अशी खूप माणसं, घटना, ठिकाणं, गोष्टी आपल्याला अवचितच भेटतात. तरीही आपल्याही नकळत मधुर सुवासासारख्या मनात दरवळत राहतात. त्या आठवणींवर कालांतराने विस्मृतीची धूळ बसू लागते आणि त्या धुरकट होऊ लागतात. काही आठवणी तर पार काळाच्या पडद्याआड जाऊन विसरल्याही जातात.  काही आठवणी मात्र धुरकटलेल्या का होईना पण मनाच्या सांदीकोपर्‍यात अडकून, दडून राहतात.

आयुष्याच्या वाटेवर चालताना असं काहीतरी घडतं किंवा असं कोणीतरी भेटतं, की आपोआप त्या आठवणींच्या आजूबाजूला साठलेली धूळ उडून त्या पुन्हा लखलखून समोर येतात आणि त्या पहिल्या भेटीची आठवण करून देतात.

मग ती माणसंच असतील असं नाही. अर्थात आपल्या आयुष्यात अशी खूप माणसं येतात जी आपल्याला आयुष्यभर बर्‍या-वाईट आठवणींच्या रुपाने साथ देतात. पण आठवणी काही फक्त माणसांच्याच असतील असं नाही.

मग त्या कोणत्याही आठवणी असतील…. अगदी चंद्र, सूर्य, तारे, नदी, नाले, ओढे, समुद्र, पक्षी, फुलं, पानं अगदी काहीही…एखादा सूर्योदय आपल्याला कुठेही सूर्य उगवताना दिसला की उगीचच आठवत राहतो.  कुठेतरी चिमणी चिवचिवताना दिसली की लहानपणची काऊ-चिऊची गोष्ट आपोआप मनात उमटते. रोजच्या कामाच्या धकाधकीत कोसळत्या पावसाकडे लक्ष जाईलच असं नाही. पण कधी कधी आपणहून पावसाला भेटायला जावसं वाटत.

असेच आपल्या मनात दडलेल्या काही सुगंधांची आणि आपली अवचित भेट होते. वैशाखात भाजून तापलेल्या मातीवर जेव्हा वळवाच्या पावसाची सर कोसळते, तेव्हा घमघमणारा मातीचा सुगंध, विसरू म्हंटल तरी न विसरता येण्याजोगा…..कधी ओल्या कंच रानात गेला असाल तर तिथला ओल्या झाडांचा सुगंध त्या रानातून बाहेर आलं तरी रेंगाळत राहतो.  समुद्र किनारी भरती-ओहोटीच्या वेळेस येणारा वेगळाला सुगंध. हे सुगंध जरी रोज भेटीला येत नसले तरी ते मनात राहतात.

काही न्‌ काही करणानं महिनाभर सकाळी फिरायला जाणं होतंच नव्हत. महिनाभरानं पहाटे बाहेर पडले. खाडीपर्यंत पोहोचले पण काहीतरी चुकल्या चुकल्या सारख वाटू  लागलं. आणि अचानक लक्षात आलं, आज मंदीर पार करून खाडीच्या रस्त्याला लागल्यावर येणारा ओळखीचा सुगंध नाही आला……पायाखाली नजर भिरभिरू लागली पण एकही बकुळीचं फूल दिसेना. तेव्हा रस्त्याच्या कडेला नजर गेली आणि बकुळीचा वृक्षच दिसेना. रस्त्याच्या कामाच्या आड येतोय म्हणून त्या वृक्षाची आहुती दिली गेली. वसंतात हमखास भेटीला येणारा हा सुंगध आता इथे तरी भेटणार नाही. या सुगंधाची आणि माझी भेट अनेक वर्षापूर्वीपासूनची. दहा/पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा या रस्त्यावर फिरायला आले होते तेव्हा, बकुळीच्या नाजूक, दरळवत्या सुगंधाशी पहिली भेट झाली होती, तोवेरी बकुळीची ओळख गजर्‍याच्या स्वरूपातच होती. ओंजळीतल्या फुलांचा मनभरून सुंगंध घेणं काय हे त्या भेटीत बकुळीनं शिकवलं.

फुलांच्या सुगंधाशी अगदी लहानपणीच भेट झाली होती. आमच्या घराबाहेर एका खिडकीखाली मोगर्‍याचा ताटवा होता, एका खिडकीमागे सोनचाफा होता तर झोपायच्या खोलीच्या खिडकीबाहेर रातराणी होती. चढत्या रात्री अचानक कधीही जाग आली की रातराणीची सोबत असे, पहाटे अभ्यासाला उठल की मोगरा सोबतीला असे. चाफा तर काय बहरला की दिवसभर नुसता घमघमत असे.

