•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    डिसेंबर २०२४ – व्यसन, भावनिक आरोग्य आणि हीलिंग

    प्रथम आपण व्यसन (Addiction) म्हणजे काय ते जाणून घेऊ या. शब्दकोशाप्रमाणे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होणे म्हणजे व्यसन, ज्याच्यामुळे आपली शारीरिक व मानसिक हानी होते. अलीकडच्या काळापर्यंत व्यसनाचे वर्गीकरण म्हणजे केवळ दारू, जुगार, बेकायदेशीर ड्रग्स इत्यादी म्हणून केले जात होते. जसजसा काळ बदलला आणि गॅझेट्‌स हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे तसतसे एक नवीन व्यसन समोर आले आहे आणि ते म्हणजे “गॅझेट व्यसन” (Gadget Addiction). गॅझेट्‌स म्हणजे विशेषत: मोबाईलने संपूर्ण जग एका छोट्या बॉक्समध्ये वेढले आहे, जे प्रत्येकजण आपल्याबरोबर कुठेही बाळगू शकतो. सध्या मोबाईलला दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. हात आणि मणक्याचे आजार यासारख्या आरोग्याच्या धोक्याबरोबर मोबाईलमुळे तुमच्या भावनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. प्रत्येकालाच हे जाणवले असेल आणि प्रत्येक जण हे वाचताना ह्याच्याशी सहमत असाल/ असेल.

    गॅझेट्‌स विशेषत: मोबाईलच्या व्यसनाधीन होण्यापासून तुम्ही स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकता हे मी शेअर करण्यापूर्वी व्यसनाची कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थोडे खोलात जाऊ या. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि भावनिक स्तरावर त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे प्रेम, काळजी, प्रशंसा, करुणा, दया इत्यादी आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे फॉलोअर्स, लाइक्स, कमेंट्‌स इत्यादीच्या रूपात ही गरज मोठ्या प्रमाणात गॅझेट्‌स पूर्ण करतात. एकदा का तुम्ही सोशल मीडियावर ते प्राप्त करण्यास सुरुवात केली की ती भावनिक गरज पूर्ण होऊ लागते आणि मनातील पोकळी भरायला सुरुवात होते. गॅझेट्‌सने प्रदान केलेल्या प्रत्येक लाइक्स व कमेंट्‌स मध्ये तुम्ही हळूहळू अडकत जाता आणि तुम्हाला समजण्याआधी गॅझेट तुमच्यावर कब्जा करतात. सतत सोशल मीडियावर आपण ऑनलाइन असण्याची शर्यत सुरू होते, यामुळे तुम्ही आपलं खरं आयुष्य जगण्यापासून दुरावता.

    पहिले लक्षण म्हणजे फोमो (Fear of missing out) यामुळे प्रत्येक क्षणी तिथे ऑनलाईन (online) असण्याची आणि दिसण्याची गरज निर्माण होते. १०० पैकी ९५ लोक याला बळी पडतात आणि सतत ह्या भीती आणि दबावाखाली असतात की आपण काहीतरी मिस आऊट केलंय. आपण जमावापासून दूर होतोय (fear of being left out) ही भीती मानवाच्या मनातील सर्वांत खोल भीती आहे आणि ती नकळत ट्रिगर होते. तुम्ही आजूबाजूला बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अनेक लोक त्यांच्या जीवनातील विविध पैलूमध्ये “मै रह गयी” ह्या वर्तणुकीचे स्वरूप दर्शवीत असतात. सोशल मीडियाचा वापर करताना अजून एक फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दुर्लक्ष करु शकता, ब्लॉक करू शकता आणि डिलीट ही करू शकता जे तुम्ही वास्तविक जगामध्ये करू शकत नाही पण “अति तेथे माती” ही म्हण अगदी खरी आहे. ज्याक्षणी
    गॅझेट तुमच्यावर हावी होतो त्याक्षणी ते व्यसन बनते. ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक गुंतागुंत होण्यास सुरुवात होते.

    यावर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्याऐवजी दुसरे काहीतरी तुमच्या जीवनावर हुकुमत गाजवत आहे हे सत्य स्वीकारणे. एकदा जागरुकता आली की छोटे छोटे बदल आणि सोपे लक्ष्य सेट करून सुरुवात करा. आजच्या काळात गॅझेट न वापरणे हा पर्याय नाही तर आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणे ही एक निवड आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण का निवडू इच्छिता याची यादी करा. काही लोकांसाठी ही यादीच प्रेरणा बनू शकते, गॅझेटचा वापर मर्यादित करण्यासाठी. पण बहुसंख्य लोकांसाठी हे घडणार नाही. अशा परिस्थितीत गॅझेट्‌वर आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामांची यादी करा, जसे की कुटुंब – मित्रांना कॉल करणे, जगातील घडामोडींची महिती, ऑनलाइन व्यवसाय इत्यादि. तुमच्या गरजेनुसार प्राधान्य द्या आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करताना वास्तववादी होऊन करा म्हणजे तुम्हाला हे वेळेचे नियोजन मोडण्याचा मोह होणार नाही. आता स्वत:बरोबर थोडेसे कठोर (strict) राहून या वेळेच्या नियोजनाचे पालन करा, हे बहुतांशी लोकांकरता काम करेल.

    आता काही मूठभर लोक शिल्लक राहतील ज्याच्यासाठी हे उपयोगी पडणार नाही. अशा लोकांकरता हे गॅझेट व्यसन कोठून येते हे पाहण्याची आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज येथे आहे, हे विविध उपचार पद्धती वापरून केले जाऊ शकते जसे समुपदेशन, रेकी, प्राणिक हिलिंग, पास्ट लाइफ रिग्रेशन (past life regression), संमोहन थेरपी, थीटा हिलिंग इत्यादि.

    प्रत्येक उपचार पद्धतीची स्वत:ची एक स्वतंत्र उपचार करण्याची पद्धत असते आणि ते उपचार घेणार्‍यांना जे उत्तम आहे तेच देते. कोणत्याही उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या हीलिंगमध्ये विश्वास आणि समर्पण. हीलिंग एक प्रकिया आहे जी तुमच्या आयुष्याला चांगल्या रीतीने कलाटणी देते. उपचार पद्धतीमुळे नवीन संधी चालून येतात, बरे होण्यासाठी जागरुकता निर्माण होते. जी ट्रिगर आणि पोकळी गॅझेट्‌ भरून काढत होती, ती हिल होते.

    या अनोख्या तंत्रज्ञाने भावनिक उपचार प्राप्त करणार्‍यांना त्यांच्या अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन मूळ कारणं शोधण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यास मदत करते. उपचार पद्धतीमुळे दु:ख, पोकळी, एकटेपणा इत्यादीसाठी उत्तरे मिळतात. या उपचारपद्धतीमुळे वरील कारणाचे विविध स्तरांवर हीलिंग होते. जसे ग्रुप कॉन्शिअसनेस, बालपणाचे संस्कार, गर्भातील ट्रॉमा, पूर्वजांचे पॅटर्नस्‌, मागील जीवन (past life) इत्यादि.

    आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. उपचार पद्धती ही ब्रह्मांडाने तुम्हाला प्रदान केलेली साधने आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता. हीलिंगचा उपयोग करून तुमचे जीवन हिल करा.

