स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावीपणामुळे केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर इतरत्र देखील कोणत्याही स्पर्धेमध्ये निवड होण्याची किंवा न होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये देखील इतरांपेक्षा स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. तर, आता प्रश्न असा उपस्थित होतो की व्यक्तिमत्त्व विकसित कसे करावे? व्यक्तिमत्त्व विकासात काय मदत करते? व्यक्तिमत्त्व विकास हा काही एक ठराविक कोर्स करून होत नाही. स्वत:मधील बलस्थाने सशक्त करण्यासाठी आणि कमतरता कमी करण्यासाठी शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक केले प्रयत्न म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास होय.

१. स्वत:ला जाणून घ्या: स्वत:ला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वत:मध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा.

२. आकर्षक दिसण्याऐवजी आपले वाटू लागा : तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचं आहे. एखाद्याचे व्यक्तिमत्त्व त्याचे स्वरूप, वागणूक, दृष्टीकोन, शिक्षण, मूल्ये आणि काही वेगवेगवेगळ्या वैशिष्ट्यांद्वारे ठरत असते. तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही गरज भासल्यास एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीला कसा प्रतिसाद द्याल.

३. काळ, वेळ, घटना व परिस्थितीनुरुप नीटनेटका पेहराव करा : लोक तुम्हाला आधी पाहतात आणि मग ऐकतात. त्यामुळे पहिल इंप्रेशन हे कपड्यांचंच पडत असतं. आपण ऑफिस, पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे यावर लक्ष द्या. प्रसंगानुसार पोषाख परिधान करा. चांगले दिसण्याचा प्रयत्न केलात तर आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर पडेल यात काहीच शंका नाही. परंतु सर्वात महत्त्वाचे आपण कसे कपडे घालता यावरून आपलं व्यक्तिमत्त्व उठून दिसत असतं.

४. कोणाची कधी नक्कल करू नका : लक्षात ठेवा की, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये आणि स्वभाव गुणधर्म असतात. त्यामुळे इतरांसोबात स्वत:ची तुलना करू नका. त्याने केवळ त्रास वाढतो. खास करून जेव्हा आपण इतरांच्या तुलनेत कमी पडतो आहोत यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात अडचणी येऊ लागतात. म्हणून कोणाचीही नक्कल करू नका. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

५. सामाजिक कौशल्ये शिका : आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी किंवा लोकांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधात आपल्याला मदत करण्यासाठी केवळ चांगले दिसणे कधीही पुरेसे नसते. त्याऐवजी आपली सामाजिक कौशल्ये वाढवा. आयुष्याच्या सामाजिक क्षेत्रात जितके यश मिळते तितकेच आपल्याला स्वत:बद्दल चांगले वाटते. इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषादेखील सर्वांना आरामदायक वाटेल अशी ठेवा.

६. सामाजिक संवाद टाळू नका: केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका. संधी शोधा, वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा. तु्‌म्ही जितकी सामाजिक संवादाची भीती बाळगाल, तु्‌म्हाला तुमच्याबद्दल तितके अधिक वाईट वाटत राहील. कधीही परिपूर्ण होण्याच्या मागे लागू नका.

७. स्वत:बद्दल सकारात्मक राहा : जर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात काही नकारात्मक बाबी असतील तर सकारात्मक गोष्टीही नक्कीच असतात. या सकारात्मक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्वत:ची शक्ती जाणून घ्या. स्वत:चे सामर्थ्य मान्य करा आणि स्वसामर्थ्य व स्वयंप्रेरणेने कोणतेही कार्य करा. आत्मविश्वासाने कार्य करणे आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्यास आणि दीर्घकाळ सकारात्मक राहण्यास निश्चितपणे मदत करेल.

८. आपल्या आरामदायी कोषातून बाहेर या:- आपल्या आरामदायी जीवनशैलीतून बाहेर येऊन नवीन कौशल्ये शिकून स्वत:ला आव्हान देण्यास तयार राहा. नवनवीन संधीच्या शोधात राहा. त्या संधी उपयोगात आणा. स्वत:च्या अंगी सकारात्मक, मुक्त विचारसरणीची वृत्ती बाणवा. गरज भासेल त्याप्रमाणे परिस्थितिनुरुप स्वत:ला बदलण्यास तयार राहा.

९. अपयशाची भीती बाळगू नका: चुका केल्याबद्दल काळजी करू नका, आपण आपल्या प्रवासामध्ये खूप चुका कराल. अनेक चुका तुमच्या वाटेमध्ये अडथळा होऊ शकतील, परंतु या चुका वेळेत सुधारून स्वत:मध्ये बदल घडवत पुढे चला आणि प्रगती पथावर न थांबता आगेकूच करा.

१०. सतत शिकत रहा: नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपला शिकण्याचा प्रयत्न; आपलं ज्ञान वाढण्यास तर मदत करेलच, परंतु या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी केलात तर तुम्ही समाजात, मित्रपरिवारात वा इतर लोकांमध्ये सन्मानाने ओळखले जाऊ लागाल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

११. नेतृत्व करण्यास व पुढाकार घेण्यास शिका : आपण जे काही शिकलात आणि आपल्याला जे काही माहिती आहे ते त्याचा उत्तम प्रकारे वापर करा. आपण ज्या विषयाला सामोरे जाल त्याचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या आणि त्यात निपुण झाल्यावर ते इतरांपर्यंत पोचवा. तुम्ही तुमचं ज्ञान योग्य रीतीने इतरांना सांगितलं आणि इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झालात; तर मग तुम्ही नैसर्गिकरीत्या नेता व्हाल. स्वत:ला अभिव्यक्त करायची सवय लावा. जे ठरवलं आहे ते तडीस नेण्याचा प्रयत्न करा.

१२. प्रयत्न आणि सुसंगतता: प्रयत्न आणि सुसंगतता या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता या गोष्टींचा अवलंब करा.

१३. हार मानू नका: आयुष्यामध्ये नेहमीच जिंकणे शक्य नसते. अशा वेळी पराभव पत्करावा लागला तरी हार न मानणे हे अतिशय कठीण काम आहे. परंतु असे बरेच लोक आहेत जे केवळ काही आठवडे किंवा महिन्यांच्या प्रयत्नातून स्वत:मध्ये हे परिवर्तन घडवून आणू शकतात. हार न मानण्याची वृत्ती म्हणजे अर्धी लढाई तिथेच जिंकण्यासारखंच आहे.

१४. हसमुख राहा आणि सर्वांना हवेहवेसे व्हा: कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. आपण प्रत्येकजण अशा व्यक्तीच्या संगतीत राहू पाहतो जो आपल्याला हसवतो वा प्रसन्न ठेवतो. पण इतरांना हसवण्यासाठी फक्त बाष्कळ विनोद मारू नका. संभाषण करीत असताना वातावरणात नैसर्गिकरीत्या मजेशीरपणा आणण्याचा प्रयत्न करा.