“मुहूर्त” पाहून केलेली सर्वच कामे  यशस्वी होतात का? मुहूर्त नसतांना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का? मुहूर्त नसतांना “काढीव” मुहूर्तावर कार्य करणे योग्य आहे का? असे अनेकजण विचारीत असतात.  माणूस आजारी पडल्यावर त्याला मुहूर्त पाहून आपण हॉस्पिटलमध्ये  कुठे घेऊन जातो? अपघात झाल्यावर मुहूर्त पाहून उपाय कुठे करतो? इतर देशातील लोक आपल्यासारखे मुहूर्त कुठे पाहतात? मोठ्या पराक्रमी  लोकनेत्यानी महान कार्य करतांना कुठे मुहूर्त पाहिला होता? “वगैरे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्यांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करीत असतो.”

मी लहान असतांना माझ्या वडिलांना  प्रश्न विचारला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी दिलेले उत्तर आजही माझ्या स्मरणात आहे. मी दिवाळीमध्ये वडिलांना विचारले होते,-“बाबा, दिवाळीत लक्ष्मी पूजन केल्याने आपणास पैसा मिळतो का? तसं जर असतं तर आपले लोक इतकी वर्षे अगदी मुहूर्त पाहून लक्ष्मीपूजन करीत आहेत , मग आपला देश श्रीमंत कसा झाला नाही ? ज्या देशातील लोक लक्ष्मीपूजन करीत नाहीत ते अमेरिकेसारखे देश श्रीमंत कसे झाले ?” यावर माझे बाबा म्हणाले – “अरे, लक्ष्मीपूजन हे लक्ष्मी मिळविण्यासाठी करावयाचेच नसते. तर ते लक्ष्मी-संपत्तीप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करावयाचे असते. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला पैसा आणि सन्मार्गासाठी खर्च होणारा पैसा याला लक्ष्मी म्हणतात.” मुहूर्ताचेही असेच आहे. आज आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करूया.

मुहूर्ताचा इतिहास

पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही पाचही अंगे जेव्हा शुभ असतील अशा काळाला मुहूर्त म्हटले जाते. हिंदुस्थानात फार प्राचीन काळापासून धार्मिक विधी व इतर शुभ कार्ये करण्यासाठी शुभ दिवस व शुभ वेळ पाहण्याची प्रथा रूढ आहे. त्यावरून शुभ दिवसाचा किंवा दिवसाच्या शुभ कालखंडाला “मुहूर्त” असे नाव मिळाले आहे.  “काल: शुभक्रियायोगी मुहूर्त:  इति कथ्यते।” म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या “विद्यामाधवीय” या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे.  ऋग्वेदात

“दिवस सुदिन असतांना” असा उल्लेख आढळतो. प्राचीनकाली यज्ञ करतांना मुहूर्त पाहत असत. कधी कधी यज्ञ चालू केल्यावर विघ्ने येत. तशी ती येऊ नयेत यासाठी मुहूर्त पाहिला जात असे. प्राचीन ग्रंथांवरून हे कळून येते. प्रत्येक नक्षत्राची देवता ठरविलेली आहे.”

(१) अश्विनी- अश्विनीकुमार.

(२) भरणी- यम.

(३) कृत्तिका-अग्नी.

(४) रोहिणी-ब्रह्मा.

(५) मृगशीर्ष – चंद्र.

(६) आर्द्रा – शंकर.

(७) पुनर्वसू- अदिती

(८) पुष्य- बृहस्पती,

(९) आश्लेषा- सर्प.

(१०) मघा- पितर.

(११) पूर्वाफाल्गुनी- भग

(१२) उत्तराफाल्गुनी-अर्यमा

(१३) हस्त- सूर्य

(१४) चित्रा- त्वष्टा.

(१५) स्वाती- वायु.

(१६) विशाखा- इंद्राग्नि.

(१७) अनुराधा – मित्र.

(१८) ज्येष्ठा-इंद्र.

(१९) मूळ- निऋति

(२०) पूर्वाषाढा – उदक.

(२१) उत्तराषाढा- विश्वदेव.

(२२) श्रवण- विष्णू

(२३) धनिष्ठा-वसु.

(२४) शततारका – वरुण

(२५) पूर्वाभाद्रपदा- अजचरण.

(२६) उत्तराभाद्रपदा-अहिर्बुध्न्स.

(२७) रेवती-प्रूषा.

 यावरून आणि इतर अनेक गोष्टींवरून हे मुहूर्त ठरविण्यात आले आहेत.

महत्त्‌वाची गोष्ट ही की प्रत्येक शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. प्राचीन कालापासून  हिंदुस्थान हा शेती प्रधान देश आहे.  काही शुभकार्याच्या मुहूर्ताचे नियम हे शेतीकार्याशीही निगडीत असल्याचे आढळून येते. विवाह मुहूर्तांचे नियम खूप होते. त्याला अपवादही सांगण्यात आले होते. ते अपवाद गृहीत धरून काही पंचांगात विवाह मुहूर्त देण्यात येतात. श्रौत, गुह्य व धर्मसूत्रात अनेक धार्मिक विधींसाठी शुभकाल सांगितलेले आहेत.मुहूर्तमार्तंड, मुहूर्तचिंतामणी इत्यादी अनेक ग्रंथांमधून केवळ मुहूर्तविषयक सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

इथे माणसाच्या मनाचे खूप महत्त्‌व आहे. कार्य करतांना ते निर्विघ्नपणे पार पडून फलप्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. ज्याठिकाणी कार्याचा प्रारंभ कधी करायचा हे ठरविणे आपल्या हाती असते तेथे इतर गोष्टींची अनुकूलता पाहतांना मुहूर्ताची कार्यारंभाची वेळ पाहून कार्य केले जाते. म्हणजे कार्य करतांना मन शांत राहते. अपघातासारख्या आपद्‌कार्याच्यावेळी मुहूर्त पाहू नयेत, माणूस आजारी पडल्यावर औषधोपचार करण्यासाठी मुहूर्त पाहू नयेत, असेही सांगण्यात आले आहे. कालानुरुप मुहूर्तांचे कोणते नियम पाळावेत हे प्रत्येकाच्या मनावरच अवलंबून असते.

महाराष्ट्रात आपण दिवसा विवाह मुहूर्त पाहून विवाह कार्य करतो. यासाठी आपण सर्व भरपूर वेळ खर्च करतो. परंतु काही व्यापारी समाजात दिवसाचा मौल्यवान वेळ खर्च होऊ नये म्हणून रात्रीच्या मुहूर्तावर विवाह लावतात. काही वेळा अमुक दिवशीच कार्य करणे अनिवार्य असेल तर “काढीव” मुहूर्तावर कार्य केले जाते. मुहूर्तावर केलेले कार्यच यशस्वी होते का ? याविषयी कोणीही संशोधन केले नाही. पराक्रमी लोकांचे मनोबल इतके मोठे असते की कार्य करीत असता मुहूर्त पाहण्याची त्यांना जरूरी नसते. मुहूर्तावर कार्य केले तर मन निश्चिंत राहते. म्हणून कोणतेही कार्य करतांना मुहूर्त पहायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न राहतो.

दा. कृ. सोमण