पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे… ह्यावरून पाण्याचं काय महत्व आहे ते नक्कीच जाणवतं. पृथ्वीवरील सर्व सजीवांचं जिणं पाण्यावरच अवलंबून आहे. मनुष्याला पाण्याची गरज फक्त पिण्यासाठीच नव्हे, तर दररोज अनेक गोष्टींसाठी असते. औद्योगिक क्षेत्रात तर पाण्याची खूपच आवश्यकता असते. शेतकर्यांकरता तर पाण्याची गरज सर्वात मोठी आहे.
तर सांगायची गोष्ट म्हणजे, आपल्या जीवनात पाणी हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. पाण्याशिवाय आपण जगण्याचा विचारही करू शकत नाही. जशी आपल्याला पाण्याची गरज असते, तशीच निसर्गातल्या प्रत्येक घटकाला पाण्याची गरज असते. मनुष्य, प्राणी, झाडं ही पाण्याशिवाय मरुनच जातील, नाही का? आपल्या पृथ्वीवरील सगळ्या सजीवांचं जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. मनुष्याचा खरा दागिना हा पाणीच आहे हे म्हटलं तर खोटं ठरणार नाही.
आपलं शरीर हे ६० टक्के पाण्यानेच बनलं आहे. शरीरातलं पाण्याचं प्रमाण जर १० टक्केहून कमी झाले तर आपण जगूच शकणार नाही. आपल्याला आपलं शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवायचं असेल तर भरपूर पाणी पिणे हा एक खूप मोठा पर्याय आहे. पोटाचे विकार, अॅसिडीटी ह्यावर पाणी हा एक उत्तम उपाय आहे. त्वचा सुंदर ठेवायची असेल तर भरपूर पाणी प्यायल्याशिवाय पर्यायच नाही. जर पाणी कमी प्यायलो तर नाना तर्हेचे विकार होऊ शकतात. अजीर्ण, गॅसेस, थकवा येणे, मूत्रविकार, त्वचा विकार, चेहर्यावर पिटीका येणे इत्यादी. जर गरम पाणी पिण्याची सवय लावून घेतली, तर बर्याच आजारांपासून लांब राहू शकतो. गरम पाणी पचायला हलकं असतं. तसंच गरम पाण्यानी अजीर्ण होत नाही. अन्न लवकर पचतं, शरीराला जडपणा वाटत नाही, पायावरची सूज निघून जाते, वजन कमी होतं, किडनीचे आजार लांब राहतात.
दिवासातून ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत, थकवा जाणवत नाही, लघवीला साफ होते आणि म्हणून मूत्राशयाचे विकारही कमी होतात. स्रियांमध्ये युरीन इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. जेवण करण्यापूर्वी १ किंवा २ ग्लास पाणी प्यावे; जेणेकरून भूकही कमी लागते आणि अन्न पचायला मदत होते. जेवण झाल्यानंतर खूप पाणी पिण्यापेक्षा जेवण्याआधी पाणी पिणे कधीही योग्य असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपले डोळे साफ आणि स्वच्छ राहतात. आपली दृष्टीही साफ होते. पाणी हे आपल्या त्वचेवर मॉइश्चरायजरचं काम करत असतं. ज्याने आपली त्वचा टवटवीत आणि उज्ज्वल राहते.
तरुण दिसण्याकरिता महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर पैसे खर्च
करण्यापेक्षा दिवसातून कमीत कमी ६ ते ८ माठे ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यामुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आपला मेंदू संतुलित राहतो आणि एकाग्रता वाढते. पाणी वय लपवण्याच काम अगदी चोख पार पाडत असतं.
वयामुळे शरीरावर येणार्या सुरकुत्या घालवायचे कामही पाणीच करते. दिवसातून ३ वेळा पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने चेहर्यावर येणार्या पिटीकांपासून आपण दूर राहू शकतो आणि चेहरा तजेलदारही दिसतो. तर भरपूर पाणी प्यायल्याने वजन आटोक्यात राहण्यासही मदत होते. टेन्शन, स्ट्रेस, जागरण यामुळे डोळ्यांवर खूप मोठा परिणाम होतो. डोळे लाल होणे, जळजळणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे, सुरकुत्या येणे या सगळ्यांवर एकमेव उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं हाच आहे. पाण्याने डोळ्यांखालची व चेहर्यावरची सूजही कमी होते.
निसर्गानं आपल्या पदरात पाण्याचं देणं अगदी भरभरून टाकलं आहे, आपण ते देणं नतमस्तक होऊन स्वीकारावं आणि जीवेभावे सांभाळावं, इतकीच त्या निसर्गाची अपेक्षा…आणि पाण्याचं आपल्या जीवनातलं अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता ही अपेक्षा अवास्तव तर नक्कीच नाही! तेव्हा वेळीच डोळे उघडू या आणि निसर्गाच्या अपेक्षेला खरे उतरू या! वाढती लोकसंख्या, खूप मोठ्या प्रमाणात होणारं औद्योगीकरण, झाडं तोडणे, जल प्रदूषण, कमी पाऊस… आहेत त्या जलसाठ्यांचा गैरवापर. त्या सगळ्या गोष्टींमुळे पाण्याची टंचाई आपल्याला जाणवतेय. आपल्या आयुष्यातला हा खूप गंभीर मुद्दा आहे. पाणी कसे / किती / कधी प्यावे कुठेतरी वाचलं किंवा कोणीतरी सांगितलं की जास्त पाणी प्यायला सुरुवात करायची हे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे शरीराची पाण्याची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे एकच नियम सगळ्यांना लागू होईलच असं नाही. काही लोक अवास्तव पाणी पितात तर काही लोकांना अजिबातच पाणी आवडत नाही किंवा १/२ ग्लास पेक्षा ते जास्ती पाणी पिऊच शकत नाहीत ही दोन्ही टोकं योग्य नाहीत. आपल्या आरोग्याची जीवनरेखा आपल्या पेशींवर अवलंबून असते आणि पेशींची कामे सुरळीत होण्यासाठी त्यामध्ये इतर जीवनसत्त्व आणि प्रथिनं तर आवश्यक आहेतच पण पाण्याचे प्रमाण योग्य राखणे पण जरुरी आहे.
काय कराल?
तहान लागेपर्यंत प्रतिक्षा करू नका. जेवणानंतर लगेच किंवा जेवण करण्यापूर्वी पाणी पिण्याचे टाळा.
आदर्श वेळ : अन्न सेवन केल्यावर एक तासानंतर पाणी प्या.
आपल्याला जेव्हा तहान लागते त्यावेळी आपल्या शरीरात आधीच पाण्याची कमतरता झालेली असते. म्हणून तहान लागेपर्यंत न थांबलेलंच बरं. आपण योग्य पाणी पितो आहोत का हे बघण्यासाठी आपल्या लघवीचाच रंग बघा. तो पाण्यासारखा रंगहीन हवा. योग्य वेळी म्हणजे दोन जेवणांमध्ये पाणी प्यावे. जेणेकरून पोषक तत्त्व मिळतील, पण जास्तीच्या कॅलरीज मिळणार नाहीत. वजन आटोक्यात राहील, पण एनर्जी भरपूर मिळेल.
काही पाण्याच्याच पाककृती :
काकडी + पुदिना पाणी = १ काकडीचे बारीक स्लाइसेस + ८-१० पुदिन्याची पाने. कलिंगड + तुळस = १ कप कलिंगडाचा पल्प + ५-६ तुळशीचे पाने लिंबू / संत्रे पाणी = २ लिंबांचा रस किंवा १ संत्र्याचा पल्प सफरचंद + दालचिनी पाणी = सफरचंदाचे बारीक काप + दालचिनीचे तुकडे वेलची आणि गुलाब पाकळ्या पेरू + लाल मिरची बिया अननस + पुदिना पाणी लिंबू + आल + सैंधव मीठ बडीशेप / जिरा / धणे पाणी या पाण्याच्या पाककृती करण्यासाठी साधारण १ लिटर पाणी वापरावे आणि फळं / हर्बस् घातल्यावर ४ तासांसाठी इन्फ्युजन होण्यासाठी ठेवावे.