    – निलिमा अमित

    Read more

    नोव्हेंबर २०२४ – साड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

    • भारी आणि किंमती साड्या, काठा-पदराच्या साड्या नेहमी उलटी घडी घालून सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. या साड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवू नका. त्यामुळे जर काळी पडते. या साड्यांना नेहमी ड्रायक्लिनिंग करा. वेळोवेळी त्यांच्या घड्या बदला.
    • ऑरेगंजा, टिश्यू, चंदेरी या साड्यांना दाबून ठेवू नका त्यामुळे घडीच्या ठिकाणी या साड्या फाटण्याची शक्यता असते. जर साडीवर काही सांडलं, पडलं तर लगेच स्वच्छ करा. पूर्ण साडी धुवू नका. कारण संपूर्ण साडी खराब होण्याची शक्यता असते. साडीवर पातळ कपडा ठेवून मगच अशा साड्यांना इस्त्री करा.
    • जरीच्या साड्यांना एकदा नेसल्यानंतर धुवू नका. या साड्यांना घरातच धुणे योग्य. धुताना पाण्यात थोडसं मीठ घाला व स्ट्राँग डिटर्जंटचा वापर टाळा. धुतल्यानंतर अशा साड्या न पिळता निथळायला ठेवा आणि पाणी निघून गेल्यावर वाळत टाका.
    • नेसलेली साडी काढल्यानंतर लगेच घडी घालून ठेवू नका किंवा धुवायलाही टाकू नका. आधी ती वाळत घाला, जेणेकरून घाम सुकून जाईल.
    • शालू वापरून झाल्यानंतर चांगला सुकू द्या, जेणेकरून घामामुळे तो खराब होणार नाही. शालू काही तासांपुरता तुम्ही वापरला असाल, पण वापरून झाल्यानंतर तो ड्राय-क्लिनिंगला देणं जास्त महत्त्वाचं आहे. ड्राय-क्लिनिंग करून झाल्यानंतर शालू वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवू नका. शालूच्या घड्या घालताना बटर पेपरचा वापर करा. नेहमी महागड्या साड्या सुती कपड्यात बांधून ठेवा. साडी सुती कपड्यात बांधून ठेवताना त्यात इतर कोणत्याही साड्या ठेवू नका. महागड्या व सिल्कच्या साड्यांवर इस्त्री करताना त्यावर पाणी मारून इस्त्री करणं टाळा. मोती किंवा खड्याची कलाकुसर केलेल्या साड्या घडी करून ठेवताना त्यातला कलाकुसर केलेला भाग आत ठेवा. आणि उलट्या बाजूने घडी करा. यामुळे मोती किंवा खडे दुसर्‍या साड्यांना अडकून निघणार नाहीत.
    • घडी करून ठेवलेल्या साडीची काही महिन्यांनी घडी उसवा असं केल्याने साडीवर सुरकुत्या पडणार नाहीत.
    • सिल्कच्या साड्यांची चमक काही काळानंतर जाते किंवा त्यावर काळसर रंगाची छटा येते, त्यामुळे त्या पॉलिश करून घ्या. घरच्या घरी साडी धूत असाल तर गरम पाण्याचा वापर करू नका.
    • प्रत्येक स्त्रीकडे साड्यांचा भरपूर स्टॉक असतो. पण वेळेअभावी त्यांची देखभाल करणं, काळजी घेणं जमत नाही आणि मग आपल्या आवडत्या साड्या खराब होतात. पण थोडासा वेळ काढलात आणि थोडीशी काळजी घेतलीत तर निश्चितपणे तुमच्या जुन्या साड्या वर्षानुवर्षे नव्यासारख्या राहतील..

    Read more

    ऑक्टोबर २०२४ – ज्येष्ठांचे आयडियल आरोग्य

    ज्याची कालांतराने झीज होत राहते ते म्हणजे शरीर. जगामध्ये कुठलीही गोष्ट असो मग ती सजीव असेल किंवा निर्जीव ह्याची निसर्गनियमाप्रमाणे कालांतराने झीज होतेच.

    आपण आता म्हातारे झालो असे स्वत:च आपण समजू लागलो तर शरीरातसुद्धा त्­याप्रमाणे क्रिया घडू लागतात. वृद्ध लोकांचा आत्मविश्वास सर्वच बाबतीत कमी व्हायला लागलेला दिसतो. त्­यातच आजार झाले म्हणजे तर ते हतबलच होतात. त्­यांच्­यावर एक प्रकारचे मानसिक दडपण येण्यास सुरुवात होते आणि ह्याच सततच्­या दडपणामुळे शरीरसुद्धा आजाराशी दोन हात करू देत नाही आणि त्याची तीव्रता त्­या व­यात जास्त जाणवू लागते.

    म्हातारपण म्हणजे दुसर्‍यांदा बालपण जगणे. आपले वय जसजसं वाढत जाईल तसतसं आपला विचार करण्याचा दर्जा ही वाढतच गेला पाहिजे.

    जिंदगी बडी होनी चाहिए – लंबी नही. समाजात राहणारा प्रत्­येक नागरिक हा कालांतराने वृध्द होणारच असतो. एखाद्या माणसाला त्­याचे व­य विचारले की आपल्­या जन्मतारखेप्रमाणे आपले वय किती आहे ते सांगतो यालाच कालक्रमाला धरून सांगितलेले वय असे म्हणता ­येईल. व्­यवहारामध्ये असे व­य सांगणे योग्­य असले तरी आपले शारीरिक, मानसिक व सामाजिक वय किती आहे ह्याच्­ा प्रत्येक व्­यक्तीने विचार केला पाहिजे. एखादा ५० वर्षांचा माणूस २५-३० वर्षाचा माणसाएवढा दिसतो किंवा अगदी तिशीतला माणूस ५० वर्षाचा माणसाएवढा दिसू लागतो. शरीरातील अवयवांवर आणि पेशींवर कालमानाप्रमाणे झालेला परिणाम ह्याला जैविक व­य किंवा Biological Age असे म्हणतात.

    थोडक्यात काय तर शारीरिक किंवा जैविक वय प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलणारे असते. नियमीत व्यायाम, चौकस व पौष्टिक आहार आणि आदर्श जीवनपद्धती जर आचरणात आणली तर म्हातारपणीसुद्धा बरेचसे वृद्ध फिट राहू शकतात. शारीरिक वयाप्रमाणे मानसिक वयही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळे असते. काही मानसिक कारणांमुळे जसे नैराश्य, एकाकीपणा, सतत मानसिक दडपण, आर्थिक विवंचना, कर्जबाजारी होणे, अतिमहत्त्वाकांक्षा किंवा चिडचिडेपणा, निरुद्योगी माणसांमध्ये जास्त काळ राहणे ह्यामुळे एजींग प्रोसेस लवकर होत जाते त्यामुळे मानसिक शांती फार महत्त्वाची आहे.

    शरीराची झीज किंवा विनाश होऊ द्यायचा नसेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे शरीराचा सतत वापर करीत राहणे. आपल्या शरीरात जी काही ऊर्जा किंवा शक्ती असते ती काम करत राहिल्यामुळेच टिकून राहते.

    वयोमानानुसार शरीरामध्ये खालीलप्रमाणे काही विशिष्ट बदल दिसून येतात.

    ) शरीरातील चरबी : शरीरातील चरबीचे प्रमाण वयाच्या २० ते ६०व्या वर्षापर्यंत खूप जास्त असते व नंतर ते हळूहळू कमी होऊ लागते.

    ) चयापचय (मेटाबॉलीझम) : वयाच्या पन्नाशीनंतर चयापचय क्रियेचा वेग मंदावू लागतो. जितका आहार आपण पूर्वी घेतो त्यापेक्षा आहाराचे प्रमाण कितीतरी पटीने कमी होते.

    ) रक्तदाब : वय जसजसं वाढत जाते तसतसं रक्तवाहिनीची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्याची लवचिकता कमी होते व ते संकुचित होतात व त्यामुळे रक्ताचा दाब वाढतो.

    ) ब्लडशुगर : प्रत्येक व्यक्तीला शरीरातील विशिष्ट ऊर्जा टिकवण्यासाठी साखरेची गरज असते. रक्तातील साखर आवश्यकतेप्रमाणे शरीरातील सर्व भागात पोहचवली जाते परंतु जसे जसे वय वाढते तशीतशी शरीरातील रक्ताची साखर वापरून घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. शरीरातील स्वादुपिंडाची कार्यशक्ती कमी होते व मधुमेहाची शक्यता निर्माण होते.

    ) सांध्याचे दुखणे : वय झालं की सांधेदुखी होणारच, अशी आपण आपल्या मनाची तयारी करतो. परंतु तरुणपणात काळजी घेतल्यास उतारवयात हा रोग आपल्याला त्रास देऊ शकत नाही. कारण हल्ली उपलब्ध असणार्‍या आधुनिक औषधोपचारामुळे हा आजार अगदी सहजपणे नियंत्रणात आणता येतो. संधिवाताचा जर विचार केला तर पुरुषांच्या  तुलनेत स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण अधिक आढळून येतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास भविष्यात स्त्रियांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.

    ज्येष्ठांसाठी काही महत्त्वाच्या टीप :

    १) दिवसा शक्यतो झोपू नये. परंतु रात्री मात्र कमीत कमी ७ ते ८ तास झोप घ्यावी.

    २) दिवसातून थोडे थोडे तीन चार वेळा मोजकेच खावे.

    ३) रात्रीचे जेवण शक्यतो हलके घ्यावे.

    ४) वजनावर नियंत्रण ठेवावे.

    ५) नियमितपणे जमेल तेवढा व्यायाम करणे जसे चालणे, सायकलींग, बागकाम व काही घरची कामे इ.

    ६) तंबाखू, धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे.

    ७) थंड पदार्थ शक्यतो टाळावेत.

