पारंपारिक सण, व्रते, उपवास यांची रेलचेल असणारा महिना म्हणजे श्रावण. पूर्वीच्या दिवसात, म्हणजे शहरीकरणाच्या आधी सणासुदीच्या निमित्ताने, हौसेमौजेचे निमित्त करुन घरच्या लेकीबाळी एकत्र यायच्या. त्यांच्या हसण्याखेळण्याने घर-अंगण गजबजून जायचे. त्याच वेळेस विविध पूजा-व्रतांच्या निमित्ताने संस्कार घडायचे. आता अंगण हरवले. आजच्या करियर वुमनकडे वेळही फारसा नाही. हौस मात्र आजही दंडगी आहे. अंगण नसले म्हणून काय झाले! इतर काही नाही जमले तरी किमान मंगळागौर तरी साजरी करूया याची धडपड ती करतेच. अशीच आपली सायली. आय टीवाली पोरगी. लग्नानंतर पहिल्या वर्षीची मंगळागौर तरी करूया असं तिला वाटलं. एरवी सगळे गुगल करणारी ती, यावेळी मात्र तिने आजीला विचारलं, “आजी, गाणी तू म्हणशील ना ग? तू खेळ सांग कोणते ते ! तू सांगशील तसे खेळू आम्ही.” जीममध्ये कामावलेली तिची शिडशिडीत काया झिम्मा-फुगडी घालताना लवणार  ह्या विचारानेच आजी खुश झाली. आजीला तिचे जुने दिवस आठवतात. आजी आणि नातीचे भावबंध नकळत जुळून आले. एरवी सायलीचे कपडे, तिचे बोलणे, तिचे दिवस-रात्र कामात असणे.. आजीला तिचे जगणे काही कळत नसे. आज मात्र आजीला ती तिचीच प्रतिकृति वाटली. आजी म्हणाली “अगं, करूया की सगळे. थांब, तुला आधी माझ्या लहानपणीच्या मंगळागौरीची गोष्ट सांगते.” आणि आजीची गोष्ट सुरू झाली.

“अग, पाऊस सुरू झाला की आमच्या जिवाची धांदल, गडबड उडून जायची. नागपंचमी खेळायला आजोळघरी जायचे या विचारानेच मन हरखून जायचे. मग आईच्या बासनातल्या साड्या पुन्हा पुन्हा काढून बघायच्या. इरकल, चंदेरी, धनवडी, रेशमी पैठणी, चंद्रकळा किती नवलाईच्या साड्या होत्या आईकडे. आणि दागिन्यांच्या पेटीत नथ, वेल, झुबे, बुगड्या, मोहनमाळ, कोल्हापुरी साज, गोठपाटल्या, पैंजण…. मग  हे सगळे घालायला मिळावे, म्हणून आईला मस्का लावायचा. बघता बघता नागपंचमीचा दिवस उजाडे.

नागराजांची पूजा भारतात सर्वत्र केलेली आढळते. प्राचीन काळापासून नागपूजेची प्रथा सुरू झाली आहे. नागपंचमी दिवशी सासुरवाशीण माहेरी येते. खेडेगावात घराच्या भिंती सारवून त्यावर हळदीने नागाचे चित्र काढतात. दारात रांगोळी पण नागाची काढतात. कुठे मातीचा नाग करतात. त्याला हळद, कुंकू, लाह्या, फुले, दूध वाहून त्याची पूजा केली जाई. कुठे खर्‍या नागाची पूजा देखील करत.

आजी पूजेचे महत्त्‌व सांगताना म्हणाली, “सायली, माझी आई सांगायची, नागदेव संपत्तीचे रक्षक मानले जातात. शेतातील पिकांचे उंदरांच्या उपद्रवापासून तेच रक्षण करतात. विषारी असले तरी ते आपले शेजारी आहेत. आपण एकमेकांना सांभाळून घ्यावे.” अशा  कृतज्ञ भावनेने मग पूजा होई. मग पंचमीची गाणी गाऊन आणि खेळ खेळून सण साजरा होई.