गणपती, दिवाळीसारख्या सणांना मामाकडे आलं की वेगळ्या फुलांशी भेट होई. पाऊस सुरु झाला की पांढर्‍याशुभ्र अनंताची फुलं हमखास भेटणारच. ओल्या मातीचिखलात केशरी देठाच्या चांदण्यासारख्या नाजूक पांढर्‍याशुभ्र प्राजक्ताचा सडा पडलेला असे. टोपलीत भरून ती फुलं पाणी भरलेल्या बालदीतून निथळून काढली की सगळा चिखल धुतला जाऊन फुलं चांदण्यासारखी लखलखून दरवळू लागत. सूर्य अस्ताला जातांना पिवळ्या-गुलाबी-गडद लाल रंगाची गुलबाक्षी, कोर्‍हांटी फुलली की रात्र पडायच्या आत, मामाला संध्येसाठी परडी भरून फुलं काढून आणायची. आजी देवाला वाहण्यासाठी त्याच्या वेण्या करून ठवत असे. हात-पाय धुवून देवाला नमस्कार केला की परडीत उरलेली एखादी वेणी आम्हांला आळीपाळीने मिळत असे. जाई-जुईचे गजरे तर लहान मोठ्या, सगळ्यांनाच घालायचे असत. मग ज्या दिवशी जी वेलीवरून फुलं तोडून आणेल तिला गजरा मिळण्याचा पहिला मान. फुलं उरली तर इतर कोणाचा नंबर लागत असे. जाई-जुईच्या त्या इतकुशा कुडीत आसमंत दरवळून टाकेल इतका सुगंध साठविण्याची क्षमता येते कुठून? हा मला आजही पडणारा प्रश्न आहे.

पुढे सरत्या दिवसांत ही फुलझाडंच मागे पडत गेली. मग कुठेतरी अचानक ही फुलं भेटली की त्याच्या सुंगंधाचा अगदी मनभरून आनंद घेता येतो. तर काही सुगंधाशी आकस्मिकपणे गाठ पडली. ते सुगंध ओळखीचे असले तरी परिचयाचे नव्हते. त्याना अनुभवलं होत पण त्यांच्याशी कधी भेट झाली नव्हती. तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल, वडिलाबरोबर त्यांच्या कामानिमित्त ठाण्याच्या पुढे घोडबंदर मार्ग आहे तिथून जात होतो. इतक्यात ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. ताई उतरा तुम्हांला गंमत दाखवतो, म्हणून रस्त्यावरून खाली घेऊन गेला आणि मस्त दरवळ येऊ लागली. तशी लगेच त्याला विचारलं, “किसन काका इथे केवडा आहे का रे?”  “तेच तर ताई, हे बघा पुढे दिसतंय न ते केतकीचं बन, पण पुढे येऊ नका हा. केतकीच्या बनात हमखास जनावर असतं” असं तो म्हणाल्यावर आपसूकच पावलं मागे सरकली, पण ती दरवळ तिथून हलू  देईना “इथंच थांबा ताई, आलोच….” म्हणत किसनकाका गेला आणि पाच मिनिटातच केवड्याच भरलेलं कणीस घेऊन आला. तसं कणीस नंतर कुठे बघायला देखील मिळालं नाही. त्या कणसातली केवड्याची पान मात्र खूप दिवस सोबतीला होती…..वहीच्या पानात, कपड्याच्या घडीत, उशीच्या खाली, कंपासपेटीत…..कुठे कुठे जपून ठवलं होत. ती पान दाखवून मैत्रिणीपुढे केतकीच बन बघितल्याची फुशारकीही मारली होती. केवड्याची आणि माझी ती पहिली आणि शेवटची भेट.

खूप वर्षांनी एखादी मैत्रीण अचानक भेटावी, तसा एक सुगंध अचानक एकदा पुन्हा भेटला. सकाळची फिरायला निघाले होते आणि रस्त्यात खूप ओळखीची दरवळ जाणवली. हे काहीतरी खूप ओळखीचं  आहे याचा विचार करतच पुढे चालू लागले आणि पावलं अडखळली. मनानं ग्वाही दिली अरे हा सोनटक्का. लहान असतांना वडिलांच्या एका मित्राकडे पांढर्‍या आणि पिवळ्या सोनटक्क्याची कितीतरी झाड होती. त्यानंतर सोनाटक्याच्या फुलांशी. सुगंधाशी अशी अचानक भेट झाली आणि मग होतंच राहिली…..अजूनही सकाळी बाहेर पडलं की कधीतरी सोनटक्का भेटतोच.

मनीषा सोमण