नवीन वर्षाचे स्वागत करत असताना आपण निश्चितच मनाशी संकल्प करतो. हे वर्ष कसे जावे, त्यामध्ये आपल्याला काय काय साध्य व्हावे याविषयी मनात आखणी करतो. अनेकदा ते कागदावर मांडतो. हे करणे योग्यच आहे कारण आपले ध्येय निश्चित केल्याशिवाय आपण त्यापर्यंत पोहचण्याचा रस्ता कसा ठरवणार? हे नवे वर्ष म्हणजे एक नवी संधी आहे. गेल्या वर्षी काय काय कमावले ह्याचा आनंद आहे आणि तो आपण साजरा करतो आहोत. त्याच बरोबर काय राहून गेले किंवा नव्याने काय हवे आहे ह्याचाही वेध घेत आहोत.
नवीन वर्षाचे संकल्प काय असावेत? असा जर विचार केला तर प्रामुख्याने ते तीन घटकात विभागता येतात. १. व्यक्तिगत संकल्प २. कामाशी निगडीत किंवा विद्यार्थीवर्गासाठी अभ्यासाशी निगडीत संकल्प आणि ३. कौटुंबिक संकल्प
अनेकदा आपला अनुभव आपल्याला हे सांगतो की वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहाने केलेले संकल्प वर्षभर काय पहिला महिना संपता संपता विरुन जातात. प्रयत्न, त्यातील सातत्य कमी पडते. आणि काही महिन्यांनी आपण निराश होतो आणि तो विचारच सोडून देतो. मग वर्षभर लिहिण्यासाठी आणलेली डायरी धूळ खात पडते, उत्साहात घेतलेली जिमची अॅन्युअल मेंबरशिप वाया जाते, कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा ठरवलेला असतो पण ऑफिसमध्ये सतत काहीतरी घडत राहते आणि ठरवलेले प्लॅन्स कॅन्सल होत राहतात. कुठल्या तरी एखाद्या अवघड प्रसंगात लक्षात येते, अरे ती वर्षाच्या सुरवातीला ठरवलेली गोष्ट केली असती तर?….तुमचाही अनुभव थोड्याफार फरकाने असाच आहे ना? नो प्रॉब्लेम. हे वर्ष अपवाद ठरवू या. या वर्षीचे संकल्प प्रत्यक्षात उतरवू या. स्वप्न साकार करू या. आता तुम्ही विचाराल, ही जादू कशी घडणार आहे? तर जादू नाही आपण सवयींचे शास्र समजून घेऊया. कारण आपल्या संकल्पाच्या यशासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही बदल करणे अपेक्षित असते. म्हणजेच दुसर्या शब्दात आपल्या काही जुन्या सवयी सोडायच्या असतात आणि काही नवीन सवयी लावून घ्यायच्या असतात. ह्या साठी आधी आपण सवयी कशा अंगी बाणवायच्या ह्याचा विचार करूया. या संदर्भात आपण सर्वसामान्यपणे काय चुका करतो त्याचाही विचार करूया.
छोटी सुरवात
आपल्या डोळ्यासमोर जरी मोठे ध्येय असले तरी आपल्याला एकदम शिखरावर झेप घेणे शक्य नाही. पण शिखराच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल महत्त्वाचे आहे. ह्या बेबी स्टेप्सचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. अनेकदा आपण इथेच गल्लत करतो. म्हणजे मी रोज एक तास व्यायाम करेन असे आपण ठरवतो. सवय नसल्यामुळे अर्ध्या तासात दमतो. मग एक तर आपण तिथेच थांबतो किंवा कसाबसा रेटून त्या दिवशी तास पूर्ण करतो. मग दुसर्या दिवशी अंग दुखते. मग जायचा कंटाळा. हो न? आता हेच जर आपण छोट्या गोष्टीपासून सुरवात केली तर रोज अर्धा तास व्यायाम करुन सुरवात केली तर? एक तर ते सोपे वाटेल. हळूहळू
स्टॅमिना वाढेल. मग तीस मिनिटाची पंचेचाळीस मिनिटे करणे फार अवघड जाणार नाही. आणि आपण तासभर व्यायामाला कधी स्थिरावलो हे लक्षातही येणार नाही.
हे सगळ्याच बाबतीत लागू करता येते.
तुम्हाला वाचन करायचे आहे. रोज दहा पाने वाचून सुरवात करा.
लिखाण करायचे आहे. एकदम दहा हजार शब्द एका दिवसात नाही लिहून होणार. ३०० शब्द रोज लिहून सुरवात करता येईल.
गाण्याचा / नृत्याचा रियाज करायचा आहे. अभ्यास करायचा आहे. दिवसभरातली २० मिनटे निश्चित करा.
कुटुंबाला वेळ द्यायचा आहे तर मोठ्या कौटुंबिक सुट्टीचा विचार करताना रोज दहा मिनिटे एकत्र काढता येतील का हे तपासा.
म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबाचे मोल लक्षात घ्या. सुरवात छोटी असेल पण परिणाम मोठा साधला जाणार आहे.
स्वतःचे कौतुक करा
आपण अनेकदा स्वतःचे सगळ्यात वाईट निंदक असतो. स्वतःच्या चुका आपल्याला ठळकपणे दिसतात. त्यासाठी आपण मनातल्या मनात स्वतःलाच दोषही देतो. पुष्कळवेळा स्वतःचे कौतुक करायला मात्र विसरतो. स्वतःचे कौतुक करुन बघा.
जेव्हा आपण एखादी गोष्ट केल्याबद्दल स्वतःची पाठ थोपटतो तेव्हा किती छान वाटते ह्याचा अनुभव घ्या.
हे कौतुक करण्यातला एक अंतर्गत मुद्दा हा की त्यासाठी स्वतःची प्रगती तपासा त्याचा रेकॉर्ड ठेवा. आजकाल ह्यासाठी अनेक अॅपस् आपल्या मोबाईलवर विनामूल्य उपलब्ध असतात. आपण आठवडाभर एखादी गोष्ट सतत केली की तो आठवड्याचा आलेख बघताना काही मिळवल्याची जी अनुभूती आहे तीच तुमची पुढील आठवड्याची प्रेरणा ठरणार आहे.
– डॉ. समिरा गुजर–जोशी
मकर संक्रांती
॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्री सरस्वत्यै नम: ॥
श्री शके १९४३ प्लवनाम संवत्सरे, विक्रम संवत २०७८ पौष शुक्ल द्वादशी, रोहिणी नक्षत्रात, ब्रह्मा योग सुरु असताना, बालव करण सुरु असताना शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार आहे. या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ शुव्रÀवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी दुपारी २.२८ पासून सूर्यास्तापर्यंत आहे. ही मकर संक्रांती बालव करणावर होत आहे. म्हणून वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे. दूध पीत आहे. सर्पजाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वारना व मिश्रा असून नक्षत्र नाव नंदा आहे. सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. उत्तरेकडून येऊन दक्षिणेकडे जात आहे. आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे.
संक्रांतीपर्वकाळामध्ये दान प्रकार : संक्रांतीच्या पुण्यकाळात नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ भरलेले भांडे, तीळ, लोकरीचे वस्र, तूप, सोने, भूमी, गाई, कपडे इत्यादी दाने द्यावीत असे सांगण्यात आले आहे.
नम्र विनंती : दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी काही चुकीच्या अफवा पसरविल्या जातात. तरी कुणीही त्यावर विश्वास ठेवू नये आणि अशा अफवा पसरवू नयेत.