    ८) औषधे घेण्याची जरूरी असेल तरच ती घ्यावीत आणि ती सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी. स्वत:च्या मनाने सेवन करू नयेत.

    ९) वार्धक्यामध्ये वात दोषाचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे वातुळ पदार्थ किंवा कडधान्याचा वापर जास्त करू नये.

    १०) रोज किमान १ ग्लासभर दूध तरी प्यावे.

    साधी साधी तत्त्वे जर आचरणात आणली तर आयुष्यमानाचा नाही तर जीवनमानाचा दर्जासुद्धा सुधारतो.

    समर्थ रामदाससुद्धा म्हणतात,

    ओषध न घे व्यथा पथ्य न पाळे सर्वथा

    न मिळे आली या व्यधा तोचि एक मूर्ख

    Read more

    सप्टेंबर २०२४ – फळं आणि भाज्यांचे महत्त्व

    आपला रोजचा आहार हा फळं आणि भाज्याने भरपूर असायला हवा. त्याचं मुख्य कारण हे – की त्यांच्यातील रेषेमय पदार्थ आपल्या आतड्यांची हालचाल होण्यासाठी उपयोगी पडतात.

    ) फळं खाण्याबद्दलचे नियम:-

    सामान्यत: फळं ही रिकाम्या पोटी खावीत. त्याचं कारण असं की, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या पोटामध्ये येणार्‍या अन्नाच्या स्वागतासाठी पाचक रस हे तयार झालेले असतात. आणि हे पाचक रस, पित्त स्वरूपामध्ये असतात त्यामुळे त्यांना शमन करण्यासाठी किंवा त्यांना पचन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पित्तशामक असं अन्न जर घेतलं तर दिवसभर आपल्या शरीरामध्ये हे पित्त आपलं कार्य नीट करत राहतं.

    आपण खाल्लेले फळांचे तुकडे  अशा रसामध्ये परिवर्तित केले जातात. आता हा रस बनत असताना पोटाची थोडीशी जी हालचाल होते त्याचा परिणाम आपल्या पोटामागे असलेल्या आपल्या मोठ्या आतड्यावर होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला शौचास होण्याससुद्धा मदत होते.

    ) फळांचा अतिरेक झाला की काय होतं

    कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. आपण कधीतरी नुसती फळं खातो. की खरंच आपल्याला दुपारी जेवण खूप जड झालंय आणि आपल्याला संध्याकाळी काही खायचं नाहीये. अशावेळी आपण विचार करतो की आपण फक्त फळं खाऊ अशावेळी नुसती फळं खाल्ली तरी चालेल. पण नुसतीच फळ खाणं आणि बाकी काही न खाणं याच्यामुळे आपल्याला सकस आहार किंवा पौष्टिक आहार मिळत नाही. कारण फळांमध्ये जरी चांगले रस आणि आपल्याला पाहिजे ती विटामिन्स छोट्या प्रमाणामध्ये असली, तरी प्रोटीन्स किंवा प्रथिनं ही त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे त्याच्या जोडीला तुम्ही थोडे अक्रोड, बदाम, किंवा एखादा उकडलेलं अंडं, शेंगदाणे, चणे असं खाल्लं तर खूप चांगलं.

    फळांमध्ये पपई, अननस ही दोन्ही फळं उष्ण असतात. त्यामुळे ती उष्ण काळात टाळावीत.

    आता कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं?

    ज्या ऋतूंमध्ये ज्या भाज्या होतात त्या ऋतूमध्ये त्या भाज्या खाव्यात. हल्ली आपल्याकडे खूप चंगळ असल्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मिळतात. पण एक छोटासा आपण विचार केला तर चातुर्मासामध्ये आपण काही भाज्या वर्ज्य ठेवतो. त्या तशा खाल्ल्या नाहीत तर आपल्या शरीरामध्ये वातपित्त कफाचं संतुलन राहतं आणि नाही तर पित्त वाढणं किंवा वात वाढणं हे त्रास आपल्याला होऊ शकतात. ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे जसे दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, काकडी या सगळ्या भाज्या रात्री खाल्ल्याने आपलं पोट हलकं राहतं. आणि इतर भाज्या आपण सकाळी खाऊ शकतो. त्यामुळे ऋतूप्रमाणे मिळणार्‍या भाज्या जर आपण खाल्ल्या तर हे खूप चांगलं. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या टाळाव्यात, कारण पावसाळ्यामध्ये या पालेभाज्यांच्या वर अनेक किडे त्यांची अंडी घालतात आणि ती इतकी छोटी असतात ती आपल्याला ती डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्यामुळे दिसायला जरी ती भाजी चांगली आणि ताजी दिसली तरीसुद्धा त्याच्यावर किड्याने घातलेली अंडी असू शकतात. म्हणून पालेभाजी ही पावसाळ्यामध्ये टाळलेली चांगली.

    अशा पद्धतीनेच आपल्याला काही भाज्या- पालेभाज्या अशा असतात की ज्या पावसाळ्यामध्ये खाव्या. अशा भाज्या जर तुमच्या आजूबाजूला मिळत असतील तर त्या अवश्य आणाव्यात. फळंसुद्धा त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी खाल्ली तर त्या फळांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि त्याच्यातील रेषा ह्या आपल्या आतड्यांची क्रिया आणि आतड्यांची हालचाल चांगली ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आतड्यांच्या हालचालीबद्दल थोडंसं परत सांगते – हल्ली लोकं खूप उशिरा जेवतात. जर आपण दहा वाजता जेवलो आणि नंतर थोडं शतपावली किंवा घरातल्या घरात हालचाल करून झोपलो नाही, तर सकाळी सहा वाजता उठल्याबरोबर आपलं पोट साफ होईल म्हणजेच आपल्याला शौचाला होईल, ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. पण ही अपेक्षा लोकांची असल्यामुळे आणि मग पोट साफ झालं नाही म्हणून त्यांना वाटतं की, आपल्याला
    कॉन्स्टिपेशन आहे आणि म्हणून मग रेचक औषधं अतिप्रमाणामध्ये घेतली जातात हे चुकीचं आहे.

    आपलं अन्न पचायला आणि ते पचून आतड्यांमध्ये पुढे जाऊन मोठ्या आतड्यामध्ये येऊन ते शौच रूपामध्ये आपल्याला त्याची संवेदना व्हायला किमान आठ तास तरी आपण द्यायला पाहिजेत. त्याचबरोबर जर आपण दहा वाजता जेवण जेवलो, आणि त्याच्या अगोदरचेसुद्धा जेवण आपण आपल्याला पचेल ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर घेतलेलं असतील तर ती सगळाच भार आपल्या पचनशक्तीवरती येतो.

    म्हणूनच जरी आपल्याला आज- उदाहरणार्थ कलिंगडं – टरबूज ही फळ थंडीमध्येही मिळत असली तरीसुद्धा आपण सारासार विचार करून ही फळ उन्हाळ्यात खाण्याची फळं आहेत, त्यामुळे ती आपण थंडीमध्ये टाळायला पाहिजे, असा विचार करून, आपण आपलं पूर्ण दिवसाच्या डायटचा एक प्लॅन तयार करावा. त्या डायट प्लॅनमध्ये प्रमाणबद्ध जेवण आणि ते जेवण पचेल याच्यासाठी प्रमाणबद्ध व्यायाम हे करणं अतिशय आवश्यक आहे.

    जाता जाता आहाराबद्दलच बोलत असल्यामुळे थोडं आणखी- आपण फळभाज्यांबद्दल बोललो, पण आयुर्वेदाप्रमाणे आपल्या जीवनात मांसाहारसुद्धा असणं आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितले की तुम्ही हित आहार घ्या, मित आहार घ्या, आणि शाकाहारी व्हा. म्हणजे नुसतंच शाकाहारी खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये हवी असलेली तत्त्वं तुम्हाला मिळत नाहीत.

     याचा नीट विचार करा, कारण आयुर्वेद हा आपला धर्मग्रंथ नव्हे. आयुर्वेद हा आपल्याला आपलं आयुष्य कसं चांगलं आपण घालवावं याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करणारा असा एक वेद आहे म्हणजे सत्य असं एक ज्ञान आहे.

    – डॉ. नियती चितलिया- बढे

    Read more

    ऑगस्ट २०२४ – विचार की अतिविचार

    तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? एखाद्या मित्र/मैत्रिणीचा मेसेज आला आहे आणि तुम्ही त्यावर भरपूर विचार करून त्याचा वेगळाच अर्थ काढला. प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्या मित्र/मैत्रिणीशी बोलणं झालं तेव्हा ते तुम्हाला म्हणाले की, “अरे ते लिहून पाठवलं होतं तेवढेच मला म्हणायचं होतं. त्यामागे वेगळा काहीही विचार नव्हता.” आणि आपल्या लक्षात येतं हे आपण उगाचच बराच वेळ फालतू विचार करण्यात घालवलेला आहे.

