सुंदर दिसण्यासाठी काही खास सण-समारंभच असायला हवेत असं अजिबात नाही. नाहीतर वर्षभर पार्लरमधून जी सातत्यानं वर्दळ दिसते ती दिसलीच नसती…..ते ही फक्त स्त्रियांच्याच नाही तर पुरूषांच्या पार्लरमधूनही! आधीची तयारी

मरीन फेशियल : ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी मरीन फेशियल करावे, ज्यामुळे त्वचेची आर्र्दता वाढते व चेहरा कमी कोरडा दिसतो.

चॉकलेट फेशियल : त्वचा तरतरीत करते.

आईस बॉल फेशियल : सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.  त्याचबरोबर बॉडी स्पा करून घेतल्यास छान फ्रेश वाटतं. बॉडी स्पा करायचा नसेल तर किमान मॅनिक्युअर, पॅडीक्युअर तर अवश्य करून घ्यावं.

आजच्या बहुतांश स्त्रिया एकावेळी चार आघाड्यांना तोंड देत असतात. नोकरी-मुलं असतंच, शिवाय घराची साफसफाई… या दगदगीमुळे आलेला शीण घालविण्यासाठी स्वत:साठी थोडा वेळ व पैसा खर्च करणे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात फार गरजेचे आहे. गृहिणी हा कुटुंबाचा केद्रबिंदू आहे. ती टवटवीत व आनंदी-उल्हसित असेल तर सारं कुटुंब हसत राहतं. ज्या स्त्रियांना पार्लरची ट्रीटमेंट फार महागडी वाटते, त्यांनी घरी आपल्यासाठी वेळ ठेवावा व घरच्या घरी फेशियल व हातापायाची काळजी खालीलप्रमाणे घ्यावी.

.   स्वच्छता : तांदळाची पिठी, मसूर डाळीचे पीठ, संत्रे किंवा लिंबू याची साल थोडी किसून, थोडे ओट्‌स, पाण्यात एकत्र करून हा लेप चेहरा, हात-पाय-मान जमल्यास पाठ ह्यावर १० मिनिटे लावावा नंतर पाण्याने धुऊन टाका.

. संवर्धन : कोणतेही शुद्ध तेल किंवा मलई ह्यासारखे स्निग्ध पदार्थ घेऊन त्यात सुगंधासाठी गुलाब पाकळी किंवा मोगर्‍याची फुले टाकून रात्रभर ठेवल्यास तो सुगंध तेलात उतरतो. या तेलाने हातापायांना चेहर्‍याला आपल्याला येईल तसा मानेपासून वर व हनुवटीपासून कानापर्यंत असा चेहर्‍यावर तसेच बोटापासून खांद्यापर्यंत व गुडघ्याच्यावर मांड्यांपर्यंत आपल्याला जमेल तितकेच प्रेशर देऊन १० ते २० मिनिटे मसाज करा. हे तेल थोडा वेळ तसेच त्वचेवर राहून मग गरम पाण्याच्या टॉवेलने पुसून टाका.

. लेप : लेप तयार करताना चंदनाची पावडर किंवा उटणे असल्यास त्यात पाणी न घालता काकडीचा रस किंवा कोरफडीचा गर किंवा कोणत्याही फळाचा ताजा काढलेला दोन चमचे रस घालून लेप करा. हा लेप चेहर्‍याला लावा. सुकल्यावर स्वच्छ धुऊन टाका. आंघोळ करतांना हाच लेप संपूर्ण शरीराला चोळा व कोमट पाण्यानं स्नान करा.

. संरक्षण :  स्नानानंतर संपूर्ण कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा अल्कोहोल नसलेले टोनर कापसाने लावा.

आता तयारी कार्यक्रमाची

केस मुलायम दिसण्यासाठी आपण शांपू झाल्यावर केसावर कंडीशनर जरूर लावावा. किंवा मेथी, रिठा, शिकेकाई, आवळा याच्या पावडरी समप्रमाणात एकत्र करून त्याचे कंडीशनींग करा.

