‘इतक्या रात्रीचं कोण बेल वाजवतय?“ कौसल्याबाईंनी चष्मा लावून, मोबाईलमध्ये घड्याळ बघितलं, ‘साडे अकरा वाजलेत… आत्ता कोण आलं असेल? या सध्याच्या दिवसात, दिवसाउजेडी कोणी येत नाही तर रात्री कोण येणार?“ सेफ्टीचेन लावून त्यांनी आतला दरवाजा उघडला तर दारात वॉचमन…..
‘का रे सुधाकर इतक्या रात्रीचा?“ दरवाजा पूर्ण उघडत त्यांनी विचारलं,

‘काकू, समोरच्या साहेबांना बरं वाटत नाहीये. थंडी भरून आलेय म्हणतायत. काही औषध आहे? मला काहीच कळत नाहीये. तुम्हांला चालेल का त्यांच्याकडे यायला?“

‘मी येऊ म्हणतोस? आणि असला तसला ताप असला म्हणजे?“

‘ते ही आहेच. मग काय करायचं?“

‘बरं चल बघूया.“  गेले जवळपास पाच/सात वर्ष तो माणूस त्यांच्या समोर राहत होता. पण त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. जवळ जाऊन अंगाला हात लावून बघावं का नाही या विचारानं त्यांची पावलं अडखळली. दोन क्षण विचार करून त्यांनी मोबाईलवर फोन लावला, ‘हॅलो नित्या,
सॉरी ग इतक्या रात्री फोन केला… माझ्या शेजारी एक गृहस्थ राहतात त्यांना ताप आहे….तो या करोनाचा ताप आहे किंवा नाही हे कसं समजायच?….. हो खरं आहे मलाही संसर्गाची भीती आहे…पण मी शक्य ती काळजी घेते ना….अग असं कसं सोडणार त्यांना?…नाही ना; डॉक्टरपण नाही यायला तयार कोणी…. हो आहे क्रोसीन…देते…  थँक यू ग….हो, गूड नाईट.“

‘ काय झालं काकू?“

‘अरे डॉक्टर म्हणतेय ते करोनाबिरोना असंच कळत नाही तपासणी शिवाय. पण कदाचित्‌  उन्हाळ्याचा ताप असेल…आपल्यालाही सगळी काळजी घ्यायला सांगितलंय. बाकी काय होईल ते बघू.“

‘ आता काय करायचं काकू?“ ‘तू थांब इथेच मी आले.“ घरी जाऊन त्या थंड पाणी आणि रुमाल घेऊन आल्या, ‘आत्ता त्यांच्या कपाळावर पट्‌ट्या“ ठेऊ. सकाळी बघू काय करायचं ते.“

कौसल्याबाई रात्रभर त्यांच्यापाशी बसून होत्या…..पहाटे त्यांचा ताप पूर्ण उतरला.

‘तब्बेत बरी दिसतेय. हे घ्या.“ विनायकरावांनी दार उघडताच हातातली डीश पुढे करत कौसल्याबाई म्हणाल्या, ‘खाणं झाल्यावर, हे औषध घ्या.“

त्या दारातून मागे फिरतच होत्या इतक्यात विनायकराव म्हणाले, ‘उगाच तुम्हांला रोजच्या रोज त्रास. उद्यापासून सुधाकर ब्रेड, अंडी काहीतरी घेऊन येईल. तुम्ही नका त्रास घेऊ.“

‘त्रास कसला हो?“ त्या आत येत म्हणाल्या, ‘ माझ्या एकटीसाठी करतेच ना त्यातच तुमच्यासाठी. तुमच्या घरातले असते तर केलंच असतं ना तुमचं.“

‘घरातले असते तर ना?“

‘म्हणजे…. “

‘आई वडील लहानपणीच गेले.  घरात शिस्त लावायला, आयुष्याला वळण द्यायला कोणी नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलं, मग योग्य वयात नोकरी व्यवसाय नाही. वडिलांच्या घरात राहणार्‍या भावाबरोबर राहत असे. दोन वेळेचं जेवायला आणि गरजेपुरते कपडे मिळत. दिवसभर उनाडक्या करत फिरत असे. एकदा एका मित्राच्या आईने त्यांच्या घरच्या व्यवसायात मदतीसाठी बोलावलं. तेव्हा मला समजलं मलाही बुद्धी आहे. ठरवलं तर मी ही काही करू शकतो. आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला. मग हे घर घेतलं. एकटाच जीव, भविष्यात पुरतील इतक्या पैशाची सोय केली आणि काम बंद करून इथे राहायला आलो. आता तर हे असे दिवस. हे असं बंदिस्त राहाणं, दुसर्‍यावर अवलंबून राहाणं, नको वाटतं हे सगळं. आपण कोणाच्या उपयोगी पडत नाही तर इतरांना निदान आपला त्रास तरी होऊ नये.“ विनायकराव अगदी हताश, उदास होऊन बोलत होते…..

‘उठा…“ कौसल्याबाई उठून उभ्या राहात म्हणाल्या. विनायकराव गोंधळून उभे राहिले…. ‘या माझ्याबरोबर बाहेर….“ म्हणत त्या त्यांना बाल्कनीत घेऊन गेल्या….. ‘बाहेर नजर फिरवा जरा. एकटे कुठे आहात तुम्ही….बघा बरं बाहेर. अहो हा आजार चार दिवसांसाठी आहे. आज ना उद्या यातून मार्ग निघेलच. पण हा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असा होऊ शकतो की. कामाच्या धकाधकीत, झाडं, पानांचा बदलता रंग, रंगबिरंगी पक्षी…. हे सगळं किती आनंद देऊन जातं हे माहिती तरी होतं का? स्वतःशीच कुढत बसण्यापेक्षा हा आनंद अनुभवा. मनात जपून ठेवा. म्हणजे कधी उदास, एकटं वाटेल ना तेव्हा मनाच्या कुपीतून या आठवणींचा दरवळ मनभर पसरवायचा. बघा मनाबरोबर शरीरही कसं ताजतवानं होईल.“

‘ आता या एकटेपणावर एक उतारा मिळालाय,“ समोर फुलत्या गुलमोहराकडे एकटक बघत ते म्हणाले, ‘रोज गुलमोहोराच्या किती कळ्या उमलल्या ते बघायचं.“

‘एकट्यानं कशाला? दोघं मिळून बघू.“ कौसल्याबाईंच्या बोलण्यावर त्यांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं…. ‘खरंच म्हणतेय. एकटेपणा मलाही खायला उठतोच की. नवरा गेला, मुलगी आपल्या घरी आहे ती ही परदेशी…. कौसल्याबाईंनी हात पुढे केला…..

त्या पुढे केलेल्या हाताकडे ते गोंधळून बघत राहिले….तशी कौसल्याबाईच म्हणाल्या, ‘जास्त विचार नका करू. नवीन नातं आलंय तुमच्या आयुष्यात तर स्वीकारा. या बंदिस्त काळाची भेट समजा… खात्री बाळगा  हे आपलं मैत्रीचं नातं नक्कीच खूप सुंदर असेल, शाश्वत प्रेमाचा अनुभव देणारं….मैत्रीचं प्रेम म्हणा किंवा प्रेमाची मैत्री म्हणा.“

कौसल्यार्बाइंच्या डोळ्यात बघत विनायकरावांनी त्यांच्या पुढे केलेल्या हातावर आपला हात ठेवला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरही छान, मोकळं हसू फुललं होतं, अगदी बाहेर सूर्यास्त होतांना गुलाबी, निरभ्र झालेल्या आकाशासारखं.