    विचार असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्यातून दोनच गोष्टी समोर येतात एक म्हणजे विचार करणे आणि दुसरी म्हणजे अति विचार करणे.

    एखादा निर्णय घेताना माणूस जितका जास्त वेळ विचार करण्यात घालवतो ना तितका जास्त वेळ तो स्वत:च्या मनाला त्या निर्णयाबद्दल नकारात्मक विचार करण्यासाठी भरीला घालत असतो.

    नकारात्मक विचार किंवा अतिविचार हे फक्त आणि फक्त नुकसानच करतात.

    पण मग हे अतिविचार म्हणजे काय? हे सगळं नेमकं सुरू कुठून होतं?

    त्यामुळे मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात? आणि ते करणे थांबवायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टींवर मला उत्तरं मिळाली ती समुपदेशक गौरी हर्षल कुलकर्णी (फोन नंबर ९७३०९६१०१४) यांच्या “अतिविचारांबद्दल असलेल्या “ऑनलाईन कार्यशाळे” मध्ये.

    त्यातल्याच काही गोष्टी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

    सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ – अतिविचार/ overthinking म्हणजे काय?

    अति विचार म्हणजे नकारात्मक विचारांची एक अशी साखळी जी सतत भूतकाळात घडून गेलेल्या घटनांभोवती फिरत असते. ही साखळी आपल्याला त्याच त्याच घटनांमध्ये इतकं अडकवून ठेवते की आपण भविष्यकाळात येऊ घातलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा नकारात्मक अति विचार करू लागतो.

    सध्याच्या काळात “अतिविचार करणे” ही एक गंभीर समस्या बनली आहे.

    अतिविचार करण्याने काय होतं?

    १. घडून गेलेली घटना, प्रसंग याबद्दल विचार करणे थांबवता येत नाही. आणि तसं करता न आल्याने ती व्यक्ती प्रत्यक्ष कृती करत नाही.

    २. त्याच त्याच घटनांमध्ये अडकून पडल्याने नकारात्मक विचार करण्यामध्ये वाढ होते.

    अति विचार करण्यामुळे होणारे परिणाम

    १. सतत चिंता करणे

    २. डिप्रेशन / नैराश्य येते

    ३. भीती

    ४. ताण

    ५. थकवा

    ६. निर्णय अक्षमता

    ७. एकटेपणा

    ८. व्यसनाधीनता

    ९. निद्रानाश

    १०. आत्महत्येचे विचार मनात येणे.

    अति विचार करण्याची कारणे

    १.   अतिसंवेदनशीलता

    २.   आत्मविश्वासाचा अभाव

    ३. स्वत:बद्दल योग्य भूमिका नसणे.

    ४.   भ्रामक कल्पना

    ५.   अतिकाम ओढवून घेणे

    ६. नकारात्मक स्व संवाद (निगेटिव्ह सेल्फ टॉक)

    अति विचार  करण्याने निद्रानाश आणि थकवा ह्या व्यतिरिक्त इतरही दुष्परिणाम शरीरावर होतात ते खालीलप्रमाणे

    १. अतिविचार केल्याने मेंदूवर सतत ताण येतो. आणि त्यामुळे चिंता विकृती (anxiety disorder) आणि मूड खराब होऊ शकतो.

    २. पचन संस्थेवर परिणाम होतो.

    ३. हृदयावर ताण येतो.

    ४. प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

    लहानपणी मनावर झालेले आघात

    बर्‍याचदा अतिविचार करण्याचे मूळ हे लहानपणी घडलेल्या एखाद्या प्रसंगांमध्ये सुद्धा दडलेले असू शकते. लहानपणी अपयश आल्यानंतर किंवा इतर कुठल्याही मार्गाने जर कोणी मानसिक खच्चीकरण करणारे शब्द उच्चारले असतील तर त्याचा मनावर होणारा आघात हा दूरगामी परिणाम निर्माण करतो.

    उदा. द्यायचे झाले तर….शाळेत एखाद्या शिक्षकांनी तुला जमणार नाही तू ढ आहेस अशा पद्धतीची वाक्य विद्यार्थ्यांसंदर्भात वापरणे किंवा ही अशी वाक्य पालकांकडून वापरली जाणे.

    अतिविचार थांबवण्यासाठी उपाय

    १. स्टॉप अँड पॉज मेथड

    अतिविचारांची साखळी सुरू झाली आहे असे लक्षात येताच स्वत:ला ऐकू येईल अशा पद्धतीने स्टॉप म्हणणे आणि नंतर मनाला दुसरीकडे वळवणे. Pause घेऊन त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलणे.

    २. नकारात्मक विचार सुरू होण्यासाठी कारणीभूत गोष्टी (ट्रीगर) निरीक्षणातून ओळखणे. त्यासाठी एका वहीत नोंद करणे.

    ३. स्वत:च्या भावना जाणून घेणे आणि त्या स्वीकारणे.

    ४. स्वत:शी बोलताना जाणीवपूर्वक सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करणे.

    ५. मेडीटेशनचा सराव करणे.

    ६. निसर्गाच्या, पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात वेळ घालवणे.

    ७. सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे.

    ८. मनाला प्रसन्न करणार्‍या गोष्टी करणे.

    ९. छंद जोपासणे. पुस्तक वाचन, संगीत ऐकणे वगैरे

    १०. योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारणे.

    आणि सगळ्यात महत्त्वाचे जर हे सगळे जमत नसेल तर योग्य वेळी योग्य तज्ञांची मदत घेणं.

    – कल्याणी मोडक

    Read more

    जुलै २०२४ – आर्थिक मंदी – फसवी का खरी

    आर्थिक मंदी म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये आलेली लक्षणीय घट ज्यामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) घट होते. सर्वसाधारणपणे जर अशी घट सलग दोन किंवा अधिक तिमाही कालावधीमध्ये दिसून आली तर ती आर्थिक मंदीची चिन्हे समजली जातात. वित्तसंस्था, कारखाने, सेवा क्षेत्रे, पर्यटन, निर्यात, कृषी अशा अर्थव्यवस्थेमधील विविध महत्त्वाच्या घटकांमध्ये मागणीअभावी मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते.

    आर्थिक मंदीचे परिणाम एखाद्या साखळीसारखे असतात. एका घटकाचा परिणाम दुसर्‍या घटकावर होतो आणि दुसर्‍याचा तिसर्‍या घटकावर. जर तुम्ही सध्याची विकसित देशातील परिस्थिती बघितलीत तर लगेच समजून येईल की उत्पादनाच्या म्हणजेच पुरवठ्याच्या तुलनेत जास्त असलेली मागणी हे त्या देशातील प्रचंड वाढलेल्या महागाई दरामागील मुख्य कारण आहे. मागणी आणि पुरवठा हे महागाईचे दोन मुख्य घटक. या दोन घटकांमध्ये जर योग्य संतुलन साधले गेले तर महागाई आपोआप नियंत्रित राहते

    सध्या जगातील विकसित आणि बलाढ्य अर्थव्यवस्था जसे अमेरिका, युरोपियन महासंघ, इंग्लंड, कॅनडा इ. खूप प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाई दरास सामोरे जात आहेत. हा महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी दोन उपाय सर्वसाधारणपणे उपलब्ध असतात. मागणी कमी करणे आणि पुरवठा वाढवणे. पुरवठा संवर्धनामध्ये सरकारी धोरणांची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि हे तुलनेने वेळखाऊ काम आहे. मागणी नियंत्रण साधारणत: मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारीत येते आणि व्याज दरातील बदलांमधून हे साधता येते आणि याचे परिणाम जलद गतीने दिसून येतात. सध्या या सर्व देशातील मध्यवर्ती बँका हा वाढता महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी जलद परिणाम करणार्‍या उपायाचा उपयोग करत आहेत ते म्हणजे व्याज दर वाढ.

    सध्या विकसित देशांमधील वाढलेले व्याज दर हे ह्या त्या देशांमधील मागणी कमी होण्यास कारणीभूत होत आहेत. जगातील बाकी विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्था ह्या बर्‍याच प्रमाणात ह्या मोठ्या देशांमधून येणार्‍या मागणीवर अवलंबून असतात कारण अशा देशांतील असलेल्या देशांतर्गत मागणीवरील मर्यादा, अविकसित अर्थ बाजार इ.

