•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    जुन २०२३ – मुले आणि शिस्त

    बर्‍याच घरात “शिस्त” हा कळीचा मुद्दा असतो. मुलांना वाढवताना कोणत्या गोष्टी

    पाळाव्यात, कोणत्या गोष्टी पाळू नयेत यासाठीचे वेगळे वर्ग अस्तित्वात नाहीत. त्यामुळे स्वत:चे अनुभव समोर ठेवूनच पालक आपले पालकत्व निभावत असतात. ते स्वत: ज्या शिस्तीत वाढले तशीच परिस्थिती आपल्या मुलांच्या बाबतीत निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. शिस्त हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मनुष्याचा एकूण विकास हा याच्याशी बव्हंशी अवलंबून असतो. माणूस काही संकेत नियमितपणे पाळत आला आहे आणि अशा नियमांनुसार वागत आला आहे. अश्मयुगीन मानवाने शांतता राखण्याचे नियम अनुसरले नसते तर आपण “आज” पाहू शकलो असतो का?

    शिस्त म्हणजे नेमके काय? – आपण आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत शिस्त आणण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपण जेव्हा शिस्त लावत असतो तेव्हा तसे करण्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे आवश्यक असते. आजही आपण किंवा आपल्यासारखे कितीतरी जण कित्येक गोष्टींचे आंधळेपणाने अनुकरण करीत असतो. माझ्या आजोबांनी किंवा बाबांनी केले म्हणून मीही तसेच करणार. नियम म्हणजे नि-यम. मी तो पाळणारच असा विचार अनेकदा होताना दिसतो. स्वत:ला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करून घेताना दिसतो. असे बंदिस्त करून घेताना “आज” त्याची खरच गरज आहे का, याचा सारासार विचारही कधी कधी केला जात नाही. परिणामी, अशा व्यक्ती घराबाहेर आणि घरात दोन्ही ठिकाणी तशाच वागतात आणि आपल्या शिस्तीचा बडगा दाखवित राहतात. त्यांनी मात्र या विशिष्ट शिस्तीची गरज किंवा महत्व लक्षात घेतलेले नसते, तसेच दुसर्‍या व्यक्तीची याबाबतीत वेगळी भूमिका असू शकेल, याचा ते विचारच करीत नाहीत. यातूनच अनेकदा पालकांवर त्यांच्या बालपणीचा काळ व अनुभव -यांचा पगडा जास्त असतो. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर घालण्यात आलेले निर्बंध, अनेक बाबतीत करण्यात आलेली सक्ती या सर्वांचा जसाच्या तसा वापर ते त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्याच मुलांना शिस्त लावण्यासाठी करतात. मात्र त्यावेळचा काळ व सांस्कृतिक वातावरण आणि आजचा काळ यात कमालीचा झालेला फरक त्यांच्या ध्यानात येत नाही. वस्तुत: शिस्तीमुळे जीवन सुलभ होते. आयुष्याला एक वळण लागते. मात्र जीवनाला नियमात बांधून घातल्यामुळे अनेकदा त्यातून प्रश्न निर्माण होतात. मग शिस्त असूच नये का? वडीलधार्‍यांचा आदर करूच नये का? असा याचा अर्थ नव्हे, पण त्यामागची कारणमीमांसा समजून घेतली आणि मुलांना असे वर्तन करायला लावले तर यातूनच त्याचे योग्य परिणाम मिळतील. पालकांनी मुलांना शिस्त जरूर लावावी. त्यासाठी ते ताठ असावेत. मात्र त्यामागची गरज व वातावरणातील परिवर्तन इ. बाबी विचारात घेण्याइतपत आपले धोरण लवचिकही ठेवावे. पालकांनी मुलांना अवास्तव, अमर्याद स्वातंत्र्य द्यावे असा याचा अर्थ नाही. मुलांमध्ये अनुभवांचे शहाणपण नसते. तसेच प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणेही शक्य नसते. अशावेळी दिपस्तंभाप्रमाणे मुलांना वाट दाखवण्यासाठी पालकांनी त्यांना वळण लावावे. त्यांना कोणताही निर्णय घेताना तो तारतम्याने घेणे जोवर साधत नाही, तोवर मुलांवर त्यासाठी पालकांचे मत घेण्याची सक्ती नव्हे, मात्र जबाबदारी टाकावी. कोणताही निर्णय मुलांवर लादण्यापेक्षा त्याचे चांगले-वाईट परिणाम त्यांना समजावून सांगून त्याची आवश्यकता स्पष्ट करावी. त्यातूनच हेतू साध्य होऊ शकतो. पालकांनी मुलांना विचार करण्याची मोकळीक द्यावी. एखाद्या परिस्थितीशी कसा सामना द्यायचा? त्यातून काय निष्पन्न होईलं िकंवा कसे वागले तर योग्य परिणाम मिळतील याचा विचार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. त्यांना अशक्यता, स्वप्न, आशा, आकांक्षा आणि वास्तव यातील फरक जाणवून द्यावा, नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता, समज-गैरसमज यातील तफावत जाणवण्याइतपत सक्षमता त्यांच्यात निर्माण करावी.

    एखादे वेळी, पालकांचे समज मुलांनी योग्या रीतीने खोडून काढले तर त्या समजांना चिकटून राहण्याची गरज नाही किंवा तुमचे मूल तुम्हाला जुमानत नाही असा समज करून घेण्याचीही गरज नाही. मुलांना समजून पालकांनी योग्य असे बदल स्वत:मध्ये करून घेतल्यास मुलं त्यांच्या अधिक जवळ येतील. एक पालक आपल्या मुलाला सर्वोत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते शिक्षण असो, सोयीसुविधा असोत किंवा जीवनशैली असो. त्यासाठी त्याने एखादी मागणी केल्यास, पालकांनी त्याला, त्याची खरच गरज आहे का, याचा विचार करून त्याची पूर्तता केली पाहिजे. मात्र एखाद्या गोष्टीची मागणी अवास्तव किंवा अनावश्यक असल्याचे वाटले तर त्याबाबत त्याला विश्वासात घेऊन तशी मागणी अजिबात न पुरवणे श्रेयकर ठरेल! तुमचे एकुलते एक मूल आहे म्हणून त्याची मागणी पुरवणे, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे म्हणून किंवा तुमच्या बालपणी ती वस्तू तुमच्या पालकांनी तुम्हाला नाकारली म्हणून आज तिची गरज नसताना ती अजिबात देऊ नका. मुले त्यांच्या पालकांना “इमोशनल ब्लॅकमेल” सहज करु शकतात. पालकांच्या भावुकतेचा फायदा अशा मुलांना सहजपणे उठवता येतो. मग मुलांमधील आक्रस्ताळेपणा वाढतो. अनेक पालकांना तो मोडून काढणे अवघड वाटते. अशा वेळी मुलांना मारणे किंवा धाक दाखवणे याचा काहीच उपयोग होत नाही आणि शिस्तीचा मात्र पुरता बोजवारा उडतो.

    पालकांनी मुलांना शिस्तीचे नियम लावताना स्वत:ला तशाच नियमांमध्ये अडकवून घेतले पाहिजे. घरातील सर्वांनाच काही नियम लावण्यात आलेले आहेत आणि सर्वजण त्या नियमांचे पालन करत आहेत. याची जाणीव मुलांना आपसूक होणे आवश्यक असते. काही नियम केवळ मुलांपुरतेच असले तरी पालकांनी सतत त्यासाठी मुलांना शिक्षा न देता माफीचे धोरण ठेवणे अधिक योग्य ठरेल.

    मुलांबरोबर सुसंवाद ठेवावा. मुलांना बोलण्याची मुभा द्यावी त्यांची मते त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात, त्यामुळे त्यांना मोकळे होऊ द्यावे. त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करावी. पालक म्हणून घेतलेला निर्णय त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हितावह कसा आहे, याची जाणीव त्यांना करवून द्यावी. तसेच एकदा हाताला, मनाला, एकूणच वागण्याला लागलेली शिस्त मोठेपणी किती व कशी उपयुक्त ठरेल याची समज वेळोवेळी मुलांना त्यांच्याशी सुसंवाद साधून, प्रसंगी त्यांना बोलते करून आणावी.

    मूल म्हणजे जणू मातीचा गोळा. त्याला आकार द्यावा त्याप्रमाणे तो घडतो. त्याच्या वैचारिकतेला, भावनिकतेला, मानसिकतेला आकार देण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिस्तीचा वापर करावा. शिस्तीमुळे त्यांच्यामध्ये उत्तम संस्कार, भावना व्यक्त करण्याची कुवत निर्माण करता येईल. शिस्तीखाली त्यांना नामोहरम करू नका तर त्यांचे जीवन फुलवा, विकसित करा.

    मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा देण्यात आली असली तरी तो जिवंत गोळा आहे. तो भावना, आकलनशक्ती व उपजत स्वभाववैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आहे, याचा पालक या नात्याने कधीच विसर पडू देऊ नका.

