सनातन वैदिक धर्माची शिकवण “माणसाने माणसाशी  आणि निसर्गाशी सुद्धा  माणसारखे वागावे” अशी आहे. भारतीय संस्कृतींत पर्यावरणाचे विशेष महत्त्‌व सांगण्यात आले आहे. औषधी वनस्पती गावात नेहमी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा अंतर्भाव धार्मिक पूजाद्रव्यामध्ये करण्यात आला आहे. या औषधी वनस्पती देवांना प्रिय आहेत असेही सांगण्यात आले आहे. त्यामध्ये तुलसी या वनस्पतीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज आपण तुलसीचे धार्मिक महत्त्‌व काय आहे ते पाहणार आहोत.

हिंदू माणसाचे घर म्हटले की, बाहेर घरासमोर अंगणात तुळशीवृंदावन हे असणारच! तुळशीवृंदावनाभोवती रांगोळी असणारच! रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचे आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. तिन्हीसांजा तुळशीवृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हटले जाते.  प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात. तिला वात्सल्यमयी माता समजतात. महिला तुलसीपुढे आपले मन मोकळे करतात. कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणी करतात. तुळशीला जिवाभावाची मैत्रिण समजून तिच्याशी संवाद साधतात. सांजसकाळ तुलसीचे दर्शन घेऊन पुढील प्रार्थना करतात.

तुलसि श्रीसखि शुभं पापहारिणि पुण्यदे ।

नमस्ते नारदस्तुते  नारायणमन: प्रिये ॥

हे तुळसी, तू लक्ष्मीची मैत्रिण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारद तुझी स्तुती करतो. तू नारायणाच्या मनाला अत्यंत आवडतेस. तुला नमस्कार असोत.

प्राचीन कालापासून ही धार्मिक परंपरा जोपासली गेली आहे. श्रीसत्यनारायण पूजेच्यावेळी विष्णूसहस्र नावे घेऊन  एक हजार तुलसीपत्र नारायणाला अर्पण करतात. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी रोजी तुलसीविवाह संपन्न झाल्यावरच माणसांचे विवाह संपन्न होत असतात. ही प्रथा फार प्राचीन कालापासून पाळण्यात येत आहे.

तुलसीची उत्पत्ती

तुलसीचे मूळ नाव तुळस असावे. तुलसी हे त्या नावाचे संस्कृतीकरण झाले असावे असे व्युत्पत्तिकोशात म्हटले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात “तुलसी” हे नाव का मिळाले ते सांगितले आहे.

नरा नार्यश्च तां दृष्ट्‌ वा  तुलनां दातुमक्षमा: ।

तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद: ॥

नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना.म्हणून पुरातत्त्‌ववेत्ते तुलसी या नावाने तिला संबोधू लागले.

देव-दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघाले, त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि  त्यातून तुळस निघाली. ती तुळस ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूना दिली, असे स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे.

दुसर्‍या एका कथेप्रमाणे जलंधराची पत्नी वृंदा हिच्यापासून तुलसीचा जन्म झाला असे सांगण्यात आले आहे. पुराणात  तुलसी जन्माच्या आणखीही कथा सांगण्यात आल्या आहेत.

पद्मपुराणात तुलसीमाहात्म्य  सांगितले आहे. “तुलसीचे केवळ दर्शनही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे. तुलसी ही वृंदावनात राहते. ती विष्णूला परमप्रिय आहे. तुलसीदलाशिवाय विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते.”

मणिकांचनपुष्पाणि तथा मुक्तामयानि च ।

तुलसीदलपत्रस्य कलां नार्हन्ति षोडशीम॥

सुवर्णाची, रत्नांची आणि मोत्याचीही फुले असली ( विष्णूला वाहिली ) तरी त्यांना तुलसीपत्राच्या सोळाव्या कलेचीही सर येणार नाही.

तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।

तद्‌ गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिंकरा: ॥

ज्या घरी तुलसीचे बन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.

तुलसीच्या बनाभोवतालची जमीन ही गंगेसारखी पवित्र असते असे सांगण्यात आले आहे. स्नान करून नंतरच तुलसी पाने काढावीत. पाने ओरबाडून काढू नयेत. तुलसीची पाने काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना म्हणावी तुलस्यमृतजन्मासि सदा त्वं केशवप्रिये ।

केशवार्थे विचिन्वामि वरदा भव शोभने ॥

हे तुलसी, तू अमृतापासून जन्मली आहेस. तू विष्णूला सर्वकाल प्रिय आहेस. मी विष्णूसाठी तुला खुडतो. हे शोभने, तू मला वर देणारी हो.

भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करतांना त्यावर तुलसीपत्र ठेवतात. तरच भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करतात अशी श्रद्धा आहे. तुलसीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, पूजन, रोपण आणि सेवन हे पुण्यदायक मानले जाते.

दा. कृ. सोमण