१९२२ ते २००२ असे ऐंशी वर्षांचे आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ जुलै २०२१ रोजी सुरु होत आहे. वसंत बापट यांची मुख्य ओळख आहे ती कवी म्हणून आणि बापट-करंदीकर-पाडगावकर हे कवी त्रिकुट १९६० नंतरची तीन दशके मराठी साहित्यात तेजाने तळपत होते.
एखाद्या बहुआयामी व्यक्ति-मत्त्वाचे वर्णन आपण अष्टपैलू असे करतो. बापटांच्या बाबतीत हे विशेषण ही तोकडे पडावे – प्राध्यापक, कवी, शाहीर, गीतकार, समीक्षक, संपादक, कार्यकर्ता, वक्ता, जाहिरातलेखनदार.. किती सांगावे.
धारवाड महाविद्यालय, नॅशनल महाविद्यालय, बांद्रा आणि रुईया महाविद्यालय माटुंगा अशा विविध शैक्षणिक संस्थांमधून त्यांनी ३५ हून अधिक वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. १९८३ ते १९९८ “साधना” साप्ताहिकाचे सहसंपादकपद सांभाळले, १९४६ ते १९८१ राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाची जबाबदारी सांभाळताना “महाराष्ट्र दर्शन”, “भारत दर्शन”, “आझादी की जंग”, “शिवदर्शन”, “गोमंतक दर्शन” इत्यादी कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन व निर्मिती केली. “पुढारी पाहिजे”, “बिनबियांचे झाड”, “गल्ली ते दिल्ली” या वगनाट्यांत भूमिका; “श्यामची आई”, “उंबरठा” या चित्रपटांसाठी गीतलेखन; भारतात व विदेशात काव्यवाचनाचे कार्यक्रम; “सुंदरा मनामध्ये भरली” या अमेरिकेत सादर झालेल्या कार्यक्रमासाठी लेखन; साधना ट्रस्ट, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती, साने गुरुजी आरोग्य मंदिर, सांताक्रुझ या संस्थांचे अनेक वर्षे विश्वस्त; साहित्य अकादमी, संगीत अकादमी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली; महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ, तसेच चित्रपट सेन्सॉर मंडळ ह्या संस्थांचे ते सदस्य होते.
वसंत बापट ह्यांचे पूर्ण नाव – विश्वनाथ वामन बापट. २५ जुलै १९२२ रोजी त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठी कर्हाड येथे झाला. बापट कुटुंबियांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप. त्यांचे घराणे मुळातच शास्री-पंडितांचे. त्यांचे वडील वामनराव हे न्यायाधीश होते. त्यांना विद्यार्थी असताना संस्कृत भाषेतील प्राविण्यासाठी अत्यंत मानाची समजली जाणारी जगन्नाथ शंकर शेट स्कॉलरशिप मिळाली होती. त्यामुळे साहजिकच घरातील वातावरण विद्याप्रेमी, संस्कृतप्रेमी होते.
ह्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वसंत बापटांचे आयुष्य आजच्या तरुणाईने समजून घ्यायला हवे. पॅशन हा अलीकडे परवलीचा शब्द झाला आहे. ज्याला आपण मराठीत मनस्वी म्हणूया. मन ओढ घेईल ती गोष्ट व्यावहारिक बाबींचा विचार न करता करणे, चाकोरी मोडणे असा साधारण अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. तर वसंत बापट नावाच्या तरुण मुलाने काय केले नाही? १९४२ ला स्वातंत्र्ययुद्धासाठी पुकारा होताच देशासाठी मागचा पुढचा विचार न करता, घरचा विरोध पत्करून, स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली.
लाँड्रिचे कपडे देऊन येतो असे घरच्यांना सांगून भूमिगतच होण्याचे अॅडवेंचर त्यांनी केले. समविचारी मुलीबरोबर प्रेमविवाह करण्याचा रोमँटिकपणा केला. बेळगावला उत्तम नोकरी मिळालेली असताना नाटक-संगीत याचा आनंद घेता यावा, मनाजोगतं जगता यावे म्हणून हातच्या नोकरीचा राजीनामा देण्याचा समाजाच्या दृष्टीने गुन्हाही केला. भारत दर्शन कार्यक्रम करायचा तर आजचा युट्यूबर कंटेंट शोधायला भटकंती करतो तशी एक-दोन महिने नाही वर्षभर भटकंती केली.
