चैत्र महिन्याची शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा किंवा युगादी म्हणून ओळखली जाते. या तारखेपासून हिंदू नववर्ष सुरू होते, असे मानले जाते. गुढी म्हणजे विजय ध्वज, गुढीपाडव्याला चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा असेही म्हणतात. हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. अशा प्रकारे हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्यात येणार्‍या नवरात्रीला वासंतिक नवरात्र म्हणतात. यासोबतच गुढीपाडवाही येतो. या वर्षी गुढीपाडवा सण ३० मार्च, २०२५ रोजी येत आहे. सदर लेखातून आपण गुढीपाडवा सणाशी संबंधित विविध प्रकारच्या परंपरा, महत्त्व आणि चालीरीतींबद्दल जाणून घेणार आहोत.

एका धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून गुढीपाडव्याला “नवसंवत्सर” असेही म्हणतात. याशिवाय महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही या तारखेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून “पंचांग” रचले होते. आंध्र प्रदेशात गुढीपाडव्यानिमित्त खास प्रकारचा प्रसाद वाटला जातो. असे मानले जाते की, जो कोणी काहीही न खाता-पिता या प्रसादाचे सेवन करतो तो नेहमी निरोगी राहतो आणि रोग त्याच्यापासून दूर राहतात. याशिवाय या प्रसादामुळे त्वचेच्या आजारांपासूनही मुक्तता मिळवून देतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या भारतीय राज्यांमध्ये हा सण ९ दिवस विशेष विधी आणि पुजेने साजरा करण्याची पद्धत आहे. रामनवमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते.

आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी तयार केलेले सर्व अन्न आरोग्यदायी असते. या सणासाठी महाराष्ट्रात पुरणपोळी, श्रीखंडपुरी असे पदार्थ खास बनवले जातात. लोकांचा असा विश्वास आहे की, रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने त्वचेचे रोग तर दूर होतातच, पण आरोग्यही सुधारते. पुरणपोळी बनवताना गूळ, चणाडाळ, यांचा वापर केला जातो; हे सर्व आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यादिवशी सकाळी कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. असे मानले जाते की, असे केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील अशुद्धता दूर होते. कैरी घालून आंबाडाळ केली जाते. तसंच कैरीचं पन्हं केलं जातं. हे सर्व पदार्थ चैत्र ऋतूमध्ये शरीरासाठी आवश्यक आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी घराची साफसफाई करून लोक रांगोळी आणि तोरणाने घर सजवतात. ते त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुढी म्हणजेच ध्वज उभारतात. तांब्याच्या भांड्यावर स्वस्तिक चिन्ह काढले जाते आणि ते रेशमी कापडात गुंडाळून ठेवले जाते. सकाळी सूर्यदेवाची पूजा करण्याबरोबरच सुंदरकांड, रामरक्षा स्रोत्र आणि देवी भगवतीच्या मंत्रांचा उच्चार करून पूजा करण्याची परंपरा आहे.

पौराणिक कथेनुसार, रामायण काळात दक्षिण भारत सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याच्या जुलमी शासनाखाली होता. माता सीतेला शोधत असताना प्रभू श्रीराम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांना वालीच्या अत्याचाराची माहिती मिळाली, तेव्हा प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून तेथील लोकांना अत्याचारांपासून मुक्त केले. पौराणिक मान्यतेनुसार हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता.

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवीदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकविण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

ही गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा “प्रभू श्रीराम” लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा श्री रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.