मग हातात हात गुंफून फुगडी रंगात यायची. बरोबरीने उखाणेही घेतले जायचे.

खरंच, काय लांब शेपटे असायचे तेव्हा आम्हा मुलींचे. आणि अगं, फुगडीचेच किती प्रकार. एका हाताची फुगडी, दोन हातांची फुगडी, बस फुगडी, पाठ फुगडी …. फुगडी सरली की झिम्मा मान वर काढायचा. दोघी दोघींचा, चौघी चौघींचा असा झिम्मा हवा तेवढा मोठा होतो.

झिम्मा खेळताना होणार्‍या बांगड्यांच्या किणकिणीने घर झंकारून जाई. मग एखादी पुढे येई, कमरेवर डावा हात ठेवून, उजव्या हाताने पदर खोचून आपल्याच भोवती घुमू लागे आणि पिंगा सुरू होई.

ह्या दिवशी नांगर चालवले जात नाही. भाजी वगैरे कापली जात नाही. तवा सुद्धा वापरत नाहीत. ह्या दिवशी हमखास केली जातात ती पुरणाची दिंड.

अशाप्रकारे पंचमीने खर्‍या अर्थाने श्रावण रंगू लागे. मग श्रावणातले मंगळवार, मंगळागौरी देवीचे पूजन करायचे. कुणाकडे मंगळागौर खेळायची ह्याच्या चर्चा रंगत. मग पत्री खुडायला कधी जायचे हे ठरे. कारण पूजेला सोळा प्रकारच्या पत्री म्हणजे पाने लागतात. शिवाय फुले गोळा करायची. मग त्या फुलांचे हार, गजरे, वेण्या गुंफायच्या. ही सगळीच आमच्या आवडीची कामे.

पंचमीला खेळाला सुरवात झाली होतीच. आता मंगळागौरीला त्यात कितीतरी भर पडते. काच किरडा खेळायचा, त्यानंतर दंडफुगडी मग एक गुडघा जमिनीवर टेकवून, कुणाची तरी वाट बघत असल्या सारखा हात कपाळावर धरून गाणे सुरू होई. मैत्रिणी एक एक खेळ सुचवत राहायच्या. मध्येच दमून थांबलो की उखाणे घ्यायचो.

सन २०२२ शास्त्रार्थासंबंधी खुलासा

चैत्र शुक्ल कामदा एकादशी

() ऋक्रउपाकर्मा संबंधी खुलासागुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी श्रवण नक्षत्र उत्तराषाढाने युक्त असल्याने त्यादिवशी ऋव्‌Àउपाकर्म करता येणार नाही. ते २ किंवा ३ ऑगस्टला करावे.

() श्रावण कृष्ण अजा एकादशीसोमवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी जेथे सकाळी ६.०६ पूर्वी सूर्योदय होणार आहेत. तेथे २३ ऑगस्ट रोजी मंगळवारी एकच अजा एकादशी आहे. मात्र जेथे सकाळी ६.०६ नंतर सूर्योदय होणार आहे तेथे सोमवार २२ ऑगस्ट रोजी अजा स्मार्त एकादशी व मंगळवार २३ ऑगस्ट रोजी अजा भागवत एकादशी असणार आहे.

२२ ऑगस्टला स्मार्त व २३ ऑगस्टला भागवत अशा दोन एकादशा असलेली गावे – मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, संपूर्ण कोकण, गोवा, जळगांव, जालना, ठाणे, धुळे, नाशिक, बीड, भुसावळ, लातूर, सांगली, सातारा या प्रदेशात २२ ऑगस्टला स्मार्त व २३ ऑगस्टला भागवत एकादशी आहे. मंगळवार दि. २३ ऑगस्टला एकच एकादशी असलेली गावे – नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, रायपूर, बीदर, तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी ठिकाणी २३ ऑगस्ट रोजी एकच एकादशी आहे.