    आता वरील नमूद केलेल्या विश्लेषणाच्या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केला तर काही गोष्टी सहज लक्षात येतील. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असलेली देशांतर्गत मागणी. आपली प्रचंड लोकसंख्या अशावेळी आपले एक बलस्थान होते. म्हणजे आपल्या उत्पादनांसाठी जागतिक मागणी कमी झाली तरी आपली प्रचंड देशांतर्गत मागणी ही पोकळी मोठ्या प्रमाणावर भरून काढेल. आणि जर पुरवठ्याची बाजू बघायची तर अनेक सरकारी योजना जसे की, काही क्षेत्रांसाठी करमुक्त मुदत (Tax Holidays), उत्पादन संलग्न बक्षिसी (Production Linked Incentive) इ. गोष्टी पुरवठा मजबूत करण्यास मदत करतात.

    रिझर्व्ह बँकेच्या कडक नियंत्रणामध्ये असलेल्या आणि जागतिक दर्जाच्या सेवा देणार्‍या बलवान देशांतर्गत पतसंस्था हे आपले अजून एक वैशिष्ट्य जे आपल्याला जागतिक अर्थकारणामध्ये होणार्‍या बदलांपासून एक संरक्षक कवच देते. त्याचप्रमाणे भारतातील सेवा क्षेत्र, आयटी आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) यांची जागतिक उपस्थिती लक्षणीय आहे. या क्षेत्रांना तात्पुरते अडथळे येऊ शकतात, परंतु आउटसोर्सिंग सेवांची मागणी स्थिर राहू शकते कारण सर्व कंपन्या कठीण आर्थिक काळात किफायतशीर उपाय शोधतात. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असताना, इतर देशांच्या तुलनेत त्याची एकात्मता काहीशी कमी आहे. हे जागतिक आर्थिक धक्क्यांच्या तात्काळ प्रभावापासून काही प्रमाणात संरक्षण करू शकते.

    आपण आधी पाहिलेल्या अर्थव्यवस्थेमधील सर्व महत्त्वाच्या घटकांचा जर भारतीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक अंदाज बांधता येऊ शकेल की जागतिक मंदीचा भारतावरील प्रभाव हा नक्कीच मोठ्या प्रमाणात नसेल. हे जरी खरे असले तरी जागतिक मंदीचा आणि होणार्‍या परिणामांचा अंदाज बांधणे हे खूपच क्लिष्ट आहे आणि विवध भू-राजकीय आणि बाह्य घटकांवर अवलंबून आहे. अर्थात मध्यवर्ती बँक आणि सरकार हे सुद्धा मंदीचे परिणाम कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतातच.

    आता या सर्व वैयक्तिक नियंत्रणापलीकडे असलेल्या गोष्टींचा ताण आपण किती घ्यायचा हे प्रत्येकाने स्वत: ठरवले पाहिजे. मंदी म्हणजे १०/१५ दिवसांत लगेच येणारी गोष्ट नाही. आणि मंदीची चिन्हे दिसताच देशातील सर्व यंत्रणा मंदीचे परिणाम कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलत असतात. त्यामुळे योग्य वैयक्तिक आर्थिक नियोजनातून आणि उत्पन्नाच्या स्तोत्रांच्या विविधीकरणातून आपणसुद्धा आपल्या जीवनात एक संरक्षक कवच तयार करू शकतो जे आपल्याला मंदी सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढण्यास पूरक ठरतील.

    Read more

    जुन २०२४ – मधुमेह आणि आपण

    दिवसेंदिवस मधुमेहींची संख्या वाढत चालल्याचं आपण ऐकतो आहोत. आपला देश मधुमेहाची राजधानी होतेय हेही आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण याचा नेमका अर्थ काय लावायचा हे कधी कधी आपल्याला कळत नाही. आज आपण याच विचाराचा मागोवा घेणार आहोत.

    यातला पहिला प्रश्न म्हणजे आपलं असं काय चुकलंय म्हणून आपल्यापैकी अनेकांची शुगर वाढायला लागली आहे? याचं  उत्तर तितकंसं कठीण नाही. संपूर्ण आशिया खंडाच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित आहे. आपणही आशिया खंडाचा भाग असल्यानं आपल्याला हा नियम लागू होतो.

    तुम्ही आम्ही जन्मलो तेच शेतकर्‍याचे जीन्स घेऊन.  सगळं काही शेतीवर अवलंबून होतं. शेतकर्‍याचं उत्पन्न म्हणजे शेतमाल. कुटुंबाची उपजीविका करताना आपली मारामार व्हायची सगळंच तुटपुंजं साहजिकच कमी अन्नात गुजराण करावी लागायची. याला उत्तर म्हणून आपल्या जीन्सना स्वत:त तसे बदल करावे लागले. गेल्या काही दशकांमध्ये यांत्रिक शेती आणि त्या क्षेत्रातली एकंदर प्रगती यामुळं अन्नाची उपलब्धता वाढली. आपण प्रमाणाबाहेर खाऊ लागलो. त्याचा परिणाम म्हणून मधुमेह वाढला. अचानक खूप लोकांना हा त्रास व्हायला लागला.

    ही प्रगती खूप जलद होती. जीन्स बदलायला जो वेळ लागतो तो न मिळताच अन्नाची उपलब्धता आणि त्यावर मारलेला ताव याने आपली शरीराच्या आतली रासायनिक घडी बिघडली. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा लांब पल्ल्याच्या आजारांनी आपण त्रस्त व्हायला सुरुवात झाली. नुसतंच इतकं असलं असतं तरीही ठीक होतं. आपण घरचं सोडून परदेशी जीवनशैलीला जवळ केलं. तेही आपला घात करून गेलं. अचानक गेल्या काही दशकांमध्ये मधुमेह होणार्‍यांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली.

    तरीही मुबलक अन्न मिळणारी पहिली पिढी तशी नशीबवान म्हणायला हवी. त्यांना मधुमेह झाला पण उतार वयात.  पण पुढच्या पिढीत मधुमेहासाठी पोषक जीन्सदेखील उतरले. अन्नाची उपलब्धता होतीच. व्यायामाला फाटा देणारी, व्यायामाची गरजच नाहीशी करणारी वाहनं आणि इतर यंत्रं लोकांना परवडू लागली. लोक ती मोठ्या प्रमाणात वापरू लागले. परिणाम असा झाला की शरीराची गरज आणखी कमी होत असताना खाणं मात्र बेसुमार व्हायला लागलेली पुढची पिढी अधिक कमी वयात जीवनशैलीच्या आजारांना बळी पडू लागली. जग बदललं. जास्त गुंतागुंतीचं बनलं. तणाव वाढले. त्या तणावांचा सामना करायला आवश्यक असलेली मोठी कुटुंबं संपली. व्यसनाधीनता वाढली. सगळं एकत्र येऊन त्याचा जो स्फोटक परिणाम अपेक्षित होता तो झाला. आता आपल्याला कमी वयात रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राल, हृदयरोग आपल्या बोकांडी बसले. आज जी तरुण मंडळी कमी वयात हृदयरोगाला बळी पडताहेत, स्रियांना गरोदरपणात मधुमेह होतोय, मोठ्या प्रमाणात पाय कापले जाताहेत. मूत्रपिंडं निकामी होताहेत, यकृतात चरबी साठल्यानं फॅटी लिव्हरसारखे प्रश्न निर्माण होताहेत, हे काही अचानक घडलेलं नाही. गेल्या काही दशकातल्या आपल्या चुकांचा तो परिणाम आहे.

    मूळ प्रश्न आहे तो आपण यातून काही शिकतो आहोत का?

    दुर्दैवानं याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. आपण आजही आजारी पडू तेव्हा बघू, तेव्हा डॉक्टरांना दाखवू हाच विचार बाळगून आहोत. मधुमेहाची प्रत्यक्ष लक्षणं दिसतील तेव्हाच रक्त तपासून घेतोय. या आजारात दुखत नाही खुपत नाही म्हणून डॉक्टरांनी एकदा चिट्ठी लिहून दिली की त्याच चिठ्ठीवर कित्येक वर्षं औषध घेत राहतो. मनाला वाटेल तेव्हा औषधं बंद करतो. कुठल्याही बाबा, भगताचं ऐकतो. गूगल,
    वॉट्‌सअॅप वर फिरणार्‍या संदेशांना आपलंसं करतो. कोणी काहीही सांगितलं तर त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. पाय, मूत्रपिंड, कोलेस्ट्रॉल, डोळे, रक्तदाब तपासून घेत नाही. खाण्यापिण्याचे, व्यायामाचे नियम पाळत नाही. प्रत्येक गोष्ट औषधांनी केली पाहिजे यावर विसंबून राहतो.