    Read more

    मे २०२३ – सौंदर्य टिकवण्यासाठी आहार

    सौंदर्य बघायला, आणि टिकवायला कोणाला आवडणार नाही? प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या जरी वेगळी असली, तरी सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही? शरीरातील प्रत्येक अवयव बांधेसूद असेल, प्रमाणबद्ध असले, तर ती व्यक्ती नक्कीच सुंदर दिसेल. हे सांगणं जितकं सोपं आहे, करणं आणि पुढे सांभाळून ठेवणं तितकंच कठीण आहे. नियमितता आणि चिकाटी, ह्याच्याबरोबर उत्कट इच्छा असणं जरूरी आहे. इच्छा दांडगी असेल तर माणूस आपल्या व्यापातून वेळ काढून हवी ती गोष्ट साध्य करू शकेल.  आपलं शरीर निरोगी आणि सुडौल ठेवण्यासाठी काय आहार घ्यावा आणि कायकाय टाळावं, त्याबद्दल आता थोड्या विस्ताराने. आपला आदर्श आहारतसं बघायला गेलं तर आदर्श आहार तो की ज्याच्यात, सगळी जीवनावश्यक तत्त्वं असतात. आज स्थौल्याचं प्रमाण इतकं वाढत चाललंय, त्याचं मुख्य कारण चुकीचा आहार. स्थूल शरीर बांधेसूद शरीरापेक्षा कमी सुंदर दिसतं. ते निरोगीसुद्धा नसतं.

    आपला आहार सकाळच्या नाष्ट्यापासून सुरू होतो.  सर्वसाधारण घरात पोहे, उपमा, पाव किंवा चहा पोळी याच प्रकारचा नाष्टा असतो. आणि बाहेर असलो तर वडा पाव, भजी…इत्यादी हे सगळे पदार्थ पोट तर भरतात. पण पोषण मात्र करत नाहीत.  नाष्ट्यामध्ये……

     मोड आलेले मूग किंवा हिरवे चणे शिजवून त्यांच्यावर कांदा, टोमॅटो घालून खावेत. किंवा इडली, डोसा, उत्तप्पा, सांबार आणि चटणीबरोबर खावेत.

     सगळ्या डाळी १ भाग आणि तांदूळ २ भाग घेऊन रात्री भिजत घालून सकाळी त्यांचे डोसे किंवा अडई करून खावेत.

    ह्या अशा प्रकारच्या नाष्ट्यामुळे आपल्या शरीराला ज्या पोषक तत्वांची गरज असते, ती सगळी मिळतात. त्यामुळे त्वचा तुकतुकीत आणि तेजस्वी दिसते. मात्र रोज एकाच प्रकारचा नाष्टा करू नये, त्यात विविधता असावी.

    आहारामागील तत्त्वं असं आहे की, तुम्ही पचवू शकाल, त्यापेक्षा अर्धा आहार घ्यावा. दर वेळी जेवताना, फक्त पोट भरणं हवेच, हे आपले ध्येय असू नये, तर पोषक तत्त्व मिळवून शरीराचे आरोग्य वाढवणे असायला हवे. खास करून जेव्हा आपलं वय लहान असतं, तेव्हा म्हातारपणाची बेगमी करायची असते आणि वय वाढत जातं तसतसं आरोग्य टिकवण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. आज आपण निरोगी आहोत, तर हवे ते खा, अशा तंत्राने जगाल तर पुढे शरीर बेढबच नाही, तर जाड आणि असंख्य रोगांचं घर झाल्याने, त्वचा सुरकुतलेली, काळे डाग पडलेली, वाळलेली अशी, दिसायला अगदी विचित्र आणि आपल्या स्वत:लासुद्धा बघवणार नाही अशी होईल.

    माझ्या व्याख्यानात, आदर्श आहार वगैरे जेव्हा मी सांगते, तेव्हा प्रेक्षकांची एकच मागणी असते. ती अशी की हा सगळा आहाराचा बेत आमच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बसवायचा कसा? सकाळी ७-७.३० ला निघायचं, घरातील सगळ्यांचा डबा करून निघायचं आणि दुपार, रात्रीचे मेन्यू ठरवायचे तरी कधी.

    वाचकहो त्यासाठी मी पर्याय सुचवते…… सुट्टीच्या दिवशी, एक आठवड्याची तालिका तयार करावी. त्यात सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सबंध आठ दिवसांचा मेन्यू असावा.

    घरातील इतरांची मदत घेऊन त्याप्रमाणे भाज्या, मासे, चिकनादी मांसाहार ह्यांची तयारी करून ठेवावी. या मेन्यूमध्ये लागणारे मसाले, चटण्या वाटून ठेवाव्यात. आणि प्रत्येक दिवशी, एक तास स्वयंपाकासाठी काढावा. घरातील स्त्री जी आपल्यासाठी इतकं काही करते, तिचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी घरातील इतरांनी तिला सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ द्यायला हवा आणि बायकांनीसुद्धा असा वेळ काढायलाच हवा. ह्या सगळ्या गोष्टी, सांघिक दृष्टिकोन ठेवूनच करता येतात. यासाठी सबंध परिवाराचा सहभाग हवा.

    घरातील सगळ्यांनीच पुढाकार घेऊन बाजारहाट, स्वयंपाक आणि मेन्यू प्लानिंग ठरवून आपसात वाटून घ्यावे. हे सगळं तयारी वगैरेचं झालं, पण मुख्य प्रॉब्लेम हा असतो, की सकाळी सकाळी घर सोडायचे असल्यास नाष्ट्यासाठी भूकच नसते.

     ह्यासाठी रात्री लवकरजेवणे आणि जेवणानंतर किमान वीस-पंचवीस मिनिटे चालणे हाच एक तोडगा आहे. त्याचप्रमाणे, सकाळी थोडा तरी व्यायाम करावा, म्हणजे जो काही थोडा बहुत नाष्टा घ्याल तो पचेल.

     सकाळी लवकर घर सोडणार्‍यांनी, नाष्ट्यासाठी एखादं फळ खावं. आणि वर जे पदार्थ सांगितेल आहेत ते डब्यात नेऊन ९-९.३० ला ऑफिसमध्ये खावेत. तिथे जर चहावाला येत असेल तर त्याला चहाऐवजी हळद घातलेलं दूध आणायला सांगावे. साखर न घालता घेता आलं तर जास्त चांगलं.

     दुपारी डब्यात पोळी कमी आणि भाजी जास्त असा आहार असावा. संध्याकाळी घरी आल्यानंतर चहा घेण्यापेक्षा थंड दूध घ्यावं. भूक लागलीच तर चणे शेंगदाणे, किंवा मोड आलेल्या मुगाची भेळ किंवा व्हेजिटेबल सँडविच घ्यायला हरकत नाही.

      रात्री जेवण तितक्याच लवकर जमेल तितक्या लवकर घ्यावे. वरील सगळे मुद्दे स्त्रिया आणि पुरुष दोघांना लागू होतात. नवरा आणि बायको या दोघांमधील व्यायाम तत्पर जो असेल त्याने दुसर्‍याला थोडे ढकलावे, सुदृढ करावे. तशीच घरकामात एकमेकाची मदत करावी.

    वाचकांनो, इथे एक गोष्ट सांगते – कारण, हा माझा अनुभव आहे की, मी जेव्हा लोकांना हे खा किंवा हे खाऊ नका सांगते तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी असते “हे सगळं नाही बुवा जमणार, डॉक्टर मला करायला.”

    नवी गोष्ट करताना थोडा त्रास तर होणारच आहे, पण आपण हे सगळं स्वत:साठी तर करतोय, ह्या सगळ्यामुळे आपली त्वचा, आपलं शरीर आणि त्यामुळे आपलं मन निरोगी, तेजस्वी आणि चिरतरुण राहणार आहे. मग काय? करणार ना लवकरात लवकर सुरुवात?

    Read more

    एप्रिल २०२३ – चैत्रमहिमा

    चैत्र महिना हा हिंदू पंचांगातील पहिला महिना. नवीन वर्षाची सुरवात होते ती इथूनच. नवीन वर्षाचे स्वागत आपण चैत्र प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा करून करतो.

    चैत्र प्रतिपदा ही तिथी फार महत्त्वाची मानली जाते. गुढी पाडवा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टिनिर्मितीला प्रारंभ केला असे म्हणतात. आधुनिक शब्दात सांगायचे तर हा सृष्टीचा वर्धापन दिवस किंवा वाढदिवस. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एका उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक मराठी घरात उत्साहात हा सण साजरा होतो. पण आपण गुढी का उभारतो? चैत्र महिन्याचे काय महत्त्व आहे? ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरे अनेकदा ठाऊक नसतात. म्हणूनच ह्या लेखात वाचू या “चैत्रमहिमा.”

    चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा शालिवाहन शकाची सुरवात मानण्यात येते. त्याविषयी कथा सांगण्यात येते की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर मंतरलेले पाणी शिंपडले. त्यामुळे मातीच्या त्या बाहुल्या जीवंत झाल्या. त्या सैन्याच्या जोरावर त्याने शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाच्या ह्या पराक्रमाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू करण्यात आले. शालिवाहनाने मातीचे सैन्य जिवंत केले, म्हणजे काय केले? आज आपण याचा अर्थ घ्यायचा तो हा की त्याकाळातील लोक पराक्रमहीन, चैतन्यहीन झाले होते. शालिवाहनासारख्या नेत्याने त्यांना जागे केले. त्यांना लढण्याचे बळ दिले. अर्थात विजयाची प्रेरणा देणारा असा हा सण आहे.  गुढी म्हणजे तर विजयपताका. सुप्रसिद्ध भावगीत गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले हे गीत आठवते ना ?

    विजयपताका श्रीरामाची

    झळकते अंबरी

    प्रभू आले मंदिरी

    श्रीराम वनवासातून पुन्हा

    अयोध्येला परत आले ते याच दिवशी म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढी म्हणजे इंद्रध्वज असेही म्हणतात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले. म्हणजेच गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रातील संतांनीही गुढीचा उल्लेख केलेला दिसतो. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य आपल्या परिचयाचे आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं” समाजात सज्जनांचा विजय व्हावा, यासाठीच ही प्रार्थना. संत एकनाथ महाराजांच्या साहित्यात तर अनेकदा गुढीचा उल्लेख आढळतो. “सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था” यासारख्या उल्लेखावरून गुढी विजयाचे प्रतीक असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.  तुकाराम महाराजही म्हणतात “पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”

    प्राचीन काळापासून ही जी गुढी उभारण्याची परंपरा सुरू आहे त्यापासून आपण नक्की काय बोध घ्यायचा हे आपल्याला कवयित्री बहिणाबाई किती छान सांगतात बघा.

    गुढीपाडव्याचा सन

    आतां उभारा रे गुढी

    नव्या वरसाचं देनं

    सोडा मनांतली आढी

    नवीन वर्षाचे स्वागत मोकळ्या मनाने करायचे, मागच्या वर्षात झालेली भांडणे, रुसवे-फुगवे तिथेच सरत्या वर्षाबरोबर विसरायचे आणि प्रेमाची गुढी उभारायची.

    वटवृक्ष

    एक झाड वादळ वार्‍यातही आपल्या मुळांना घट्ट धरून उभ असलेलं. जाणार्‍या – येणार्‍या वाटसरूला आपल्या सावलीनं कुशीत घेणारं, पिल्लांना आपल्या अंगा-खांद्यावर घरटी बांधायला आसरा देणारं. भूकेलेल्यांची भूक भागवणारं. असं प्रेमळ, परोपकारी, उदार मनाचं, सर्वांना सुख देणारं ते झाड आज अगदी एकाकी झालंय.

    जोवर त्याला पालवी होती, ते फळं देत होतं तोवर सर्व त्याच्या आश्रयाला येत होते. आज कुणी पिल्लही आपली घरटी बांधत नाहीत. कुणी वाटसरूही तिकडे फिरकत नाही. का तर पहिल्यासारखी हिरवीगार पाने त्या झाडाला नाहीत. गोड रसाळ फळे नाहीत, गार सावली नाही.  पण आज जेव्हा खरी गरज त्या झाडाला आहे. तेव्हा सर्वांनी आपली पाठ फिरवली. कुणी आपुलकीने, माणुसकीच्या नात्याने जर त्याला पाणी घातलं असतं तर ही वेळ त्या झाडावर आली नसती. उनाड ओसाड रानात उगवल्यासारखं आज ते वाटतय. पिल्लांची वाट बघतयं. कुणीतरी आपल्या कुशीत निजावं या आशेने जगतय. खरंच झाड आणि माणसाच्या आयुष्यात तरी काय फरक आहे? जोवर आपल्याकडे पैसा असतो. कुणाला द्यायला काहीतरी असतं तोवर सगळे जमा होतात. प्रेमाचा खोटा भास दाखवतात. पण ते प्रेम आपल्यावरचं नसून आपल्याकडे असलेल्या पैशावरचं असतं. मग पैसा मोठा की प्रेम. म्हणून सर्व काही विकत घेता येतं म्हणून पैशाला महत्त्व द्यायचं की प्रेमानं जग जिंकता येतं म्हणून प्रेमाला महत्त्व द्यायचं. पण प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. नात्यांमध्ये असलेला ओलावा हा कायम असावा. आपलं म्हणून विचारणांर, मायेनं जवळ घेणारं प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम ही बाजारात विकणारी वस्तू नव्हे, माणसाच्या हृदयातील भावना आहे. जी आपोआप निर्माण व्हावी लागते. म्हणून आपल्या घरातल्या वटवृक्षांना आपुलकीचं पाणी पाजा. प्रेमाचा स्पर्श करा, मायेनं जवळ घ्या. त्यांच्या सावलीतच मोठे व्हा. आपलं स्वत:च अस्तित्त्व निर्माण करा पण त्यांच्या अस्तित्त्वाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्या.

    Read more

    मार्च २०२३ – आनंदी राहण्याचे रहस्य

    आसपास असलेल्या वेदना, समस्या, ताण, तणाव यांमध्ये महत्त्वाचे असते ते आनंदी राहणे. समस्त मानसिक विकारांवर ‘‘आनंदी राहणे” हा एक उत्तम इलाज आहे.

    आनंदी राहणे म्हणजे काय?

    आनंद सर्वांना हवाहवासा असला तरी तो बाजारात विकत मिळत नाही. तो सकारात्मक विचारशैलीतून निर्माण होतो.

    रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे!” प्रत्यक्ष जीवनात सर्वसुखी कोणीच नसते. प्रत्येकाला दु:खाचा सामना करावा लागतोच. काहींना त्यांच्या समस्यांचा सामना करायला आवडते तर काहींना त्यांपासून पळ काढायला. या समस्यांना सक्षमपणे तोंड देणार्‍या व्यक्तींमध्ये निराश न होता संघर्ष करण्याची कुवत असते.

    एका बाजूला संघर्ष करून समस्यांवर विजय मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणार्‍या व्यक्ती असतात तर दुसर्‍या बाजूला क्षणिक दु:खाने कोलमडून जाणारी, सतत गांजलेला, भविष्यातील समस्यांचा ताण वर्तमानात घेऊन वावरणारी कायम चिंतातूर राहणारी मंडळीही आसपास दिसतात. भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता यावर तुमची क्षमता ठरते आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रत्येकात असते. मात्र समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची काही जणांची तयारीच नसते.

     स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे ठरते. या विश्वासाच्या बळावरच आयुष्यामध्ये मोठा पल्ला गाठणे शक्य होते. यासाठी काही सहज साध्य नियम पाळणे गरजेचे ठरते.

     लोकं काय म्हणतील या लोक लज्जेचे भय बाळगू नये.

     आयुष्यात नेहमीच शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारे लोक लज्जेचे भय बाळगून आनंदी राहता येत नाही.

    माणूस समाजशील प्राणी आहे. त्यामुळे बव्हंशी तो समाजावर अवलंबून असतो मात्र तरीही त्याला स्वत:चं अस्तित्वही असतं. ते विसरून तो जेव्हा फक्त लोकांचाच विचार करू लागतो तेव्हा तो इतरांना काय वाटेल या विचाराने स्वत:मध्ये तसा बदल करू लागतो. कधी-कधी स्वत:चं मन मारतो. अखेर दु:खी होतो. प्रत्येक कृतीचे उत्तर तुमच्याकडे असल्यास इतरांचा विचार करून दु:खी होण्याची गरजच काय? खरंतर सतत टीकेचा स्वर काढणार्‍यां पासून दोन हात दूर राहणेच उत्तम! कधीही कोणीही तुमच्यावर टीका केल्यास त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे व्यक्त व्हा. या जगात सर्वांचे समाधान करण्याची चूक करू नका. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे सगळ्यांना वाटेल तसे करता येणे अवघडच आहे. त्यामुळे जे तुम्हांला योग्य वाटते तेच करा.

    आनंदी राहाणार्‍यांबरोबर रहा नकारात्मक विचार करणार्‍यांपेक्षा सकारात्मक विचार करणार्‍या व सदैव आनंदी राहणार्‍या व्यक्तीं बरोबर रहा. यामुळे येणार्‍या प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्यासोबत राहण्यामुळे संगतीचा परिणाम होऊन आपली विचारसरणी देखील सकारात्मक होऊ शकते.

    सकारात्मक असणे म्हणजेच समस्या स्वीकारणे. त्यातून वाट काढणे होय. आपले निर्णय नेहमीच योग्य ठरतील असे नाही. कोणतेही निर्णय त्यामुळे होणार्‍या परिणामांवर अवलंबून असतात. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयाचे परिणामही चांगले वाईट असू शकतात.

    तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर तुमचा मूड ठरू शकतो. विचार एक केंद्री होऊ नकारात्मक होऊ लागले तर मूडही वाईट होईल. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा. प्रत्येक गोष्टीचे चांगले-वाईट परिणाम होणारच. त्यामुळे वाईटातूनच चांगले शोधण्याचा प्रयत्न करा.

