विवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का? विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का? मुहूर्त नसताना “काढीव” मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण विचारीत असतात. अर्थात पुढे त्या संसारांचे काय होते याविषयी अजून कोणीही संशोधन केलेले नाही. आपल्याकडे विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो. विवाह कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावे, वधुवरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाहाच्या वेळी आप्तेष्ट मित्रमंडळी वधू-वरांना शुभाशीर्वाद, शुभेच्छा देत असतात. विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.
विवाह संस्कार
गृहस्थाश्रम हा सर्व आश्रम धर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम धर्माचरणाची योग्यता विवाह संस्कारानेच प्राप्त होते. विवाह विधींमध्ये विवाह होम आणि गृह प्रवेशनीय होम हे दोन प्रमुख विधी सूत्रकारांनी सांगितलेले आहेत. विवाह होमामध्ये होम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्नि प्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. गृह प्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधुला उपदेश आणि देवताप्रार्थना हे विधी असतात. तसेच पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, मंडप देवता स्थापन, वाग्दान, सीमांतपूजन, ऐरणी पूजन इत्यादी धार्मिक विधी संस्कार ही केले जातात.
या प्रमुख विधींखेरीज अक्षत, घाणा भरणे, साखरपुडा, उष्टी हळद, केळवण, तेलसाडी, तेलफळ, रूखवत, सूनमुख, व्याहीभोजन, रासन्हाणे, विडे तोडणे, रंग खेळणे, झेंडा नाचवणे वगैरे लौकिक विधी विवाह समारंभात केले जातात. भारतातील प्रत्येक राज्यात विवाह विधींमध्ये कालमानाप्रमाणे आणि स्थानिक कुलाचाराप्रमाणेही बदल झालेले आढळतात.
विवाह मुहूर्त
“काल: शुभक्रियायोगी मुहूर्त: इति कथ्यते।” म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या “विद्यामाधवीय” या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे. ऋग्वेदात “दिवस सुदिन असताना” असा उल्लेख आढळतो.
महत्त्वाची गोष्ट ही की, प्रत्येक शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. विवाह मुहूर्तांचे खूप नियम सांगण्यात आले आहेत. त्याला अपवादही सांगण्यात आले आहेत. ते अपवाद गृहीत धरून पंचांगात विवाह मुहूर्त देण्यात येतात. श्रौत, गुह्य-धर्म सूत्रात, मुहूर्तमार्तंड, मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त गणपती इत्यादी अनेक ग्रंथांमधून केवळ मुहूर्त विषयक सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या कालाला चातुर्मास म्हणतात. हे दिवस पावसाळ्याचे शेतीच्या कामांचे असतात. प्रवास करणेही कठीण जात असते. चातुर्मासात विवाह मुहूर्त दिलेले नसतात. तसेच नियमांप्रमाणे विवाहयोग्य शुभ दिवस आणि शुभवेळ काढली जाते. पंचांगे आणि दिनदर्शिकांमधून विवाह मुहूर्त दिलेले असतात. हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही “काढीव मुहूर्त” वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात.
पंचांग – दिनदर्शिकांमध्ये विवाह मुहूर्ताची जी वेळ दिलेली असते त्या शुभवेळी पाणिग्रहण, कन्यादान, सप्तपदी यापैकी एखादा विधी केला जातो. काही पुरोहित मंगलाष्टके संपवून या शुभवेळी अंतरपाट दूर करून वधुवरांना एकमेकांना फुलांच्या माळा घालायला सांगतात. महाराष्ट्रात शुभमुहूर्ताच्या शुभवेळा दिवसाच्या असतात. परंतु गुजरात आणि उत्तर भारतातील काही राज्यात शुभवेळा रात्रीच्या असतात. त्या विवाह सोहळ्यात हस्तमिलाप आणि वधुच्या केसांमधील भांगामध्ये वर सिंदूर भरतो याला विशेष महत्त्व दिले जाते.
आधुनिक काळात कधीकधी काही कार्यात विवाह मुहूर्ताची वेळही पाळली जात नाही हे ही खरे आहे.
काही कार्यात वधुला मेकअप करायला, सजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शुभमुहूर्त वेळ चुकते. तर काही कार्यात नवरा मुलगा मिरवणुकीने मंगलकार्यात येत असतो. वर्हाडी नाचत नाचत येत असल्याने मिरवणुकीला उशीर होतो, मुहूर्ताची वेळ टळून जाते. काही कार्यात अंतरपाट दूर होताच माळ घालण्यापूर्वी उत्साही वर्हाडी वधुवरांना उंच उचलतात. कधी कधी रंगाचा बेरंगही होतो. काही कार्यात एक मंगलाष्टक झाल्यावर पुरोहित थांबतात. वधू पालखीत बसून वेगळ्याच संगीताच्या तालावर कार्यालयात प्रवेश करते. नंतर पुन्हा मंगलाष्टकांना सुरुवात केली जाते. मुहूर्तवेळ चुकते. काही कार्यात नवरा मारूतीचे दर्शन घेऊन यायचा असल्याने उशीर होतो. म्हणून काही कार्यालयांनी कार्यालयातच गणपती आणि मारूती यांची मंदिरे उभारली आहेत.
अनेक लोक विवाह शुभमुहूर्त वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाह विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. जमलेले आप्तेष्ट मित्र आशीर्वाद, शुभेच्छा देतात.
शेवटी विवाहकार्यात मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो एक महत्त्वाचा कौटुंबिक आनंद सोहळा असतो. महत्त्वाचा संस्कार असतो.