“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!”

तुम्ही कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेले आणि गायक अरुण दाते यांनी गायलेले हे सुंदर गीत नक्कीच ऐकले असेल. तरीही माणसे नवस फेडण्यासाठी, धार्मिक(?) रूढी- परंपरा पाळण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी जेव्हा शरीराला क्लेश करून घेतात, जीवन धोक्यात घालतात किंवा ते संपवतात हे पाहून खूप वाईट वाटते. सर्वात महत्त्‌वाची गोष्ट म्हणजे “आपले जीवन आणि त्यासाठी आरोग्यसंपन्न शरीर” हे आहे, हे समजून घेतले पाहिजे.

मध्यंतरी  फेसबुकवरती एक पोस्ट पाहत होतो. एका बाईने मुलागा व्हावा यासाठी देवाला नवस बोलला. “जर मुलगा झाला तर मुलगा चालायला लागताच देवा, तुझ्या दर्शनासाठी त्याला चालवीत घेऊन येईन! “झाले, काही दिवसांनी त्या बाईला मुलगा झाला, तो चालायला लागला, लगेच त्या बाईने नवस फेडण्यासाठी त्या लहान मुलाला चालवीत मंदिरात नेले. चालतांना दमलेल्या, रडणार्‍या त्या लहान मुलाचा फोटो फेसबुकवर टाकला.

अशीच आणखी एक गोष्ट नवरात्रातील! एका सासूने नवीनच लग्न होऊन आलेल्या आपल्या सुनला नवरात्रातील नऊ दिवस कडक उपवास करण्याची सक्ती केली. त्यामध्ये त्या दुर्दैवी सूनेचा मृत्यू झाला. मध्यंतरी दिल्लीमध्ये ‘मोक्ष (?) प्राप्तीसाठी एका कुटुंबातील प्रमुखाने कुटुंबातील सर्वांचे जीवनच संपविले होते.

यावर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना २५ गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुंबईतील एका गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्यावेळी पाण्यात एक बोट उलटली आणि एक मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. पंजाबमध्ये तर रावणाची मूर्ती जाळण्याच्यावेळी ट्रेन अंगावरून गेल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडले. यात्रेमध्ये गर्दीचे व्यवस्थापन संयोजकांनी नीट न केल्यामुळे तसेच भाविकांनी शिस्त न पाळल्याने माणसे चेंगराचेंगरीत मृत्यू पावल्याच्याही अनेक घटना घडलेल्या आहेत.

वास्तव काय सांगते ?

या सर्व घटना पाहिल्या की खूप वाईट वाटते. एवढे का आपले जीवन कमी महत्त्‌वाचे व क्षुल्लक आहे? सध्याचे हे कलियुग आहे. देव नवसाला पावत नसतो. साधा विचार करूया. जर देव नवसाला पावत असता तर मुलांना अभ्यास करण्याची जरूरी नव्हती. नवस बोलून पास होता आले असते.
हॉस्पीटल्सची जरूरी नव्हती, नवस बोलून रोग बरा करता आला असता. देशाच्या सीमेवर सैन्य ठेवण्याची जरूरी नव्हती. देवाला नवस बोलून शत्रूला नष्ट करता आले असते.

केवळ उपवास करून जर पुण्य मिळत असते; तर गरीब लोकांचा अन्न न मिळाल्याने अनेक दिवस उपवास घडतो. म्हणजे ते अधिक पुण्यवान व्हायला पाहिजे होते. आत्महत्या करून जर मोक्ष मिळत असता तर मग त्या मोक्षाचा उपयोगच काय ?

गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना या वर्षी पंचवीस लोकांना आपले प्राण जर गमवावे लागले तर त्या गणेशभक्तीचा उपयोगच काय? तो तर विघ्नहर्ता, सुखकर्ता आहे, आपणच आपली काळजी न घेतल्याने विघ्न व दु:ख ओढवून घेत असतो नाही का? आपण विज्ञानयुगात वावरतो. आपण कलियुगात जगतो. ईश्वर म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? या गोष्टी समजून घ्यायला नकोत का? सेल्फी काढतांना जर आपण मृत्यू पावलो तर ती काढलेली सेल्फी पाहणार कोण?