    आनंदाची वाट पाहत राहू नका लहान-सहान गोष्टींमधून मिळवण्याचा प्रयत्न करा. आनंदी रहा. आनंद ही मनोवस्था असून, ग्लास अर्धा रिकामा आहे किंवा अर्धा भरलेला आहे, असे म्हणणार्‍या दोन मनोवस्थांच्या प्रकारच्या सकारात्मक व नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्ती असतात. आनंद मिळविण्यासाठी धडपड केली तर पदरी निराशाच येईल. छोट्या-मोठ्या घटना किंवा प्रसंगांमुळे तुम्ही घाबरून गेलात तर आनंदा पासून खूपच दूर निघून जाल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंद तुमच्या जवळ राहील अन्यथा तुमच्यापर्यंत येणारही नाही.

    सख्य संबंध अथवा मैत्रीसंबंध जोडा. एकही मित्र-मैत्रीण नसलेल्या व्यक्तीस दरिद्री म्हणतात. कारण अशा व्यक्तींजवळ त्यांच्या उरातील दु:ख, वेदना व्यक्त करून हलकी करण्यासाठी एकही व्यक्ती नसते. आनंदी व्यक्ती नेहमीच नवीन मित्रमंडळाच्या शोधात असतात. त्यांच्याशी प्रेमाचे, मायेचे सख्य संबंध प्रस्थापित करतात. ही एक सापेक्ष क्रिया आहे. जर तुम्ही एखाद्याला आनंद दिलात तर तो तुम्हांला आंनदी ठेवील. त्यामुळे चांगले, मित्रत्वाचे, सख्य संबंध जोडा व आनंदी व्हा.

    परिस्थितीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा :

    परिस्थिती मग ती कोणतीही असो कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अवघड परिस्थितीतून मार्ग काढणे होय. तुमच्या कठीण काळातही हसू शोधा, हसवा, हसत रहा. यामुळे चांगले विचार तुमच्या मनात निर्माण होतील आणि या विचारांच्या आधारे तुम्ही दु:ख, वेदना व प्रतिकूलता यांमधून वाट काढू शकाल. तुमच्या डोक्यात नकारात्मक विचारांनी गर्दी केली असेल तर थंड डोक्याने प्रतिकूलतेतून मार्ग काढणे शक्य होणार नाही.

    स्वत: हसा व इतरांना हसवा :

    ‘‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते”. त्यामुळे एखाद्या हसतमुख व्यक्तीकडे पाहून त्याला कसलेही दु:ख नाही, असे म्हणून चालणार नाही किंवा सतत रडारड करणार्‍या व्यक्तींचे दु:ख मोठे आहे, असे समजूनही चालणार नाही. त्यामुळे हसत राहण्याची कला अवगत करा ती कोणत्याही भीतीचा सामना करण्यास आपल्याला सक्षम करते तसेच हसत राहण्याने मूडही आनंदीच होतो आणि अवघड प्रसंगातही तरून जाण्याचे बळ आपल्याला येते.भरपूर परिश्रम करा, स्वत:वर विश्वास ठेवा कोणीही तुमच्यापासून आनंद हिरावून घेऊ शकणार नाही.

    पूर्वानुभवांपासून धडा घ्या

    जर तुमच्या मनात काही कडू आठवणी असतील तर चांगल्या विचारांनी त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करा. आपल्या हातून घडलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. तुमच्या मनातील राग तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत परावर्तित करा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आत्मविश्वासाने पुन्हा कामाला लागा. जर तुमच्या निर्णयक्षमतेतून तुम्ही मानसिकदृष्ट्या सबळ असल्याचे सिद्ध करून दाखवा.

    Read more

    फेब्रुवारी २०२३ – देववाणी गीर्वाण भारती

    संस्कृत भाषा ही देववाणी. गीर्वाण भारती. पाठांतरासाठी सोपी भाषा. संस्कृत भाषा सर्व भारतीय प्रादेशिक भाषांची जननी म्हणून मानली गेली आहे. पूर्वी बहुसंख्य शिक्षित लोक संस्कृत भाषा बोलत असत. सर्व ग्रंथरचना संस्कृत भाषेमधून होत असे.वेद उपनिषदादि वाङ्‌मय संस्कृत भाषेचं अनमोल लेणं आहेत.

    वेद हे अपौरुषेय आहेत. वेदांचा अभ्यास करणे कोणालाही एका जन्मामध्ये शक्य झाले नसते असा मोठा वेदसमूह होता. पण जगद्‌गुरु  व्यास महर्षी यांनी वेदांचे विभाजन केले. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि समुन्तु या चार शिष्यांना त्यांनी वेदराशीमधील ऋचा वेगवेगळ्या करून अभ्यासासाठी दिल्या. आणि देवदेवतांच्या स्तवनाच्या प्रार्थना, ऋचा, ऋग्वेद या नावाने एकत्रित केल्या. यज्ञविषयक मंत्र प्रार्थना वगैरे ऋचा या नावाने एकत्र केल्या. संगीत गायनाविषयीच्या ऋचा सामवेद या नावाने आणि मंत्र तंत्र जारण मारण वगैरे विषयीच्या ऋचा अथर्व वेदात समाविष्ट केल्या.

    वेदानंतरचा उपनिषदांचा काळ हा बराच प्रगल्भ विचारांचा काळ होता.

    गुरुजवळ बसून अत्यंत श्रद्धेने जी परमार्थ विद्या शिष्य गुरुकडून प्राप्त करतो, त्या विद्येला उपनिषद असे म्हणतात. याला वेदान्त असे म्हणतात. ब्रह्म हा उपनिषदांचा प्रतिपाद्य विषय आहे. म्हणून याला ब्रह्मविद्या पराविद्या श्रेष्ठविद्या असेही म्हटले आहे. उपनिषदे संख्येने १०८ आहेत. काही विद्वानांच्या मते ती सुमारे २५० आहेत. ईश केन, कठ, प्रश्न, मांडुक्य, तैतरिय, ऐतरेय, छांदोग्य, बृहदाख्यक नृसिंहपूर्वतापिनी अशी उपनिषदे महत्त्वाची मानली जातात. उपनिषदात सांगितलेले विचार आजच्या जीवनातही महत्त्वाचे आहेत.

    ईशावास्योपनिषदात म्हटले आहे.

    ईशावास्यमिदं सर्वं यत्‌ किॅञ्च जगत्या जगत्‌ ।

    तेज त्यक्तेन भुग्जीषा: मा गृध: कस्यचित्‌ धनम्‌ ॥

    हे जग ईश्वराने भरलेले आहे. म्हणून त्या ईश्वराला साक्षी ठेवून त्याग करीत उपभोग घ्यावा. कोणाचेही धन हिसकावून घेऊ नये.

    प्रामाणिक कष्ट करून धन मिळवावे. कोणाचेही धन लुबाडून घेऊ नये. आणि धनाचा उपभोग घेताना समाजाला, गरजूंना मदत करीत त्या धनाचा उपभोग घ्यावा. अशा तर्‍हेचा सामाजिक भान असलेला संदेश या ऋचेमधून देण्यात आला आहे. भ्रष्टाचाराने दुसर्‍याचं धन शोषून घेणार्‍यांना या ऋचेमधून योग्य तो संदेश मिळेल.

    अठरा पुराणे

    व्यास महर्षींनी एका मोठ्या पुराणसंहितेचे अठरा भाग निर्माण केले. व्यावसायिक रोमहर्षण माने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने ब्रह्म, पद्म, विष्णु, शिव, भागवत, नारद, मार्कंडेय, अग्नि, भविष्य ब्रह्मवैवर्त, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड, ब्रह्माण्ड पुराण अशी अठरा पुराणे तयार केली आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार केला.

    पुराणे ही सामान्य माणसाला कैवल्याची प्राप्ती करून देतात. असे पद्मपुराणात म्हटले आहे. या अठरा पुराणांचे सार एका श्लोकातच व्यासांनी सांगितले आहे.

    अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्‌ ।

    परोपकार: पुण्याय पापार्थ परपीडनम्‌ ॥

    अठरा पुराणांमध्ये व्यासांचे वचन प्रसिद्ध आहे. परोपकारामुळे पुण्य मिळते. आणि दुसर्‍याला त्रास देण्यामुळे पाप घडते.

    सामान्य माणसांनी पापकर्मा-पासून दूर रहावे. यासाठी व्यासांनी असा ठाम विचार दिला आहे.

    कसे जगावे? याचे मार्गदर्शन वाल्मिकींचे रामायण सांगते तर जग कसे आहे? जगताना सावधपणे कसे जगले पाहिजे याची जाणीव महाभारत ग्रंथ करून देत असतो.

    कौरव पाण्डव युद्धाच्या निमित्ताने भगवान कृष्णांनी कर्मयोगाचे महत्त्व सांगितले. व्यासमहर्षिंनी तो कर्मयोग त्याचबरोबर ध्यानयोग भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचेही महत्त्व विशद करून ७०० श्लोकांचा श्रीमद्‌भगवद्‌गीता हा ग्रंथ लिहिला.

