ग्रीष्म ऋतूने काहिली होत असताना, अचानक दाटून येते, आकाशात काळे काळे ढग जमा होतात. वारे वाहू लागतात. आणि हा सोहळा आपण मान उंचावून पाहत असतानाच कपाळावर थेंबांचा अभिषेक होतो आणि नकळत ओठी शब्द येतात, “आला पाऊस आला”. पावसाची महती प्रत्येकासाठी वेगळी. शहरी भागातील पाऊस वेगळा. शेतकर्‍यांसाठी पाऊस वेगळा. तरुणांना त्याचे आकर्षण वाटते ते वेगळे आणि लहान मुलांना वाटते ती मौज आगळी. नेमेची येतो मग पावसाळा, तरी दर वर्षी पावसाचे कौतुक काही कमी होत नाही. जसे ते आपल्याला वाटले तसेच आपल्या पूर्वजांना वाटत आले आहे, अगदी वैदिक काळापासून. पर्जन्यसूक्तात ऋषी वर्णन करतात, “वारे जोराने वाहू लागतात. विजा चमकू लागतात. वनस्पती डोलू लागतात. सर्व प्राण्यांसाठी विपुल अन्न निर्माण करणारा पर्जन्यदेव पृथ्वीवर वृष्टीच्या रुपाने कृपावंत होतो. हे पर्जन्यदेवते, आम्हाला भरभरून थेंबांचे दान दे. नद्या दुथडी भरुन वाहू देत. गायींना प्यायला पुष्कळ पाणी मिळू दे. कारण गायीला चारा मिळाला की दूध-दुभत्याने आमचे घर न्हाऊन जाईल. हे पर्जन्यदेवते, तुझी लीला अपरंपार आहे. ती अवगत करणे कोणाला शक्य आहे? मला तर सृष्टीच्या लीलेचे इतके आश्चर्य वाटते. इतक्या नद्या दुथडी भरुन वाहतात आणि त्या समुद्रात पाणी ओततात पण तो समुद्र काही पूर्णपणे भरत नाही.”

आकाशातून पडणारा हा पाऊस माणसाला नेहमीच खूप काही सांगत, शिकवत आला आहे. पुढील सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, पाऊस वेगवेगळ्या ठिकाणी पडतो पण शेवटी सगळे पाणी वाहून समुद्रालाच मिळते; त्याप्रमाणे वेगवेगळ्या देवाला नमस्कार केला वा पूजा केली तरी ती केशवापर्यन्त म्हणजेच परब्रह्मापर्यन्त पोहचते.

जे लोक कमी काम करणारे असतात ते खूप बडबड करतात. जसे शरद ऋतूतील ढग नुसतीच गर्जना करतात, गडगडाट करतात, पाऊस मात्र देत नाहीत. मराठीत देखील आपण म्हणतो, “गर्जेल तो वर्षेल काय” !

ढग पाणी नुसते साठवत नाहीत तर पाणी देतात. म्हणून ते दानी आहेत आणि दानी माणसाचा मान हा केवळ श्रीमंती मिरवणार्‍या माणसापेक्षा निश्चितच अधिक आहे. म्हणूनच सुभाषितकार म्हणतात, गौरव हा दानामुळे प्राप्त होतो, केवळ पैसा साठवून तो मिळत नाही. त्यामुळेच नुसते पाणी साठविणार्‍या पण त्याचा लाभ कुणालाही न देणार्‍या समुद्राचे स्थान खाली जमिनीवर आहे; तर दानी ढगांना मात्र उच्च स्थान प्राप्त झाले  आहे.

नेमेची येतो मग पावसाळा, असे आपण म्हणतो खरे पण पावसाळ्याचे आगमन ही आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवणारी घटना असते. आपण आयुष्याचे मोजमापही किती पावसाळे पाहिले यावरून करतो,  यातच  ह्या वर्षाऋतुचे महत्त्‌व स्पष्ट व्हावे.  अशा ह्या वर्षाऋतूविषयी प्राचीन काळापासून जे चिंतन संस्कृत साहित्यात करण्यात आले आहे ते आपण पाहिले.

कालिदास म्हणतो त्याप्रमाणे “मेघालोके भवति सुखिनो पि अन्यथावृत्तिचेत:”. आकाशात ढग दिसू लागले की स्वस्थचित्त माणसाच्या मनातही अनामिक हुरहूर दाटून येते. काहीतरी वेगळे वाटते. मग आपोआपच पावसाचे स्वागत करायला, वर्षा सहल करायला किंवा चहा-भजीचा आनंद घ्यायला सरसावतो. पण “उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी” हेही ध्यानात घ्यायला हवे. म्हणूनच पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्‌वाच्या टिप्स–

हात – पाय स्वच्छ धुणे – आपल्याला लहान असल्यापासून शिकवलेले आहे, बाहेरुन आल्यावर हात पाय धुणे. आपण प्रवासात, बस, ट्रेन मध्ये चढता- उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, प्रत्येक जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. आजकाल आपल्याला hand sanitizer सहज उपलब्ध असतात. ते जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वापर करा.

– ताप वा कोणत्याही प्रकारच्या आजाराचे योग्यवेळी निदान व्हायला हवे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर आवश्यक चाचण्या केल्याशिवाय आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका

– पाणी तुंबल्यानंतर लेप्टो होण्याचा धोका असतो. त्यामुळे साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे

– पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे- आरोग्याची काळजी खूप महत्त्वाची आहे. पावसाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. बॅक्टेरिया, वायरसेसचे वाढलेले प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले उकळलेले नसते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माशी बसून ते अन्न दूषित करतात. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळावे.

– डासांपासून सुरक्षित राहा – पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठवणार्‍या क्रीम [mosquito  repellent] चा वापर करा. तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू, मलेरिया सारखे आजार पसरतात

-पाणी उकळून प्या आणि त्याचे प्रमाण वाढवा – पावसाळ्यात कमी तहान लागते, त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी, शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेवून, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

– योग्य आहार घ्यावा- पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

– दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेये घेणे जास्त चांगले. पावसाळ्यात बाजारातील शीतपेय पेय घेणे टाळावे. शीतपेय शरीरातील खनिज साठा कमी करतात, त्यामुळे शरीरातील enzyme activity  कमी होते, ज्यामुळे पचनसंस्थे वरचा ताण वाढतो.

ह्या बारीकसारीक सवयींची काळजी घ्या आणि निरोगी राहून ह्या वर्ष ऋतूचा मनसोक्त आनंद लुटा.