आज जमाना इवेंट मॅनेजमेंटचा आहे असे आपण म्हणतो. मोठ-मोठे सोहळे आयोजित करणे, त्यासाठी कलाकारांची मोठी संख्या, त्यांचे आयोजन, संगीत ही सगळी तारेवरची कसरत चर्चेचा विषय ठरते. मराठी बाणा सारखे कार्यक्रमांचे यश याबाबत उल्लेखनीय आहे. त्याचे अनुकरण आजकाल मराठी वाहिन्याही करू पाहतात. पण ह्या सगळ्याची गंगोत्री म्हणावी तर ती वसंत बापटांच्या प्रयत्नात आहे. महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, शिवदर्शन, आझादी कि जंग हे त्यांच्या कल्पनेतून साकार झालेले सोहळे. लेखन, अभिनय, दिग्दर्शक आणि संघटक ह्या सगळ्याच आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी बजावली. पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहिजे ह्या वगनाट्याचे दिग्दर्शन त्यांचे होते आणि त्यात ते प्रमुख भूमिकाही करत. एका प्रयोगाला पंडित जवाहरलाल नेहरूंची उपस्थिती लाभली होती. त्यांना वसंत बापटांचा रांगडा अभिनय इतका भावला की हा माणूस प्राध्यापक आहे ह्यावर त्यांचा विश्वासच बसेना.
असाच एक मजेचा प्रसंग बिन बियांचे झाडच्या एका प्रयोगादरम्यान घडला. त्यात ते राजाची भूमिका करत असत. राजाला गाढवाचे कान फुटतात ह्या भोवतीच नाटकाचे कथानक गुंफलेले. गंमत म्हणजे ऐन प्रयोगात रबर बॅन्डने लावलेले कान उडून खाली पडले. आता आली का पंचाईत? आता काय करावे? पण प्रसंगावधान राखून वसंत बापट म्हणाले, बघा प्रधानजी, ही अशी अडचण झाली आहे अलीकडे. गाढवाचे कान येतात, गळून पडतात आणि पुन्हा येतात हो!” त्यामुळे प्रेक्षकांना झालेला गोंधळ न कळता प्रसंग पार पडला. लोककलांसाठी लागणारा उत्स्फूर्तपणा त्यांच्याकडे असा उपजतच होता. म्हटलं तर विद्वतसभेत वाहवा घेईल आणि म्हटलं तर परावरच्या माणसाबरोबर चतुराईच्या गोष्टी करण्यात रमेल अशी त्यांची प्रतिभा.
त्यांचा स्वभाव माणुसवेडा होता. ते माणसांचे लोभी होते. आयुष्य आसोशीने जगण्यावर त्यांचा भर होता. कोरडी विद्वत्ता नव्हे तर रसरसशीत संतत्वाचा आदर्श त्यांच्या समोर होता. त्यांची भूमिका जणू कीर्तनकाराची होती. लोकांशी सहज संवाद साधणे, त्यांच्या मनात मूल्यांची ज्योत जागवणे त्यांना सहज शक्य होई. त्यांच्या गाजलेल्या समूहगीतातून त्यांना समाजमनाचे कसे भान होते, याचा सहज अंदाज येतो. मग ते चीन युद्धाच्या वेळी लिहिलेले “उत्तुंग आमची उत्तरसीमा इंच इंच लढवू” असू दे की “शिंग फुंकले रणी, वाजतात चौघडे” सारखे गीत असो.
दख्खन राणीच्या बसून कुशीत…….शेकडो पिले ही चालली खुशीत……ह्या शेकडो पिलांपैकीच आपण.
आपण मनाने खुरटी होऊ नये हा संस्कार बापटांची कविता कळत नकळत राहते. त्यांची बरीचशी कविता ही काहीतरी सांगण्यासाठी लिहिली गेली असूनही प्रचारकी वाटत नाही कारण ती आंतरिक उमाळ्यातून येते.