    आजही यशस्वी जीवनाचे सारभूत तत्त्व गीतेमधूनच वाचकांना समजून घ्यावे लागते.

    संस्कृत वाङ्‌मय

    संस्कृत वाङ्‌मयात अनेक कवी – नाटककारांनी आपल्या अलौकिक साहित्यकृतींनी संस्कृत भाषेला भूषविले आहे. कविकुलगुरू कालिदासांनी मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीम्‌, शाकुंतल ही तीन नाटके कुमारसंभव आणि रघुवंश ही महाकाव्ये आणि मेघदूत आणि ऋतुसंहार ही खण्डकाव्ये संस्कृत भाषेची अनमोल अशी देणगीच आहे. याचबरोबर माघकवीचे शिशुपालवध, श्रीहर्षकवीचे नैषधीचरित आणि भारवीकवीचे किरातार्जुनीय अशी पाच महाकाव्ये संस्कृत भाषेला ललामभूत अशी आहेत. संस्कृत भाषेत कालिदासासारखेच आणखी भवभूती, बाण, दण्डी, भास वगैरे कवीच्या साहित्यकृती अजरामर झाल्या आहेत.

    भर्तृहरी कवीने “शतकत्रयम्‌” .लिहिले. त्यापैकी नीतिशतकम्‌ यामध्ये शंभर सुभाषितांचा संग्रह एकत्र केलेला आहे. सज्जनांविषयी आदर, दुर्जन आळशी माणसांविषयी तिटकारा, उद्योग, परिश्रमांविषयीची तळमळ, नीती-परोपकार-दान या मूल्यांविषयीचा आग्रह या सुभाषितांमधून व्यक्त झाला आहे. संस्कृत भाषेला सुंदर, सुमधुर, अल्पाक्षरी, गेय सुभाषितांनी भूषविले आहे. अनेक सुभाषितकारांनी विविध विषयांवर सुवचने लिहिली पण त्यांचे नाव मात्र माहीत नाही. आकाशात जशा चांदण्या सर्वत्र चमचमत असतात तशी संस्कृत वाङ्‌मयात सर्वत्र विखुरलेली ही सुभाषिते माणसांचे मन आकर्षून घेतात.

    पंचतंत्र

    निसर्गातील पशु पक्षी प्राणी माणसे यांच्या कथा पंचतंत्र या नावाने संकलित केल्या आहेत. सुदर्शन राजाच्या संस्कारहीन, आळशी, अव्यवहारी, अकुशल मुलांना सहा महिन्यांच्या आत संस्कारशील उद्योगी, व्यवहारी आणि कुशल बनविण्याचे अवघड काम विष्णुगुप्त शर्मा या विद्वानाने या कथा सांगून केले. इतरांच्या आग्रहाखातर या कथा एकत्रित केल्या गेल्या. हा विद्वान म्हणजेच आर्य चाणक्य होय. आज ह्या कथा भारतीय प्रादेशिक भाषांमधूनच नव्हे तर जागतिक अनेकानेक भाषांमधून भाषांतरीत झाल्या आहेत.

    केवळ नाटके-काव्य आणि त्याग दान प्रेम नीती परोपकार, प्रामाणिकपणा वगैरेंची शिकवण शतकापुरतीच संस्कृत भाषा मर्यादित राहिली नाही.

    रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, गणितशास्त्र, खगोल शास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्थापत्य शास्त्र, वास्तु शास्त्र, संगीत शास्त्र, व्याकरण शास्त्र अशा विविध विषयांवरील ग्रंथ संस्कृत वाङ्‌मयात आजही अभ्यासकांना मार्गदर्शन करीत असतात.

    Read more

    जानेवारी २०२३ – टिळा

    हिंदूधर्मात तिलक वा टिळा लावणे ही बाब बहुतांशी धार्मिक मंगलविधी अथवा समारंभाशी निगडित असते. प्रत्येक मंगलसमयी असे करणे प्रसन्नता, सात्त्विकता आणि यशस्वितेचे प्रतिक मानले जाते. एखाद्या महत्त्वाच्या कामगिरीवर निघताना हळद, चंदन वा कुंकवाचा टिळा लावला जातो. उपासनेत षट्‌कर्मामधला हा एक अविभाज्य भाग आहे. वैज्ञानिकदृष्टया म्हटले तर कपाळावर ज्या स्थानावर किंवा ठिकाणावर हा टिळा लावतात ते स्थान दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असते. शरीरशास्त्राच्या दृष्टीने या ठिकाणी पिनियल ग्रंथी असते. प्रकाशाचा याच्याशी गहन संबंध आहे. ध्यानधारणा प्रक्रियेत जे आज्ञाचक्र प्रकाशमान होते, त्यात कपाळोवरील या स्थानाचा कोणतातरी संबंध निश्चित आहे. ऋषमुनींनी ही गोष्ट जाणूनच अशी टिळा लावण्याची ही पद्धत पूजा-उपासनेसोबत जोडून त्याला धार्मिक संदर्भ, अर्थ प्राप्त करून दिला. त्यामुळेच नियमितपणे त्या स्थानाच्या स्पर्शाने  उद्यिप्त होऊन तेथून योग्य ती जागृती संबंधित अवयवामध्ये निर्माण होते. टिळा पद्धतीने सर्वसाधारण माणसाच्या कलास धार्मिक रंग व प्रतिष्ठा देऊन आत्मिक प्रगतीकडे वाटचालीचे पहिले पाऊल टाकले. तिलक लावणे वा धारण करणे हे वस्तुत: तृतीय नेत्र उन्मीलनाच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रवास आहे. वैज्ञानिकांच्या दृष्टीने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेले कपाळाच्या वरचे क्षेत्र (स्थान) काही अंशी संवेदनशील असते. त्याची योग्य ती परीक्षाही घेतली जाऊ शकते. या ठिकाणी जेव्हा टिळा लावला जातो तेव्हा आज्ञाचक्र नियमितपणे उत्तेजित होत असते. त्याची आपल्याला वैयक्तिकरित्या जरी खास जाणीव नसली तरी प्रत्यक्ष अनुभवांमुळे आपल्याला त्याचे प्रत्यंतर जाणवते. मंत्रतंत्र शास्त्रांतील असा टिळा लावणे हे जरी परंपरागत नसले तरी त्याला गूढ अर्थ व नियोजित अर्थ असतो. माथ्यावर हे इष्टशक्तीचे प्रतीक मानले जाते. यासंदर्भात स्मृती सदैव चैतन्यमय राहावी, भलेही संपूर्ण शरीर याबद्दल विशेष जागरूक वा लक्ष देणारे नसेना का, परंतु या मानसिक बैठकीमुळे मन सदैव त्या केंद्रबिंदूकडे आकर्षित असते. याचा प्रत्यक्ष परिणाम असा दिसून येतो की, शरीरव्यापी चेतना हळूहळू आज्ञाचक्रावर केंद्रित होत जाते. याला समर्पक उपमा म्हणजे भिंगातून सूर्यकिरणांना एकत्रित करून कागदावर लक्ष बनवायचे. यामुळे तिसर्‍या नेत्राचा जागृतीचा मार्ग मोकळा होतो. योग विज्ञान शास्त्रानुसार ईडा, पिंगळा व सुषुम्ना या तीन प्रमुख प्रकाराच्या मिळून एकूण बाहात्तर हजार नाड्या असतात. या तीनही नाड्या मज्जातंतूद्वारे डोक्याकडे जाऊन तीन वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करतात. नंतर त्या एकत्रित होऊन (दोन याप्रमाणे एकत्रित) कपाळाच्या प्रदेशातून वरून खाली येतात. यातच दोन्ही भुवयांमधील भागावर त्याचा परिणाम आढळतो. सुषुम्ना नाडी आज्ञाचक्र वा तिसरा नेत्र या ठिकाणी आपला प्रवास संपवून पूर्ण करते. त्याच वेळी ईडा व पिंगळा या दोन्ही नाड्या डोळ्यांच्या दिशेस स्पर्श करून रक्तवाहिन्यांच्या रूपाने तेथे विसर्जित होतात. या दोन्ही नाडयांचा डोळ्यांद्वारे जागेपणी व झोपेत स्वप्नावस्थेशी संबंध असतो. याच्यापेक्षा वैशिष्टयपूर्ण सुषुम्ना नाडीचा संबंध तृतीय नेत्राद्वारे सुषुप्ति, तुरचि आणि तरी यातील अवस्थांशी असतो. टिळा लावल्याने साधकाला दैनंदिन उपासनेशिवाय अशी स्थिती सहजगत्या काही अंशी प्राप्त होते आणि तिलक लावणे हा आत्मोकर्षाचा एक निश्चित आधार बनतो आणि साधना अभ्यासात उपयुक्त ठरतो.

