वावाबोट

साहित्य : लांबसर मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धी वाटी,
व्हॅनिल कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.

कृती : व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात
मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे. किंवा एका भांड्यात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे, त्याच्या आतमध्ये बसणार्‍या भांड्यात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर
गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयलिंग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)

वावाबोट : पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. त्यामध्ये जेली घालून सर्व्हींग प्लेटमध्ये पहिल्यांदा कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची बोट ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सर्व्ह करावे.

सीताफळाचा जॅम

साहित्य : सीताफळाचा गर २ वाट्या, साखर १  वाटी, १ लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅसिड छोटा चमचा, जिलेटीन अर्धा चमचा.

कृती : सीताफळाचा गर, साखर, सायट्रिक अॅसिड व पातळ केलेले
जिलेटीन एकत्र करून घट्ट होईस्तोवर शिजवा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा.

डाळिंब मॉकटेल

साहित्य : डाळिंबाचा रस अर्धा ग्लास, शुगर सिरप २ चमचे, सोडा वॉटर अर्धा कप, क्रश आईस, कोकोनट मिल्क अर्धा कप, आल्याचा रस १ चमचा.

कृती :  सर्व प्रथम डाळिंबाचा रस, आल्याचा रस, साखर व कोकनट मिल्क एकत्र करावे. नंतर एका ग्लास मध्ये क्रश आईस व वरील तयार केलेले मिश्रण एकत्र करून सर्व्ह करावे. सर्व्ह करतेवेळी सोडा वॉटर व वरून पुदीन्याचे पान घालून सर्व्ह करावे.

चिकूचा हलवा

साहित्य : चिकू ५०० ग्रॅम, खवा १५० ग्रॅम, साखर चवीनुसार, साजूक तूप ४ चमचे, वेलची बेदाणे, बदाम पिस्त्याचे काप, दूध अर्धी वाटी, वर्ख.

कृती : चिकू चांगले धुवून, साल काढून, त्याचा गर काढून घ्या.
नॉनस्टीक पॅनमध्ये तुपावर हा गर भाजून घ्या. यातले थोडे पाणी आटले की दूध गरम करून जरूरीपुरते घाला. साखर,वेलची दाणे घालून चांगले मिसळून घ्या. वरुन बदाम पिस्त्याचे काप, वर्ख लावून सर्व्ह करा.

क्रिस्पी बनाना

साहित्य : ४- ५ केळ्याची स्वच्छ धुतलेली साल, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, आले-लसूण पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, चाट मसाला, तिखट, तेल तळायला.

कृती : केळ्याची साल स्वच्छ धुवून त्याच्या लांब पट्टया कापून घ्याव्यात. त्याला लिंबू, मीठ, आले-लसूण पेस्ट चोळून ठेवावी. त्यानंतर कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून डीप फ्राय करावे.

वरून चाट मसाला लावून सर्व्ह करावे. अतिशय कुरकरीत असा हा स्नॅकचा वेगळा प्रकार आहे

काळ्या मनुकांचे लाडू

साहित्य : काळ्या मनुका २ वाट्या, भरडलेले काजू किंवा
शेंगदाणे १ वाटी, मिल्क पावडर २ चमचे, बारीक साखर अर्धी वाटी.

कृती : शेंगदाणे किंवा काजू मंद आचेवर भाजून भरडून घेणे. त्यानंतर त्यात मिल्क पावडर घालणे. सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू बांधणे. तयार केलेले लाडू बारीक साखरेमध्ये घोळून खायला देणे.

किसमिस चटणी

साहित्य : किसमिस २ वाट्या, तिखट अर्धा चमचा, एक लिंबाचा रस, आले अर्धा इंच, मीठ चवीनुसार.

कृती : किसमिस स्वच्छ धुवून घ्यावे. थोडा वेळ पाण्यात भिजवून त्यातील पाणी काढून टाकणे. नंतर यात तिखट, मीठ, आलं मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या. जरूरीपुरते पाणी मिसळून पातळ चटणी करू शकता.

आंब्याचे रोल

साहित्य : आंब्याचा रस २ वाट्या, बदाम पिस्त्याचे काप १ चमचा, पिठीसाखर २ चमचे, खवा ४ चमचे, वर्ख.

कृती : आंब्याचा रस
नॉनस्टीक पॅनवर घालून मंद आचेवर जाळीदार डोसा तयार करून घ्या,
किंवा मायक्रोव्हेवच्या काचेला तेल
लावून त्यात १० मिनिटे पसरवून ठेवल्याससुद्धा डोसा छान जाळीदार होतो. नंतर यावर खवा, सुक्या मेव्याचे काप, पिठीसाखर घालून चाकुच्या सहाय्याने लांब पट्या
कापून प्रत्येक पट्टीची गुंडाळी करणे. सुरळीच्या वड्यासारखी त्यावर वर्ख लावून सर्व्ह करा.