उच्च रक्तदाब हा वैद्यकीयदृष्टया आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा विषय बनतो आहे. व्यक्तीचं वय जसजसं वाढत जाईल, तसा उच्च रक्तदाबाचा त्रास हा अपरिहार्य ठरत आहे. वाढत्या वयानुसार या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून ६० ते ६९ वर्ष या वयातील ५० टक्के रूग्णांमध्ये आणि ७० किंवा अधिक वयाच्या अंदाजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रूग्णांमध्ये ही समस्या आढळते. किंबहुना, ५५ ते ६५ वर्षे वयापर्यंत उच्च रक्तदाब नसणार्या पुरूष आणि महिलांमध्ये हा आजार उद्भवण्याची शक्यता अंदाजे ९० टक्के इतकी असते.
उच्च रक्तदाबाची अनेक कारणे असतात. त्यापैकी अनुवंशिकता, वय, लिंग या गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु याशिवाय आपले रक्तदाब वाढवणार्या अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. उदा; समतोल आहार, निव्यर्सनी राहणे, रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचं प्रमाण या गोष्टीवर ताबा ठेवल्यास आपल्या रक्तदाबावर आपोआप नियंत्रण राहते. १२०/८० हा रक्तदाब सर्वसामान्य समजला जातो. जेव्हा ही पातळी वर चढते आणि तो १३०/९० होतो तो सहन न होण्याइतका रक्तदाब समजला जातो. ही पातळी ओलांडली की तो उच्च रक्तदाब समजला जातो.
उच्च रक्तदाब हा कोणतेही लक्षण न दर्शविता कधी होतो हे कळत नाही म्हणून या आजाराला “सायलंट किलर” असे संबोधिले जाते. हृदय, मेंदू व मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांच्या निरोगी आरोग्याकरिता रक्तदाब हा सामान्य असणे फार गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाच्या आजारामुळे हृदय निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, किडणी निकामी होणे अशा जीवघेण्या आजारांना तोंड द्यावे लागते. वाढत्या शहरीकरणामुळे मानसिक ताणतणाव, नात्यातील गुंता व कामाच्या डेडलाईन यांचा वाढता ताण लक्षात घेता आजची तरूण पिढी ही उच्च रक्तदाबाच्या आजाराला बळी पडत आहे. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा धोका उद्भवण्याचं एक स्वतंत्र कारण असून त्यामुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट ते तिपटीने वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात.
या आजारामुळे हृदयास रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या कठिण होतात आणि त्यावर सूज येते. त्यामुळे त्यांचा रक्तवाहक मार्ग अरूंद होऊन परिणामत: हृदयास कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. (अँजायना, इस्केमिक हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज) तसंच या आजारामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. किंबहुना ज्या लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाबाचा विकार आधीपासूनच असल्याचे आणि त्याचे निदान आणि उपचार झाले नसल्याचे आढळून येते.
हृदयाचे स्नायू ताठर होण्याची समस्या ज्याला लेफ्ट व्हेण्टिक्युलर हायपरटॉफी असं म्हणतात. ही देखील या आजारामुळे उद्भवू शकते. भविष्यात हृदयवाहिनीशी संबंधित आजार होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याची सूचना या समस्येमुळे रूग्णास मिळू शकते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि हृदयाकडून अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावं लागतं. यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती क्रमश: घडत राहते आणि याचा परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यामध्ये होतो.
उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे रक्तदाबाचा आपोआप वाढवणारा स्तर किंवा मुख्य रक्तवाहिन्या ताठर होण्याची आनुषंगिक क्रिया यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम करणारे विकार उद्भवतात. अपेक्षित स्तरापेक्षा अधिक प्रमाणात असलेला रक्तदाब हा हृदयास कमी रक्तपुरवठा झाल्याने उद्भवणार्या ५० टक्के आजारांस कारणीभूत ठरतो. तसंच अंदाजित आकडेवारीनुसार आकुंचित रक्तदाबातील २० एमएम एचजी किंवा प्रसारित रक्तदाबातील १० एमएम एचजीपर्यंतच्या वाढीमुळे प्रत्येक वेळेस हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो.
भारतात गेल्या काही वर्षात उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप वेगाने वाढत असून ही एका चिंताजनक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व आधुनिक सुखसोयीमुळे बैठ्या जीवनशैलीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर रोजच्या आहारामध्ये वाढलेले जंक फूड, धुम्रपान, मद्यपान तसेच मानसिक ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढीस लागले असून हृदयविकार होण्यामागे मधुमेहाप्रमाणे उच्च रक्तदाब हे ठळक कारण समोर येत आहे. रक्तदाबाचे नियंत्रण वेळेवर न झाल्यास आपल्या शरीरात बरीच गुंतागुंत निर्माण होते.
उच्च रक्तदाब रोखण्यासाठी:
उच्च रक्तदाब टाळणे किंवा कमी ठेवणे हे आपल्या हातात असते.
सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी रक्तदाब तपासणी करणे, प्रत्येकाचा रक्तदाब साधारणपणे आयुष्यभर बदलत राहतो.
वजन आटोक्यात ठेवा. तुमचं वजन अधिक असेल, तर वजन कमी करायला तत्काळ सुरूवात करा.
नियमित व्यायाम
आहारातील मिठाचं प्रमाण कमी करा. अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते.
फळं, भाज्या भरपूर प्रमाणात खा. लो-फॅट डायट घेण्याकडे कल असू दे.
रिलॅक्सेशन आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने फायदा होतो.
दिवसभरात भरपूर प्रमाणात कॉफी घेतल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच कॉफीचे प्रमाण कमी करा.
रात्री पुरेशी झोप घ्या. यामुळे दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर होतात.
उच्च रक्तदाबापासून काही अंशी बचाव करण्यामध्ये आहाराची महत्त्वाची भूमिका असते. आहारात लोणी, तूप कमी प्रमाणात खावं. ज्यांनी कॅल्शिअम मिळेल, असे पदार्थ खावेत. दूध, हिरव्या भाज्या, डाळी, संत्रे, स्ट्रॉबेरी, बदाम, केळे, सीताफळ अशा पदार्थामध्ये ते जास्त असतं. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी सूप, सॅलेड, आंबट फळे, लिंबू पाणी, नारळाचं पाणी हे घेणं फायदेशीर ठरतं. गाजर, फ्लॉवर, पालक, टोमॅटो, कांदा, पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा.
दिवसांतून कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड यांचाही समावेश असावा. सॉस, लोणी, बेकिंग पावडर यापासून दूर राहावं. त्याचप्रमाणे मासांहार पदार्थही जास्त प्रमाणात खाऊ नयेत. याशिवाय सपाट रस्त्यावरून मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम करणं, पुरेशी विश्रांती घेणं, तसंच चिंता, काळजी चिडचिडेपणा टाळून मानसिक स्वास्थ्य टिकवणं हे देखील तितकंच गरजेचं ठरतं.
रक्तदाब आणि हृदयविकार यांच्यामध्ये सातत्यपूर्ण आणि चिरंतन राहणारं नातं आहे आणि त्याच्याशी अन्य कोणत्याही शारीरिक धोक्यांचा संबंध नाही. रक्तदाब जितका अधिक, तितकाच हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते.
उच्च रक्तदाबामुळे ९० टक्के रूग्णांमध्ये हृदय बंद पडण्याची समस्या वाढीस लागते आणि हृदय बंद पडण्याचा धोका दुपटी-तिपटीने वाढतो. त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष करून उद्भवणारे भयंकर परिणाम टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाच्या आजाराचं त्वरित निदान आणि त्यावरील योग्य उपचार करणे आवश्यक आहे.