    तिलक तात्त्विकदृष्टया अनेक प्रकारे प्रेरणायुक्त असतो. तिलक बर्‍याच वेळा चंदनाचा असतो. चंदन शीतल किंवा थंड मानले जाते. चंदन डोक्याला म्हणजे कपाळावर लावल्यामुळे मेंदूतील महत्त्वपूर्ण चिंतन केंद्र हे सदैव नेहमी थंड, शांत राहते. त्या शांतपणामुळे मनातील भाव व विचार इतके चांगले राहतात की त्या माणसाचे इतरांशी जे वागणे असते त्यात प्रसन्नता, सौम्यपणा व शांती दिसून येते.

    विवाहित स्त्रिया भांगामध्ये, माथ्यावर कुंकू आणि कपाळावर बिंदी लावतात. बिंदी टिळ्याचे तर कुंकू हे तिलकाचे प्रतीक मानले जाते, परंतू याचा संदर्भ त्यांच्या सौभाग्याशी जोडलेला आहे हे अक्षय सुवासिनीचे प्रतीक मानले जाते.यात समर्पण आणि निष्ठा प्रतीत होत असते. तिलक-द्रव्य रूपात वेगवेगळ्या वस्तूंचा वापर केला जात असतो. पांढरे व लाल चंदन हे भक्तिमार्गाचे प्रतीक आहे. भजन करणारी मंडळी यांचा वापर नेहमी करतात. केशर किंवा गोरोचनाचा वापर हे ज्ञान आणि वैराग्याचे निदर्शक असते. ज्ञानी तत्त्वचिंतक वा विरक्त माणसे याचा उपयोग करतात. कस्तुरी हे ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य इत्यादींचे चिन्ह मानले जाते. परम अवस्थाप्राप्त योगी लोक याचा वापर करतात.

    तिलकधारणेच्या उद्देशानुरूप तो लावण्यासाठी वेगवेगळ्या बोटांचा वापर केला जातो. ज्ञानाच्या संदर्भात तर्जनीचा वापर केला जातो. पांढर्‍या चंदनाचा टिळा लावतात. ऐश्वर्यासाठी मधले बोट व त्याने कुंकू लावले जाते. धन-वैभव, सुख-शांतिकरिता अनामिकेचा वापर असतो. त्या बोटाने केशर, कस्तुरी वा गोरोचनाचा टिळा लावला जातो. या प्रत्येकासाठी क्रमश: तर्जनी-पूर्व दिशा, मध्यमा-उत्तर दिशा आणि अनामिका-पश्चिम दिशा निश्चित केलेली आहे. त्या दिशांकडे तोंड करूनच त्यासंदर्भीय टिळा लावावा. अंगठ्यानेही चंदन तिलक लावायची परंपरा आहे. अंगठ्याने तिलक लावणारे असे असतात की जे सर्व धर्म तसेच संप्रदायांना समान मानतात. काळ्या रंगाचा टिळा कपालिक लोक करतात.(अघोरी विद्यावाले).

    Read more

    डिसेंबर २०२२ – भेट तुझी माझी स्मरते….

    अशी खूप माणसं, घटना, ठिकाणं, गोष्टी आपल्याला अवचितच भेटतात. तरीही आपल्याही नकळत मधुर सुवासासारख्या मनात दरवळत राहतात. त्या आठवणींवर कालांतराने विस्मृतीची धूळ बसू लागते आणि त्या धुरकट होऊ लागतात. काही आठवणी तर पार काळाच्या पडद्याआड जाऊन विसरल्याही जातात.  काही आठवणी मात्र धुरकटलेल्या का होईना पण मनाच्या सांदीकोपर्‍यात अडकून, दडून राहतात.

    आयुष्याच्या वाटेवर चालताना असं काहीतरी घडतं किंवा असं कोणीतरी भेटतं, की आपोआप त्या आठवणींच्या आजूबाजूला साठलेली धूळ उडून त्या पुन्हा लखलखून समोर येतात आणि त्या पहिल्या भेटीची आठवण करून देतात.

    मग ती माणसंच असतील असं नाही. अर्थात आपल्या आयुष्यात अशी खूप माणसं येतात जी आपल्याला आयुष्यभर बर्‍या-वाईट आठवणींच्या रुपाने साथ देतात. पण आठवणी काही फक्त माणसांच्याच असतील असं नाही.

    मग त्या कोणत्याही आठवणी असतील…. अगदी चंद्र, सूर्य, तारे, नदी, नाले, ओढे, समुद्र, पक्षी, फुलं, पानं अगदी काहीही…एखादा सूर्योदय आपल्याला कुठेही सूर्य उगवताना दिसला की उगीचच आठवत राहतो.  कुठेतरी चिमणी चिवचिवताना दिसली की लहानपणची काऊ-चिऊची गोष्ट आपोआप मनात उमटते. रोजच्या कामाच्या धकाधकीत कोसळत्या पावसाकडे लक्ष जाईलच असं नाही. पण कधी कधी आपणहून पावसाला भेटायला जावसं वाटत.

    असेच आपल्या मनात दडलेल्या काही सुगंधांची आणि आपली अवचित भेट होते. वैशाखात भाजून तापलेल्या मातीवर जेव्हा वळवाच्या पावसाची सर कोसळते, तेव्हा घमघमणारा मातीचा सुगंध, विसरू म्हंटल तरी न विसरता येण्याजोगा…..कधी ओल्या कंच रानात गेला असाल तर तिथला ओल्या झाडांचा सुगंध त्या रानातून बाहेर आलं तरी रेंगाळत राहतो.  समुद्र किनारी भरती-ओहोटीच्या वेळेस येणारा वेगळाला सुगंध. हे सुगंध जरी रोज भेटीला येत नसले तरी ते मनात राहतात.

    काही न्‌ काही करणानं महिनाभर सकाळी फिरायला जाणं होतंच नव्हत. महिनाभरानं पहाटे बाहेर पडले. खाडीपर्यंत पोहोचले पण काहीतरी चुकल्या चुकल्या सारख वाटू  लागलं. आणि अचानक लक्षात आलं, आज मंदीर पार करून खाडीच्या रस्त्याला लागल्यावर येणारा ओळखीचा सुगंध नाही आला……पायाखाली नजर भिरभिरू लागली पण एकही बकुळीचं फूल दिसेना. तेव्हा रस्त्याच्या कडेला नजर गेली आणि बकुळीचा वृक्षच दिसेना. रस्त्याच्या कामाच्या आड येतोय म्हणून त्या वृक्षाची आहुती दिली गेली. वसंतात हमखास भेटीला येणारा हा सुंगध आता इथे तरी भेटणार नाही. या सुगंधाची आणि माझी भेट अनेक वर्षापूर्वीपासूनची. दहा/पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा या रस्त्यावर फिरायला आले होते तेव्हा, बकुळीच्या नाजूक, दरळवत्या सुगंधाशी पहिली भेट झाली होती, तोवेरी बकुळीची ओळख गजर्‍याच्या स्वरूपातच होती. ओंजळीतल्या फुलांचा मनभरून सुंगंध घेणं काय हे त्या भेटीत बकुळीनं शिकवलं.

    फुलांच्या सुगंधाशी अगदी लहानपणीच भेट झाली होती. आमच्या घराबाहेर एका खिडकीखाली मोगर्‍याचा ताटवा होता, एका खिडकीमागे सोनचाफा होता तर झोपायच्या खोलीच्या खिडकीबाहेर रातराणी होती. चढत्या रात्री अचानक कधीही जाग आली की रातराणीची सोबत असे, पहाटे अभ्यासाला उठल की मोगरा सोबतीला असे. चाफा तर काय बहरला की दिवसभर नुसता घमघमत असे.

    गणपती, दिवाळीसारख्या सणांना मामाकडे आलं की वेगळ्या फुलांशी भेट होई. पाऊस सुरु झाला की पांढर्‍याशुभ्र अनंताची फुलं हमखास भेटणारच. ओल्या मातीचिखलात केशरी देठाच्या चांदण्यासारख्या नाजूक पांढर्‍याशुभ्र प्राजक्ताचा सडा पडलेला असे. टोपलीत भरून ती फुलं पाणी भरलेल्या बालदीतून निथळून काढली की सगळा चिखल धुतला जाऊन फुलं चांदण्यासारखी लखलखून दरवळू लागत. सूर्य अस्ताला जातांना पिवळ्या-गुलाबी-गडद लाल रंगाची गुलबाक्षी, कोर्‍हांटी फुलली की रात्र पडायच्या आत, मामाला संध्येसाठी परडी भरून फुलं काढून आणायची. आजी देवाला वाहण्यासाठी त्याच्या वेण्या करून ठवत असे. हात-पाय धुवून देवाला नमस्कार केला की परडीत उरलेली एखादी वेणी आम्हांला आळीपाळीने मिळत असे. जाई-जुईचे गजरे तर लहान मोठ्या, सगळ्यांनाच घालायचे असत. मग ज्या दिवशी जी वेलीवरून फुलं तोडून आणेल तिला गजरा मिळण्याचा पहिला मान. फुलं उरली तर इतर कोणाचा नंबर लागत असे. जाई-जुईच्या त्या इतकुशा कुडीत आसमंत दरवळून टाकेल इतका सुगंध साठविण्याची क्षमता येते कुठून? हा मला आजही पडणारा प्रश्न आहे.