    आज आपल्याला हे नक्कीच बदलावं लागेल. ती काळाची गरज आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा उंबरा झिजवण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे. साहजिकच प्रश्न येईल की नेमकं काय करायचं?

    पहिली गोष्ट अर्थातच पुढच्या पिढीला हे जीवनशैलीचे आजार होऊ नयेत याबद्दल आग्रही असलं पाहिजे. सुदैवानं हे आजार काही दोनचार दिवसात होत नाहीत. म्हणजेच आपल्याला भरपूर वेळ मिळतो. उदाहरणार्थ, प्रत्यक्षात मधुमेह होण्याच्या किमान दहा बारा वर्षं आधी त्या पोषक असं वातावरण शरीरात तयार होत असतं. याचा अर्थ आपल्या हातात दहा बारा वर्षं असतात. हृदयरोगाचा प्रत्यक्ष झटका येण्याच्या काही वर्षं अगोदर कोलेस्ट्रॉल वाढत असतं, हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागलेल्या असतात. एकंदरीत या सर्व आजारांमध्ये ते आजार होऊ नयेत म्हणून प्रयत्न करायला भरपूर वाव असतो. त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करणं आपल्याला शक्य असतं.

    अर्थात प्रथम आपल्याला काहीच होणार नाही हा विचार बाजूला ठेवून ही कास धरायला हवी. हे आजार चिकटले की, आयुष्यभर साथ सोडत नाहीत याची जाणीव धरून कमी वयातच जीवनशैली बदलायला सुरुवात करायला हवी. आईवडिलांपैकी एकाला मधुमेह असल्यास विशी पंचविशीत आणि दोघांनाही असल्यास पंधरा वीस वर्षांचे असतानाच सुरुवात करायला हवी. कारण सध्या पस्तीस चाळिशीत मधुमेह झालेल्यांची संख्या खूप जास्त आहे. तेव्हापासून खाण्यापिण्याच्या सवयी बदलता येतील. व्यायामाच्या संधी शोधून त्या प्रयत्नपूर्वक उपलब्ध करायला हव्यात.

    एका गोष्टीचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. वैद्यकीय वंशावळ हा माझा आवडीचा विषय. कारण जीन्समध्ये काही दोष असला तर त्याचा सुगावा खूप लवकर लागण्याची शक्यता या एका गोष्टीने वाढते. याला खर्च देखील नसतो. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी बोलतात की झालं.

    ती शक्यता वाटलीच तर उद्याची वाट ना पाहता आजच जीवनशैलीतल्या बदलांना सुरुवात करता येईल सवयी सुधारणं सहज शक्य आहे. पार्ट्या कमी करून घरचं खाणं, त्यातही भाज्या, फळं, कच्च्या पदार्थांपासून बनवलेली सॅलड, सुका मेवा, पालेभाज्या अशांवर भर द्यावा. थंड पेयं, ड्रिंक्स, गोड पदार्थ कमीत कमी करता येतील. तळलेले तुपकट पदार्थ टाळता येतील.

    व्यायाम करायला जिममध्येच जायला हवं असं नाही. चालणं फुकट असतं. दिवसातून त्यासाठी नियमित वेळ काढता येईल. रिक्षासाठी धावपळ करण्यात जो वेळ त्या वेळेत चालत घर गाठणं सहज शक्य आहे हे लक्षात ठेवायला हवं. वाईट सवयी सांभाळण्यासाठी खर्च येतो. त्या करून आणखी औषधांचा खर्च वाढवण्यात काय अर्थ असतो?

    इतकं करूनही असले आजार वाट्याला आलेच तर वेळीच उपचार करून, नियमित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या आजारांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणार नाहीत याची काळजी घेता येईल.

    – सतीश नाईक

    Read more

    मे २०२४ – पावसाळ्याचे सोबती

    आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. त्यात आलं, सुंठ आणि गवती चहा हे पदार्थ महत्त्वाचे आहेत.

    आले

    • जेवणात तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट वापरण्याऐवजी आलं वापरणं श्रेष्ठ असतं. आलं वाटून त्याचा वापर केल्याने तो तिखटपणा बाधत नाही.
    • आल्याचा रस हा भूक वाढवणारा आहे.
    • आल्याच्या रसात, लिंबू रस, सैंधव घालून तयार केलेलं पाचक हे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
    • आल्याच्या रसात डाळिंबाचे दाणे व खडीसाखर घालून सेवन केल्याने तोंडाला चव येते. पुष्कळ दिवस ताप येऊन गेल्यानंतर वरील मिश्रण घेतल्यास फायदा होतो.
    • जेवणापूर्वी मीठ व आल्याचा रस पाव चमचा घेतल्यास कोलेस्टेरॉल आटोक्यात राखण्यास मदत होते.
    • दम्याचा त्रास होत असल्यास आल्याचा रस, तूप (गायीचं) व खडीसाखर घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
    • पोट दुखत असल्यास आल्याचा रस व लिंबाचा रस एकत्र करून बेंबी सोडून अवतीभोवती चोळावा.
    • ज्यांना सर्दीचा त्रास असेल त्यांनी आल्याच्या रसात गूळ घालून ते पाण्यात पातळ करून नंतर नाकात घातल्यास फायदा होतो. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वरील प्रयोग करावा. कोणतेही सांधे दुखत असल्यास आल्याचा रस व मीठ यांच्या मिश्रणाने सांधे चोळावे. पायाच्या पोटरीतून गोळा येत असल्यास आल्याच्या रसात हिंग घालून तो रस चोळावा.

    सुंठ

    • आलं सुकल्यानंतर सुंठ तयार होते. सुंठ ही उत्तम आम्लपाचक आहे. म्हणजेच शरीरात होणार्‍या फाजिल संचिताचं ती पचन करते. शरीरात जी विषद्रव्य निर्माण होतात ती पचवायला सुंठ मदत करते.
    • सुंठवडा हा रामनवमीला वाटण्याची पद्धत आहे. खरं तर रामनवमी ही वसंत ऋ़तुमध्ये येते. सुंठवडा त्या दरम्यान सेवन केल्याने कफाचा त्रास आटोक्यात राहातो. पण पावसाळ्यात देखील सुंठ, तूप व गूळ यांची गोळी करून ती रोज घेतल्याने पोटाचे विकार होत नाहीत. बरेच वेळा आमांशजन्य शौचाला होते. त्यात सुंठीचं चाटण मध घालून सेवन केल्याने फायदा होतो.
    • पोटात दुखून जर शौचाला होत असेल तर सुंठ, बारशिंग व खसखस पावडर करून त्यात खडीसाखर घालून द्यावं.
    • सुंठ पाण्यात उकळून ते पाणी निम्मं करून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. असं पाणी घेतल्याने तापावर नियंत्रण राखता येतं.
    • वारंवार खोकला येत असल्यास सुंठ व खडीसाखर घ्यावी. पुष्कळ प्रमाणात ढेकर येत असल्यास सुंठ व गूळ घ्यावा. अजीर्ण झाल्यानंतर सुंठ व ताक घेतल्याने फायदा होतो.
    • आम्लपित्त झालं तर सुंठ व आवळा चूर्ण खडीसारेबरोबर घेतल्याने फायदा होतो.
    • कोणत्याही प्रकारची सूज आली असता त्यावर सुंठ उगाळून लेप करावा.
    • सुंठ पावडरचं नस्य केल्याने सर्दी कमी होते. मात्र तज्ज्ञांकडूनच नस्य करावं.

    गवती चहा

    • पावसाळ्यात गवती चहा खूप प्रमाणात उपलब्ध असतो. गवती चहाची वाफ घेतल्याने घाम येतो. ताप आल्यानंतर अशी वाफ घ्यावी.
    • सर्दी झाली तर गवती चहा, सुंठ, मिरं व दालचिनी यांचा काढा फायदेशीर होतो.
    • गवती चहाचं तेल हे सांधेदुखीवर लाभदायक असत. गवती चहाचा काढा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते.
    • गवती चहा उत्कृष्ट वातसारक आहे. ह्याचा काढा घेतल्याने पोट फुगणे व या त्रासात फरक पडतो.
    • कंबरदुखीवर गवती चहाचं तेल लावल्यास फायदा होतो.
    • थोडक्यात, पावसात होणार्‍या छोट्या-मोठ्या त्रासांना जर वेळीच अटकाव करायचा असेल, तर घरातच उपलब्ध असणार्‍या या सोबत्यांचा नीट उपयोग करायला हवा.
    Read more

    एप्रिल २०२४ – हिरवाईने वेढलेली देवस्थानं

    रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थाने

    आंजल्­र्याचा कड्यावरचा गणपती आंजर्ले गावात समुद्रासमोरच असलेल्­ा एका उंच टेकडीवर हे गणेश मंदिर असून मंदिराचं बांधकाम माधवराव पेशवे यांचा काळातलं असावं. हे मंदिर वास्तुशास्राचा उत्तम नमुना आहे. हे ठिकाण दापोलीपासून केवळ १८ किमी अंतरावर आहे.

