जेव्हा लोक तुम्हांला पहिल्यांदा भेटतात तेव्हा पहिल्या काही सेकंदातच तुमच्याविषयी मत बनवितात. हे पहिलं मत तुमच्या बाह्य रुपावर ठरत असतं…म्हणजेच तुम्ही कसे दिसता, कसे बोलता, कसे वागता, कपडे कसे घालता….वगैरे!  या तुमच्या बाह्य रुपावरूनच तुमची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, तुमची वागणूक, स्वभाव, राहाणीमान इतकंच नाही तर अगदी आर्थिक परिस्थितीविषयी देखील समोरचा माणूस आडाखे बांधून मोकळा झालेला असतो, आणि हे त्याचं मत त्याच्यापुरत तरी ठाम असतं. भले ते तुम्हांला चुकीचं वाटत असेल, पण त्याच्यासाठी हे मत बरोबरच असतं. पुढे तुमची आणि त्या माणसाची घनिष्ट ओळख झाल्यावर कदाचित्‌ त्याला तुमचं खरं व्यक्तिमत्व कसं आहे हे कळेल, पण तोपर्यंत त्याच्या डोक्यात मत इतकं घट्ट भिनलं असेल की तुमच्याशी वागतांना त्याचे परिणाम कुठे ना कुठे जाणविल्याशिवाय राहाणार नाहीत. कारण तुम्ही त्याच्या मनात तुमच्याविषयी एक प्रतिमा निर्माण केलेली असते. ती पूर्णतया पुसून काढणं कठीणच नाही तर काही प्रमाणात अशक्यच असतं. यालाच तर इमेज मॅनेजमेंटच्या भाषत्ेा “फर्स्ट इंप्रेशन” म्हणजेच पहिल्यांदा पडणारी छाप किंवा प्रभाव म्हणतात.

हे फर्स्ट इंप्रेशन किंवा पहिल्यांदा पडणारी छाप उत्तम असावी याकरता आपल्याकडून काय प्रयत्न करावे हे सांगण्याआधी इमेज मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमची पहिल्यांदा पडणारी छाप ही प्रभावशाली असावी यासाठी तुम्हांला मदत करून याचं व्यवस्थापन करायला शिकवणं म्हणजे इमेज मॅनेजमेंट.

तर आता तुमच्या उणीवा झाकून फर्स्ट इंप्रेशन कसं चांगलं पाडू शकाल या विषयी थोड जाणून घेऊ या.

आजचा लेख खास अशाच युवापिढीसाठी आहे ज्यांना आज तयार केलेली प्रतिमा पुढच्या आयुष्यात ही खूप गरजेची ठरणार आहे, तेव्हा प्रतिमा कशी बनवावी आणि समोरच्याच्या मनात कशी ठसवावी, या दोन्ही विषयी मी इथे सांगणार आहे….. कॉलेज जीवन म्हणजे मुक्त, उन्मुक्त आयुष्य, हा समज, अनेक मुलांच्या मनात असतो. खरंतर हा गैरसमज असतो.कारण इथे तुमचा जो शिक्षणाचा, संस्कारांचा पाया घातला जाणार असतो, त्यावर तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. तेव्हा याच वयापासून आपण काय कपडे घालतो आणि चार लोकात कसे वागतो, याचं भान ठेवणं खूप आवश्यक आहे.

इथून बाहेर पडतांनाच तुम्हांला प्रचंड स्पर्धेच्या जगाला तोंड द्यायचं असतं. याच जगाचं आजचं प्रचलित नाव आहे “कॉरपोरेट वर्ल्ड!” याची सुरवात होते ती नोकरी मिळविण्यासाठी द्याव्या लागणार्‍या मुलाखतींपासून. तेव्हा इंटरव्ह्यूला जातांना काय काळजी घेतली पाहिजे, पेहराव कसा असला पाहिजे, आचरण कसे असले पाहिजे…ज्यायोगे आपली सक्षम आणि प्रगल्भ प्रतिमा  तयार होईल आणि इंटरव्ह्यूमध्ये यश मिळण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो वाढेल…..

 नोकरीसाठीच्या मुला-खतीत फक्त शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असून उपयोग नाही तर तुमचे वागणे, बोलणे, पेहराव, बॉडी लँग्वेंज या सगळ्यावर तुमची गुणवत्ता ठरवली जात असते.

 तुम्ही त्या पदासाठी लायक आहात की नाही? तुमचं वागणं कंपनीच्या कल्चरशी साजेसं आहे की नाही? तुम्ही त्या वातावरणात मिसळून जाऊ शकाल की नाही? या सगळ्याचं निरीक्षण मुलाखतकार त्या २५/३० मिनिटांच्या अवधीत करणार असतो, तेव्हा त्याच्या त्या निरीक्षणाला वाव मिळेल असं तुमचं वागणं असणं अपेक्षीत असतं.

 इंटरव्ह्यूच्या दिवशी तुमचं स्वास्थ चांगलं असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची दमणूक किंवा चिंता चेहर्‍यावर बॉडी लँग्वेजमधून दिसू नये.

 आदल्या रात्री उत्तम झोप घ्या. सकाळी भरपूर पाणी प्या, ज्यायोगे तुम्ही ताजेतवाने दिसाल.