    पुढे सरत्या दिवसांत ही फुलझाडंच मागे पडत गेली. मग कुठेतरी अचानक ही फुलं भेटली की त्याच्या सुंगंधाचा अगदी मनभरून आनंद घेता येतो. तर काही सुगंधाशी आकस्मिकपणे गाठ पडली. ते सुगंध ओळखीचे असले तरी परिचयाचे नव्हते. त्याना अनुभवलं होत पण त्यांच्याशी कधी भेट झाली नव्हती. तीस एक वर्षापूर्वीची गोष्ट असेल, वडिलाबरोबर त्यांच्या कामानिमित्त ठाण्याच्या पुढे घोडबंदर मार्ग आहे तिथून जात होतो. इतक्यात ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. ताई उतरा तुम्हांला गंमत दाखवतो, म्हणून रस्त्यावरून खाली घेऊन गेला आणि मस्त दरवळ येऊ लागली. तशी लगेच त्याला विचारलं, “किसन काका इथे केवडा आहे का रे?”  “तेच तर ताई, हे बघा पुढे दिसतंय न ते केतकीचं बन, पण पुढे येऊ नका हा. केतकीच्या बनात हमखास जनावर असतं” असं तो म्हणाल्यावर आपसूकच पावलं मागे सरकली, पण ती दरवळ तिथून हलू  देईना “इथंच थांबा ताई, आलोच….” म्हणत किसनकाका गेला आणि पाच मिनिटातच केवड्याच भरलेलं कणीस घेऊन आला. तसं कणीस नंतर कुठे बघायला देखील मिळालं नाही. त्या कणसातली केवड्याची पान मात्र खूप दिवस सोबतीला होती…..वहीच्या पानात, कपड्याच्या घडीत, उशीच्या खाली, कंपासपेटीत…..कुठे कुठे जपून ठवलं होत. ती पान दाखवून मैत्रिणीपुढे केतकीच बन बघितल्याची फुशारकीही मारली होती. केवड्याची आणि माझी ती पहिली आणि शेवटची भेट.

    खूप वर्षांनी एखादी मैत्रीण अचानक भेटावी, तसा एक सुगंध अचानक एकदा पुन्हा भेटला. सकाळची फिरायला निघाले होते आणि रस्त्यात खूप ओळखीची दरवळ जाणवली. हे काहीतरी खूप ओळखीचं  आहे याचा विचार करतच पुढे चालू लागले आणि पावलं अडखळली. मनानं ग्वाही दिली अरे हा सोनटक्का. लहान असतांना वडिलांच्या एका मित्राकडे पांढर्‍या आणि पिवळ्या सोनटक्क्याची कितीतरी झाड होती. त्यानंतर सोनाटक्याच्या फुलांशी. सुगंधाशी अशी अचानक भेट झाली आणि मग होतंच राहिली…..अजूनही सकाळी बाहेर पडलं की कधीतरी सोनटक्का भेटतोच.

    मनीषा सोमण

    Read more

    नोव्हेंबर २०२२ – धार्मिक तुलसीमाहात्म्य!

    सनातन वैदिक धर्माची शिकवण “माणसाने माणसाशी  आणि निसर्गाशी सुद्धा  माणसारखे वागावे” अशी आहे. भारतीय संस्कृतींत पर्यावरणाचे विशेष महत्त्‌व सांगण्यात आले आहे. औषधी वनस्पती गावात नेहमी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा अंतर्भाव धार्मिक पूजाद्रव्यामध्ये करण्यात आला आहे. या औषधी वनस्पती देवांना प्रिय आहेत असेही सांगण्यात आले आहे. त्यामध्ये तुलसी या वनस्पतीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज आपण तुलसीचे धार्मिक महत्त्‌व काय आहे ते पाहणार आहोत.

    हिंदू माणसाचे घर म्हटले की, बाहेर घरासमोर अंगणात तुळशीवृंदावन हे असणारच! तुळशीवृंदावनाभोवती रांगोळी असणारच! रोज सकाळी तुळशीला पाणी घालून पूजन करायचे आणि प्रदक्षिणा घालायची ही पद्धत प्राचीन कालापासून चालत आलेली आहे. तिन्हीसांजा तुळशीवृंदावनासमोर दीप प्रज्वलित करून तुळशीचे संस्कृत स्तोत्र म्हटले जाते.  प्रार्थना केली जाते. महिला तुळशीला सर्वश्रेष्ठ देवता मानतात. तिला वात्सल्यमयी माता समजतात. महिला तुलसीपुढे आपले मन मोकळे करतात. कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणी करतात. तुळशीला जिवाभावाची मैत्रिण समजून तिच्याशी संवाद साधतात. सांजसकाळ तुलसीचे दर्शन घेऊन पुढील प्रार्थना करतात.

    तुलसि श्रीसखि शुभं पापहारिणि पुण्यदे ।

    नमस्ते नारदस्तुते  नारायणमन: प्रिये ॥

    हे तुळसी, तू लक्ष्मीची मैत्रिण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारद तुझी स्तुती करतो. तू नारायणाच्या मनाला अत्यंत आवडतेस. तुला नमस्कार असोत.

    प्राचीन कालापासून ही धार्मिक परंपरा जोपासली गेली आहे. श्रीसत्यनारायण पूजेच्यावेळी विष्णूसहस्र नावे घेऊन  एक हजार तुलसीपत्र नारायणाला अर्पण करतात. दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी रोजी तुलसीविवाह संपन्न झाल्यावरच माणसांचे विवाह संपन्न होत असतात. ही प्रथा फार प्राचीन कालापासून पाळण्यात येत आहे.

    तुलसीची उत्पत्ती

    तुलसीचे मूळ नाव तुळस असावे. तुलसी हे त्या नावाचे संस्कृतीकरण झाले असावे असे व्युत्पत्तिकोशात म्हटले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणात “तुलसी” हे नाव का मिळाले ते सांगितले आहे.

    नरा नार्यश्च तां दृष्ट्‌ वा  तुलनां दातुमक्षमा: ।

    तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद: ॥

    नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना.म्हणून पुरातत्त्‌ववेत्ते तुलसी या नावाने तिला संबोधू लागले.

    देव-दानव यांनी केलेल्या समुद्रमंथनाच्यावेळी जे अमृत निघाले, त्या अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि  त्यातून तुळस निघाली. ती तुळस ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूना दिली, असे स्कंदपुराणात सांगण्यात आले आहे.

    दुसर्‍या एका कथेप्रमाणे जलंधराची पत्नी वृंदा हिच्यापासून तुलसीचा जन्म झाला असे सांगण्यात आले आहे. पुराणात  तुलसी जन्माच्या आणखीही कथा सांगण्यात आल्या आहेत.

    पद्मपुराणात तुलसीमाहात्म्य  सांगितले आहे. “तुलसीचे केवळ दर्शनही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे. तुलसी ही वृंदावनात राहते. ती विष्णूला परमप्रिय आहे. तुलसीदलाशिवाय विष्णूची पूजा केल्यास ती व्यर्थ ठरते.”

    मणिकांचनपुष्पाणि तथा मुक्तामयानि च ।

    तुलसीदलपत्रस्य कलां नार्हन्ति षोडशीम॥

    सुवर्णाची, रत्नांची आणि मोत्याचीही फुले असली ( विष्णूला वाहिली ) तरी त्यांना तुलसीपत्राच्या सोळाव्या कलेचीही सर येणार नाही.

    तुलसीकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।

    तद्‌ गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिंकरा: ॥

    ज्या घरी तुलसीचे बन आहे, ते घर तीर्थासारखे पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत.

    तुलसीच्या बनाभोवतालची जमीन ही गंगेसारखी पवित्र असते असे सांगण्यात आले आहे. स्नान करून नंतरच तुलसी पाने काढावीत. पाने ओरबाडून काढू नयेत. तुलसीची पाने काढण्यापूर्वी पुढील प्रार्थना म्हणावी तुलस्यमृतजन्मासि सदा त्वं केशवप्रिये ।

    केशवार्थे विचिन्वामि वरदा भव शोभने ॥

    हे तुलसी, तू अमृतापासून जन्मली आहेस. तू विष्णूला सर्वकाल प्रिय आहेस. मी विष्णूसाठी तुला खुडतो. हे शोभने, तू मला वर देणारी हो.

    भगवान विष्णूला नैवेद्य अर्पण करतांना त्यावर तुलसीपत्र ठेवतात. तरच भगवान विष्णू नैवेद्याचा स्वीकार करतात अशी श्रद्धा आहे. तुलसीचे दर्शन, स्पर्श, ध्यान, पूजन, रोपण आणि सेवन हे पुण्यदायक मानले जाते.