    आसूदचं केशवराज मंदिर हाती शंख, चक्र, गदा, पद्म घेतलेलं हे विष्णूचं रूप अतिशय देखणं रूप बघा­यला मिळणारं केशवराज तसेच व्­ाघ्रेश्वर या दोन देवस्थानांमुळे आसूद दापोलीनजीकचं महत्त्वाचं गाव ठरलं आहे.

    डोंगराच्या कुशीत असलेलं अस्सल कोकणी निसर्गसौंदर्यानं नटलेलं केशवराज मंदिर दापोली-हर्णे रस्तावर दापोलीपासून फक्त ६ कि. मी. अंतरावर असून ते आसूदबाग ­या नावाने ओळखलं जातं.

    तामसतीर्थ तांबूस रंगाचा समुद्र… म्हणजे पाणी तांबूस, वाळूही तांबूस रंगाची असा विलक्षण देखणा समुद्र लाडघर बुरोंडीला पाहा­यला मिळतो. लाडघर गावापासून पुढे गेलो की आपण थेट तामसतीर्थकडे जाऊ शकतो. इथे वेळेश्वराचं प्राचीन मंदिर असून समुद्रकिनार्‍­यावरचं हे मंदिर अतिश­य सुंदर दिसतं. याच रस्त्याने पुढे बुरोंडी गावाकडे गेल्­ात की मागील उंच टेकडीवर श्रीपरशुरामाचा भव्य पुतळा दिसतो.

    ­केळशीची महालक्ष्मी स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा, वाळूची टेकडी, गणेश मंदिर आणि केळशीचं सुप्रसिध्द महालक्ष्मी मंदिर ­यामुळे रा­यगड-रत्नागिरी जिल्ह्यांच्­ा सरहद्दीवरचं केळशी गाव उत्तम पर्यटन केंद्र बनले आहे. केळशीत उटंबर डोंगराच्या पा­यथ्याशीच महालक्ष्मीचं मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमुख असून ते पेशवेकालीन असावं. ते वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना मानलं जातं. इ. स. १८०८ सालात ते बांधल्याचे संदर्भ आढळतात. मंदिरापुढील धर्मशाळेत गणपती व शंकराची पिंडीही आहे. परिसरात असलेल्­या तळ्यात कमळे फुलतात. दोन घुमट असलेल्या मंदिरात पुढे सभागृह व गाभार्‍यात लक्ष्मीचं स्वयंभू स्थान आहे. हे ठिकाण दापोलीपासून २५ किमी अंतरावर आहे. याशिवा­य केळशी गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हैदराबादी याकूब बाबांचा दर्गाही प्रसिद्ध आहे. समुद्रकाठी उंचावर हे ठिकाण आहे.

    दाभोळची चंडिका दापोली परिसरातील  देवस्थान पाहताना आवर्जून पाहावं असं एक प्राचीन स्वयंभू स्थान म्हणजे दाभोळची चंडिका. चंडिका देवीचं हे गुहेतील स्थान एक अद्‌भुत अनुभव देतं. नंदादीपाच्या उजेडात गुहेतील मूर्ती अचानकपणे समोर येते तेव्हा त्­या दर्शनाने आपण भारावून जातो. नवसाला पावणारी देवी म्हणून भक्तांचं हे श्रद्धास्थान आहे. दापोलीपासून अंतर २८ किमी आहे.

    गुहागरची दुर्गादेवी, व्याडेश्वर  व उफराटा गणेश ही प्राचीन मंदिरं

    श्री व्याडेश्वर मंदिर गुहागरातील सुप्रसिद्ध श्री व्याडेश्वर मंदिर म्हणजे एक भव्य प्राचीन शिवमंदिर आहे. मुख्य देवळात महादेवाची पिंड आहे, तर प्रांगणात श्री देवी, सूर्यनारायण, विष्णू, गणपती व मारुती अशी मंदिर आहेत. कोकणात पाऊस कमी पडला तर व्याडेश्वर पाण्यानं कोंडलं जातं व मग पाऊस पडतो अशी श्रद्धा आहे.

    उफराटा गणेश खुद्द गुहागर गावात देवपटात हे गणेशाचं स्थान असून पूर्वी हा गणेश पूर्वाभिमुख होता. मात्र समुद्राचं पाणी गावात शिरून गाव गिळकृंत करू लागलं तेव्हा तो पश्चिमाभिमुख झाला व समुद्र मागे सरला अशी एक कथा आहे. मूर्ती संगमरवराची व अतिशय सुंदर असून हे छोटेखानी मंदिर जरूर पाहण्याजोगं आहे.

    दुर्गादेवीचं मंदिर गुहागरातील वरलापाट येथील प्राचीन दुर्गादेवीचं मंदिर सध्या भक्तांना नव्या रूपात पाहायला मिळत आहे.

    हेदवीचा दशभुजा लक्ष्मीगणेश हे ठिकाण गुहागरपासून २७ किलोमीटर अंतरावर (पालशेत रोड) आहे. गुहागर-पालशेत वेळणेश्वर फाटा व हेदवी अशा मार्गाने तिथे जाता येतं. अतिशय निसर्गरम्य परिसर आणि श्रीगणेशाची विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती काश्मीरमधील असून गणरायाच्या सोंडेत अमृतकलश, मांडीवर लक्ष्मी तर गळ्यात नागरूपी जानवं आणि हातात धनुष्य, त्रिशूळ, गदा, मोदक, चक्र, कमळ आदी वस्तू आहेत. मंदिर पेशवेकालीन आहे.

    चिपळूणची विंध्यवासिनी यादवकालीन प्राचीन देखणी मूर्ती महिषासुरमर्दिनी विंध्यवासिनी असं हे देवीचं स्थान चिपळूण शहराच्या एका टोकाला डोंगराच्या पायथ्याशी आहे. जमिनीत गुप्त असलेलं हे मंदिर सध्या नूतनीकरणानंतर भव्य स्वरूपात थेट भेट घेता येईल.
    श्री देवी विंध्यवासिनीच्या उजव्या बाजूला श्रीगणेशाची मूर्ती तर डावीकडे कार्तिकेय महाराज यांची सुंदर कोरीव मूर्ती आहे.

    गणपतीपुळे पुळ्याचा गणपती गुळ्याला गेला अशी कोकणात एक म्हण आहे. पावसजवळील गणेशगुळे या गावी एक गणेश मंदिर आहे व त्याचं नात थेट गणपतीपुळ्याच्या मंदिरातील गणेशाशी आहे असं म्हणतात. गणपतीपुळे येथील स्वयंभू मूर्ती ही मूळ रूपात आजही पाहायला मिळते. ही पूर्ण टेकडीच गणेशस्वरूप मानली जाते. समुद्राला खेटून असं हे नयनरम्य देवस्थान आहे.

    करंजेश्वरी गोविंदगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे ठिकाण आवर्जून भेट देण्याजोगं आहे. गोविंदगड किल्ला व करंजेश्वरी ही दोन्ही ठिकाणं पाहण्याजोगी असून चिपळूणपासून केवळ ५ किलोमीटर अंतरावर आहेत.

    परशुराम विष्णूचा सहावा अवतार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान परशुरामाचं हे मंदिर चिपळूणपासून १०-१२ किलोमीटर अंतरावर आहे. कोकणभूमी ही भगवान परशुरामांनी बाण मारून समुद्र हटवून निर्माण केली असं मानलं जातं. परशुराम मंदिराच्या मागे रेणुकादेवीचं मंदिर आणि बाजूलाच बाणगंगा तलाव आहे. हे निसर्गरम्य देवस्थान भक्तांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

    कर्णेश्वर संगमेश्वरजवळचं प्राचीन कर्णेश्वर मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असून केवळ मंदिराचं दगडावरील कोरीव काम पाहायला तास-दोन तास लागतात. सभामंडप आणि गाभार्‍यातील शिल्पं लक्ष वेधून घेतात. दशावतार, गणपती, सरस्वती यांची शिल्पं पाहात आपण आत प्रवेश करतो व शिवलिंगाचं दर्शन घेतो. अतिशय प्राचीन असं हे मंदिर १२व्या शतकापूर्वी बांधलं असावं असा समज आहे. संगमेश्वर शहरापासून केवळ ४ किलोमीटरवर आहे.

