डॉ. अपर्णा जोशी एम्.डी.(होमिओपाथी)
आयुष मंत्रालयाने कोरोना पासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथीक आर्सेनीक अल्बम ३०, औषधांचा डोस घेण्याची शिफारस केली आणि नव्यानं होमिओपॅथीविषयक चर्चा सुरु झाली. कोरोनाच्या रोग्यांसाठी शासनाने फक्त अॅलोपाथीचा उपचार करणार्या डॉक्टरांचा विचार केला होता. या पार्श्वभूमीवर जेव्हा होमिओपॅथीक आर्सेनीक औषधांचे महत्त्व समोर आले तेव्हा आम्ही होमिओपाथी
डॉक्टरांनीही कोरोनावरील उपचारांचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवली.
होमिओपाथी औषधांच्या प्रभावाविषयी जाणून घेण्याआधी होमिओपाथीने विविध आजारांच्या काळात जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तब्बल २००वर्षांपूर्वी डॉ.सॅम्युअल हानेमान यांनी होमिओपाथीचा शोध लावला. त्यानंतर जेव्हा जेव्हा अशा काही महामारीच्या जागतिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली तेव्हा होमिओपाथीने प्रभावकारी काम केले आहे याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत. जसे १८३०साली आलेल्या कॉलरा महामारीच्या काळात इतर वैद्यकशास्रांच्या तुलनेत होमिओपाथी उपचार घेणार्या रोग्यांमध्ये मृत्युदर फक्त १०० : ७ होता. याच प्रकारची सरासरी यलो फिव्हर, स्पॅनिश फ्लूपासून नुकतंच तोंड द्यावं लागलेल्या स्वाईन फ्लू, डेंग्यू पर्यंतच्या आजारांमधली आहे.
तसाच होमिओपाथीमधील किलेशन उपचार हे ही एक वरदानच आहे. वातावरणात जे जड धातू असतात त्याच्याशी मानवाचा सहज संपर्क होत असतो. आणि ज्या ठिकाणी हे प्रमाण खूप जास्त असते त्या ठिकाणी अन्न, पाण्यातूनही विषबाधा होऊ शकते. वाढत्या उद्योगधंद्यामुळे, रहदारीमुळे प्रदूषणाचा त्रास वाढू लागला आहे. या प्रदूषणाबरोबर जेव्हा जड धातूंचा संयोग होतो तेव्हा हे विषारी घटक क्रिया घडवून आणतात आणि माणूस आजारी पडतो. या विषारी घटकांचे बंध मोकळे करण्याचे कार्य किलेशन उपचार पद्धती करत असते. होमिओपाथीतील ही एक प्रभावी उपचार पद्धती आहे हे सिद्धही झाले आहे.
कोव्हिड-१९च्या काळात आयुष मंत्रालयाने आर्सेनिक औषधाची शिफारस केली आणि तो डोस अनेकांनी घेतला देखील. त्याचा कोणाला किती आणि कसा फायदा झाला याविषयी तर काही पुरावा उपलब्ध नाही. आर्सेनिकचा उपयोग रुग्णाच्या शरीरातील आरोग्यास घातक अशा लेड, आर्सेनीक अशा विषारी द्रव्यांचा निचरा करण्यासाठी केला जातो. अर्सेनीक औषधात जे विषारी गुणधर्म असतात तेच शरीरातील विषारी घटकांचा नायनाट करतात. म्हणूनच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रायलाने आर्सेनिकची शिफारस केली.
पण एक मात्र नक्की की होमिओपाथीत असं एखादं औषधं सर्वसाधारणपणे सगळ्यांसाठी गुणकारी ठरेलच असं अजिबात नाही. होमोओपाथी हे व्यक्तिगत उपचारांवर आधारीत आहे. चार रोगी जरी एकाच प्रकारच्या सर्दी-पडश्याने आजारी असतील तरी त्या प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार औषोपचार केला जातो.
हाच नियम आर्सेनीक अल्बम ३०च्या बाबतीही लागू पडतो. जोपर्यंत रोग्याच्या प्रकृतीस कोणती आणि कशी औषधे आवश्यक आहेत; तोपर्यंत हे एक औषध अमूक एका रोगाची लागण होण्यापासून तुम्हांला सुरक्षित ठेऊ शकते म्हणणे योग्य नाही. त्यासाठी या रोगाची लागण झालेल्या रोग्याला पहिल्या दिवसापासून होमिओपाथीचे उपचार सुरु करणे गरजेचे आहे.
मुळात कोव्हिड-१९च्या काळात रोगाची लागण होऊच नये यासाठी बहुतांश लोकांनी…… रोगप्रतिकारशक्ती वाढविणे, स्वच्छता आणि योग्य अंतर पाळण्याचे नियम अंगिकारणे, गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होऊ नये म्हणून मास्कचा वापर करणें….. यासारखी आधीच काळजी घेतली होती. या काळजी बरोबरच होमिओपाथी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार त्या काळात अनेकांनी केला नसेल. जो आता करण्यास काहीच हरकत नाही. म्हणतातच ना देरसे आए पर दुरुस्त आए….