श्रीक्षेत्र सोमनाथ
गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. श्रीशंकराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून सोमनाथ मंदिर हे अग्रस्थानी आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या, कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो. त्याशिवाय सोमनाथाजवळ पाच पांडवांचे वास्तव्य होते असाही इतिहास आहे.
श्री शैलम मल्लिकार्जुन
भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर असून हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिणेचा कैलाश या नावानेदेखील हे स्थळ ओळखण्यात येते. माता पार्वती अर्थात मलिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले आहे.
श्री महाकालेश्वर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. रूद्र सागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदिर अप्रतिम असून भगवान शिव स्वत: लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे.
ओंकारेश्वर
उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासांच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशात असून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहचणे सोपे आहे.
केदारनाथ
सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गढवाल रांगांमध्ये असणार्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्यामध्ये वसलेले आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. केदारनाथची यात्रा म्हणजे चारधाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो. हे मंदिर चारधामांपैकी एक असून समुद्रसपाटी पासून ३५८३ मीटर उंचीवर वसलेले आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर. पण हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून १९८४ मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
काशी विश्वनाथ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले आणि तिथे मशीद उभारली. पण अकबराच्या काळात तोरडमलांनी पुन्हा एकदा या मंदिराचे पुनर्निमाण केले. पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडले. पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी त्यानंतर हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला.
त्र्यंबकेश्वर
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणार्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (सन १७४० ते १७६०) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले.
वैजनाथ
वैजनाथ अर्थात परळी वैजनाथ. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हेदेखील ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अशी मान्यता आहे. परळी येथील हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक असल्याचे मानण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्रीकरणाधिप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
नागेश्वर
नागांचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या व्युत्पत्तीची कथा आणि माहात्म्य जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे.
शिव पुराणानुसार, नागेश्वर ज्योतिर्लिंग ‘दारूकवन”मध्ये आहे. जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. ‘द्रुकनाव” या नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. जसे कामकावन, द्वैतावंत, दंडकवन नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिव पुराणात दारुका नावाचा उल्लेख आहे.
रामेश्वरम तीर्थ
चारधामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल समजण्यात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे, तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे. हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वत: रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे, असे सांगण्यात येते.
घृष्णेश्वर
हे शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबादपासून साधारण ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण यासारख्या ग्रंथांत घृष्णेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात. सदर मंदिराचे बांधकाम हे लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसंच या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.