यावर्षी १८ जुलै पासून १६ ऑगस्ट पर्यंत अधिक श्रावण महिना आलेला आहे.

अधिकमासाला “पुरुषोत्तम-मास” असेही म्हणतात. अधिकमास कसा व का येतो हे आपण आज पाहणार आहोत. तसेच अधिकमासात काय करावयाचे असते याचीही माहिती आपण घेणार आहोत.

प्राचीनकाली शास्रकारानी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “आरोग्य” हे ओळखले होते. माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य जर चांगले असेल तर जीवन सुखी व आनंदी होऊ शकते हे जाणले होते. शरीराचे आरोग्य प्रामुख्याने आहावर अवलंबून असते. माणसाने जर ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी बरेच लोक आजारी पडतात कारण ते बदलत्या ऋतूप्रमाणे आहारात बदल करीत नाहीत. ऋतूप्रमाणे जर सण राहीले तर सणांप्रमाणे माणसे आहारात बदल करतील आणि त्यांच्या शरीराचे आरोग्य चांगले राहील. परंतू ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून आपल्या पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्यात आलेला आहे. त्यामुळे ठराविक सण ठराविक ऋतूत येतात.

उपवास करण्याचा श्रावण महिना पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असल्याने माणसे बराच वेळ घरात असतात. साहजिकच शरीराचे चलन वलन कमी असल्याने शरीराला हलक्या आहाराची जरूरी असते. उपवासात हलके म्हणजे पचनास सुलभ असे पदार्थ आपण खातो. त्यामुळे शरीरातील मांद्य कमी होते. शरीर चपळ राहते. आधुनिक कालात शरीराचे मांद्य कमी करण्यासाठी “डाएटींग” करतात ना, हाच उद्देश त्यामागे असतो. पावसाळयात भूकही कमी लागते हलका आहार घेणे जरूरीचे असते. श्रावण महिना पावसाळ्यात आल्याने धार्मिक कारणाने माणसे उपवास करतात साहजिकच त्याचा शरीराच्या आरोग्यास फायदा होतो. थंडीत आपल्या शरीरास स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते, तसेच थंडीच्या मोसमात भूकही जास्त लागते म्हणून दीपावलीसारखा सण थंडीत येत असतो. संक्रांतीचा सणही थंडीत येतो त्यावेळी आपण तिळगूळ खातो. थंडीत शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यकता असते. उत्सवांमुळे मनाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उत्सवात माणसे दु:ख, चिंता विसरून जातात. आनंदी होत असतात.

चांद्रसौर मेळ: पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.  ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनेही समजून घेता येईल. तीस तिथींचा एक चांद्रमास होतो व ३६० तिथींचे (म्हणजेच बारा चांद्रमासांचे) एक चांद्रवर्ष होते. एका सौरवर्षाच्या काळात तशा सुमारे ३७१ तिथी होतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षी ११ तिथी शिल्लक राहून ३० तिथी झाल्या की अधिकमास येऊन चांद्र आणि सौर पद्धतीचा म्हणजेच ऋतू आणि सण यांचा मेळ राखला जातो. जेव्हा अधिकमास येतो त्यावेळी तेरा महिन्यांचे म्हणजे ३९० तिथींचे एक चांद्रवर्ष असते.

एकदा अधिकमास आल्यापासून मध्यम मानाने साडेबत्तीस चांद्रमहिन्यांनी पुन्हा अधिकमास येतो. स्पष्ट मानाने दोन अधिक मासांमध्ये कमीतकमी २७ महिने व जास्तीत जास्त ३५ महिने अंतर असते.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व फाल्गुन या ९ महिन्यांपैकी कोणताही महिना अधिकमास होऊ शकतो. गंमतीने सांगायचे तर जर चाकरमान्यांचा पगार चांद्रमहिन्यांप्रमाणे देण्यात येत असता तर एका वर्षात तेरा आणि दिवाळीच्या बोनसचा एक जादा म्हणजे चौदा पगार मिळाले असते.

क्षयमास: चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल झाला नाही की जसा अधिकमास येतो तसेच कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्याचा दोनदा राशीबदल  होतो त्यावेळी “क्षयमास” येतो. कार्तिक मार्गशीर्ष आणि पौष या तीन महिन्यांपैकी कोणताही क्षयमास होऊ शकतो. माघ हा महिना कधीही क्षय किंवा अधिकमास होत नाही. अर्थात या गोष्टी सूर्यगतीवरच अवलंबून आहेत. क्षयमास साधारणत: १९ किंवा १४१ वर्षांनी होतो. ज्यावर्षी क्षयमास येतो त्यावर्षी अधिकमासही येतो. शके १९०४ मध्ये (सन १९८३ मध्ये) पौष महिना क्षयमास होता. त्यावर्षी फाल्गुन अधिकमास आला होता. आता यानंतर शके २०४५ मध्ये (सन२१२३ मध्ये) मार्गशीर्ष क्षयमास येणार असून आश्विन अधिकमास येणार आहे.

अधिकमासात काय करावे?

अधिकमासात संपूर्ण दिवस उपवास, किंवा एक वेळ भोजन करावे. देवापुढे अखंड दीवा लावावा. ३३ अपूप म्हणजे अनारसे यांचे दान करावे ३३ अनारसे भगवान विष्णूला अर्पण करावेत असे सांगितले आहे. परंतु जावई हा विष्णूसमान मानला जातो. म्हणून अधिकमासात जावयाला ३३ अनारशांचे दान देण्याची प्रथा सुरु झाली असावी. इथे ३३ अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन वर्षात वाढल्या गेलेल्या तेहतीस तिथी मानल्या जातात.

अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावी. मात्र काम्य कर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. केल्यावाचून गती नाही अशी कर्मे अधिकमासात करावयास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिकमासात करु नये असे सांगण्यात आले आहे.

दान करा!

अधिकमासात दान करावे असे सांगण्यात आले आहे. भारतीय संस्कृतींत दानाचे विशेष महत्व आहे. दान म्हणजे “डोनेशन” नव्हे. डोनेशन कोणी दिले आणि डोनेशन काय दिले ते जाहीर केले जाते. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले ते गुप्त ठेवायचे असते. एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हातालाही कळता कामा नये असे म्हटले जाते. अधिकमासाच्या निमित्ताने समाजातील गरजू गरीब लोकांना तसेच सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना मदत मिळावी हा त्यामागच उद्देश आहे.

संस्कृतमध्ये दानासंबंधी सुंदर सुभाषित आहे.

गौरवं प्राप्यते दानात्‌, न तु वित्तस्य संचयात्‌।

स्थितिरुच्चै: पयोदानां, पयोधीनामध: स्थिति:॥

– “दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. धन साठविल्याने नव्हे. जसे (पाणी देणार्‍या) ढगाचे स्थान आकाशात उंचावर असते. परंतु (पाणी साठविणार्‍या) समुद्राचे स्थान खाली (खड्डयात) असते.”

कविवर्य विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे – “देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे!” महर्षी व्यास आणि संत तुकारामानी म्हटले आहे. “इतरांना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते आणि इतरांना त्रास दिल्याने पाप लागते.”

संस्कृतमध्ये आणखी एक सुभाषितकार म्हणतात – दानेन तुल्यो विधिरस्ति नान्य:।

लोभाच्च नान्यो ऽ स्ति रिपु: पृथिव्याम्‌॥

विभूषणं शीलसमं न चान्यत्‌।

संतोष तुल्यं धनमस्ति नान्यत्‌॥

“दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही. लोभासारखा दुसरा शत्रु नाही. चारित्र्यासारखा दुसरा उत्कृष्ट अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही.” या अधिक श्रावण महिन्यात अन्नदान, वस्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान, अनरसे दान कराच.

शिवाय रक्तदान, नेत्रदान – अवयव दानाचा संकल्प करता येईल. आपण आनंदाने, समाधानाने जगायचेच आणि जास्तीत जस्त लोकांच्या जीवनात आनंद-समाधानाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करावयाचा हाच श्रावण अधिक महिन्याचा संदेश आहे.

या पुढील अधिकमास असे येणार आहेत.

१. १७ मे ते १५ जून २०२६ – ज्येष्ठ

२. १६ मार्च ते १३ एप्रिल २०२९ – चैत्र

३. १९ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०३२ – भाद्रपद

४. १७ जून ते १५ जुलै २०३४ – आषाढ

५. १६ मे ते २३ जून २०३७ – ज्येष्ठ

६. १९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०३९ – आश्विन

७. १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०४२ – श्रावण

८. १७ मे ते १५ जून २०४५ – ज्येष्ठ

९. १५ मार्च ते १३ एप्रिल २०४८ – चैत्र

१०. १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०५० – भाद्रपद अधिकमास येणार आहेत.