सौंदर्य बघायला, आणि टिकवायला कोणाला आवडणार नाही? प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या जरी वेगळी असली, तरी सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही? शरीरातील प्रत्येक अवयव बांधेसूद असेल, प्रमाणबद्ध असले, तर ती व्यक्ती नक्कीच सुंदर दिसेल. हे सांगणं जितकं सोपं आहे, करणं आणि पुढे सांभाळून ठेवणं तितकंच कठीण आहे. नियमितता आणि चिकाटी, ह्याच्याबरोबर उत्कट इच्छा असणं जरूरी आहे. इच्छा दांडगी असेल तर माणूस आपल्या व्यापातून वेळ काढून हवी ती गोष्ट साध्य करू शकेल.  आपलं शरीर निरोगी आणि सुडौल ठेवण्यासाठी काय आहार घ्यावा आणि कायकाय टाळावं, त्याबद्दल आता थोड्या विस्ताराने. आपला आदर्श आहारतसं बघायला गेलं तर आदर्श आहार तो की ज्याच्यात, सगळी जीवनावश्यक तत्त्वं असतात. आज स्थौल्याचं प्रमाण इतकं वाढत चाललंय, त्याचं मुख्य कारण चुकीचा आहार. स्थूल शरीर बांधेसूद शरीरापेक्षा कमी सुंदर दिसतं. ते निरोगीसुद्धा नसतं.

आपला आहार सकाळच्या नाष्ट्यापासून सुरू होतो.  सर्वसाधारण घरात पोहे, उपमा, पाव किंवा चहा पोळी याच प्रकारचा नाष्टा असतो. आणि बाहेर असलो तर वडा पाव, भजी…इत्यादी हे सगळे पदार्थ पोट तर भरतात. पण पोषण मात्र करत नाहीत.  नाष्ट्यामध्ये……

 मोड आलेले मूग किंवा हिरवे चणे शिजवून त्यांच्यावर कांदा, टोमॅटो घालून खावेत. किंवा इडली, डोसा, उत्तप्पा, सांबार आणि चटणीबरोबर खावेत.

 सगळ्या डाळी १ भाग आणि तांदूळ २ भाग घेऊन रात्री भिजत घालून सकाळी त्यांचे डोसे किंवा अडई करून खावेत.

ह्या अशा प्रकारच्या नाष्ट्यामुळे आपल्या शरीराला ज्या पोषक तत्वांची गरज असते, ती सगळी मिळतात. त्यामुळे त्वचा तुकतुकीत आणि तेजस्वी दिसते. मात्र रोज एकाच प्रकारचा नाष्टा करू नये, त्यात विविधता असावी.

आहारामागील तत्त्वं असं आहे की, तुम्ही पचवू शकाल, त्यापेक्षा अर्धा आहार घ्यावा. दर वेळी जेवताना, फक्त पोट भरणं हवेच, हे आपले ध्येय असू नये, तर पोषक तत्त्व मिळवून शरीराचे आरोग्य वाढवणे असायला हवे. खास करून जेव्हा आपलं वय लहान असतं, तेव्हा म्हातारपणाची बेगमी करायची असते आणि वय वाढत जातं तसतसं आरोग्य टिकवण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. आज आपण निरोगी आहोत, तर हवे ते खा, अशा तंत्राने जगाल तर पुढे शरीर बेढबच नाही, तर जाड आणि असंख्य रोगांचं घर झाल्याने, त्वचा सुरकुतलेली, काळे डाग पडलेली, वाळलेली अशी, दिसायला अगदी विचित्र आणि आपल्या स्वत:लासुद्धा बघवणार नाही अशी होईल.

माझ्या व्याख्यानात, आदर्श आहार वगैरे जेव्हा मी सांगते, तेव्हा प्रेक्षकांची एकच मागणी असते. ती अशी की हा सगळा आहाराचा बेत आमच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बसवायचा कसा? सकाळी ७-७.३० ला निघायचं, घरातील सगळ्यांचा डबा करून निघायचं आणि दुपार, रात्रीचे मेन्यू ठरवायचे तरी कधी.

