प्रास्ताविक

मन करा रे प्रसन्न  सर्व सिद्धीचे कारण,  मोक्ष अथवा बंधन,  सुख समाधान, इच्छा ते आयु, म्हणजे जीवन आणि त्यासंबंधीचं ज्ञान म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद आपल्याला योग्य आणि आरोग्ययुक्त आयुष्यासाठी मार्गदर्शन करतो. हे मार्गदर्शन, आपला आहार कसा असावा, आपला विहार म्हणजे आपलं आचरण कालानुरूप, परिस्थितीनुरूप कसं असावं, याबद्दल प्रामुख्याने असतं. परिपूर्ण आणि प्रदीर्घ आयुष्य जगण्यासाठी योग्य काय, अयोग्य काय, सुखकर काय, दुःखकर काय याबद्दल ज्ञान देणारं शास्र म्हणजेच आयुर्वेद.

आयुर्वेदोक्त मानसविचार

आयुर्वेद हे वैद्यकशास्र असलं तरी त्याची स्वतःची अशी काही तत्त्‌वं आहेत, संकल्पना आहेत आणि सिद्धान्तही आहेत. या अर्थाने आयुर्वेद स्वतःच एक तत्त्‌वज्ञान आहे. आयुष्याशी संबंधित शरीर इत्यादि घटक कसे निर्माण झाले, त्यांचे गुणधर्म कोणते, त्यांची कार्यं काय आहेत, ती कशी घडतात, अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आयुर्वेदामध्ये केलेला आहे. याच धर्तीवर आयुर्वेद “मन” या महत्त्‌वपूर्ण घटकाबद्दलही विचार व्यक्त करतो. मनाचं स्वरूप, त्याची निर्मिती, गुणधर्म, कार्य इत्यादि विषयांबद्दल आयुर्वेदाने शास्रीय दृष्टीने व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. यालाच “आयुर्वेदोक्त मानसशास्र” किंवा “मानस-विचार” असं म्हणतात.

मनाचे स्वरूप आणि कार्य 

आयुर्वेदानुसार “मन” हा आयुष्याचा, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सजीव जीव-सृष्टीच्या निर्मितीचा एक भाग म्हणूनच मन निर्माण होतं. सत्त्‌व-रज-तम या त्रिगुणांनी युक्त अशा प्रकृतीपासूनच मन या द्रव्याची निर्मिती होत असली तरी मनाच्या निर्मितीमागे प्रकृतीमधील स्वयंभावी सात्ति्‌वक आणि राजसिक गुणांचा महत्त्‌वपूर्ण सहभाग असतो. यांच्यापासून मनोत्पत्ती होत असताना सोबतच पाच ज्ञानेन्द्रिय (कर्ण, त्वव्‌À, चक्षु, रसना, नासा) आणि पाच कर्मेन्द्रियंही (हस्त, पाद, पायु, उपस्थ, जिठा) निर्माण होतात. आयुष्य म्हणजे जीवन सुरू होत असताना, गर्भावस्थेतील नवीन शरीरामध्ये आत्मा, मन आणि ज्ञानेन्द्रियांचं त्रिकूट प्रवेश करत असताना, या समूहातील मन, नव्या शरीरातील सत्त्‌व-रज-तमाच्या प्रमाण आणि गुणवत्तेनुसार तिथे नव्या मनाची निर्मिती करतं, असं आयुर्वेद संहिता प्रतिपादन करतात.

आयुर्वेदानुसार मन स्वतःदेखील एक इन्द्रियंच आहे. मात्र ते उभयेन्द्रिय म्हणजे ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेन्द्रिय दोन्ही आहे. यामुळे इन्द्रिये मनाच्या नियंत्रणाखाली कार्यकारी होतात. सर्व ज्ञानेन्द्रिये, त्यात मनही आलं, ही ज्ञानाची साधनं आहेत. आपल्या सभोवतालच्या आणि त्याबरोबरच शरीरान्तर्गत परिस्थितीबद्दलचं ज्ञान ज्ञानेन्द्रिये करून देतात. प्रमुख पंच ज्ञानेन्द्रियांच्या द्वारे प्राप्त झालेलं ज्ञान मन आत्म्यापर्यंत पोहोचवतं आणि त्या ज्ञानानुसार कर्मेन्द्रियांकडून जे कार्य घडवून आणायचं असतं, त्याबद्दलची आज्ञा कर्मेन्द्रियांना देण्याचं कार्य मन करतं. या उभयेन्द्रियत्वामुळे मन हे दहा इन्द्रियांवर नियंत्रण करण्याचं महत्त्‌वाचं कार्य करतं. त्याबरोबरच स्वतःवर नियंत्रण राखण्याचं कार्यही मनाकडून घडतं; किंबहुना, केवळ मन स्वतःच स्वतःवर नियंत्रण राखण्यास सक्षम असतं. इतर कोणतंही तत्त्‌वं मनावर नियंत्रण करू शकत नाही. म्हणून स्वनियंत्रण हे मनाचं महत्त्‌वाचं कार्य आहे.

