कोरोनाच्या काळात विविध औषधोपचारांचं पेवच फुटलं होतं. कोणीही काहीही घरगुती औषधं सांगितली की लोकं मागचा-पुढचा विचार न करता आपल्या प्रकृतीला तो उपाय चालेल की नाही याचाही विचार न करता करुन बघत होते. ज्याचे विपरित परिणामही अनेकांनी भोगले. त्याचसाठी आपल्या स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या कायम आपल्या घरात असणे आवश्यक आहे. कोरोना सारखी भीषण परिस्थिती भविष्यात कधीही न उद्‌भवो हे नक्की. तरीही इतर छोट्या-मोठ्या आजारांवर हे घरगुती उपचार नक्कीच परिणामकारक ठरतात.

प्राचीन काळापासून आरोग्याची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. आयुर्वेदात आरोग्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपल्या स्वयंपाकघरातील मसाले, कडधान्ये, भाजीपाला, तसेच परिसरातील वनस्पती, फळे या सर्वांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. आरोग्याशी संबंधित छोट्या छोट्या विकारांवर आपल्या जवळच गुणकारी काही घरगुती औषधोपाचार :

 

लिंबाचे औषधी गुणधर्म

१)  एक कप पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे. बारा तासांत साधारणपणे पाच वेळा हे सेवन केल्यास अतिसार थांबेल व शरीरात थकवाही जाणवणार नाही.

२)  सकाळी अनशापोटी मीठ घातलेले लिंबूपाणी प्यायल्यास मलावरोध दूर होतो.

३)  काळे मीठ, त्रिफळा, सुंठ, सोनामुखीची पाने हे चारही घटक घेऊन त्यात लिंबाचा रस घातल्यानंतर बारीक वाटून घ्यावेत. त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. सकाळ-संध्याकाळ दोन गोळ्या पाण्याबरोबर घेतल्यास पोटदुखी थांबते.

४)  अपचनाचा त्रास असेल तर लिंबाच्या फोडीवर थोडेसे काळे मीठ व हिंग घालावे व हे लिंबू थोड्या थोड्या वेळाने चाटावे.

५)  कारल्याची मुळी लिंबाच्या रसात एकत्र करून लावल्याने खरूज बरी होते.

६)  उन्हाळ्यात व पावसाळ्यात लिंबूपाणी सेवन करणार्‍या व्यक्तीला सहसा घामोळ्यांचा त्रास होत नाही.

 

बहुगुणी आवळा

१) रोज ताजा आवळा चावावा. दात किडणार नाहीत.

२) आवळ्याची पाने वाटून त्याचा रस गाळून घ्यावा. हा रस एक ग्लास कोमट पाण्यात घालून एकत्र करावा. पाच मिनिटे या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा होऊन काहीही खाता-पिता येईल.

३) सर्दी–पडसे झाले असेल, तर आवळ्याचे चूर्ण मधात कालवून घ्यावे. उन्हाळ्यातील पडसे असेल, तर आवळ्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे.

४) डोकेदुखी, डोळ्यांतील जळजळ तसेच मानसिक थकवा असल्यास आवळ्याच्या तेलाने मालीश करणे गुणकारी ठरते.

५) कफयुक्त खोकला असेल, तर फक्त आवळ्याच्या रसाने सेवन करावे. कच्चा आवळा चावून खाल्ल्यानंतरही कफ बाहेर पडतो.

६) आवळ्याच्या रसात पिंपळीचे चूर्ण व मध मिसळून सेवन केल्यास उचकी थांबेल.

७) डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर आवळ्याचा मुरांबा सेवन करावा. त्यामुळे मलावरोधही नाहीसा होतो. स्नायुमध्ये आलेला अशक्तपणा कमी होतो.

८) अतिसार होत असल्यास वाळलेला आवळा १० ग्रॅम व हिरडा १० ग्रॅम घेऊन दोन्हीला एकत्र करून बारीक वाटावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा पाण्यासोबत सेवन करावे.

९) कच्च्या आवळ्याच्या सेवनाने पोटाचे अनेक विकार बरे होतात. तसेच आवळ्यामुळे पोटातील कृमी-जंतू नाहीसे होतात.

१०) लिंबू पाण्यात पिळून त्यात वाटलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकावे. या पाण्याने रोज केस धुवावेत. केस काळे होण्याबरोबरच रेशमी मुलायम होतात.

 

तुळशीचे औषधी उपचार

१)  सर्दी – ताप असेल, तर तुळस व काळ्या मिरीचे चूर्ण २५० ग्रॅम पाण्यात उकळून पाजल्यास लगेच आराम मिळतो.

२)  १० ग्रॅम तुळशीचा रस, २० ग्रॅम मध व ५ ग्रॅम आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास खोकला, ताप बरा होईल, तसेच २ ग्रॅम तुळशीची पाने, २ ग्रॅम जिरे बारीक वाटून ५० ग्रॅम पाण्यात मिसळून प्यायल्याने देखील खोकला-ताप बरा होईल.

३)  मलेरिया झालेल्या रूग्णाला तुळशीचा १० ग्रॅम रस आणि काळीमिरी चूर्ण १ ग्रॅम पाण्यात मिसळून दिवसातून ५-६ वेळा २ तासांच्या अंतराने पाजावे. यामुळे आराम मिळेल.

४)  तुळशीची पाने पाण्यात उकळवून  प्यायल्याने कफ, सर्दी, थकवा, ताप, डोकेदुखी त्रास होणार नाहीत.

५)  दमा असेल तर काळ्या तुळशीच्या रसात मध घालून सेवन करावे.

६)  तुळशीची पाने व आले यांचा रस काढून कोमट करावा आणि २ तासांच्या अंतराने प्यावा. यामुळे पोटदुखी कमी होते.

७)  तुळशीच्या पानांचे चूर्ण साखरेसोबत सेवन केल्यास संग्रहणी ठीक होईल.

८)  अर्धा चमचा तुळशीच्या बियांचे चूर्ण दुधासह सेवन केल्याने जुलाब लगेच थांबतील.

९)  एक चमचा तुळशीचा रस घेतल्याने उलट्या बंद होतात. तसेच हा रस मधासह चाटल्यानेही उलट्या थांबतात.

१०)   तुळशीचा व लिंबाचा रस समप्रमाणात घेतल्यास डाकेदुखी थांबते. तसेच तुळशीच्या पानांचे चूर्ण मधासह घेतल्यानेही डोकेदुखी थांबते.