हे सर्व पाहिल्यानंतर असे वाटते की प्रत्येक माणसाने वास्तवाचे भान थोडेतरी ठेवायला हवे. आपले जीवन सुंदर करणे, समृद्ध , आनंददायी करणे आपल्याच हाती असते. म्हणून आपण आपल्या जगण्यावर, आपल्या जन्मावर, आपल्या आरोग्यसंपन्न शरीरावर शतदा प्रेम करायला हवे.

पापपुण्य

माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागावे असे आपला धर्म सांगतो. चराचरात असलेले चैतन्य म्हणजे ईश्वर! मुंगी चालते, पण समजा ती चिरडली गेली तर तिच्यातून काय निघून गेले? ते चैतन्य, तोच ईश्वर ! माणूस जिवंत असतांना त्याच्यामध्ये चैतन्य असते, तोच ईश्वर! प्रत्येक प्राणिमात्रात हा ईश्वरी अंश असतो. संपूर्ण सृष्टीमध्ये हा ईश्वर असतो. म्हणूनच आपण मानवसेवा ही ईश्वरसेवा मानतो. सामान्य माणसाला हा निर्गुण निराकार ईश्वर समजणार नाही, म्हणून आपण सगुण – साकार ईश्वराला मानून मूर्तीपूजा करतो. महर्षी व्यास आणि संत तुकारामांनी पाप-पुण्याची सोपी व्याख्या सांगितली आहे. इतरांना त्रास देणे म्हणजे पाप आणि इतरांना मदत करणे म्हणजे पुण्य! म्हणूनच आपण जगत असतांना इतर गरीब- गरजू लोकांना मदत करून पुण्य मिळविले पाहिजे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्‌रिपूंवर नियंत्रण ठेवून आपण स्थितप्रज्ञ राहून जिवंतपणीच मोक्ष मिळवता येतो.

म्हणूनच मित्रानो, आपले शरीरस्वास्थ्य व मन:स्वास्थ्य हेच सर्वात महत्त्‌वाचे आहे. तेच आपण प्रथम जपले पाहिजे. ते असेल तरच आपण ईश्वरपूजा करू शकतो. इतरांना मदत करून आपले व त्यांचे आयुष्य आनंदी व सुखी करू शकतो.

दा. कृ. सोमण

सन २०२२ शास्त्रार्थासंबंधी खुलासा

चैत्र शुक्ल कामदा एकादशी पंचांग – दिनदर्शिकेत मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२ रोजी कामदा एकादशी दिलेली आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ६.०५ नंतर सूर्योदय होत असलेल्या गावी दशमीवेध होत नसल्याने मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे. ज्या गावी सकाळी ६.०५ पूर्वी सूर्योदय होईल त्या गावी मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी कामदा स्मार्त एकादशी व बुधवार १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी अशा दोन एकादशा असतील.

(१) मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी एकच एकादशी असलेली गावे : मुंबई, पुणे, सोलापूर, अकोला, अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, उस्मानाबाद, जळगांव, ठाणे, संपूर्ण कोकण, धुळे, नाशिक, नांदेड, बीड, परभणी, लातूर, भुसावळ, सांगली, सातारा, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील इंदोर, उज्जैन वगैरे भाग येथे १२ एप्रिल रोजी एकच एकादशी आहे.

(२) मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी स्मार्त आणि बुधवार १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी असलेली गावे – नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, मध्यप्रदेशातील काही भाग, दिल्ली, हैद्राबाद, तेलंगणा, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाणा येथे १२ एप्रिल रोजी स्मार्त व १३ एप्रिल रोजी भागवत एकादशी असेल.