    दा. कृ. सोमण

    Read more

    ऑक्टोबर २०२२ – सन २०२२ शास्त्रार्थासंबंधी खुलासा

    धनत्रयोदशी संबंधी खुलासा आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रदोषकाळी असेल त्या दिवशी धनत्रयोदशी होते. यावर्षी शनिवार २२ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ०६.०२ मि. आश्विन कृष्ण त्रयोदशी प्रारंभ होत असून रविवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०६.०३ मि. समाप्त होत आहे. २२ ऑक्टोबर रोजी सायं. ०६.०२ मि .नंतर ज्या गावी सूर्यास्त होत असेल त्या गावी शनिवार २२ ऑक्टोबर रोजी प्रदोष व धनत्रयोदशी आहे. मात्र २३ ऑक्टोबर रोजी सायं. ६.०३ पूर्वी ज्या गावात सूर्यास्त होत असेल त्या गावी रविवार २३ ऑक्टोबर रोजी प्रदोष व  धनत्रयोदशी आहे.

    (१) शनिवार २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली गावे – मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, संपूर्ण कोकण, गोवा, गुजरात, बेळगाव, मंगळूर या भागात शनिवार २२ ऑक्टोबर रेाजी धनत्रयोदशी आहे.

    (२) रविवार २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असलेली गावे – नागपूर, सोलापूर, अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगांव, जालना, धुळे, नांदेड, परभणी, भुसावळ, लातूर, यवतमाळ, वर्धा, विजापूर, विदर, गुलबर्गा, हुबळी, धारवाड, दिल्ली येथे रविवार २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे.

    Read more

    सप्टेंबर २०२२ – ऐसा गणेश मंगलमूर्ती

    श्री गणेशाची आराधना करताना त्याचे “सुखकर्ता दुखहर्ता” रूप आपल्या डोळ्यासमोर असते. “सुखकर्ता दुखहर्ता” ही आरती म्हटल्याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात आरत्यांना सुरवात होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे श्रीगणेशाला अग्रपूजेचा मान आहे, त्याचे पूजन केल्याशिवाय शुभकार्याला सुरवात होत नाही त्याचप्रमाणे ह्या आरतीशिवाय गणेशपूजा संपन्न होत नाही. गणपती बाप्पाची ही आरती रचिली आहे संत रामदासांनी. आरतीच्या शेवटी “दास रामाचा, वाट पाहे सदना” असा स्पष्ट उल्लेखही आहे. ही आरती आज गणेशभक्तांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. रामदास हे एक विलक्षण संत होते. प्रपंच आणि परमार्थ ह्यांची सांगड घालायला त्यांनी आपणास शिकवले. स्वतः विरक्त आयुष्य जगत असताना समाजासाठी त्यांनी समाजकारण आणि राजकारण ह्यात महत्त्‌वाची भूमिका बजावली.

    शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ॥

    कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्‌गुरू रामदासा ॥ ह्या श्लोकात त्यांना वंदन करत असताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्‌वाचे किती समर्पक वर्णन केले आहे. वैराग्य, ज्ञान आणि कवित्व ह्यांचा अद्‌भुत संगम त्यांच्या ठायी दिसून येतो. रामदास स्वामींनी बुद्धी आणि शक्ती ह्या दोन्हीची उपासना करण्यास शिकवले. बलोपासना करण्यासाठी त्यांनी गावोगावी मारूतीरायाची मंदिरे स्थापली. “भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती” ही त्यांनीच लिहिलेली आरती. त्याच बरोबर बुद्धीची देवता असणार्‍या गणेशाचेही त्यांनी वेळोवेळी स्तवन केले आहे. खरेतर ते अनन्यभक्त श्रीरामाचे. म्हणजे त्यांनी जणू आपल्याला देवता पंचायतन दिले – राम, लक्ष्मण, सीता, मारुती आणि श्रीगणेश.

    कार्यारंभी आणि ग्रंथारंभी, सकल विघ्नांचा नाश करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींपासून अनेक संतांनी श्रीगणेशाला वंदन केले आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी “ॐ नमोजी आद्या” असे लिहून ओंकारस्वरूप आत्मरूपाला वंदन केल्यानंतर माऊली म्हणतात, “देवा तूंचि गणेशु” आणि मग गणेशाच्या वाङ्‌मय मूर्तीचे अत्यंत रसाळ वर्णन माऊली करतात. श्रुतीस्मृती हेच तिथे गणेशाचे अवयव झाले आहेत, तर पुराणे हे रत्नालंकार. काव्य, नाटक इत्यादी साहित्य हे गणेशाच्या पायातील घागर्‍या आहेत, ज्यांचा रुणुझुणू नाद सगळ्यांसाठी आनंददायक आहे. असे अत्यंत समर्पक रूपक रंगविताना ज्ञानेश्वर माऊली लिहितात, तर्क हा त्याच्या हातातील परशु आहे, न्याय शास्र हा जणू त्याच्या हातातील अंकुश आहे आणि वेदान्त दर्शन जणू त्याच्या हातातील गोड मोदक आहे. त्याचप्रमाणे रामदासांनी देखील दासबोधाच्या सुरवातीला, सगुण साकार गणेश मूर्ती रंगविली आहे. ही मूर्ती अतिशय साजिरी आहे आणि तिचे वर्णन अतिशय सजीव आहे. शब्दाच्या कुंचल्यातून साकारलेले चित्रच ते. आपणही त्या मूर्तीचे दर्शन घेवूया. खास करुन श्लोक १३ पासून पुढील वर्णन तर केवळ चित्रासारखे नसून चलत्‌-चित्रासारखे आहे. गणेशाचे फडफडणारे कान त्याचा “फडै फडै” आवाज होतो असे वर्णन रामदास स्वामी करतात. त्याच्या नृत्याचे वर्णन करताना “घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी” आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. हे सारे वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे. तुमच्या सोयीसाठी ते खाली दिले आहे. गणेश हा “ऐसा सर्वांगे सुंदरु” आहे. अशा गणेशाचे ध्यान केल्याने बुद्धी प्रकाशमान होते, सरस्वती प्रसन्न होते. अवलक्षणी, हीन, मूर्ख व्यक्ती देखिल त्याच्या कृपाप्रसादाने दक्ष-प्रवीण होते. अशा “मंगलमूर्ती” गणेशाकडे आपण जे मागू ते मिळेल. पण काय मागावे तर रामदास स्वामी म्हणतात, स्वार्थ नको, परमार्थ चित्ती ठेवून गणेशाला शरण जावे.

     

    समास दुसरा गणेशस्तवन

    श्रीराम ॥

    ॐ नमो जि गणनायेका । सर्वसिद्धिफळदायेका ।

    अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरुपा ॥ १ ॥

    मराठी अर्थ

    १) सर्व सिद्धींची फळें देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा, आणि ज्ञानस्वरुप, ओंकाररुप जो गणपति त्याला मी नमस्कार करतो.

    माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।

    मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरुनी ॥ २ ॥

    २) गणपतीनें माझें अंतःकरणी वास्तव करुन आपल्या कृपाकटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे. वाग्सुंन्यास = वाक्‌ शून्य

    तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।

    आणी विश्र्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥

    ३) त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचें आवरण विरुन जातें आणि सारें विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो.

    येतां कृपेची निज उडी । विघ्नें कांपती बापुडीं ।

    होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥

    ४) अशी त्याची कृपा झाली की संकटें भयाने थरथर कापूं लागतात. तसेच त्याच्या नामस्मरणाने ती नाहींशी होऊन जातात.

    म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर ।

    आदिकरुनि हरीहर । अमर वंदिती ॥ ५ ॥

    ५) म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात. आम्हां अनाथांचे ते माहेर आहे. विष्णू व शंकर त्याला नमस्कार करतात.

    वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।

    आघात अडथळें उपाधी । बाधूं सकेना ॥ ६ ॥

    ६) जगांत जें मंगळ आहे ते तो आहे. त्याला नमस्कार करुन कार्य केल्यास ते सिद्ध होते. अडथळें, अडचणी किंवा संकटे यांचा त्रास होत नाही.

    जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।

    नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळें सर्वांगी ॥ ७ ॥

    ७) त्याचे रुप, ध्यान आठविल्यावर समाधान वाटते. मन डोळ्यांमध्ये अवतरुन बाकी सर्व क्रिया बंद करुन ते रुप पाहू लागते.

    सगुण रुपाची टेव  माहा लावण्य लाघव ।

    नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८ ॥

    ८) ते गणेशाचे सगुण रुप विलक्षण आहे. तो नाचू लागला कीं सगळे देव नुसते पाहातच बसतात.

    सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।

    हरुषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९ ॥

    ९) त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो. म्हणून जेव्हां पहावे तेव्हां तो मस्त दिसतो, परमानंदाने नेहमी डोलत असतो. आंतून येणार्‍या आनंदाच्या उर्मींनी त्याचे मुख प्रसन्न असते.

    भव्यरुप वितंड । भीममूर्ति महा प्रचंड ।

    विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १० ॥

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter