•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    ऑक्टोबर २०२१ – निरोगी राहण्यासाठी व्यायामाचे महत्त्व

    गेल्या वर्षाने आपल्याला रोगप्रतिकारशक्तीचं महत्त्व शिकवलं. रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर योग्य आहार आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी आपल्या दिनचर्येचा अपरिहार्य भाग असल्याच पाहिजेत. रोजच्या धावपळीत व्यायामासाठी थोडा वेळच मिळत नाही, या सबबीखाली व्यायाम टाळणं हे तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही हे कायम लक्षात ठेवावे.

    आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या व्यायामांना प्राधान्य द्यावे, कोणते व्यायाम प्रकार नियमित करावेत, याबद्दल…

    व्यायामामुळे होणारे फायदे :

    १)  व्यायाम केल्यामुळे कार्यक्षमता वाढते, कारण व्यायामामुळे शरीराला आणि सर्व अवयवांना प्राणवायू म्हणजेच
    ऑक्सिजन जास्त प्रमाणात पोचवला जातो. ज्यामुळे शरीरातील उत्साह व चैतन्य वाढते.

    २)  व्यायामामुळे वाढलेले वजन कमी करण्यास आणि वजन कमी असल्यास ते वाढण्यास मदत होते. व्यायामामुळे वाढलेल्या कॅलरी वापरल्या जातात.

    ३)  व्यायामामुळे शरीर अनेक रोगांशी लढण्यासाठी सक्षम होते आणि नियमित व्यायाम केल्यामुळे शारिरीक स्वास्थ्य टिकून राहते, मनाची स्थिती सुधारते, आत्मविश्वास वाढतो. व्यायामामुळे स्नायूंची शक्ती सुधारते आणि काम करण्याची सहनशक्ती वाढते.

    ४)  व्यायामाने लवकर आणि शांत झोप लागते.

    ५)  व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि ¿दय, मेंदू  यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळे ¿दयाचे विकार, रक्तदाब यासारख्या आरोग्य समस्यांमध्ये फायदा होतो..

    ६)  स्त्रियांमध्येही अनेक रोगांसाठी व्यायाम महत्त्वाचे आहेत. गर्भावस्थेतसुध्दा नियमित व्यायाम केल्यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते.

    ७)  त्वचा हा एक शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. व्यायामामुळे त्वचेलासुध्दा रक्तपुरवठा वाढविला जातो. यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात आणि त्वचेला पोषक घटक पोचवले जातात.

    काही दररोज करण्यासाठीचे व्यायाम :

    सूर्यनमस्कार

    अ) सूर्यनमस्कारामुळे पचनसंस्थेचे काम व्यवस्थित होते.

    ब) यामुळे पोटावर ताण आल्याने पोटाची जाडी कमी होण्यास मदत होते.

    क) सूर्यनमस्कारामुळे झोपेच्या समस्या कमी होऊन झोप शांत लागते.

    ड) सूर्यनमस्कारामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो.

    इ) यातील स्थितीमुळे शरीरामध्ये लवचिकता येते.

    फ) सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे अनियमित मासिक धर्म नियमित होण्यास मदत होते.

    ग) तसेच सूर्यनमस्कारामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर वगैरे समस्यांमध्ये देखील फायदा होतो.

    वेगाने चालणे

    वेगाने चालणे हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे. दररोज चालण्यामुळे रक्तदाब, डायबिटीज, वजनच्या समस्या, मानसिक ताणतणाव वगैरे समस्यांवर रोज चालण्यामुळे फायदा होतो.

    सायकलिंग

     कोलेस्टेरॉल वाढणे यांसारख्या समस्येवर सायकलिंग करणे हा उत्तम व्यायाम आहे.

     सायकलिंग केल्याने ह्यदयरोगाचा धोका या व्यायामुळे टाळला जाऊ शकतो.

    सायकलिंग हा व्यायाम दररोज केल्यामुळे श्वास संस्थेतील स्नायूंचे कामसुध्दा उत्तम प्रकारे होते.

    सायकलिंग केल्यामुळे स्नायूंची शक्ती वाढते आणि त्यामुळे हातापायातील स्नायूंचे कार्य सुधारते आणि हालचाली करण्यामध्ये सोपेपणा येतो.

    प्रत्येकाने आपल्या आवडी व निवडीनुसार दररोज करण्याचा व्यायाम ठरवावा. आठवड्यातून  कमीत कमी पाच ते सहा दिवस तरी अर्धा तास व्यायाम करावा. एकाच प्रकारचा व्यायाम करण्यापेक्षा दिवसाआड वेगळ्या पध्दतीचा व्यायाम करावा. आपण त्रÝतुमानानुसार देखील व्यायाम बदलू शकतो.

    Read more

    सप्टेंबर २०२१ – लॉकडाऊन डायरी

    अनिकेत परशुराम आपटे

    ‘आज रात बारा बजे से… संपूर्ण देश लॉकडाऊन होने जा रहा है। जो जहाँ है, वही रहे  बाहर नहीं निकलना है“ । २२ मार्च या दिवशी मोदीजींचे हे शब्द कानी पडले आणि माझ्यासह जवळ जवळ सर्वांचंच धाबं दणाणलं.

    लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कामासाठी बाहेर पडणार्‍यांनीच त्या काळातली खरी परिस्थिती अनुभवली…….

    एकमेकां सहाय्य करू

    सुट्टी कोणाला नको असते..!! पण अशी जबरदस्तीची सुट्टी… बरं, घरातल्या बायकांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कामवाल्या बायका येणं बंद झालं. झाड-लोट, कपडे-लत्ते, भांडी-कुंडी आणि स्वयंपाक, असे चार सामने त्यांच्यासमोर उभे ठाकले. कामाचं विभाजन हा उत्तम आणि एकमेव पर्याय समोर होता. आई व बायकोने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर झाड-लोट आणि कपडे-लत्ते ही जबाबदारी माझ्यावर आली.

    ‘एकमेकां सहाय्य करू…“ हे वचन जसं घरात दिसू लागलं, तसं ते सोसायटीतही जाणवलं. २२ मार्चला ती घोषणा झाल्या झाल्या सोसायटीच्यों प्aूेAज्ज्ु rदल्ज् वर चर्चा सुरू झाली. काय करायचं… सामान कसं काय आणायचं… सुरक्षेचं कसं करायचं… हे विषय ओघाने आलेच. माझ्यासह सोसायटीतल्या अजून दोघांनी ही जबाबदारी स्वीकारली.

    बदललेला दृष्टिकोन

    अत्यावश्यक सेवांमध्ये बँकांचाही समावेश होता. त्यामुळे काहीही झालं तरी बँका सुरूच राहणार होत्या. मी बँक कर्मचारी असल्याने मला काही झालं तरी कामावर जावंच लागणार होतं.  लॉकडाऊनचं कडक पालन सुरू असल्याने येणार्‍या ग्राहकांची संख्या जवळ जवळ नगण्यच होती. पण आमच्याबरोबरची  ग्राहकांची बदललेली वागणूक नक्कीच जाणवत होती. मेलेले उंदीर पकडावे तसे काही ग्राहक आम्ही दिलेल्या नोटा, कागद हाताळायला लागले; तर भिकार्‍यासमोर पैसे फेकावेत तसे काही ग्राहक पैसे व कागद आमच्यावर लांबूनच फेकू लागले. अशा वेळी वाटायचं, ‘या अशा अपमानित करणार्‍या, हेटाळणी करणार्‍या ग्राहकांसाठी का आम्हाला बसवलं इथे…“ पण यातही काही ग्राहक आमची काळजीही करत होते. ‘स्वत:ची काळजी घ्या… लवकर घरी जा… आज काम नाही झालं तरी चालेल, माणसं कमी आणि काम जास्त हे मला माहीत आहे…“ अशी वाक्य ऐकताना नवा हुरूप यायचा कामाचा…

    अपेक्षाभंग आणि कानगोष्टी

    काहींच्या मते २१ दिवसांचा हा कैदवास होता. तो संपत येण्याची तारीख जशी जवळ येत होती, तसे सगळे आनंदीत होऊ लागले. एका बाजूला जिथे लॉकडाऊन संपणार ही चर्चा होती तिथेच दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्याही बातम्या येत होत्या. अशातच आपल्या सर्वांच्या अपेक्षांना सुरूंग लावणारा, लॉकडाऊन वाढल्याचा निर्णय समोर आला. इतके दिवस एक सुट्टी  म्हणून घेतलेले हेच दिवस लॉकडाऊन वाढल्याने आता वेगळेच वाटू लागले. कोरोनाबद्दलची भीती आता वाढू लागली होती. त्यातच कानगोष्टींना ऊत आला. कोणी सांगत होतं, ‘कोरोना काही जात नाही… आपण सगळे मरणार यामुळे…“ कोणी बोलत होते, ‘हा कोरोना आता आपलं शरीरच नाही तर पैसाही पोखरणार… नोकर्‍या जाणार… खायची भ्रांत पडणार…“ अफवांना ऊत येत होतां.

    अंगवळणी पडले सारे… दारात आले कोरोनाचे वारे…

    हे लॉकडाऊन आता माझ्यासह सर्वांच्याच अंगवळणी पडलं होतं. जसं लॉकडाऊन वाढत गेलं तसे ग्राहकांच्या काळजीचे सूरही बदलत गेले. ‘मिळतात ना इतक्या सवलती, मग करा की जरा जास्तीची कामं…“

    अचकत-बिचकत का होईना, पण धीम्या गतीने आणि योग्य ती काळजी घेऊन आयुष्य सुरू होतं. असं असतानाच एक दिवस मी ऑफीसच्या कामात व्यस्त होतो तेव्हा घरून फोन आला. बातमी ऐकून शॉकच बसला. आमच्या सोसायटीत एकाच परिवारातल्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. इतकी दक्षता घेऊनही, स्वच्छतेबाबत पूर्ण निगा राखूनही कोरोनाचं संकट सोसायटीत शिरलंच होतं. यामुळे आम्ही सर्वचूा हेग्दह मध्ये होतो. आठवड्याभरात ती तिघं परत देखील आली. त्या परिवाराची गाडी पूर्वपदावर येईपर्यंत सर्व बिर्‍हाडकरूंनी आळी-पाळीने त्या परिवाराच्या दिवसभराची खान-पान व्यवस्था आपल्या हाती घेतली…

    वागणुकीतला बदल

    सोसायटीतल्या सर्वांनी त्या बाधित परिवाराला सावरायला आणि पुन्हा उभं रहायला मोलाची मदत केली खरी; पण बाहेरच्या जगाची आमच्याशी असलेली वागणूक मात्र बदलली. आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी आस-पासच्या दुकानांमध्ये, वसाहतींमध्ये वार्‍यासारखी पसरली. त्यावेळी सामान देताना, ते आमच्याकडे टाकल्यासारखं करणे, ‘त्या परिवाराला काही दिवस दूर का पाठवत नाही तुम्ही…“ अशी सतत विचारणा करणे, ‘तुमच्याकडून कॅश किंवा कार्ड पेमेंट आम्ही घेणार नाही… गूगलपे फोनपे नसेल तर सामान घेऊ नका…“ असं सांगणे, हे प्रकार काही दुकानदारांकडून व्हायला लागले. शिवाय परिसरातील काही राहिवासी तर, आम्ही कोणी अस्पृश्यच आहोत असे वागत होते आमच्यासोबत…

    इतकंच कशाला, मी ज्या शाखेत काम करतो तिथल्या काही ग्राहकांपर्यंतसुद्धा ही बातमी पोहोचली. तेव्हा काही ग्राहक तर माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करू लागले. एक-दोन ग्राहकांनी तर चक्क त्यांची खाती बंद करून शाखेतून काढता पाय घेतला. हे सर्व पाहून मन खूप व्यथित झालं. या लोकांमधले अर्धे-अधिक लोक मी राहतो त्याच परिसरातले असल्याने, मी अगदी लहान असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते काका, ती मावशी, ते दादा, लहानपणापासून इतके मोकळे वागले माझ्याशी, आणि आज ही अशी तिरस्काराने भरलेली वागणूक… आणि तीही माझीच नाही, तर सोसायटीतल्या कोणाचीच काहीच चूक नसताना… पण करावे काय… शेवटी, ‘आलिया भोगासि…“ असंच म्हणावं लागेल आता… कोरोनाने  नुसती मानवी शरीरंच नष्ट केली असं नाही, तर जिवंत व धडधाकट व्यक्तींची बुद्धीही भ्रष्ट केली हेच खरं…

    संकट काही थांबणार नाहीजगरहाटी चालू राही

    पहिला लॉकडाऊन, मग दुसरा, तिसरा, चौथा… गेले साडेपाच महिने हेच चक्र सुरूच राहिले. मला खात्री आहे, भाईंच्या  ‘असा मी आसा मी“ मधले भिकाजी कडमडेकर जोशी आज असते तर नक्कीच म्हणाले असते, ‘तूंस सांगतो मी बेमट्या…  हा कोरोना नावाचा विषाणू, सावकाराच्या व्याजासारखा आहे हो… व्याज जसें कर्ज घेणार्‍याची पाठ सोडीत नाही, तसेंच हा विषाणूदेखील आता आपल्याला चिकटला आहे हो… तेंव्हा, घाबरत बसण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यायची आणि कामाला लागायचे, कसें…

    Read more

    ऑगस्ट २०२१ – घरगुती औषधोपचार

    कोरोनाच्या काळात विविध औषधोपचारांचं पेवच फुटलं होतं. कोणीही काहीही घरगुती औषधं सांगितली की लोकं मागचा-पुढचा विचार न करता आपल्या प्रकृतीला तो उपाय चालेल की नाही याचाही विचार न करता करुन बघत होते. ज्याचे विपरित परिणामही अनेकांनी भोगले. त्याचसाठी आपल्या स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या कायम आपल्या घरात असणे आवश्यक आहे. कोरोना सारखी भीषण परिस्थिती भविष्यात कधीही न उद्‌भवो हे नक्की. तरीही इतर छोट्या-मोठ्या आजारांवर हे घरगुती उपचार नक्कीच परिणामकारक ठरतात.

    प्राचीन काळापासून आरोग्याची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. आयुर्वेदात आरोग्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपल्या स्वयंपाकघरातील मसाले, कडधान्ये, भाजीपाला, तसेच परिसरातील वनस्पती, फळे या सर्वांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. आरोग्याशी संबंधित छोट्या छोट्या विकारांवर आपल्या जवळच गुणकारी काही घरगुती औषधोपाचार :

     

    लिंबाचे औषधी गुणधर्म

    १)  एक कप पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे. बारा तासांत साधारणपणे पाच वेळा हे सेवन केल्यास अतिसार थांबेल व शरीरात थकवाही जाणवणार नाही.

    २)  सकाळी अनशापोटी मीठ घातलेले लिंबूपाणी प्यायल्यास मलावरोध दूर होतो.

    ३)  काळे मीठ, त्रिफळा, सुंठ, सोनामुखीची पाने हे चारही घटक घेऊन त्यात लिंबाचा रस घातल्यानंतर बारीक वाटून घ्यावेत. त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. सकाळ-संध्याकाळ दोन गोळ्या पाण्याबरोबर घेतल्यास पोटदुखी थांबते.

    ४)  अपचनाचा त्रास असेल तर लिंबाच्या फोडीवर थोडेसे काळे मीठ व हिंग घालावे व हे लिंबू थोड्या थोड्या वेळाने चाटावे.

    ५)  कारल्याची मुळी लिंबाच्या रसात एकत्र करून लावल्याने खरूज बरी होते.

    ६)  उन्हाळ्यात व पावसाळ्यात लिंबूपाणी सेवन करणार्‍या व्यक्तीला सहसा घामोळ्यांचा त्रास होत नाही.

     

    बहुगुणी आवळा

    १) रोज ताजा आवळा चावावा. दात किडणार नाहीत.

    २) आवळ्याची पाने वाटून त्याचा रस गाळून घ्यावा. हा रस एक ग्लास कोमट पाण्यात घालून एकत्र करावा. पाच मिनिटे या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा होऊन काहीही खाता-पिता येईल.

    ३) सर्दी–पडसे झाले असेल, तर आवळ्याचे चूर्ण मधात कालवून घ्यावे. उन्हाळ्यातील पडसे असेल, तर आवळ्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे.

    ४) डोकेदुखी, डोळ्यांतील जळजळ तसेच मानसिक थकवा असल्यास आवळ्याच्या तेलाने मालीश करणे गुणकारी ठरते.

    ५) कफयुक्त खोकला असेल, तर फक्त आवळ्याच्या रसाने सेवन करावे. कच्चा आवळा चावून खाल्ल्यानंतरही कफ बाहेर पडतो.

    ६) आवळ्याच्या रसात पिंपळीचे चूर्ण व मध मिसळून सेवन केल्यास उचकी थांबेल.

    ७) डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर आवळ्याचा मुरांबा सेवन करावा. त्यामुळे मलावरोधही नाहीसा होतो. स्नायुमध्ये आलेला अशक्तपणा कमी होतो.

    ८) अतिसार होत असल्यास वाळलेला आवळा १० ग्रॅम व हिरडा १० ग्रॅम घेऊन दोन्हीला एकत्र करून बारीक वाटावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा पाण्यासोबत सेवन करावे.

    ९) कच्च्या आवळ्याच्या सेवनाने पोटाचे अनेक विकार बरे होतात. तसेच आवळ्यामुळे पोटातील कृमी-जंतू नाहीसे होतात.

    १०) लिंबू पाण्यात पिळून त्यात वाटलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकावे. या पाण्याने रोज केस धुवावेत. केस काळे होण्याबरोबरच रेशमी मुलायम होतात.

     

    तुळशीचे औषधी उपचार

    १)  सर्दी – ताप असेल, तर तुळस व काळ्या मिरीचे चूर्ण २५० ग्रॅम पाण्यात उकळून पाजल्यास लगेच आराम मिळतो.