    रत्नागिरीचं पतितपावन मंदिर, भगवती मंदिरपतितपावन मंदिर रत्नागिरी शहरालगत पतितपावन मंदिर, विश्वेश्वर मंदिर, लाल गणपती, ज्योतिबा मंदिर व भगवती मंदिर अशी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दलित सवर्णांना एकत्र भोजनाला बसवलं ते पतितपावन मंदिर अगदी शहरातच आहे. मंदिरात लक्ष्मीनारायणाची मूर्ती असून हरिजनांसाठी खुलं झालेलं देशातलं पहिलं मंदिर आहे.

    भगवती मंदिर भगवती किल्ल्यावर या देवीचं स्थान. रत्नागिरी शहरातून रिक्षाने केवळ १५-२० मिनिटांत येथे जाता येते. तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या उंच किल्ल्यावरील हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय आहे.

    मार्लेश्वर – दरवर्षी संक्रातीला श्री देव मार्लेश्वर व गिरीजादेवीचा विवाह होतो व त्यासाठी अवघं कोकण मार्लेश्वर येथे जमतं.

    Read more

    मार्च २०२४ – तारुण्याच्या उंबरठ्यावर….!

    आपल्याकडे “आलसस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धनम्‌ । अधनस्य कुतो मित्रम्‌, अमित्रस्य कुत: सुखम्‌” असं म्हटलं जातं. आळशी माणसाला कधीच विद्या प्राप्त होत नाही. विद्या नाही तर पैसा नाही, पैसा नाही तर मित्र नाहीत आणि ज्याला मित्रच नाहीत, अशी व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात, ज्यांच्या अंगी अनेक गुण असूनही ती अयशस्वी होतात, यामागे तीन गोष्टी दडलेल्या असतात, एक आळस आणि दुसरा “चालढकलपणा” आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे “आपल्याला काय करायचं आहे, हेच माहिती नसणं”. हल्ली इंटरनेटचा स्पीड थोडा जरी कमी झाला, तरी मुलं चिडचिड करतात, इतक्या वेगाने त्यांना गोष्टी घडणं अपेक्षित असतं, परंतु काही गोष्टींना वेळ द्यावाच लागतो. निवडलेल्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तर वरील तिन्ही बाबींवर काम करणं गरजेचं आहे.

    दहावीनंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, की खर्‍या अर्थाने करियरची सुरुवात होते. हा काळ करियरच्या जडणघडणीचा असतो, व्यक्तिमत्त्व खुलवणारा असतो, त्यामुळे या काळात योग्य दिशेने केलेली वाटचाल तुम्हाला अपेक्षित ध्येय गाठायला मदत करते. “आपल्याला काय करायचं आहे?”  या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि मेहनत घ्यायलाच हवी. मानसशास्रातील ‘APTITUDE TESTS’ तुम्हाला मदत करू शकतात.  तुमचा कल कोणत्या विषयाकडे आहे याची तुम्हाला थोडी कल्पना असेल, तर कॉलेज सांभाळून तुम्ही त्या क्षेत्रात थोडंफार काम करून बघा. त्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना संपर्क करा त्यांच्याशी चर्चा करा, त्यांचे अनुभव लक्षात घ्या. हे सगळं करत असताना मनात कधीच “मला हे जमेल का?” “मी त्यांना कसं भेटू?” हे विचार आणू नका. चार लोकांशी संपर्क साधल्याशिवाय, प्रत्यक्ष काम कसं केलं जातं हे अनुभवल्याशिवाय तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार नाही. सुरुवातीला थोडी भीती वाटेल, पण एकदा निर्णय घेतलात, की तो योग्यच आहे हे मनाशी पक्कं ठरवून त्यादृष्टीने पावलं उचलायला सुरुवात करा. निर्णयाबद्दल साशंकता बाळगू नका. माझ्या एका मैत्रिणीला
    हॉटेल मॅनेजमेंट करायची इच्छा होती. नृत्यविशारद आहे. शिवाय भाषेवरही प्रभुत्व असल्याने तिला मीडियातही काम करावंसं वाटत असे, पण वेळीच योग्य निर्णय न घेतल्याने आज यातील कोणत्याच क्षेत्रात ती स्वत:च नाव कमावू शकली नाही, अंगी १० गुण असूनही!

    तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना अजून एक गोष्ट तुम्ही कमवू शकता, ते म्हणजे “सुदृढ शरीर”! व्यायामासाठी वेळ राखून ठेवा. आज तुम्ही व्यायामासाठी दिलेला वेळ तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. टिळकांची एक सुंदर गोष्ट आहे. टिळकांची प्रकृती तारुण्यात खूपच नाजूक होती, ते सतत आजारी पडत. शरीराला सुदृढ करण्यासाठी त्यांनी इतर कामांमधून स्वत:ला बाजूला सारत काही काळ फक्त शरीर कमावण्यासाठी दिला. या काळात त्यांनी भरपूर व्यायाम केला आणि शरीरयष्टी कमावली. एक लक्षात घ्या, तुमचं शरीर सुदृढ असेल, तरच तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करू शकता, मज्जा करू शकता. जंक फूडसारखी अनेक प्रलोभनं आपल्या आजूबाजूला असतात, कॉलेजमध्ये सतत पार्टीज करणं, वेळी-अवेळी जेवणं, वाट्टेल ते खाणं या गोष्टी काळात नकळत तुमच्या शरीरावर परिणाम करतात आणि गंमत म्हणजे या सगळ्याचे दुष्परिणाम तुम्हाला लगेच कळत नाहीतच, काही वर्षांनी दिसतात. म्हणूनच या बाबीकडे दुर्लक्ष करू नका.

    अभ्यास करताना आपल्याला सगळे विषय आवडतातच असं नाही. काही विषय हे आपल्या नावडीचे असतात. अशावेळी ते विषय टाळण्याने प्रश्न सुटणार नाही हे ध्यानात ठेऊन आपल्याला या विषयाला सामोरं जायचं आहे हे मनाशी ठरवा. हा विचार तुम्हाला भविष्यातही प्रश्न सोडवायला मदत करेल. मनातल्या इच्छाशक्तीच्या जोरावर, स्वअध्ययन करत, गरज पडल्यास शिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्या विषयाला सामोरे जा. तुम्हाला यश मिळेलच. कमी मार्क्स त्या विषयात मिळाले, तरी उदास होऊ नका. तुम्ही प्रयत्न केलेत आणि कठीण असूनही तो विषय न टाळता तुम्ही त्या विषयाला सामोरे गेलात, याबद्दल स्वत:चं अभिनंदन करा. एकदा तुम्ही नकारात्मकेतच्या विळख्यात अडकलात, की तशीच कृती घडायला सुरुवात होते. बर्‍याचदा भीती अनाठायी असते, आपण त्या विचारांमध्ये अडकून तिला उगाच मोठं करत असतो. त्यामुळे, स्वत:च्या समजुती वास्तवाला धरून आहेत ना, याची कायम पडताळणी करा.

    कोणतीही नवीन गोष्ट करताना, स्वत:ला आधी एक हलका चिमटा काढा आणि तुम्ही ती गोष्ट का करत आहात, याविषयी १० सेकंद चिंतन करा. आयुष्यात सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही. नको त्या गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. ती गोष्ट किती गरजेची आहे, त्याने तुम्हाला आनंद मिळणार आहे का, भविष्यात त्याचा किती उपयोग आहे याचा सारासार विचार करा. हा एक चिमटा तुम्हाला भानावर आणेल आणि तुम्हाला अयोग्य गोष्टींपासून, चुकीचं पाऊल उचलण्यापासून कायम लांबवेल.

    तारुण्याचा उंबरठा ओलांडून तुम्ही एका नवीन पर्वाची सुरुवात करणार असता. हा उंबरठा धडपडण्यासाठीच असतो. इथे काही चुका झाल्या, तरी त्या सुधारता येतात. अयशस्वी झालात, तरीही न हरता प्रयत्न करता येतात. वेळ, उत्साह, मज्जा-मस्ती, अभ्यास यांचा योग्य मेळ साधलात, तर हा काळ तुमच्या आयुष्यातला “सुवर्णकाळ” ठरेल.

    – देविका गोखल

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter