श्री गणेशाची आराधना करताना त्याचे “सुखकर्ता दुखहर्ता” रूप आपल्या डोळ्यासमोर असते. “सुखकर्ता दुखहर्ता” ही आरती म्हटल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात आरत्यांना सुरवात होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे श्रीगणेशाला अग्रपूजेचा मान आहे, त्याचे पूजन केल्याशिवाय शुभकार्याला सुरवात होत नाही त्याचप्रमाणे ह्या आरतीशिवाय गणेशपूजा संपन्न होत नाही. गणपती बाप्पाची ही आरती रचिली आहे संत रामदासांनी. आरतीच्या शेवटी “दास रामाचा, वाट पाहे सदना” असा स्पष्ट उल्लेखही आहे. ही आरती आज गणेशभक्तांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. रामदास हे एक विलक्षण संत होते. प्रपंच आणि परमार्थ ह्यांची सांगड घालायला त्यांनी आपणास शिकवले. स्वतः विरक्त आयुष्य जगत असताना समाजासाठी त्यांनी समाजकारण आणि राजकारण ह्यात महत्त्‌वाची भूमिका बजावली.

शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥

कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्‌गुरू रामदासा ॥ ह्या श्लोकात त्यांना वंदन करत असताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्‌वाचे किती समर्पक वर्णन केले आहे. वैराग्य, ज्ञान आणि कवित्व ह्यांचा अद्‌भुत संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. रामदास स्वामींनी बुद्धी आणि शक्ती ह्या दोन्हीची उपासना करण्यास शिकवले. बलोपासना करण्यासाठी त्यांनी गावोगावी मारूतीरायाची मंदिरे स्थापली. “भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती” ही त्यांनीच लिहिलेली आरती. त्याच बरोबर बुद्धीची देवता असणार्‍या गणेशाचेही त्यांनी वेळोवेळी स्तवन केले आहे. खरेतर ते अनन्यभक्त श्रीरामाचे. म्हणजे त्यांनी जणू आपल्याला देवता पंचायतन दिले – राम, लक्ष्मण, सीता, मारुती आणि श्रीगणेश.

कार्यारंभी आणि ग्रंथारंभी, सकल विघ्नांचा नाश करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींपासून अनेक संतांनी श्रीगणेशाला वंदन केले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी “ॐ नमोजी आद्या” असे लिहून ओंकारस्वरूप आत्मरूपाला वंदन केल्यानंतर माऊली म्हणतात, “देवा तूंचि गणेशु” आणि मग गणेशाच्या वाङ्‌मय मूर्तीचे अत्यंत रसाळ वर्णन माऊली करतात. श्रुतीस्मृती हेच तिथे गणेशाचे अवयव झाले आहेत, तर पुराणे हे रत्नालंकार. काव्य, नाटक इत्यादी साहित्य हे गणेशाच्या पायातील घागर्‍या आहेत, ज्यांचा रुणुझुणू नाद सगळ्यांसाठी आनंददायक आहे. असे अत्यंत समर्पक रूपक रंगविताना ज्ञानेश्वर माऊली लिहितात, तर्क हा त्याच्या हातातील परशु आहे, न्याय शास्र हा जणू त्याच्या हातातील अंकुश आहे आणि वेदान्त दर्शन जणू त्याच्या हातातील गोड मोदक आहे. त्याचप्रमाणे रामदासांनी देखील दासबोधाच्या सुरवातीला, सगुण साकार गणेश मूर्ती रंगविली आहे. ही मूर्ती अतिशय साजिरी आहे आणि तिचे वर्णन अतिशय सजीव आहे. शब्दाच्या कुंचल्यातून साकारलेले चित्रच ते. आपणही त्या मूर्तीचे दर्शन घेवूया. खास करुन श्लोक १३ पासून पुढील वर्णन तर केवळ चित्रासारखे नसून चलत्‌-चित्रासारखे आहे. गणेशाचे फडफडणारे कान त्याचा “फडै फडै” आवाज होतो असे वर्णन रामदास स्वामी करतात. त्याच्या नृत्याचे वर्णन करताना “घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी” आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. हे सारे वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. तुमच्या सोयीसाठी ते खाली दिले आहे. गणेश हा “ऐसा सर्वांगे सुंदरु” आहे. अशा गणेशाचे ध्यान केल्याने बुद्धी प्रकाशमान होते, सरस्वती प्रसन्न होते. अवलक्षणी, हीन, मूर्ख व्यक्ती देखिल त्याच्या कृपाप्रसादाने दक्ष-प्रवीण होते. अशा “मंगलमूर्ती” गणेशाकडे आपण जे मागू ते मिळेल. पण काय मागावे तर रामदास स्वामी म्हणतात, स्वार्थ नको, परमार्थ चित्ती ठेवून गणेशाला शरण जावे.

 

समास दुसरा गणेशस्तवन

श्रीराम ॥

ॐ नमो जि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।

अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरुपा ॥ १ ॥

मराठी अर्थ

१) सर्व सिद्धींची फळें देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा, आणि ज्ञानस्वरुप, ओंकाररुप जो गणपति त्याला मी नमस्कार करतो.

माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।

मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरुनी ॥ २ ॥

२) गणपतीनें माझें अंतःकरणी वास्तव करुन आपल्या कृपाकटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे. वाग्सुंन्यास = वाक्‌ शून्य

तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।

आणी विश्र्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥

३) त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचें आवरण विरुन जातें आणि सारें विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो.

येतां कृपेची निज उडी । विघ्नें कांपती बापुडीं ।

होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥

४) अशी त्याची कृपा झाली की संकटें भयाने थरथर कापूं लागतात. तसेच त्याच्या नामस्मरणाने ती नाहींशी होऊन जातात.

म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर ।

आदिकरुनि हरीहर । अमर वंदिती ॥ ५ ॥

५) म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात. आम्हां अनाथांचे ते माहेर आहे. विष्णू व शंकर त्याला नमस्कार करतात.

वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।

आघात अडथळें उपाधी । बाधूं सकेना ॥ ६ ॥

६) जगांत जें मंगळ आहे ते तो आहे. त्याला नमस्कार करुन कार्य केल्यास ते सिद्ध होते. अडथळें, अडचणी किंवा संकटे यांचा त्रास होत नाही.

जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।

नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळें सर्वांगी ॥ ७ ॥

७) त्याचे रुप, ध्यान आठविल्यावर समाधान वाटते. मन डोळ्यांमध्ये अवतरुन बाकी सर्व क्रिया बंद करुन ते रुप पाहू लागते.

सगुण रुपाची टेव  माहा लावण्य लाघव ।

नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८ ॥

८) ते गणेशाचे सगुण रुप विलक्षण आहे. तो नाचू लागला कीं सगळे देव नुसते पाहातच बसतात.

सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।

हरुषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९ ॥

९) त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो. म्हणून जेव्हां पहावे तेव्हां तो मस्त दिसतो, परमानंदाने नेहमी डोलत असतो. आंतून येणार्‍या आनंदाच्या उर्मींनी त्याचे मुख प्रसन्न असते.

भव्यरुप वितंड । भीममूर्ति महा प्रचंड ।

विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १० ॥