“विचार करणं” हे मनाचे आणखी एक महत्त्‌वाचे कार्य असते. मनामध्ये कोणकोणते विचार येऊ शकतात, याबद्दल आयुर्वेद माहिती देतो. चिन्तन, विचार, ऊह (कारणमीमांसा), ध्येय आणि संकल्प या स्वरूपांमध्ये येणार्‍या विचारांना आयुर्वेद मनाचे विषय मानतो. या विषयांचं योग्य ते ग्रहण करून त्यानुसार कृती करण्याचं आणखी एक महत्त्‌वाचं कार्य मनाद्वारे होत असतं. उपरोल्लेखित मन-विषयांच्या अनुषंगाने मन हे मीमांसा करणं, समजून घेणं, ज्ञान मिळवणं, विचार करणं, विचार नष्ट करणं अशा प्रकारची कार्यं करतं.

मन आणि आरोग्यअनारोग्य

आयुर्वेदाने, शरीरातील कार्यकारी शक्तीमध्ये होणारी विकृती ज्या लक्षणांनी शरीरावर दिसते, त्या लक्षणसंग्रहाला रोगावस्था किंवा अनारोग्य असं म्हण्टलं आहे. हीच कार्यकारी शक्ती जेव्हा प्राकृतावस्थेमध्ये असते तेव्हा शरीरातील सर्व क्रिया सुयोग्य पद्धतीने घडत असतात, भूक नीट लागत असते, अन्नपचन व्यवस्थित होत असतं, सर्व इन्द्रिये आपापली कार्य व्यवस्थित करत असतात. मन आणि आत्मा प्रसन्न असतात. त्याबरोबरच शरीरावर इतर कोणतीही वाईट लक्षणं दिसत नसतात. या अवस्थेलाच आयुर्वेद, “स्वास्थ्य किंवा आरोग्य” असं म्हणतो. या वर्णन केलेल्या बाबी अशा होत नसतील, त्यात काही अडचणी असतील तर ते “अस्वास्थ्य किंवा अनारोग्य” होय.

या विवेचनावरून आपण म्हणू शकतो की आयुर्वेद रोगांचे सामान्यपणे शारीरिक रोग आणि मानसिक रोग असे दोन प्रकार मानतो. शारीरिक रोगांची कारणं शरीरातील घटकांमध्ये उपस्थित असतात तर मानसिक रोगांची कारणं मनाशी निगडित असतात. त्यांची लक्षणंही शारीरिक म्हणजे शरीरव्यापाराशी संबंधीत आणि मानसिक म्हणजे मनोव्यापारांशी संबंधित अशा प्रकारची असतात. असं असलं तरी, शारीरिक रोगांचा मनावर परिणाम होतो आणि त्याच वेळी मानसिक रोगही शरीरावर विशेष परिणाम करतात. लक्षणांच्या स्वरूपांमध्ये याचं आपल्याला दर्शन होऊ शकतं. असं असल्यामुळे रोगावस्था शारीरिक असो किंवा मानसिक, “मनाचं रक्षण करणं, मनाला उभारी येईल अशी चिकित्सा करणं”, हा कोणत्याही प्रकारच्या रोगावस्थेला दूर करण्याकरिता केलेल्या उपायांमध्ये महत्त्‌वाचा भाग ठरतो.

आयुर्वेद चिकित्साविचार

आयुर्वेदानुसार कोणत्याही रोगाची चिकित्सा करत असताना रुग्णाच्या शारीर आणि मानसिक भावांचा विचार केलेला दिसून येतो. रोगचिकित्सा म्हणजे केवळ रोगाच्या लक्षणांची चिकित्सा करणं नसून त्याबरोबरच रुग्णाचं शरीर आणि मन या दोहोंची चिकित्सा असल्याचं आयुर्वेद मानतो. यामुळेच कोणत्याही रोगाची चिकित्सा करताना रुग्णाला धीर देण्याची आवश्यकता आयुर्वेद प्रकर्षाने सांगतो. रुग्णाचं धैर्य टिकून राहावं यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचना आयुर्वेदाने केलेली आहे. हे करण्यासाठी आवश्यक असलेली कृती ही त्या “रुग्णाच्या बुद्धीनुरूप म्हणजे त्याला कळेल अशा भाषेमध्ये करण्याची उपसूचनाही”, दिलेली आहे. या प्रक्रियेलाच सध्या “काऊन्सिलिंग” म्हणून ओळखलं जातं.

डॉ. प्रसाद अकोलकर,

आयुर्वेदाचार्य, एमए, पीएचडी (मुंबई)