    २)  १० ग्रॅम तुळशीचा रस, २० ग्रॅम मध व ५ ग्रॅम आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास खोकला, ताप बरा होईल, तसेच २ ग्रॅम तुळशीची पाने, २ ग्रॅम जिरे बारीक वाटून ५० ग्रॅम पाण्यात मिसळून प्यायल्याने देखील खोकला-ताप बरा होईल.

    ३)  मलेरिया झालेल्या रूग्णाला तुळशीचा १० ग्रॅम रस आणि काळीमिरी चूर्ण १ ग्रॅम पाण्यात मिसळून दिवसातून ५-६ वेळा २ तासांच्या अंतराने पाजावे. यामुळे आराम मिळेल.

    ४)  तुळशीची पाने पाण्यात उकळवून  प्यायल्याने कफ, सर्दी, थकवा, ताप, डोकेदुखी त्रास होणार नाहीत.

    ५)  दमा असेल तर काळ्या तुळशीच्या रसात मध घालून सेवन करावे.

    ६)  तुळशीची पाने व आले यांचा रस काढून कोमट करावा आणि २ तासांच्या अंतराने प्यावा. यामुळे पोटदुखी कमी होते.

    ७)  तुळशीच्या पानांचे चूर्ण साखरेसोबत सेवन केल्यास संग्रहणी ठीक होईल.

    ८)  अर्धा चमचा तुळशीच्या बियांचे चूर्ण दुधासह सेवन केल्याने जुलाब लगेच थांबतील.

    ९)  एक चमचा तुळशीचा रस घेतल्याने उलट्या बंद होतात. तसेच हा रस मधासह चाटल्यानेही उलट्या थांबतात.

    १०)   तुळशीचा व लिंबाचा रस समप्रमाणात घेतल्यास डाकेदुखी थांबते. तसेच तुळशीच्या पानांचे चूर्ण मधासह घेतल्यानेही डोकेदुखी थांबते.

    Read more

    जुलै २०२१ – आणि करोना झाला….

    जयश्री देसाई

    ज्या काळात करोनाबद्दल सगळ्यांच्याच मनात भीती बसली होती; ज्या काळात या रोगाबद्दलच्या अफवांचं पीक आलं होतं; नेमकं त्याच काळात मी व माझे पती सुधीर… दोघांनाही एकदमच करोना झाला होता. आम्ही यातून सुखरुप बाहेर पडलो. मात्र या काळात आलेले काही बरे- वाईट अनुभव खूप समृद्ध करून गेले. या रोगाबद्दल माध्यमांतून जनजागृती सुरु असून सुद्धा या बाबत गैरसमजच जास्त होते. म्हणून त्या काळातले अनुभव लिहून ठेवावेसे वाटले.

    १७ जून रोजी मला अचानक दिवसभर खूप ढेकर आले. रात्री मला व माझे पती सुधीर या दोघांनाही अचानक सर्दीचा अटॅक आल्यासारखे झाले. सुधीरची सर्दी खोकल्यात परिवर्तित झाली होती तर मला गुरुवारी दुपारी अचानक २ पर्यंत ताप चढला. मी लॉक डाऊन सुरु झाल्यापासून घराबाहेरच पडलेली नसल्याने करोनाची शंका सुद्धा माझ्या मनात आली नाही. सुधीरही बँक वा तत्सम कार्यालयांतच…आणि तोही क्वचितच जात होता. एकदाच फक्त तो मोठ्या मार्केटला गेला होता. त्यामुळे त्यालाही हा खोकला हवा बदलामुळे आला असावा असेच वाटले. त्यात आम्ही घरात व बाहेर सगळ्या दक्षता पाळत होतो. त्यामुळे करोनाच्या शक्यतेवर आम्ही फुलीच मारली होती. आमचा मुलगा आदित्य मात्र कोणतीही ‘रिस्क“ घ्यायला तयार नव्हता.

    आमच्या घराशेजारीच प्रख्यात हार्ट सर्जन डॉ. अनिल तांबे यांचे हॉस्पिटल आहे.  तो मला तिथे घेऊन गेला. डॉक्टरांनी ७ दिवसांचा कोर्स दिला व त्याने जर बरे वाटले नाही तर करोनाची टेस्ट करावी लागेल असे सांगितले आणि करोनाची टांगती तलवार माझ्या मानेवर लटकायला लागली.

