संगीततज्ञ अशोक रानडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे कर्नाटकाने महाराष्ट्राला अनेक गोष्टी दिल्या, ज्या महाराष्ट्राच्याच होऊन गेल्या. या मध्ये कर्नाटकाने जसा विठ्ठल दिला, तसा विठ्ठलभक्त स्वरही दिला, शास्रीय संगीत जाणणार्‍या जाणकारापासून दुर्गम भागातल्या एखाद्या खेडूतापर्यंत सर्वांना प्रभावित करणारा हा स्वर म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी.

४ फेब्रुवारी १९२२ रोजी त्यांचा जन्म कर्नाटकात झाला.  गदग हे त्यांचे गाव. आजोबांच्या नावावरून त्यांचे नाव भीमसेन ठेवण्यात आले. त्यांच्या गायकीच्या अफाट आवाक्याने त्यांनी हे नाव सार्थ केले. किराणा घराण्याच्या गायकीचा त्यांचा आविष्कार अभूतपूर्व होताच. त्यांच्या अभंग गायनाने सारेच नादावले. वारकरी संप्रदायाच्या गायन परंपरेला एक वेगळाच आयाम त्यांनी मिळवून दिला. जेष्ठ संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी गायलेल्या  अभंगांनी  लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. भारतीय संगीत ऐकणारे कान त्यांनी जगभर निर्माण केले. पु. ल. देशपांडे त्यांचा परिचय करुन देताना गमतीने म्हणायचे हे सवाई गंधर्वांचे शिष्य पण यांना “हवाई गंधर्व” हीच उपाधी शोभून दिसेल. अर्थात परदेश प्रवासाबरोबर संपूर्ण भारतभर त्यांचे गायन झाले. आपल्या गुरुच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी “सवाई गंधर्व महोत्सव” सुरू केला. आज देशभरातली शास्रीय संगीताच्या चाहत्यांसाठी आणि कलाकारांसाठी सवाई महोत्सव म्हणजे “गानपंढरी” आहे.

भीमसेन लहान असताना आईच्या गोड गळ्यातून भजनं ऐकून त्यांच्या मनात सुरांची गोडी निर्माण झाली. पण आपण गाणं शिकलंच पाहिजे हा ध्यास त्यांच्या मनाने घेतला तो अब्दुल करीम खांसाहेब यांची “पिया बिन” ही रेकॉर्ड ऐकल्यानंतर! त्यांच्या गावातील एक दुकानदार ही रेकॉर्ड आपल्या दुकानात सतत वाजवायचा. मोहिनी पडल्यासारखे भीमसेनही ती रेकॉर्ड तासन्‌ तास ऐकायचे. शाळा सोडून तिथेच जाऊन बसायचे. आपल्यालाही असे गाता आले पाहिजे असा त्यांच्या मनाने निश्चय केला. तो काळ असा होता की मुलाने नाटकात जाणे, गाणे गाणे ह्या गोष्टींना प्रतिष्ठा नव्हती. भीमसेनजींच्या वडिलांची इच्छा देखील त्यांनी आधी ग्रॅज्युएशन पूर्ण करावे अशी होती. पण स्वरवेड्या भीमसेनला इतका धीर धरणे शक्य नव्हते. बारा-तेरा वर्षांचा भीमसेन चक्क घरातून पळून गेला. जवळ पैसे नाहीत, कुठे जायचे ठाऊक नाही. पण संगीतावरील प्रेमापोटी त्याने हे धाडस केले होते.  गदग ते ग्वाल्हेर असा प्रवास त्यांनी रेल्वेने लपतछपत, विदाऊट तिकीट प्रवास करत केला. प्रवासात ते गाणे म्हणत. लोक गाणे ऐकून पैसे देत, जेवण देत. एकदा तर विनातिकीट प्रवास करताना त्यांना पकडण्यात आले. शिपायाने त्यांचे गाणे ऐकले मात्र आणि खुश होऊन त्यांना सोडून दिले. असा त्यांचा गाण्यासाठीचा प्रवास सुरू होता. त्यांना शोध होता तो गाण्याची दीक्षा देऊ शकेल अशा गुरूचा.  असाच प्रवास करत ते पंजाबमध्ये जालंदरला पोहचले. तिथे “आर्य संगीत विद्यालय” होते. तिथे भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. त्यांच्याकडे शिकायला त्यांनी सुरवात केली. तिथे “हरी वल्लभ का मेला” नावाचा संगीत महोत्सव भरायचा. देशभरातून तिथे गायक येत. महाराष्ट्रातूनही येत. तिथे भीमसेन गायकांच्या मागे साथीला तंबोरा घेऊन बसत. एकदा जेष्ठ शास्रीय गायक विनायकबुवांनी त्यांना पाहिले. ते म्हणाले, “अरे गाणंच शिकायचं असेल तर इथे काय करतोस? तुझ्या घराजवळच तर गुरु आहेत.” अशाप्रकारे गुरूचा शोध पूर्ण होऊन ते  कुंदगोळला रामभाऊ म्हणजेच सवाई गंधर्व ह्यांच्याकडे गाणे शिकू लागले. अर्थात तो काळ गुरुशिष्य परंपरेने शिकण्याचा होता. आजच्या क्लासेस मध्ये गाणे शिकण्याच्या काळात त्यावेळेसच्या वातावरणाची कल्पना करता येणेही अवघड आहे. पहाटे विहिरीवरून पाणी भरण्यापासून दिवसाला सुरवात व्हायची. ह्या गुरुसेवेतून तोच ताऊन सुलाखून बाहेर पडायचा, ज्याची गाण्याची जिद्द तशीच प्रचंड असायची.

आजही त्यांच्या पहिल्या जाहीर बैठकीची आठवण जुने जाणते सांगतात. ती बैठक पुण्याला झाली होती. पंडितजींनी मियामल्हार सुरू केला आणि बाहेर धो धो पाऊस पडू लागला. तानसेनची कथा खरी झाली असेच त्यावेळेस श्रोत्यांना वाटले. त्या पावसाळी मेघांआडून एका स्वरभास्कराचा उदय होत होता. आज कल्पना केली तरी रोमांचित व्हायला होते की ह्या मैफिलीला पेटीवर पु. ल. देशपांडे होते. वसंतराव देशपांडेही तिथे होते. ह्या तिघांचे विलक्षण मैत्र होते. ह्या त्रिकूटाचे गाणे म्हणजे ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेले “इंद्रायणी काठी देवाची आळंदी” भीमसेनजींनी गायलेल्या ह्या अभंगाला चाल
पु. ल. देशपांडे यांची तर ऑर्गन साथ वसंतराव देशपांडे यांची. वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी ह्यांच्या मैत्रीचा हा किस्सा तर निव्वळ अफलातून म्हणावा असा. “कट्यार काळजात घुसली” या नाटकात वसंतरावांना तबला-साथ करायचे नाना मुळे. एकदा पंडितजी त्यांना आपल्या साथीला मंगळुरला घेऊन गेले. दुसर्‍या रात्री सोलापूरला कट्यारचा प्रयोग होता. मंगळुरमध्ये मैफल संपल्यावर त्यांनी नाना मुळेना घेऊन गाडी सुरू केली. स्वतः
नॉनस्टॉप गाडी चालवत मित्राच्या तबलजीला सोलपुरात आणून सोडला. इतकंच नव्हे तर हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे मडके, तिळकूटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन “ए बुवा, येता येता हुबळीला ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा आणि रात्री हे चेपा पोटात.” असा दम भरून ते पुण्याला रवाना झाले.

जेष्ठ संगीतकार पद्मविभूषण श्रीनिवास खळे यांनी दोन भारतरत्न अर्थात पं. भीमसेन जोशी आणि गान सरस्वती लता मंगेशकर ह्यांना “राम शाम गुण गान” ह्या ध्वनीमुद्रिकेच्या निमित्ताने एकत्र आणून रसिकांना आनंद ठेवा प्राप्त करुन दिला. शिवाय “सावळे सुंदर रूप मनोहर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, जे का रंजले गांजले, आरंभी वंदिन अयोद्धेचा राजा” अशा सुंदर संत रचनांनी महाराष्ट्र भक्तिरंगी रंगून गेला.

जेष्ठ संगीतकार राम फाटक यांनी पुणे आकाशवाणीवरील स्वरचित्र ह्या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” हा अभंग गाऊन घेतला आणि संतवाणी ह्या अजरामर कलाकृतीचा जन्म दिला. त्यांनी पंडितजींकडून “सखी मंद झाल्या तारका” सारखे भावगीतही गाऊन घेतले. पंडितजींनी चित्रपटासाठी पार्श्वगायनही केले. “रम्य ही स्वर्गाहून लंका” हे त्यांनी गायलेले गीत सुप्रसिद्ध आहे. त्यांनी “मिले सूर मेरा तुम्हारा” केवळ गायले.

त्यांच्या गायनकलेचा सन्मान संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, याचबरोबर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन करण्यात आला.

आज भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतीला वंदन करताना महाराष्ट्राला लाभलेल्या ह्या संपन्न सांगीतिक वारशाची आठवण होते. आजची तरुण पिढी आवडीने शास्रीय संगीत ऐकते आहे, गाणे शिकते आहे, हे संस्कार ह्या पिढीवर करण्यात पंडितजींचे योगदान अतुलनीय आहे.