वाचकहो त्यासाठी मी पर्याय सुचवते…… सुट्टीच्या दिवशी, एक आठवड्याची तालिका तयार करावी. त्यात सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सबंध आठ दिवसांचा मेन्यू असावा.

घरातील इतरांची मदत घेऊन त्याप्रमाणे भाज्या, मासे, चिकनादी मांसाहार ह्यांची तयारी करून ठेवावी. या मेन्यूमध्ये लागणारे मसाले, चटण्या वाटून ठेवाव्यात. आणि प्रत्येक दिवशी, एक तास स्वयंपाकासाठी काढावा. घरातील स्त्री जी आपल्यासाठी इतकं काही करते, तिचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी घरातील इतरांनी तिला सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ द्यायला हवा आणि बायकांनीसुद्धा असा वेळ काढायलाच हवा. ह्या सगळ्या गोष्टी, सांघिक दृष्टिकोन ठेवूनच करता येतात. यासाठी सबंध परिवाराचा सहभाग हवा.

घरातील सगळ्यांनीच पुढाकार घेऊन बाजारहाट, स्वयंपाक आणि मेन्यू प्लानिंग ठरवून आपसात वाटून घ्यावे. हे सगळं तयारी वगैरेचं झालं, पण मुख्य प्रॉब्लेम हा असतो, की सकाळी सकाळी घर सोडायचे असल्यास नाष्ट्यासाठी भूकच नसते.

 ह्यासाठी रात्री लवकरजेवणे आणि जेवणानंतर किमान वीस-पंचवीस मिनिटे चालणे हाच एक तोडगा आहे. त्याचप्रमाणे, सकाळी थोडा तरी व्यायाम करावा, म्हणजे जो काही थोडा बहुत नाष्टा घ्याल तो पचेल.

 सकाळी लवकर घर सोडणार्‍यांनी, नाष्ट्यासाठी एखादं फळ खावं. आणि वर जे पदार्थ सांगितेल आहेत ते डब्यात नेऊन ९-९.३० ला ऑफिसमध्ये खावेत. तिथे जर चहावाला येत असेल तर त्याला चहाऐवजी हळद घातलेलं दूध आणायला सांगावे. साखर न घालता घेता आलं तर जास्त चांगलं.

 दुपारी डब्यात पोळी कमी आणि भाजी जास्त असा आहार असावा. संध्याकाळी घरी आल्यानंतर चहा घेण्यापेक्षा थंड दूध घ्यावं. भूक लागलीच तर चणे शेंगदाणे, किंवा मोड आलेल्या मुगाची भेळ किंवा व्हेजिटेबल सँडविच घ्यायला हरकत नाही.

  रात्री जेवण तितक्याच लवकर जमेल तितक्या लवकर घ्यावे. वरील सगळे मुद्दे स्त्रिया आणि पुरुष दोघांना लागू होतात. नवरा आणि बायको या दोघांमधील व्यायाम तत्पर जो असेल त्याने दुसर्‍याला थोडे ढकलावे, सुदृढ करावे. तशीच घरकामात एकमेकाची मदत करावी.

वाचकांनो, इथे एक गोष्ट सांगते – कारण, हा माझा अनुभव आहे की, मी जेव्हा लोकांना हे खा किंवा हे खाऊ नका सांगते तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी असते “हे सगळं नाही बुवा जमणार, डॉक्टर मला करायला.”

नवी गोष्ट करताना थोडा त्रास तर होणारच आहे, पण आपण हे सगळं स्वत:साठी तर करतोय, ह्या सगळ्यामुळे आपली त्वचा, आपलं शरीर आणि त्यामुळे आपलं मन निरोगी, तेजस्वी आणि चिरतरुण राहणार आहे. मग काय? करणार ना लवकरात लवकर सुरुवात?