या वर्षी शनिवार १ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाळी आणि प्रदोषकाळी माघ शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी आहे. मंगळवार हा गणेश आराधनेचा वार समजला जातो. या वर्षी मंगळवारी श्रीगणेश जयंती आल्याने “अंगारक योग” आलेला आहे.
श्रीगणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो गणनायक आहे. आपणही आयुष्यात एक विद्या आणि एका कलेत पारंगत झालो तर आपले जीवन सुखी व आनंदी होईल. नेतृत्व गुण आपल्या अंगी यावयास हवेत. गणपती हा मातृ-पितृभक्त होता. आपण हे गुण जर आपल्या अंगी बाणवले तर ती खरी गणेशपूजा ठरेल.
गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी “पुष्टिपती विनायक जयंती” म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला “श्रीगणेश चतुर्थी” म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला “गणेश जयंती” म्हणून आपण साजरा करीत असतो.
माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.
गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.
या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचारे गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला “तिलकुंद चतुर्थी” असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते.
धुंडीविनायक
गणेशाला धुंडीराज हे नाव कसे पडले याविषयी स्कंदपुराणात एक कथा आहे. दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. त्यावेळी सर्व देव काशी नगरी सोडून निघून गेले. परंतु काशी नगरीचा विरह भगवान शंकरांना सहन झाला नाही. भगवान शंकरांनी काशी नगरीतून दिवोदासचे उच्चाटन करण्यासाठी गणेशाला त्याच्या गणांसह काशी नगरीत पाठवले. गणेशाने ज्योतिषी बनून काशी नगरीत प्रवेश केला. त्याने या विद्येमुळे काशी नगरीत लोकप्रियता मिळविली. दिवोदासाच्या राजवाड्यातही गणेशाने ज्योतिषामुळे प्रवेश मिळवला. ज्योतिषी स्वरूपात वावरणार्या गणेशाने दिवोदासाला भविष्यही सांगितले. त्यामुळे दिवोदासचे काशी नगरीतून उच्चाटन झाले. मंदार पर्वतावरून शंकराचे काशी नगरीत आगमन झाले. तसेच सर्व देवही काशी नगरीत आले. भगवान शंकर गणेशावर प्रसन्न झाले. त्यांनी गणेशाला “धुंडीराज” हे नाव बहाल केले. त्या वेळेपासून काशी नगरीत धुंडीवनायक प्रसिद्ध झाला. काशी नगरीत धुंडीविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
आधुनिक काळात
आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा होय. कोणत्याही देवतेची पूजा आपण का करतो? त्या देवतेचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी ती देवता आदर्श मानून त्या गुणांची पूजा आपण करीत असतो. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपणही आयुष्यात विद्या-कला अवगत केल्या तर आपले जीवन आपण सुखी व आनंदी करू शकतो. गणपतीची उपासना म्हणजे विद्या-कला यांची उपासना! तप म्हणजे मेहनत! भक्ती म्हणजे ही साधना करताना साधावयाची एकाग्रता होय. गणपती हा सुखकर्ता व दु:खहर्ता आहे. आपणही गरीब, दीनदुबळ्या लोकांच्या जीवनातील दु:ख कमी करून सुखी होण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणेश हा गणांचा नायक होता. तो लढवय्या होता, तो चतुर होता. आपणही त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आहे. मन पवित्र ठेवले तर आपल्या हातून पवित्र कार्य घडण्यास मोठी मदत मिळत असते. गणेशपूजा ही त्यासाठीच करावयाची असते.
गणपतीने देवान्तक, नरांतक आणि इतर अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपल्या अंगीही गणेशाचे गुण अंगी बाणवून आपल्यातील आणि समाजातील अस्वच्छता, अनीती, अनाचार, आळस, अंधश्रद्धा, अनारोग्य इत्यादी राक्षसांचा नाश करावयाचा आहे.
गणेश हा मातृभक्त होता. भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील एक उत्कृष्ट आहे. भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. आज अनेक देशात भारतीय लोक गेलेले आहेत. तेथे ते आपले सण-उत्सव साजरे करीत असतात. गणेशोत्सव हा तर लोकप्रिय उत्सव आहे. तो खर्या अर्थाने जागतिक उत्सव झाला आहे.
श्रीगणेश आणि शेंदूर
गणेशाची मूर्ती शेंदूर रंगाची का दिसते त्यासंबंधी एक कथा पुराणात आहे. पूर्वी सिंदुरपूर नगरामध्ये नरांतक राजा राज्य करीत होता. तो अतिशय दुष्ट होता. प्रजेला त्याचा खूप त्रास होई. प्रजा त्याला कंटाळली होती. हे पाहून श्रीगणेशाने सिंदुरपूरवर स्वारी केली. नरांतक आणि श्रीगणेश यांचे तुंबळ युद्ध झाले. गणपतीने आपले धनुष्य घेतले. त्याला तीक्ष्ण बाण जोडला आणि प्रत्यंचा ओढली. तो बाण नरांतकाच्या छातीत घुसला. नरांतक जमिनीवर कोसळला. त्याचे सैन्य घाबरून पळून गेले. श्रीगणेशाला विजय मिळाला. सर्वांनी श्रीगणेशाचे कौतुक केले. गणपतीच्या गणांनी विजयोत्सव साजरा करताना गणपतीच्या अंगाला शेंदूर लावला. अनेक आभूषणे दिली. त्याच्या कपाळावर चंद्र ठेवला. या गणपतीचे सर्वांनी कौतुक केले. पार्वतीने गणपतीला शाबासकी दिली. श्रीगणेशाला सर्व देवांनीही मान दिला. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याला सिंहासनावर बसविले. देव, गंधर्व आणि ऋषीमुनींनी त्याचा सत्कार केला. ऋषींनी त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला. देवांनी गणेशाच्या मस्तकावर दूर्वांच्या एकवीस जुड्या वाहिल्या. कुबेराने तर गणेशाच्या मस्तकावर रत्नजडित असा मुकूट चढविला. तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेश मूर्ती आणल्या जाऊ लागल्या. त्याचे पूजन होऊ लागले.