चुर्मा लाडू
साहित्य आणि कृती: बारीक रवा, चवीला मीठ व तुपाचे मोहन घालून एकत्र करावा. दुधाचे किंवा पाण्याने भिजवून मुठे (छोटे – छोटे गोळे) करून तुपात तळून घेऊन मिक्सरमधून जाडसर काढून ते चाळून रव्याच्या अर्धा पटीने बारीक दळलेली साखर, थोडेसे साजूक तूप, वेलची, जायफळ पूड घालून घट्ट लाडू वळावेत.
केळवरी
साहित्य आणि कृती: पिकलेली परंतु कडक राजेळी केळी, सालासकट उकडून साले काढून स्मॅश करणे. ओल्या खोबर्याचा गूळ किंवा साखर व वेलची पूड घालून चव करणे. केळ्यांच्या मिश्रणात चवीला मीठ, मोहनाला अर्धा चमचा तूप घालून लहान गोळी घेऊन मोदकाप्रमाणे पातळ पारी करून त्यात चव भरून बंद करून चपटे थोडे दाबावे व
(शॅलोफ्रॉय) थोडे थोडे तेल सोडून पॅटीस प्रमाणे तळावे.
ढेबरे
साहित्य आणि कृती: प्रथम केळं व गूळ एकत्र घेऊन ते एकजीव करून त्यात गव्हाचे व तांदळाचे पीठ घालून तव्यावर तूप सोडून वरील मिश्रण थालीपीठाप्रमाणे थापून झाकणी ठेवून मंदाग्नीवर भाजणे.
तिलोरी
साहित्य आणि कृती: पाव किलो मैदा, २०० ग्रॅम पिठी साखर, २ मोठे चमचे तूप गरम करून मोहनासाठी घालावे, तीळ घालावे. पीठ मळल्यावर लगेच जाडसर चपाती लाटून लहान वाटीने तिलोर्या पाडून मंदाग्नीवर तळाव्यात.
नारळाचे पाकाशिवाय लाडू
साहित्य आणि कृती: २ वाटी बारीक रवा, पाऊण वाटी तूप, खवलेला नारळ १ वाटी, २ वाट्या पिठीसाखर, रवा तुपात भाजून घ्यावा. नारळ नुसतेच मंदाग्नीवर परतावे. त्यातील पाण्याचा अंश भाजल्याने कमी होईल. रवा, नारळ, साखर, वेलची, मनुका सर्व एकत्र करून त्याचे लाडू वळावे. (लाडू वळले गेले नाही तर त्यात दुधाचा हबका मारावा) हे लाडू चार दिवस टिकतात.
चनपापडी
साहित्य आणि कृती: १ वाटी चण्याचे पीठ, १ चमचा भरून कार्नफ्लावर, १ पळी तेल, मीठ, किंचित हळद वरील सर्व पिठात १ पळी तेल गरम करून घालून पीठ घट्ट मळावे. अर्ध्या तासानंतर चांगले मळून घेऊन चपाती एवढी गोळी घेऊन साधारण मध्यम जाडीची चपाती लाटावी. लहान वाटीने चनपापड्या दाबून पाडाव्या व तेलात तळाव्या. फुगल्या तरी कडक राहतात.
कांदा – बटाटा रस्सा भाजी
साहित्य आणि कृती: प्रथम तेलावर आलं – लसूण पेस्ट घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून लालसर झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, पाचकळशी मसाला व मीठ घालून परतावे. नंतर बटाट्याची फोडी घालून परतून घेणे. नंतर त्यात पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्यात १ टीस्पून गरम मसाला घालून उकळी येऊ द्यावी. कांदा – बटाटा रस्सा भाजी तयार.
गव्हाची स्वीट कचोरी
साहित्य : १ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी मावा, अर्धी वाटी पिठी साखर, १ वाटी साखर, १ वाटी फ्रेश क्रीम, किसलेले मिक्स ड्रायफ्रूट्स, मीठ
कृती : प्रथम कढईत साखर आणि पाणी घेऊन पाक बनवून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून घ्या. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, फ्रेश क्रीम आणि गरम तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये मावा, पिठीसाखर, मिक्स ड्रायफ्रूट आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. मळलेल्या पिठाची पारी करून तयार मिश्रण भरून त्याचे गोळे करून घ्या. नंतर तयार गोळे गरम तेलात तळून साखरेच्या पाकात घोळवून घ्या. तयार कचोरी प्लेटमध्ये काढून काजू आणि बदामाने गार्निश करून सर्व्ह करा.
नारळाच्या दुधातील गव्हाची खीर
साहित्य : (ह्यात शक्यतो खपली गव्हाचा जाडसर रवा वापरतात) गव्हाचा जाड रवा १ वाटी, एका नारळाचे दूध, साखर-२ लहान चमचे, गूळ अर्धी वाटी, जायफळ पावडर अर्धा लहान चमचा
कृती: कढईमध्ये गव्हाचा रवा थोडा गरम करून घेणे. रवा त्यात बुडेल इतपत गरम पाणी घालून १० मिनिटे ठेवणे. नंतर कुकरमध्ये शिजवून घेणे. शिजलेला रवा घट्ट झाल्यास मोडून घेणे. त्यात नारळाचे पातळ दूध घालून गॅसवर उकळायला ठेवणे. नारळाचे दूध चटकन फाटते त्यामुळे सतत पदार्थ घोटणे गरजेचे आहे. सात/आठ मिनिटे उकळल्यावर त्यात नारळाचे घट्ट दूध घालणे. बुडबुडे आल्यावर गॅस बंद करून त्यात २ चमचे साखर आणि अर्धी वाटी गूळ, जायफळ पावडर घालून ढवळणे. ही खीर गरमपेक्षा थंड झाल्यावर छान लागते. पुरी सोबत ह्याची जोडी छान जमते.
नारळाच्या घार्या
साहित्य :२ वाट्या ओले खोबरे (नुकते खवून घेतलेले), २ वाट्या पिठीसाखर, ४ चमचे पातळ केलेले तूप, २ चमचे कणीक, तांदूळाचे पीठ लागेल तसे, तळायला तेल.
कृती : ह्या रेसिपीमध्ये नुकते ताजे खवलेले खोबरे घेणे गरजेचे आहे. ते ओलसर असल्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. साखर, खोबरे, तूप एकत्र घेऊन ते व्यवस्थित फेसायचे अगदी पांढरेशुभ्र होईपर्यंत. त्यात कणीक घालायची आणि लागेल तसे तांदळाचे पीठ घालत थालिपीठाच्या गोळ्यासारखे बनवायचे. तेल तापत ठेवायचे. प्लास्टिक पेपरवर तेल लावून थालिपीठासारखे थापावे व एकेक खरपूस तळून घ्यावे.
नारळाच्या दुधातील शिकरण
साहित्य : नारळाचे घट्ट दूध २ वाट्या, २ केळी, ४ चमचे साखर, चिमूटभर वेलची पावडर
कृती: नारळाचे घट्ट दूध काढून घेणे. ते आधी थंड करून घेतले तर उत्तमच! त्यात केळीचे काप, साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित ढवळणे. गरम पोळी बरोबर शिकरण मस्त लागते.