ये, माथ्यावर कुंकू आणि कपाळावर बिंदी लावतात. बिंदी टिळ्याचे तर कुंकू हे तिलकाचे प्रतीक मानले जाते, परंतू याचा संदर्भ त्यांच्या सौभाग्याशी जोडलेला आहे हे अक्षय सुवासिनीचे प्रतीक मानले जाते.यात समर्पण आणि निष्ठा प्रतीत होत असते. तिलक-द्रव्य रूपात वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला जात असतो. पांढरे व लाल चंदन हे भक्तिमार्गाचे प्रतीक आहे. भजन करणारी मंडळी यांचा वापर नेहमी करतात. केशर किंवा गोरोचनाचा वापर हे ज्ञान आणि वैराग्याचे निदर्शक असते. ज्ञानी तत्त्वचिंतक वा विरक्त माणसे याचा उपयोग करतात. कस्तुरी हे ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य इत्यादींचे चिन्ह मानले जाते. परम अवस्थाप्राप्त योगी लोक याचा वापर करतात.
तिलकधारणेच्या उद्देशानुरूप तो लावण्यासाठी वेगवेगळ्या बोटांचा वापर केला जातो. ज्ञानाच्या संदर्भात तर्जनीचा वापर केला जातो. पांढर्या चंदनाचा टिळा लावतात. ऐश्वर्यासाठी मधले बोट व त्याने कुंकू लावले जाते. धन-वैभव, सुख-शांतिकरिता अनामिकेचा वापर असतो. त्या बोटाने केशर, कस्तुरी वा गोरोचनाचा टिळा लावला जातो. या प्रत्येकासाठी क्रमश: तर्जनी-पूर्व दिशा, मध्यमा-उत्तर दिशा आणि अनामिका-पश्चिम दिशा निश्चित केलेली आहे. त्या दिशांकडे तोंड करूनच त्यासंदर्भीय टिळा लावावा. अंगठ्यानेही चंदन तिलक लावायची परंपरा आहे. अंगठ्याने तिलक लावणारे असे असतात की जे सर्व धर्म तसेच संप्रदायांना समान मानतात. काळ्या रंगाचा टिळा कपालिक लोक करतात.(अघोरी विद्यावाले).