    सुधीरचा सगळा भर कमीत कमी औषधे घेणे यावर असतो. शरीरात नैसर्गिकरित्या बरे होण्याची शक्ती असते यावर त्याचा दृढ विश्वास. त्यामुळे त्याने ४ दिवस अंगावर काढले. मात्र प्रचंड व सततच्या खोकल्याने त्याची होणारी अवस्था बघवत नव्हती. अखेर त्यालाही डॉक्टरकडे जाण्यास आम्ही भाग पाडले. त्या अनुभवावरुन एक नक्की की करोनाची भीती असो वा नसो, वयोमानानुसार आपल्या आजाराचा विचार करावा. साठीच्या पुढे आणि वयवर्ष पंधराच्या आत साधा सर्दी – खोकला झाला तरी घरगुती उपचार करत वेळ न काढता डॉक्टरांकडे जाणे हे उचित. आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल, आणि आपण तातडीने डॉक्टरकडे गेलो तर करोना आपले काही वाकडे करु शकत नाही हा अनुभव त्या काळात करोनाची शिकार झालेल्या अनेकांनी घेतला असेल.

    त्यावेळी तर करोनाचे काळेकुट्ट ढग चांगलेच दाटून आलेले होते. सुधीरला डॉक्टरांनी औषध तर दिले. पण त्याला बरे वाटेना. शेवटी २७ तारखेला त्यांनी त्याचे औषध बदलून दिले पण तातडीने करोनाची टेस्ट करायला सांगितली. ठाण्यात कॅडबरी जंक्शनच्या फ्लाय ओव्हरच्या खाली असलेल्या तपासणी केंद्रावर जाऊन त्याने शनिवारी २७ जूनला टेस्ट केली. सोमवारी दुपारी महापालिकेतून फोन आला की सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.  मात्र ठाणे महापालिकेचे खरोखर कौतुक करायला हवे इतका चांगला अनुभव आम्हाला आला. घरातच क्वारंटाइन होण्यासारखी स्थिती आहे की नाही ते त्यांनी आदित्यला विचारले. ती स्थिती आहे हे समजल्यावर घरातच क्वारंटाइन करताना काय काय खबरदारी घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी आमच्या आदित्यला केले व तेवढ्यावरच न थांबता सुधीरला महापालिकेने घरपोच एक कफ सिरप दिला तर आदित्यला करोना होऊ नये म्हणून सहा टॅबलेट्‌स दिल्या!

    मी तोवर बरी झाले होते. फक्त थोडी सर्दी होती. मात्र सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर सोमवारीच मी जाऊन टेस्ट करून आले. माझ्याही टेस्टचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटीव्ह आला आणि मी दुसर्‍या बेडरुममध्ये क्वारंटाइन झाले. मला काहीच लक्षणे नसल्याने पालिकेतर्फे मला फक्त बिकॉस्युल झेड आणि सी व्हिटामिन च्या गोळ्या खाण्यास सांगण्यात आले .

    पालिका तेवढेच करून थांबली नाही त्यांनी सोसायटीच्या दारावर येथे करोना पेशंट आढळल्याचे नमूद करणारा फ्लेक्स तर लावलाच. पण पूर्ण सोसायटीत निर्जंतुकीकरण केले. सोसायटीला एक सॅनीटायझर पंप भेट दिला आणि तेवढ्यावरच न थांबता वारंवार आम्हाला काही हवे आहे का याची चौकशी केली. अगदी ‘मेडिकल वेस्ट“ची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावली जाते आहे की नाही याचीही चौकशी केली. आमच्याकडे ‘मेडिकल वेस्ट“ तयारच होत नाहीय असे आदित्यने सांगितल्यावर सुद्धा त्यांनी त्यासाठी एक पिवळ्या रंगाची कचर्‍याची पिशवी देण्याची तयारी दर्शवली. मात्र तेवढ्यात ठाण्यात पूर्ण लॉक डाऊन जारी झाला आणि ते राहिले. त्याची आम्हाला तशीही गरज नव्हतीच.

    पोलिसांचेही फोन आले. त्यांनीही चौकशी केली आणि आमच्याकडे करोना रुग्ण आढळल्याने सोसायटीत कुणी त्रास दिला तर त्याची तक्रार करण्याचेही त्यांनी सांगितले.   आम्ही जरी पोलिसांत तक्रार केली नाही तरी आमच्या सोसायटीत काही जणांकडून आम्हाला वाळीत टाकण्यासारखे अनुभव आले. आमच्याकडचा कचरा न उचलणे, आम्ही जेवणाचा डबा लावला, पण त्याला आत न येऊ देणे असे काही प्रकार घडले.

    हा विषाणू फक्त आणि फक्त डोळे, नाक व तोंडातून आत जाऊ शकतो. त्यामुळे कचरा न उचलणे, डबेवाल्याला आत न येऊ देणे वा काही सोसायट्यांमध्ये करोनामुक्त झालेल्या  सभासदांनाही लिफ्ट वापरु न देणे वा त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण करू न देणे… सुरवातीला अज्ञानातून हे प्रकार सर्वत्र, सर्रास घडत  होते जे सरत्या काळानुसार कमी होत गेले.

    यथाअवकाश आम्ही करोना मुक्त होऊन आमचं सामान्य जीवन जगू लागलो. आज तर त्या रोगाच्या फक्त आठवणी मनात उरल्या आहेत. पण त्या काळानं आम्हांला काही चांगले अनुभवही दिले.  अतिशय सुखद अनुभव आम्हाला दिला तो आमच्या लेकानं… आदित्यने! तो या सगळ्या काळात आमची आई झाला होता. त्याने खूप केलं….आम्ही  लवकर बरे झालो याचं श्रेय त्यालाही तितकंच जातं. आपण केलेले संस्कार आणि आपली आपल्या घरच्यांशी, नातलगांशी असणारी वागणूक मुलांच्या मनावर परिणाम करत असते, ज्याचा अनुभव, वेळ आली की येतो, हे ही आदित्यच्या वागणुकीवरुन पुन्हा मनावर ठसलं. काळ्याकुट्ट अनुभवालाही रुपेरी किनार असतेच! फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्यालाच विकसित करावी लागते!

    Read more

    जून २०२१ – ..इन टाईम ऑफ कोव्हीड

    ‘इतक्या रात्रीचं कोण बेल वाजवतय?“ कौसल्याबाईंनी चष्मा लावून, मोबाईलमध्ये घड्याळ बघितलं, ‘साडे अकरा वाजलेत… आत्ता कोण आलं असेल? या सध्याच्या दिवसात, दिवसाउजेडी कोणी येत नाही तर रात्री कोण येणार?“ सेफ्टीचेन लावून त्यांनी आतला दरवाजा उघडला तर दारात वॉचमन…..
    ‘का रे सुधाकर इतक्या रात्रीचा?“ दरवाजा पूर्ण उघडत त्यांनी विचारलं,

    ‘काकू, समोरच्या साहेबांना बरं वाटत नाहीये. थंडी भरून आलेय म्हणतायत. काही औषध आहे? मला काहीच कळत नाहीये. तुम्हांला चालेल का त्यांच्याकडे यायला?“

    ‘मी येऊ म्हणतोस? आणि असला तसला ताप असला म्हणजे?“

    ‘ते ही आहेच. मग काय करायचं?“

    ‘बरं चल बघूया.“  गेले जवळपास पाच/सात वर्ष तो माणूस त्यांच्या समोर राहत होता. पण त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. जवळ जाऊन अंगाला हात लावून बघावं का नाही या विचारानं त्यांची पावलं अडखळली. दोन क्षण विचार करून त्यांनी मोबाईलवर फोन लावला, ‘हॅलो नित्या,
    सॉरी ग इतक्या रात्री फोन केला… माझ्या शेजारी एक गृहस्थ राहतात त्यांना ताप आहे….तो या करोनाचा ताप आहे किंवा नाही हे कसं समजायच?….. हो खरं आहे मलाही संसर्गाची भीती आहे…पण मी शक्य ती काळजी घेते ना….अग असं कसं सोडणार त्यांना?…नाही ना; डॉक्टरपण नाही यायला तयार कोणी…. हो आहे क्रोसीन…देते…  थँक यू ग….हो, गूड नाईट.“

    ‘ काय झालं काकू?“

    ‘अरे डॉक्टर म्हणतेय ते करोनाबिरोना असंच कळत नाही तपासणी शिवाय. पण कदाचित्‌  उन्हाळ्याचा ताप असेल…आपल्यालाही सगळी काळजी घ्यायला सांगितलंय. बाकी काय होईल ते बघू.“

    ‘ आता काय करायचं काकू?“ ‘तू थांब इथेच मी आले.“ घरी जाऊन त्या थंड पाणी आणि रुमाल घेऊन आल्या, ‘आत्ता त्यांच्या कपाळावर पट्‌ट्या“ ठेऊ. सकाळी बघू काय करायचं ते.“

    कौसल्याबाई रात्रभर त्यांच्यापाशी बसून होत्या…..पहाटे त्यांचा ताप पूर्ण उतरला.