 निघतांना योग्य तितकेच खा. खूप जास्त किंवा खूप कमी खाऊ नका. अती खाणे किंवा उपाशी राहाणे दोन्हीमुळे चेहर्‍यावर परिणाम होत असतो.

 मुलाखतीच्या आधी किमान अर्धा तास तुम्ही तिथे पोहोचलेला असला पाहिजे. ज्यामुळे तुम्हांला निदान थोडा वेळ तरी स्वत:शी शांतपणे विचार करता येईल.

 मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलात की आधी फ्रेश होऊन या. तुमचा चेहरा, कपडे व्यवस्थित आहेत किंवा नाही याची खातरजमा करून घ्या. आपलं नाव येण्याआधी पाच मिनिटे आपल्याला दिलेल्या जागी बसा. नाव पुकारताच आत्मविश्वासाने आत जा. मात्र आत जाण्यापूर्वी परवानगी घेऊनच आत जा.

 चेहर्‍यावर हसू असावे. सर्वाना अभिवादन करून, सांगितल्यावर मगच खुर्चीत बसावे. बसतांना खूपच रेलून आरामात किंवा अगदीच टोकावर टेन्शन आल्याप्रमाणे बसू नये. खूर्ची आवाज न करता, सावकाश हाताने खेचून घेऊन व्यवस्थित ताठ बसता येईल असे बसावे.

 विचारलेल्या प्रश्नांची मोजक्या शब्दात उत्तरे द्यावी.  अती फाफटपसारा असू नये. त्याच प्रमाणे अती संक्षिप्त उत्तरेही देऊ नयेत. उत्तरे देतांना चेहर्‍यावर अहंभाव किंवा कुत्सितपणा किंवा अगदीच केविलवाणेपणा नसावा. समोरच्याच्या डोळ्याला डोळे देऊन उत्तरे द्यावी. खाली बघून किंवा इकडे-तिकडे बघत उत्तरे देऊ नयेत.

 बोलतांना सावकाश, स्पष्ट, पण न रेंगाळता बोलावे.

  तुमच्याविषयी सांगा म्हंटल्यावर स्वत:ची थोडक्यात पण पूर्ण माहिती देता आली पाहिजे. त्यात तुमची व्यक्तिगत माहिती, शिक्षण, छंद, आवडी-निवडी आणि ध्येय हे मुद्दे आले पाहिजेत.

 दातांची व केसांची योग्य निगा राखली पाहिजे. पिवळे किंवा डाग पडलेले दात आणि तोंडाला दुर्गंधी नसावी. त्यासाठी माऊथ
वॉशने तोंड स्वच्छ ठेवा. तोंडात काहीही चघळत राहू नये. केस स्वच्छ धुतलेले, नीट विंचरलेले असावेत.

 कपडे स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असावेत. कपडे, मोजे Eिकवा शूज्‌ यांना घामाची किंवा इतर दुर्गंधी येत नाही ना याची काळजी घ्यावी. परफ्युमचा वापर करत असाल तर सौम्य सुगंधाचे असावे.

 शर्ट सौम्य रंगाचा व
फॉर्मल असावा. शर्ट इन केलेला असावा. जर नोकरीची गरज आणि मागणी असेल तरच टाय लावा अन्यथा नको. गडद रंगाची ट्राऊझर, काळा बेल्ट आणि काळे स्वच्छ शूज्‌ असावेत.

 अॅक्सेसरीज्‌ मोजक्याच असाव्यात, ज्यामुळे तुमच्या पेहरावाला उठाव येईल.

 हातांनी टेबलावरच्या कोणत्याही गोष्टींनी खेळू नका. सारखा चेहर्‍याला, केसांना वा कपड्यांना हात लावू नका.

 मुलींनी नोकरीचे स्वरूप बघून भारतीय, किंवा वेर्स्टन फॉर्मल किंवा फ्युजन कपडे निवडावे. साडी हा पेहराव कोणत्याही प्रकारच्या लुकसाठी चांगला दिसतो. मात्र साडी वा सलवार-कमिज भरजरी वा टिकल्या वगैरे लावलेले फॅन्सी नसावेत. ज्वेलरी मोजकी असावी. वेर्स्टन पेहरावावर स्कार्फ घेणार असाल तर तो सोबर रंगाचा असावा.

नोकरी मिळल्यावर आता काय कसंही वागू असं होत नाही. नोकरीच्या ठिकाणी जर तुमची वागणूक उत्तम नसेल तर कामाचा दर्जा चांगला असूनही नोकरीत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.

 सगळ्यांशी स्वत:हून आणि आत्मविश्वासाने बोला. मात्र बोलण्यात सतत स्वत:बद्दलची प्रौढी नसावी. आपल्याबद्दल सांगा. तसेच दुसर्‍याबद्दल ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. ऑफिस कल्चरप्रमाणे स्वत:ची वागणूक ठेवा. वेगळं वागण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही एकटे पडाल हे लक्षात ठेवा.

 कामाच्या ठिकाणी हेवेदावे, लावालाव्या करणं, भांडण लावून देणं टाळावं. हे सगळं थोडा काळंच खपून जाणारं असतं, याचे दूरगामी परिणाम वाईट होतात हे लक्षात ठेवा.