केसांना चांगले वळण देऊन स्टायलिश बनवायचे असेल तर ड्रायर किंवा कर्लिंग आयर्नचा उपयोग करून केसांना वळण देता येते किंवा केस सरळ करण्याची आयर्न वापरून कुरळे केस सरळ करता येतात. या ट्रिटमेंट पार्लरमध्ये घेता येतातच पण जर घरात त्यासाठी योग्य उपकरणं असतील तर घरच्याघरी करणंही काही कठीण नाही. लांब केस असणार्‍या स्त्रियांनी केसाच्या पुढच्या भागात थोडेसे ब्रेडींग करावे किंवा ब्रेडींगची वेणी घालावी. ती घालताना जर सोनेरी किंवा चंदेरी रीबीन किंवा डेकोरेशनचा वापर केला तर छान दिसेल.

सध्या नॅचरल मेकअपची फॅशन आहे. जाड आयलायनर व काजल प्रामुख्याने वापरले जाते. रोजच्या मेकअपमध्ये फार भडकपणा नसावा पण आयशॅडो, लिपस्टीक,

नेलपॉलीश हे ड्रेस किंवा साडी ह्यांना पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी असावे.

नखांवर डिझाईन काढण्याची खूप फॅशन आहे. काहीजणी पार्लरमध्ये जाऊन नखांवर डिझाईन्स करून घेतात, तर पेंटींगची आवड असेल तर त्यांना घरीदेखील नेल आर्ट करणे कठीण नाही. वेशभूषा ही केशभूषा व मेकअपला साजेशी किंवा दोन्ही एकमेकांना पूरक असावे. साधारण नियम असा आहे की, ज्यावेळी आपण खूप दागिने भरजरी साड्या किंवा ड्रेस किंवा साडी प्लेन किंवा साध्या सरळ रेषेतील डिझाईनचे ड्रेस असतील तर एखादाच सिग्नेचर दागिना आणि डोळ्यात भरण्यासारखा मेकअप असावा.

खरंतर सुंदर दिसण्यापेक्षा, सुंदर, टापटीप राहाणं जास्त महत्त्वाचं असतं. छान प्रसन्न व्यक्तिमत्व आणि टापटीप राहाणीमान असेल तर सोने पे सुहागाच!

चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी 

तेव्हा जे आपण खातोय, ते मी का खातो आणि माझं शरीर हे पचवू शकतंय का हा एकच प्रश्न स्वत:ला विचारुन खा. रोज रात्री झोपताना चेहर्‍याला हलक्या हाताने क्लिंन्झिंग लोशन लावावं. ते वेट टिश्यूनं साफ करावं. त्यामुळे दिवसभर चेहर्‍यावर चढलेला राप स्वच्छ होतो. त्यानंतर हलक्या हाताने मलमल किंवा
कॉटनच्या स्वच्छ कपड्याने चेहरा पुसून घ्या. नंतर मॉईश्चरायझर लावावं.

चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

१. चेहरा स्क्रब करण्यासाठी २ मोठे चमचे दही आणि ओट्‌सची पावडर एकत्र करुन हलक्या हाताने चेहर्‍यावर चोळावी.

२. चेहर्‍यावर मुरुमं असल्यास १ छोटा चमचा दालचिनी आणि १ मोठा चमचा मध याचे मिश्रण लावावे.

३. चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी १ चिमूट हळद, १ मोठा चमचा खोबरेल तेलात मिसळून चेहर्‍याला लावावे.

४. चेहरा साफ करण्यासाठी १ छोटा चमचा लिंबूरस आणि २ मोठे चमचे मध एकत्र करुन चेहर्‍याला लावावे.

५. चेहरा तेलकट असेल तर १ छोटा चमचा हळद, २ मोठे चमचे अॅलोव्हेरा जेल मिसळून लावावे.

६. त्वचेवर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर २ मोठे चमचे दही व २ छोटे चमचे लिंबूरस एकत्र करुन लावावे.