    ‘तब्बेत बरी दिसतेय. हे घ्या.“ विनायकरावांनी दार उघडताच हातातली डीश पुढे करत कौसल्याबाई म्हणाल्या, ‘खाणं झाल्यावर, हे औषध घ्या.“

    त्या दारातून मागे फिरतच होत्या इतक्यात विनायकराव म्हणाले, ‘उगाच तुम्हांला रोजच्या रोज त्रास. उद्यापासून सुधाकर ब्रेड, अंडी काहीतरी घेऊन येईल. तुम्ही नका त्रास घेऊ.“

    ‘त्रास कसला हो?“ त्या आत येत म्हणाल्या, ‘ माझ्या एकटीसाठी करतेच ना त्यातच तुमच्यासाठी. तुमच्या घरातले असते तर केलंच असतं ना तुमचं.“

    ‘घरातले असते तर ना?“

    ‘म्हणजे…. “

    ‘आई वडील लहानपणीच गेले.  घरात शिस्त लावायला, आयुष्याला वळण द्यायला कोणी नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलं, मग योग्य वयात नोकरी व्यवसाय नाही. वडिलांच्या घरात राहणार्‍या भावाबरोबर राहत असे. दोन वेळेचं जेवायला आणि गरजेपुरते कपडे मिळत. दिवसभर उनाडक्या करत फिरत असे. एकदा एका मित्राच्या आईने त्यांच्या घरच्या व्यवसायात मदतीसाठी बोलावलं. तेव्हा मला समजलं मलाही बुद्धी आहे. ठरवलं तर मी ही काही करू शकतो. आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला. मग हे घर घेतलं. एकटाच जीव, भविष्यात पुरतील इतक्या पैशाची सोय केली आणि काम बंद करून इथे राहायला आलो. आता तर हे असे दिवस. हे असं बंदिस्त राहाणं, दुसर्‍यावर अवलंबून राहाणं, नको वाटतं हे सगळं. आपण कोणाच्या उपयोगी पडत नाही तर इतरांना निदान आपला त्रास तरी होऊ नये.“ विनायकराव अगदी हताश, उदास होऊन बोलत होते…..

    ‘उठा…“ कौसल्याबाई उठून उभ्या राहात म्हणाल्या. विनायकराव गोंधळून उभे राहिले…. ‘या माझ्याबरोबर बाहेर….“ म्हणत त्या त्यांना बाल्कनीत घेऊन गेल्या….. ‘बाहेर नजर फिरवा जरा. एकटे कुठे आहात तुम्ही….बघा बरं बाहेर. अहो हा आजार चार दिवसांसाठी आहे. आज ना उद्या यातून मार्ग निघेलच. पण हा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असा होऊ शकतो की. कामाच्या धकाधकीत, झाडं, पानांचा बदलता रंग, रंगबिरंगी पक्षी…. हे सगळं किती आनंद देऊन जातं हे माहिती तरी होतं का? स्वतःशीच कुढत बसण्यापेक्षा हा आनंद अनुभवा. मनात जपून ठेवा. म्हणजे कधी उदास, एकटं वाटेल ना तेव्हा मनाच्या कुपीतून या आठवणींचा दरवळ मनभर पसरवायचा. बघा मनाबरोबर शरीरही कसं ताजतवानं होईल.“

    ‘ आता या एकटेपणावर एक उतारा मिळालाय,“ समोर फुलत्या गुलमोहराकडे एकटक बघत ते म्हणाले, ‘रोज गुलमोहोराच्या किती कळ्या उमलल्या ते बघायचं.“

    ‘एकट्यानं कशाला? दोघं मिळून बघू.“ कौसल्याबाईंच्या बोलण्यावर त्यांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं…. ‘खरंच म्हणतेय. एकटेपणा मलाही खायला उठतोच की. नवरा गेला, मुलगी आपल्या घरी आहे ती ही परदेशी…. कौसल्याबाईंनी हात पुढे केला…..

    त्या पुढे केलेल्या हाताकडे ते गोंधळून बघत राहिले….तशी कौसल्याबाईच म्हणाल्या, ‘जास्त विचार नका करू. नवीन नातं आलंय तुमच्या आयुष्यात तर स्वीकारा. या बंदिस्त काळाची भेट समजा… खात्री बाळगा  हे आपलं मैत्रीचं नातं नक्कीच खूप सुंदर असेल, शाश्वत प्रेमाचा अनुभव देणारं….मैत्रीचं प्रेम म्हणा किंवा प्रेमाची मैत्री म्हणा.“

    कौसल्यार्बाइंच्या डोळ्यात बघत विनायकरावांनी त्यांच्या पुढे केलेल्या हातावर आपला हात ठेवला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरही छान, मोकळं हसू फुललं होतं, अगदी बाहेर सूर्यास्त होतांना गुलाबी, निरभ्र झालेल्या आकाशासारखं.

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter