•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Posts by admin

    डिसेंबर २०२५ – रोज जंकफूड खाताय? मग वेळीच सावध व्हा

    आजच्या काळात रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण स्वत:कडे लक्ष देत नाही. सकाळी उठल्यापासून आपले रुटीन सुरू होते ते अगदी रात्री झोपेपर्यंत आपण अविरत काम करतो. यामध्ये अगदी समोर येईल ते खाल्ले जाते.

    विशेषत: आपले फास्ट फूडकडे (Fast Food / Junk Food) जास्त लक्ष असते. आपले पोट भरण्याबरोबरच जंक फूड खाण्याची अनेक कारणे आहेत. एक तर फास्ट फूड आपल्याला सहज उपलब्ध होते, झटपट तयार होते आणि मुख्य म्हणजे याची चवही खूप मस्त असते. जंक फूड खाण्याचे अनेक तोटेही (Disadvantages) आहेत. फास्ट फूड खूप अनहेल्दी (Unhealthy) असते. हेल्दी फूड खाण्यापेक्षा (Healthy Food) जंक फूड खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो.

    आपण अनेकदा ठरवतो की, वारंवार जंक फूड खाणे टाळले पाहिजे पण आपल्याला सवय लागलेली असल्यामुळे सहज शक्य होतेच असे नाही.

    जर्नल अॅपेटाईटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, जेव्हा आपण पुन्हा पुन्हा शिजवलेले अन्न खायचे टाळतो तेव्हा मूड बदलणे (Changing mood), एखादी गोष्ट खायची वारंवार इच्छा होणे (Craving for something), काळजी वाटणे (Worrying), डोकेदुखी आणि झोप कमी होणे (Headache and reduced sleep) यासारखी मनोवैज्ञानिक आणि शारीरिक लक्षणे (Effects) दिसतात. हीच लक्षणे जेव्हा एखादी व्यक्ती सिगारेट किंवा एखादे व्यसन सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दिसतात. संशोधनातून असेही आढळले आहे की, जंक फूड कमी करण्याच्या दिवसांमधील २ ते ५ दिवस ही लक्षणे तीव्र होतात.

    फास्ट फूड आरोग्यासाठी का धोकादायक?

    फास्ट फूड अथवा जंक फूडमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर खूप जास्त प्रमाणात असते आणि पौष्टिक तत्त्व नगण्य असतात. फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट असतात, जे शरीरासाठी नुकसानकारक असतात. जास्त

    फॅट, साखर आणि अतिरिक्त मीठ या कॉम्बिनेशनमुळे फास्ट फूड चविष्ट तर बनते. पण ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. या तीन पदार्थांमुळे

    कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टिमवर दबाव पडतो आणि लोकं आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसांत स्वच्छतेची नीट काळजी न घेतल्यास फास्ट फूडमुळे टायफॉइड, कॉलरा आणि काविळीसारखे आजारही पसरू शकतात.

    या आजारांचा वाढतो धोका

    अनेक अभ्यासांमधून हे निष्कर्ष निघाले आहेत की, फास्ट फूडमधील ट्रान्स फॅटमुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रालची पातळी वाढते आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे टाईप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आहारात मिठाचे प्रमाण वाढल्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. फास्ट फूड अथवा जंक फूडमध्ये

    कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते, ज्यामुळे लोकांचे वजन वाढते आणि त्यांना जाडेपणाची समस्या भेडसावते. त्यामुळे अस्थमा आणि श्वसनासंबंधित इतर आजार होण्याचा धोकाही वाढतो..

    प्रोसेस्ड फूड म्हणजे काय आहे?

    जे अन्न दीर्घकाळ खाण्यासाठी संरक्षित केले जाते त्याला प्रोसेस्ड फूड असे म्हणतात. यामध्ये फ्लेवर्स आणि रंगांचा (Flavors & Colors) वापर केला जातो. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम (Adverse effects on health) होतो.

    जंक फूड खाल्ल्यामुळे होणारे परिणाम –

    १. विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. प्रोसेस्ड फूडमध्ये पोषणमूल्य (Nutritious ingredients) नसतात. जेव्हा शरीराला गरजेच्या असलेल्या पोषणतत्त्व (Body Essential Nutrients) मिळत नाहीत तेव्हा आपली विचारांची क्षमता खुंटते. म्हणूनच जंक फूड/ प्रोसेस्ड फूड न खाण्याचा सल्ला दिला आतो. फास्ट फूड खाल्ल्यामुळे तुमची भूक काही काळासाठी भागते. मात्र बराच काळ फास्ट फूडचे सेवन करणे धोकादायक असते. ज्या व्यक्ती फास्ट फूड आणि प्रोसेस्ड पेस्ट्री खातात, त्यांना डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता इतरांपेक्षा ५१ टक्के अधिक असते.

    २. अॅलर्जीचा धोका

    हे पदार्थ तयार करताना यामध्ये फ्लेवर्स आणि रंगांचा वापर केला जातो यामुळे आपल्या त्वचेवर

    अॅलर्जीचे कारण होऊ शकते. अनेकदा ही अॅलर्जी इतकी जास्त असते की, त्यावर उपाय करणे अवघड होऊन बसते. आपण अनेकदा बघतो की प्रोसेस्ड फूडमध्ये कोणत्या ना कोणत्या कृत्रिम रंगाचा वापर केलेला असतो.

    ३. हाडे कमकुवत होतात

    प्रोसेस्ड फूडमध्ये फॉस्फेट असते, यामुळे तो पदार्थ चविष्ट होतो. पण हेच फॉस्फेट आपल्या हाडांना कमकुवत बनवते. बर्‍याचदा लोक दिवसभर प्रोसेस्ड फूड खातात यामुळे त्यांच्या शरीरात फॉस्फेट जास्त प्रमाणात जाते याचा परिणाम हाडांवर होतो. म्हणून हे खाणे टाळले पाहिजे.

    ४. मूड स्विंग

    फास्ट फूडमध्ये ट्रान्स फॅट जास्त प्रमाणात असतात त्यामुळे हे शरीरामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे (Omega-3 Fatty Acid) संतुलन बिघडवते. जेव्हा ओमेगा ३ फॅटी

    अॅसिड्‌चे संतुलन बिघडते तेव्हा आपले मूड्‌स बदलतात, तसेच आपल्या मूड स्विंगचे हे कारण बनते.

    ५. प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो

    प्रोसेस्ड फूड अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. आपण आजच्या काळात अनेक महिलांना या समस्येला तोंड देताना बघतो आहोत.

    प्रोसेस्ड फूडमध्ये या गोष्टी मिसळल्या जातात

    १. प्रिझर्वेटीव्ह (Preser vative) : अन्न नासू नये किंवा खराब होऊ नये म्हणून टाकले जाणारे रसायन.

    २. कलर (Color) : पदार्थाला विशिष्ट रंग देण्यासाठी कृत्रिम रंग यामध्ये मिसळला जातो.

    ३. चव (Taste) : पदार्थाला विशिष्ट चव मिळण्यासाठी यामध्ये फ्लेवर्स मिसळले जातात.

    ४. टेक्श्चर (Texture): पदार्थाला विशिष्ट टेक्श्चर मिळण्यासाठी हे कृत्रिमरित्या मिसळले जाते.

    फास्ट फूडमध्ये याचे प्रमाण जास्त असते

    १. फास्ट फूडमध्ये फॅट्‌स आणि कॅलरीजचे (Fat and calories) प्रमाण खूप जास्त असते. यामध्ये

    ट्रान्सफॅट (Trans fat) असतात, यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हार्ट डिसिझ (Heart Disease and Cholesterol) होण्याचा धोका संभवतो.

    २. फास्ट फूडमध्ये साखर जास्त प्रमाणात असते यामुळे हे लठ्ठपणाचे (Obesity) एक कारण बनते.

    ३. फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात सोडियम (Sodium) असते यामुळे ब्लड प्रेशर (Blood pressure) वाढते.

    म्हणूनच प्रोसेस्ड फूड /जंक फूड/ फास्ट फूडपासून शक्य तितके लांब राहिले पाहिजे. भविष्यात आरोग्यात होणार्‍या बदलांची सुरुवात आपल्या आहारापासून होत असते. म्हणूनच शक्य तितका नैसर्गिक, संतुलित आहार घ्यावा.

    Read more

    नोव्हेंबर २०२५ – निरोगी आरोग्यासाठी योगा योगासनाचे फायदे

    योग तीन स्तरांवर काम करते ज्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदा मिळतो. योग्य स्वरूपात आणि योग्य प्रकारे योग करणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. योगासनाचे (Yogasan Marathi) नक्की काय फायदे आहेत जाणून घ्या –

    • पहिल्या चरणामध्ये योग मनुष्याला स्वास्थ्यवर्धक बनवते आणि त्यामध्ये ऊर्जा भरण्याचे काम करते.
    • दुसर्‍या चरणामध्ये योगा हे मस्तिष्क आणि विचारांवर परिणाम करते. आपल्यातील नकारात्मक विचार असतात, जे आपल्याला तणाव आणि चिंता देतात अथवा आपल्या आयुष्यात मानसिक विकारांसाठी प्रवृत्त ठरतात. योग या चक्रातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी फायदेशीर ठरते.
    • तर तिसर्‍या आणि सर्वात महत्त्वपूर्ण चरणामध्ये पोहचून मनुष्य सर्व चिंतापासून मुक्त होतो. योगाच्या या अंतिम चरणापर्यंत पोहचण्यासाठी कठीण परिश्रमाची गरज असते. या प्रकाराच्या योगाचे फायदे हे विविध स्तरावर तुम्हाला पाहायला मिळतात.

    नियमित योगा करण्याचे फायदे

    शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं.

    • ताणतणावपासून मुक्ती – आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.
    • शरीरातील साखरेवर नियंत्रण – आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
    • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी – आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बर्‍याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
    • रक्ताभिसरण चांगलं होतं – योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तर्‍हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते.
    • म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी – तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं.

    योगा करण्याची योग्य पद्धत

    ध्यान (Meditation)

    ध्यानधारणा करणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काही मिनिट्‌स तुम्ही ध्यान लावून बसलात की, तुमच्या मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहतं. तसंच पूर्ण दिवस तुमचं मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहतं.

    नाडी शोधन प्राणायम

    (Anulom Vilo)

    आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायम करण्यात येतं. प्राणायमप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचा असतो. हा योगप्रकार अनुलोम – विलोम या नावानेदेखील ओळखला जातो. अनुलोम विलोमचे फायदे शरीराला मिळतात. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं हे प्राणायाम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याचं कसब येते.

    शलभासन (Shala bhasana)

    बर्‍याच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा खूपच त्रास असतो; विशेषत: महिलांना गरोदरपणानंतर तर हा त्रास सर्रास होतो. या आसनामुळे तुमच्या कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. शिवाय तुमच्या पाठीमध्ये आणि कंबरेत कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत असेल तर हे आसन तुम्ही रोज करायला हवं. हे रोज करून तुम्हाला स्वत:लाच स्वत:मधील बदल जाणवेल.

    भुजंगासन (Bhujan gasana)

    तुमची छाती आणि तुमच्या शरीरातील मांसपेशी लवचिक बनवण्यासाठी आणि कंबरेत आलेला तणाव दूर करण्यासाठी हे आसन अप्रतिम आहे. मेरूदंडसंबंधित आजारी व्यक्तींनी हे आसन केल्यास, त्याना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय महिलांमध्ये गर्भाशयातील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठीदेखील या आसनाची मदत होते. तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत चालणेही गरजेचे असते. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती चांगली राहते.

    अर्धचक्रासन

    (Ardha Chandrasana)

    तुम्हाला मधुमेह अथवा साखरेचा कोणताही आजार वा पोटावरील चरबीपासून सुटका हवी असेल तर अर्धचक्रासन हा उत्कृष्ट पर्याय आहे. याबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तींना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन अजिबात करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहावं. केवळ मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.

    योगाचे महत्त्व काय आहे

    योगा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर, यामुळे तुमच्या शरीराला एक योग्य कसरत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळं मिळतं पण आपण स्वत:च्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. व्यायामाचे, योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर राहतो. इतकंच नाही तर माणसाचे वजन, हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय तुम्ही नियमित योगा केलात तर कोणत्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नियमित करणं आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योगा हा बर्‍याचशा आजारांना दूर ठेवतो जे जास्त महत्त्वाचं आहे.

    Read more

    ऑक्टोबर २०२५ – त्वचेची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारे करा

    जाणून घेऊ तांदळाचे पीठ आपल्या त्वचेसाठी कसे फायदेशीर आहे आणि ते कसे वापरले जाऊ शकते. ज्याच्या वापराने सौंदर्य तर वाढतेच पण वाढत्या वयाचा परिणामही थांबवता येतो.

    • तांदळाचे पीठ खूप चांगले स्क्रब आहे. ज्यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण बाहेर काढून चमक मिळते. स्क्रब बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात मध आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करावी. चांगले मिक्स करा. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडतात. तांदूळ पीठ आणि गुलाबजल मिसळून पेस्ट तयार करावी. चांगले मिक्स करा. हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी बाहेर पडतात.
    • तांदळाच्या पिठापासून तुम्ही बॉडी लोशन बनवू शकता, ज्यामुळे त्वचा खोलवर मॉइश्चरायझ राहते, ज्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते आणि त्वचेचा कोमलपणा टिकून राहतो. आपण ते दररोज बनवू शकता, प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी कोरफड जेल आणि खोबरेल तेल समप्रमाणात मिसळावे. चांगले मिक्स करा आणि नंतर त्यात सुमारे दोन चमचे तांदळाचे पीठ घाला. आंघोळीनंतर त्वचेवर लावा.
    • तांदळाच्या पिठापासून बनवलेला फेस मास्क झटपट चमक देतो. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. तोंडाला मास्क बनवण्यासाठी तांदळाच्या पिठासोबत मसूर डाळीचाही वापरही केला जातो. यासाठी मसूरडाळ रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी अगदी थोड्या पाण्यात बारीक करून घ्या. नंतर त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ घालावे. हा फेस मास्क १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
    Read more

    सप्टेंबर २०२५ – मराठी खाद्य परंपरा

    चुर्मा लाडू

    साहित्य आणि कृती: बारीक रवा, चवीला मीठ व तुपाचे मोहन घालून एकत्र करावा. दुधाचे किंवा पाण्याने भिजवून मुठे (छोटे – छोटे गोळे) करून तुपात तळून घेऊन मिक्सरमधून जाडसर काढून ते चाळून रव्याच्या अर्धा पटीने बारीक दळलेली साखर, थोडेसे साजूक तूप, वेलची, जायफळ पूड घालून घट्ट लाडू वळावेत.

    केळवरी

    साहित्य आणि कृती: पिकलेली परंतु कडक राजेळी केळी, सालासकट उकडून साले काढून स्मॅश करणे. ओल्या खोबर्‍याचा गूळ किंवा साखर व वेलची पूड घालून चव करणे. केळ्यांच्या मिश्रणात चवीला मीठ, मोहनाला अर्धा चमचा तूप घालून लहान गोळी घेऊन मोदकाप्रमाणे पातळ पारी करून त्यात चव भरून बंद करून चपटे थोडे दाबावे व

    (शॅलोफ्रॉय) थोडे थोडे तेल सोडून पॅटीस प्रमाणे तळावे.

    ढेबरे

    साहित्य आणि कृती: प्रथम केळं व गूळ एकत्र घेऊन ते एकजीव करून त्यात गव्हाचे व तांदळाचे पीठ घालून तव्यावर तूप सोडून वरील मिश्रण थालीपीठाप्रमाणे थापून झाकणी ठेवून मंदाग्नीवर भाजणे.

    तिलोरी

    साहित्य आणि कृती: पाव किलो मैदा, २०० ग्रॅम पिठी साखर, २ मोठे चमचे तूप गरम करून मोहनासाठी घालावे, तीळ घालावे. पीठ मळल्यावर लगेच जाडसर चपाती लाटून लहान वाटीने तिलोर्‍या पाडून मंदाग्नीवर तळाव्यात.

    नारळाचे पाकाशिवाय लाडू

    साहित्य आणि कृती: २ वाटी बारीक रवा, पाऊण वाटी तूप, खवलेला नारळ १ वाटी, २ वाट्या पिठीसाखर, रवा तुपात भाजून घ्यावा. नारळ नुसतेच मंदाग्नीवर परतावे. त्यातील पाण्याचा अंश भाजल्याने कमी होईल. रवा, नारळ, साखर, वेलची, मनुका सर्व एकत्र करून त्याचे लाडू वळावे. (लाडू वळले गेले नाही तर त्यात दुधाचा हबका मारावा) हे लाडू चार दिवस टिकतात.

    चनपापडी

    साहित्य आणि कृती: १ वाटी चण्याचे पीठ, १ चमचा भरून कार्नफ्लावर, १ पळी तेल, मीठ, किंचित हळद वरील सर्व पिठात १ पळी तेल गरम करून घालून पीठ घट्ट मळावे. अर्ध्या तासानंतर चांगले मळून घेऊन चपाती एवढी गोळी घेऊन साधारण मध्यम जाडीची चपाती लाटावी. लहान वाटीने चनपापड्या दाबून पाडाव्या व तेलात तळाव्या. फुगल्या तरी कडक राहतात.

    कांदा – बटाटा रस्सा भाजी

    साहित्य आणि कृती: प्रथम तेलावर आलं – लसूण पेस्ट घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून लालसर झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, पाचकळशी मसाला व मीठ घालून परतावे. नंतर बटाट्याची फोडी घालून परतून घेणे. नंतर त्यात पाणी घालून शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्यात १ टीस्पून गरम मसाला घालून उकळी येऊ द्यावी. कांदा – बटाटा रस्सा भाजी तयार.

    गव्हाची स्वीट कचोरी

    साहित्य : १ वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी मावा, अर्धी वाटी पिठी साखर, १ वाटी साखर, १ वाटी फ्रेश क्रीम, किसलेले मिक्स ड्रायफ्रूट्‌स, मीठ

    कृती : प्रथम कढईत साखर आणि पाणी घेऊन पाक बनवून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून घ्या. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, फ्रेश क्रीम आणि गरम तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये मावा, पिठीसाखर, मिक्स ड्रायफ्रूट आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्या. मळलेल्या पिठाची पारी करून तयार मिश्रण भरून त्याचे गोळे करून घ्या. नंतर तयार गोळे गरम तेलात तळून साखरेच्या पाकात घोळवून घ्या. तयार कचोरी प्लेटमध्ये काढून काजू आणि बदामाने गार्निश करून सर्व्ह करा.

    नारळाच्या दुधातील गव्हाची खीर

    साहित्य : (ह्यात शक्यतो खपली गव्हाचा जाडसर रवा वापरतात) गव्हाचा जाड रवा १ वाटी, एका नारळाचे दूध, साखर-२ लहान चमचे, गूळ अर्धी वाटी, जायफळ पावडर अर्धा लहान चमचा

    कृती: कढईमध्ये गव्हाचा रवा थोडा गरम करून घेणे. रवा त्यात बुडेल इतपत गरम पाणी घालून १० मिनिटे ठेवणे. नंतर कुकरमध्ये शिजवून घेणे. शिजलेला रवा घट्ट झाल्यास मोडून घेणे. त्यात नारळाचे पातळ दूध घालून गॅसवर उकळायला ठेवणे. नारळाचे दूध चटकन फाटते त्यामुळे सतत पदार्थ घोटणे गरजेचे आहे. सात/आठ मिनिटे उकळल्यावर त्यात नारळाचे घट्ट दूध घालणे. बुडबुडे आल्यावर गॅस बंद करून त्यात २ चमचे साखर आणि अर्धी वाटी गूळ, जायफळ पावडर घालून ढवळणे. ही खीर गरमपेक्षा थंड झाल्यावर छान लागते. पुरी सोबत ह्याची जोडी छान जमते.

    नारळाच्या घार्‍या

    साहित्य :२ वाट्या ओले खोबरे (नुकते खवून घेतलेले), २ वाट्या पिठीसाखर, ४ चमचे पातळ केलेले तूप, २ चमचे कणीक, तांदूळाचे पीठ लागेल तसे, तळायला तेल.

    कृती : ह्या रेसिपीमध्ये नुकते ताजे खवलेले खोबरे घेणे गरजेचे आहे. ते ओलसर असल्यामुळे पाण्याची गरज पडत नाही. साखर, खोबरे, तूप एकत्र घेऊन ते व्यवस्थित फेसायचे अगदी पांढरेशुभ्र होईपर्यंत. त्यात कणीक घालायची आणि लागेल तसे तांदळाचे पीठ घालत थालिपीठाच्या गोळ्यासारखे बनवायचे. तेल तापत ठेवायचे. प्लास्टिक पेपरवर तेल लावून थालिपीठासारखे थापावे व एकेक खरपूस तळून घ्यावे.

    नारळाच्या दुधातील शिकरण

    साहित्य : नारळाचे घट्ट दूध २ वाट्या, २ केळी, ४ चमचे साखर, चिमूटभर वेलची पावडर

    कृती: नारळाचे घट्ट दूध काढून घेणे. ते आधी थंड करून घेतले तर उत्तमच! त्यात केळीचे काप, साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित ढवळणे. गरम पोळी बरोबर शिकरण मस्त लागते.

    Read more

    ऑगस्ट २०२५ – १२ ज्योतिर्लिंग

    श्रीक्षेत्र सोमनाथ

    गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. श्रीशंकराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून सोमनाथ मंदिर हे अग्रस्थानी आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या, कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो. त्याशिवाय सोमनाथाजवळ पाच पांडवांचे वास्तव्य होते असाही इतिहास आहे.

    श्री शैलम मल्लिकार्जुन

    भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर असून हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिणेचा कैलाश या नावानेदेखील हे स्थळ ओळखण्यात येते. माता पार्वती अर्थात मलिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले आहे.

    श्री महाकालेश्वर

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. रूद्र सागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदिर अप्रतिम असून भगवान शिव स्वत: लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे.

    ओंकारेश्वर

    उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासांच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशात असून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहचणे सोपे आहे.

    केदारनाथ

    सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गढवाल रांगांमध्ये असणार्‍या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्यामध्ये वसलेले आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. केदारनाथची यात्रा म्हणजे चारधाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो. हे मंदिर चारधामांपैकी एक असून समुद्रसपाटी पासून ३५८३ मीटर उंचीवर वसलेले आहे.

    श्रीक्षेत्र भीमाशंकर

    १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर. पण हे पर्यटनस्थळ म्हणून अधिक नावारूपाला आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून १९८४ मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

    काशी विश्वनाथ

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले आणि तिथे मशीद उभारली. पण अकबराच्या काळात तोरडमलांनी पुन्हा एकदा या मंदिराचे पुनर्निमाण केले. पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडले. पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी त्यानंतर हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला.

    त्र्यंबकेश्वर

    श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे नाशिकपासून २८ कि.मी. अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणार्‍या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (सन १७४० ते १७६०) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले.

    वैजनाथ

    वैजनाथ अर्थात परळी वैजनाथ. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हेदेखील ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे अशी मान्यता आहे. परळी येथील हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक असल्याचे मानण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्रीकरणाधिप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

    नागेश्वर

    नागांचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या व्युत्पत्तीची कथा आणि माहात्म्य जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे.

    शिव पुराणानुसार, नागेश्वर ज्योतिर्लिंग ‘दारूकवन”मध्ये आहे. जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. ‘द्रुकनाव” या नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. जसे कामकावन, द्वैतावंत, दंडकवन नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिव पुराणात दारुका नावाचा उल्लेख आहे.

    रामेश्वरम तीर्थ

    चारधामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल समजण्यात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे, तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे. हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वत: रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे, असे सांगण्यात येते.

    घृष्णेश्वर

    हे शंकराचे एक प्राचीन मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबादपासून साधारण ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण यासारख्या ग्रंथांत घृष्णेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात. सदर मंदिराचे बांधकाम हे लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसंच या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

    Read more

    जुलै २०२५ – ॥ शुभ मुहूर्त, सावधान ॥

    विवाह मुहूर्त पाहून केलेले सर्वच विवाह यशस्वी होतात का? विवाह मुहूर्त नसताना जर कार्य केले तर ते अयशस्वी होते का? मुहूर्त नसताना “काढीव” मुहूर्तावर विवाह कार्य करणे योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण विचारीत असतात. अर्थात पुढे त्या संसारांचे काय होते याविषयी अजून कोणीही संशोधन केलेले नाही. आपल्याकडे विवाह हा एक शुभ संस्कार मानला जातो. विवाह कार्य निर्विघ्नपणे संपन्न व्हावे, वधुवरांचा भावी संसार सुखाचा व्हावा यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाहाच्या वेळी आप्तेष्ट मित्रमंडळी वधू-वरांना शुभाशीर्वाद, शुभेच्छा देत असतात. विवाह मुहूर्तावर विवाह संस्कार करणे हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो.

    विवाह संस्कार

    गृहस्थाश्रम हा सर्व आश्रम धर्मामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम धर्माचरणाची योग्यता विवाह संस्कारानेच प्राप्त होते. विवाह विधींमध्ये विवाह होम आणि गृह प्रवेशनीय होम हे दोन प्रमुख विधी सूत्रकारांनी सांगितलेले आहेत. विवाह होमामध्ये होम, पाणिग्रहण, लाजाहोम, अग्नि प्रदक्षिणा, अश्मारोहण, सप्तपदी आणि ध्रुवादिदर्शन हे विधी असतात. गृह प्रवेशनीय होमामध्ये गृहप्रवेश, होम, वधुला उपदेश आणि देवताप्रार्थना हे विधी असतात. तसेच पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, मंडप देवता स्थापन, वाग्दान, सीमांतपूजन, ऐरणी पूजन इत्यादी धार्मिक विधी संस्कार ही केले जातात.

    या प्रमुख विधींखेरीज अक्षत, घाणा भरणे, साखरपुडा, उष्टी हळद, केळवण, तेलसाडी, तेलफळ, रूखवत, सूनमुख, व्याहीभोजन, रासन्हाणे, विडे तोडणे, रंग खेळणे, झेंडा नाचवणे वगैरे लौकिक विधी विवाह समारंभात केले जातात. भारतातील प्रत्येक राज्यात विवाह विधींमध्ये कालमानाप्रमाणे आणि स्थानिक कुलाचाराप्रमाणेही बदल झालेले आढळतात.

    विवाह मुहूर्त

    “काल: शुभक्रियायोगी मुहूर्त: इति कथ्यते।” म्हणजे शुभ कर्मांना योग्य असा काल म्हणजे मुहूर्त होय. अशी मुहूर्त शब्दाची व्याख्या “विद्यामाधवीय” या प्राचीन ग्रंथात दिलेली आहे. ऋग्वेदात “दिवस सुदिन असताना” असा उल्लेख आढळतो.

    महत्त्वाची गोष्ट ही की, प्रत्येक शुभकार्यासाठी मुहूर्त काढण्यासाठी वेगवेगळे नियम सांगण्यात आले आहेत. विवाह मुहूर्तांचे खूप नियम सांगण्यात आले आहेत. त्याला अपवादही सांगण्यात आले आहेत. ते अपवाद गृहीत धरून पंचांगात विवाह मुहूर्त देण्यात येतात. श्रौत, गुह्य-धर्म सूत्रात, मुहूर्तमार्तंड, मुहूर्त चिंतामणी, मुहूर्त गणपती इत्यादी अनेक ग्रंथांमधून केवळ मुहूर्त विषयक सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

    आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतच्या कालाला चातुर्मास म्हणतात. हे दिवस पावसाळ्याचे शेतीच्या कामांचे असतात. प्रवास करणेही कठीण जात असते. चातुर्मासात विवाह मुहूर्त दिलेले नसतात. तसेच नियमांप्रमाणे विवाहयोग्य शुभ दिवस आणि शुभवेळ काढली जाते. पंचांगे आणि दिनदर्शिकांमधून विवाह मुहूर्त दिलेले असतात. हल्ली काही ग्रंथांचा आधार घेऊन चातुर्मासातही “काढीव मुहूर्त” वेगळे देण्यात येतात. अडीअडचणींच्या वेळी या काढीव मुहूर्तावर विवाह कार्ये केली जातात.

    पंचांग – दिनदर्शिकांमध्ये विवाह मुहूर्ताची जी वेळ दिलेली असते त्या शुभवेळी पाणिग्रहण, कन्यादान, सप्तपदी यापैकी एखादा विधी केला जातो. काही पुरोहित मंगलाष्टके संपवून या शुभवेळी अंतरपाट दूर करून वधुवरांना एकमेकांना फुलांच्या माळा घालायला सांगतात. महाराष्ट्रात शुभमुहूर्ताच्या शुभवेळा दिवसाच्या असतात. परंतु गुजरात आणि उत्तर भारतातील काही राज्यात शुभवेळा रात्रीच्या असतात. त्या विवाह सोहळ्यात हस्तमिलाप आणि वधुच्या केसांमधील भांगामध्ये वर सिंदूर भरतो याला विशेष महत्त्व दिले जाते.

    आधुनिक काळात कधीकधी काही कार्यात विवाह मुहूर्ताची वेळही पाळली जात नाही हे ही खरे आहे.

    काही कार्यात वधुला मेकअप करायला, सजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे शुभमुहूर्त वेळ चुकते. तर काही कार्यात नवरा मुलगा मिरवणुकीने मंगलकार्यात येत असतो. वर्‍हाडी नाचत नाचत येत असल्याने मिरवणुकीला उशीर होतो, मुहूर्ताची वेळ टळून जाते. काही कार्यात अंतरपाट दूर होताच माळ घालण्यापूर्वी उत्साही वर्‍हाडी वधुवरांना उंच उचलतात. कधी कधी रंगाचा बेरंगही होतो. काही कार्यात एक मंगलाष्टक झाल्यावर पुरोहित थांबतात. वधू पालखीत बसून वेगळ्याच संगीताच्या तालावर कार्यालयात प्रवेश करते. नंतर पुन्हा मंगलाष्टकांना सुरुवात केली जाते. मुहूर्तवेळ चुकते. काही कार्यात नवरा मारूतीचे दर्शन घेऊन यायचा असल्याने उशीर होतो. म्हणून काही कार्यालयांनी कार्यालयातच गणपती आणि मारूती यांची मंदिरे उभारली आहेत.

    अनेक लोक विवाह शुभमुहूर्त वेळेला खूप महत्त्व देतात. वैदिक पद्धतीने सर्व विवाह विधी अगोदर करून घेतात आणि मंगलाष्टके म्हणून शुभ मुहूर्तावर वधू-वर एकमेकांना माळा घालतात. जमलेले आप्तेष्ट मित्र आशीर्वाद, शुभेच्छा देतात.

    शेवटी विवाहकार्यात मुहूर्त वेळेबरोबरच हौस- मौज, कुलाचार यांनाही सध्या विशेष महत्त्व दिले जाते. तो एक महत्त्वाचा कौटुंबिक आनंद सोहळा असतो. महत्त्वाचा संस्कार असतो.

    Read more

    जून २०२५ – आर्थिक साक्षरता

    संपत्तीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा करावा, हे समजण्याची क्षमता म्हणजे आर्थिक साक्षरता होय. पैसा म्हणजे काय? पैशाच्या सहाय्याने आपण काय काय करू शकतो? आपल्या जवळचे पैसे कोठे आणि कसे गुंतवायचे? गुंतवणुकीला किती परतावा मिळू शकेल? इत्यादींबाबत जाणीव व जागरूकता असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. थोडक्यात, पैसे कोठे व कसे खर्च करायचे आणि गुंतवायचे यांचे ज्ञान असणे म्हणजे आर्थिक साक्षरता होय. आर्थिक साक्षरता निवड नसून ती एक गरज आहे. लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष सगळ्यांसाठी ती महत्त्वाची असल्यामुळे आर्थिक साक्षरतेला पर्याय नाही. कुटुंब, व्यवसाय आणि जीवनशैली समृद्ध करण्यासाठी; आर्थिक स्वावलंबनासाठी; भविष्यकालीन आर्थिक सुरक्षेसाठी; समाधानी जीवन जगण्यासाठी आर्थिक साक्षरता गरजेची आहे. चांगली आर्थिक साक्षरता वर्तमान जीवन सक्रिय बनवून भविष्य सुरक्षित करते. आजची आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्ती उद्याची कुशल नागरिक बनते व आर्थिक विकासासाठी नवीन संधींची निर्मिती होते. याचा देशाच्या एकूण आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होत असतो.

    निरोगी आणि जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधीसाठी काय केले जावे व काय करू नये यांबाबत लोकांना ज्ञान देणे आणि त्यांच्या कर्जांचे डोंगर, कर्जांचे सापळे आणि बेईमान सावकारांकडून होणार्‍या शोषणापासून संरक्षण करणे हे आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे पहिले उद्दिष्ट आहे. बँकेत खाते उघडणे, बचत करण्याची पद्धत, कर्जाचे व्यवहार, करांमधील बचत, गृहकर्ज, विमा प्रीमियम, गुंतवणुकीतील परतावा, भाग (शेअर्स) खरेदी, लाभांश, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, विद्युतीय आधुनिक उपकरणांचा वापर, पंजीकृत संस्थेतील गुंतवणूक इत्यादींबाबत माहितीचा समावेश आर्थिक साक्षरतेत होतो. मंदीचे संधीत रूपांतर कसे करावे? चांगल्या कंपन्यांचे भाग खरेदी करण्याची क्षमता, भाग बाजारातील गुंतवणुकीला चांगला परतावा मिळावा, तो किती काळ ठेवावा, कधी विकावा? इत्यादींचे अद्ययावत ज्ञान आर्थिक साक्षरतेत अभिप्रेत आहे.

    भारतीय लोकसंख्येचा एक मोठा भाग अजूनही वित्तीय संस्था, त्यातील सुरक्षित गुंतवणूक आणि लाभाचे प्रमाण यांपासून अनभिज्ञ असून संस्थात्मक वित्तीय सेवांच्या परिघाबाहेर आहे. ग्रामीण गरीब लोक पैसा मिळविण्यासाठी मोठे शारीरिक कष्ट उपसतात; पण त्यातून मिळणारा पैसा कसा उपयोगात आणावा? कोठे गुंतवावा? यांचे त्यांना फारसे ज्ञान नाही. त्यामुळे कमी उत्पन्न असणार्‍या कुटुंबांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रमात बचत करणे, आर्थिक जोखीम कमी करणे, वित्तीय निर्णय संपूर्ण माहितीसह घेणे, आर्थिक व्यवहार सोपे करणारे आवश्यक ज्ञान व माहिती देणारी साधनयंत्रणा उपलब्ध करणे इत्यादी आरबीआयद्वारे केले जाते.

    आर्थिक संतुलन साधणारे गुंतवणुकीचे काही ठळक पर्याय वर्तमानकाळात प्रचलित आहेत, ज्यांची माहिती सामान्यांना असल्यास आर्थिक व्यवहार फायदेशीरपणे यशस्वी होतील. जागतिकीकरणामुळे वित्तीय बाजार आणि आर्थिक व्यवहार एकीकडे व्यापक झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव आपल्या वैयक्तिक वित्तावर पडत आहे. याची दखल घेऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

    ± म्युच्युअल फंड (पारस्परिक निधी) : भविष्यकालीन परताव्यासाठी, स्थैर्य अपेक्षित असणार्‍या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा सामूहिक गुंतवणुकीचा प्रकार असून याद्वारे चांगल्या व्याजाचा परतावा मिळत असतो.

    ±लोक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड – पीपीएफ) : मध्यमवर्गीय गुंतवणुकदारांमध्ये सर्वाधिक पसंतीची ही योजना आहे. या योजनेचा कार्यकाळ १५ वर्षे असून यामधील गुंतवणकीला सरकारची हमी आहे. यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत असून मुदतीअंती मिळणारी रक्कम करमुक्त आहे.

    ±   ज्येष्ठ नागरिक योजना : ही सर्वाधिक पसंतीची योजना असून ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना टपाल कार्यालय किंवा राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून या योजनेत सहभागी होता येते. या योजनेत ५ वर्षांची व त्यांनतर ३ वर्षांची मुदतवाढ मिळत असून यात किमान १५ लाख रुपये गुंतविता येतात.

    ±राष्ट्रीय पेंशन योजना

    (नॅशनल पेंशन स्कीम – एनपीएस) : राष्ट्रीय पेंशन योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना असून ती पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॅारीटीद्वारे चालविली जाते. ही योजना म्हणजे इक्विटी, मुदत ठेवी, औद्योगिक रोखे यांचा मिलाफ आहे.

    ± केंद्रीय बँकेचे रोखे : यास आरबीआय रोखे असेही म्हणतात. रिझर्व्ह बँकचे करपात्र रोखे हादेखील गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. हे रोखे डिमॅट फॉर्मच्या माध्यमातून घ्यावे लागतात.

    ±   वारसा संपत्ती : वारसाहक्काने मिळालेली जमीन व राहते घर ही कधीही गुंतवणूक समजू नये. एखादे नवीन घर, जागा किंवा शेतजमीन विकत घेतली, तर ती गुंतवणूक असते. भविष्यात या संपत्तीला किती किंमत येईल यावरून तिचा परतावा ठरत असतो.

    ±   सोने : सोन्यातील गुंतवणूक ही पूर्वापार, पारंपरिक गुंतवणूक आहे. सोन्याच्या आश्चर्यकारकरीत्या वाढलेल्या किमती गुंतवणूकदारांना प्रलोभन देणार्‍या आहेत. भाग बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली; पण सोन्याच्या किमती सातत्याने इतक्या वाढत असताना त्यात गुंतवणूक करणे योग्य नाही. जे लोक कमी किंमत असताना सोन्यात गुंतवणूक करतात, त्यांना भविष्यात मोठा फायदा होताना दिसून येतो.

    ±इंडिया पोस्ट पेमेंट बँक : आर्थिक सुधारणांमध्ये आणखी एक पाऊल म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक होय. ही योजना १ सप्टेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आली. डिजिटल क्रांतीच्या दिशेने टाकलेले हे एक भरीव पाऊल आहे. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, थर्ड पार्टी ट्रान्सफर सेवा इत्यादींचा प्रचार व प्रसार यामार्फत यशस्वीपणे केला जात आहे.

    आर्थिक साक्षरता ही चालू आर्थिक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांसाठी महत्त्वाची आहे. देशाचा निम्मा वाटा असणारा स्रीवर्ग आर्थिक साक्षर झाल्यास त्या दोन कुटुंब साक्षर करतात. त्या आर्थिक निर्णय स्वत: घेऊ लागतात. ग्रामीण क्षेत्रात बचतगट, स्वयंरोजगार, कौशल विकास योजना, शिक्षण यांमुळे अर्थार्जन करणार्‍या स्रियांचे प्रमाण वाढले आहे. उत्पन्नाची गुंतवणूक योग्य ठिकाणी करण्यासाठी त्यांना आर्थिक साक्षरतेची गरज आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक साक्षरता प्रचार व प्रसार मोहीम, तसेच वित्तीय साक्षरता सप्ताह साजरा केला जातो.

    आर्थिक साक्षरतेचे अनेक फायदे आहेत. यामध्ये आर्थिक स्वावलंबन, ग्राहक संरक्षण, समाजाच्या वित्तीय व्यवहारातील बदल, आर्थिक विषमता कमी होणे, दूरदृष्टी विकसित होणे, निर्णय क्षमता वाढणे, आर्थिक सुरक्षितता व समाधानी वृत्ती वाढणे, तरुणाईला बचत व गुंतवणुकीची सवय लागणे, आत्मविश्वास वाढणे व भविष्य सुरक्षित होणे इत्यादींचा समावेश होतो. शोषणापासून मुक्ती मिळविणे, भ्रष्टाचार व अनियमिततेपासून सुटका करवून घेण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे.

    औपचारिक शिक्षण आणि आर्थिक साक्षरता यांचा संबध अधिक दृढ झाल्यास आर्थिक साक्षरता ही संकल्पना अधिक यशस्वी होईल. आर्थिक व्यवहार व पैशात सुरक्षित वाढ हा आर्थिक साक्षरतेचा मूळ गाभा आहे.

    Read more

    मे २०२५ – व्यक्तिमत्त्व विकास

    स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावीपणामुळे केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर इतरत्र देखील कोणत्याही स्पर्धेमध्ये निवड होण्याची किंवा न होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दैनंदिन व्यवहारांमध्ये देखील इतरांपेक्षा स्वत:ला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकासाची निकड जाणवू लागली आहे. तर, आता प्रश्न असा उपस्थित होतो की व्यक्तिमत्त्व विकसित कसे करावे? व्यक्तिमत्त्व विकासात काय मदत करते? व्यक्तिमत्त्व विकास हा काही एक ठराविक कोर्स करून होत नाही. स्वत:मधील बलस्थाने सशक्त करण्यासाठी आणि कमतरता कमी करण्यासाठी शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक केले प्रयत्न म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास होय.

    १. स्वत:ला जाणून घ्या: स्वत:ला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी स्वत:मध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादी करा. त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा. सोबत वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी, तजेलदार व्यक्तिमत्त्व घडवा.

    २. आकर्षक दिसण्याऐवजी आपले वाटू लागा : तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचं आहे. एखाद्याचे व्यक्तिमत्त्व त्याचे स्वरूप, वागणूक, दृष्टीकोन, शिक्षण, मूल्ये आणि काही वेगवेगवेगळ्या वैशिष्ट्यांद्वारे ठरत असते. तुमचे व्यक्तिमत्त्व ठरवते की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही गरज भासल्यास एखाद्या आव्हानात्मक परिस्थितीला कसा प्रतिसाद द्याल.

    ३. काळ, वेळ, घटना व परिस्थितीनुरुप नीटनेटका पेहराव करा : लोक तुम्हाला आधी पाहतात आणि मग ऐकतात. त्यामुळे पहिल इंप्रेशन हे कपड्यांचंच पडत असतं. आपण ऑफिस, पार्टी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे यावर लक्ष द्या. प्रसंगानुसार पोषाख परिधान करा. चांगले दिसण्याचा प्रयत्न केलात तर आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर पडेल यात काहीच शंका नाही. परंतु सर्वात महत्त्वाचे आपण कसे कपडे घालता यावरून आपलं व्यक्तिमत्त्व उठून दिसत असतं.

    ४. कोणाची कधी नक्कल करू नका : लक्षात ठेवा की, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये आणि स्वभाव गुणधर्म असतात. त्यामुळे इतरांसोबात स्वत:ची तुलना करू नका. त्याने केवळ त्रास वाढतो. खास करून जेव्हा आपण इतरांच्या तुलनेत कमी पडतो आहोत यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात अडचणी येऊ लागतात. म्हणून कोणाचीही नक्कल करू नका. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.

    ५. सामाजिक कौशल्ये शिका : आपल्याला आयुष्यात पुढे नेण्यासाठी किंवा लोकांशी असलेल्या आपल्या नातेसंबंधात आपल्याला मदत करण्यासाठी केवळ चांगले दिसणे कधीही पुरेसे नसते. त्याऐवजी आपली सामाजिक कौशल्ये वाढवा. आयुष्याच्या सामाजिक क्षेत्रात जितके यश मिळते तितकेच आपल्याला स्वत:बद्दल चांगले वाटते. इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषादेखील सर्वांना आरामदायक वाटेल अशी ठेवा.

    ६. सामाजिक संवाद टाळू नका: केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका. संधी शोधा, वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा. तु्‌म्ही जितकी सामाजिक संवादाची भीती बाळगाल, तु्‌म्हाला तुमच्याबद्दल तितके अधिक वाईट वाटत राहील. कधीही परिपूर्ण होण्याच्या मागे लागू नका.

    ७. स्वत:बद्दल सकारात्मक राहा : जर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात काही नकारात्मक बाबी असतील तर सकारात्मक गोष्टीही नक्कीच असतात. या सकारात्मक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्वत:ची शक्ती जाणून घ्या. स्वत:चे सामर्थ्य मान्य करा आणि स्वसामर्थ्य व स्वयंप्रेरणेने कोणतेही कार्य करा. आत्मविश्वासाने कार्य करणे आपल्याला आपल्या आव्हानांवर मात करण्यास आणि दीर्घकाळ सकारात्मक राहण्यास निश्चितपणे मदत करेल.

    ८. आपल्या आरामदायी कोषातून बाहेर या:- आपल्या आरामदायी जीवनशैलीतून बाहेर येऊन नवीन कौशल्ये शिकून स्वत:ला आव्हान देण्यास तयार राहा. नवनवीन संधीच्या शोधात राहा. त्या संधी उपयोगात आणा. स्वत:च्या अंगी सकारात्मक, मुक्त विचारसरणीची वृत्ती बाणवा. गरज भासेल त्याप्रमाणे परिस्थितिनुरुप स्वत:ला बदलण्यास तयार राहा.

    ९. अपयशाची भीती बाळगू नका: चुका केल्याबद्दल काळजी करू नका, आपण आपल्या प्रवासामध्ये खूप चुका कराल. अनेक चुका तुमच्या वाटेमध्ये अडथळा होऊ शकतील, परंतु या चुका वेळेत सुधारून स्वत:मध्ये बदल घडवत पुढे चला आणि प्रगती पथावर न थांबता आगेकूच करा.

    १०. सतत शिकत रहा: नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आपला शिकण्याचा प्रयत्न; आपलं ज्ञान वाढण्यास तर मदत करेलच, परंतु या ज्ञानाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी केलात तर तुम्ही समाजात, मित्रपरिवारात वा इतर लोकांमध्ये सन्मानाने ओळखले जाऊ लागाल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

    ११. नेतृत्व करण्यास व पुढाकार घेण्यास शिका : आपण जे काही शिकलात आणि आपल्याला जे काही माहिती आहे ते त्याचा उत्तम प्रकारे वापर करा. आपण ज्या विषयाला सामोरे जाल त्याचे संपूर्ण बारकावे जाणून घ्या आणि त्यात निपुण झाल्यावर ते इतरांपर्यंत पोचवा. तुम्ही तुमचं ज्ञान योग्य रीतीने इतरांना सांगितलं आणि इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झालात; तर मग तुम्ही नैसर्गिकरीत्या नेता व्हाल. स्वत:ला अभिव्यक्त करायची सवय लावा. जे ठरवलं आहे ते तडीस नेण्याचा प्रयत्न करा.

    १२. प्रयत्न आणि सुसंगतता: प्रयत्न आणि सुसंगतता या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगतता या गोष्टींचा अवलंब करा.

    १३. हार मानू नका: आयुष्यामध्ये नेहमीच जिंकणे शक्य नसते. अशा वेळी पराभव पत्करावा लागला तरी हार न मानणे हे अतिशय कठीण काम आहे. परंतु असे बरेच लोक आहेत जे केवळ काही आठवडे किंवा महिन्यांच्या प्रयत्नातून स्वत:मध्ये हे परिवर्तन घडवून आणू शकतात. हार न मानण्याची वृत्ती म्हणजे अर्धी लढाई तिथेच जिंकण्यासारखंच आहे.

    १४. हसमुख राहा आणि सर्वांना हवेहवेसे व्हा: कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. आपण प्रत्येकजण अशा व्यक्तीच्या संगतीत राहू पाहतो जो आपल्याला हसवतो वा प्रसन्न ठेवतो. पण इतरांना हसवण्यासाठी फक्त बाष्कळ विनोद मारू नका. संभाषण करीत असताना वातावरणात नैसर्गिकरीत्या मजेशीरपणा आणण्याचा प्रयत्न करा.

    Read more

    एप्रिल २०२५ – सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

    वैवाहिक जीवन सुखाचं आणि समाधानाचं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र लग्नानंतर प्रत्येकाकडे जीवन सुखी आणि आनंदी करणारं “सिक्रेट” असेलच असं नाही. अनेकांच्या आयुष्यात लग्नाआधी आणि नवीन लग्न झाल्यावर भरभरून वाहणारं प्रेम काळाच्या ओघात नकळत कधी कमी होत जातं हे कळतसुद्धा नाही. जेव्हा त्यांना याची जाणीव होते तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो. यासाठीच आयुष्यभर संसार सुखाचा (Happy married life in marathi) कसा करायचा हे प्रत्येकाला माहीत असायलाच हवं. दैनंदिन जीवनात अगदी काही सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी करून तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन आनंदी करू शकता. यासाठी सुखी वैवाहिक जीवनाचं हे गुपित जरूर जाणून घ्या.

    जोडीदाराचे मनापासून कौतुक करा (Appreciate Your Partner)

    कौतुक ऐकायला कोणाला नाही आवडत? घरातल्या अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच आपलं कौतुक व्हावं असं वाटत असतं. जोडीदार अथवा पार्टनर तर तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती आहे. जोडीदाराचे वेळोवेळी कौतुक केल्यामुळे एकमेकांमधील प्रेम अधिक दृढ होत जातं. बाहेर परिस्थिती कशीही असली तरी घरातून आणि विशेषत: लाईफ पार्टनरकडून मिळणारी कौतुकाची थाप काम अधिक चांगलं करण्याची ऊर्मी मनात निर्माण करते. मग ते तुमचा आवडता पदार्थ तयार करणं असू दे किंवा ऑफिसमध्ये मिळालेलं एखादं छोटं यश. तुमच्या जोडीदाराच्या यशाचं मनापासून कौतुक करायला मुळीच विसरू नका. मात्र लक्षात ठेवा कौतुक मनापासून करा वरवर केलेलं कौतुक समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत जाऊन कधीच भिडत नाही. यासाठी त्या कौतुकामध्ये तुमच्या मनातील प्रेम आणि जोडीदाराबद्दल वाटणारा आदर त्यात जोडलेला असायला हवा.

    लाईफ पार्टनरचे चांगले श्रोते व्हा

    (Be a Good Listener)

    जेव्हा जेव्हा तुमच्या दोघांमध्ये एकाला व्यक्त होण्याची गरज असेल तेव्हा दुसर्‍याने त्याच्यासाठी चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. या एकाच गोष्टींवर आज अनेक कुटुंब सुखाने संसार करत आहेत. सुखी वैवाहिक जीवनाचं हे एक गुपितच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं म्हणणं कान देऊन ऐकता तेव्हा त्या व्यक्तीला सर्वात आधी मनातून खूप बरं आणि हलकं वाटतं. शिवाय यामुळे अनेक समस्या सहज सोडवता येऊ शकतात. जेव्हा तुम्ही एखाद्याला थोडासा वेळ देता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील मौल्यवान क्षण आणि तुमचं आयुष्यच त्या व्यक्तीला देत असता. एखाद्या महागड्या भेटवस्तूपेक्षा हे गिफ्ट जोडीदारासाठी नेहमीच गरजेचं असतं.

    मनमोकळा आणि सुसंवाद करा

    (Maintain Strong Communication)

    सुसंवाद ही गोष्टच आजकाल हरवत चालली आहे असं वाटत आहे. कारण करिअर आणि वैयक्तिक आनंदाच्या प्रयत्नात माणूस त्याच्या घरातल्या लोकांपासून फार दूर चालला आहे. याचं प्रमुख कारण पूर्वीप्रमाणे आजकाल कुटुंबामध्ये संवाद होत नाहीत. जोडीदारासोबत तर दररोज सुसंवाद होणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुमचा संवाद चांगलाच होईल आणि कोणतेही मतभेद होणार नाहीत असं नाही. मात्र यामुळे कोणताही वाद जास्त काळ न टिकवता पुन्हा तुमची मनं एक होतील याची काळजी घेता येऊ शकते. त्यामुळे बोला… भरपूर बोला…. एकमेकांशी दररोज थोडावेळ काढून बोलणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. शिवाय मनातील वाईट गोष्टींचा निचरा झाल्याशिवाय नवीन चांगल्या गोष्टी मनात शिरत नाहीत. म्हणून एकमेकांबद्दल वाटणार्‍या भावना आणि मतभेद अशा संवादातून सोडवा.

    शारीरिक जवळीक आणि

    उत्साह कायम राखा

    (Maintain Intimacy and Passion)

    सुखी वैवाहिक जीवन मराठी हे एक आणखी एक रहस्य आहे. लग्नाला कितीही वर्ष होऊ द्या अथवा तुमचं वय कितीही असू द्या. जोडीदारासोबत शारीरिक जवळीक आणि प्रेमातील उत्साह कायम ठेवा. कारण सेक्समुळे आयुष्यातील इतर गोष्टींमधून मिळणारा मानसिक ताणतणाव कमी होतो. यासाठी तुमच्या लाईफ पार्टनरच्या गरजा योग्य वेळी ओळखा आणि एकमेकांना सुखी आणि आनंदी ठेवा.

    जोडीदाराच्या फँटसी पूर्ण करा (Fulfill Your Partners Fantasy)

    रोमँटिक आयुष्याबद्दल प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी “फँटसी” या असतातच. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरच्या या “फँटसी” माहीत असायलाच हव्यात. पार्टनरला सुखी ठेवण्यासाठी या “फँटसी” पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या फँटसीबाबत सतत तुमच्या पार्टनरसोबत चर्चा करा. ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील चार्म टिकून राहील. वय कितीही झालं तरी एकमेकांबद्दलची ओढ कायम ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. सुखी वैवाहिक जीवन जगण्याचा हा आणखी एक बेस्ट उपाय आहे.

    जबाबदारी स्वीकारा

    (Take Responsibility)

    जोडीदाराची जबाबदारी स्वीकारा. वैवाहिक आयुष्य हे तुमच्या दोघांचं आहे. त्यामुळे दोघांनी एकमेकांची जबाबदारी स्वत:हून स्वीकारायला हवी. यासाठी तुमच्या लाईफ पार्टनरची सर्व बाबतीत जबाबदारी स्वीकारण्यास काहीच हरकत नाही. लाईफ पार्टनरच्या आयुष्यातील इतर जबाबदार्‍या जसं की, आईवडिलांची काळजी, कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण, आर्थिक मदत, भावंडाचे करिअर अथवा लग्न अशा अनेक गोष्टीत सहकार्य करून तुम्ही या जबाबदारी स्वीकारू शकता.

    एकमेकांना गृहित धरू नका

    (Don’t Take Each Other For Granted)

    वैवाहिक जीवनात बर्‍याचदा अनेकांना जोडीदाराला गृहित धरण्याची सवय असते. कधी कधी तर लग्नानंतर काही वर्षांनी जोडीदार एकमेकांना आपोआप गृहित धरू लागतात. मात्र हे फार चुकीचे आहे. कारण लाईफ पार्टनर असला तरी प्रत्येक व्यक्तीला त्याचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यामुळे एखादी जबाबदारी, काम अथवा वैयक्तिक सल्ला देताना आधी समोरच्या व्यक्तीचं म्हणणं नीट ऐकून घ्या. जोडीदाराच्या वैयक्तिक मत आणि कामांना आधी प्राधान्य द्या.

    भावनांचा आदर राखा

    (Respect Each Others Emotions)

    प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना निरनिराळ्या असतात. कोणी फारच भावनिक असेल तर कोणी फारच मजबूत मन असलेलं. यासाठी तुमच्या जोडीदाराच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. शिवाय समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि तुमचे विचार एकसमान असतीलच असं नाही. मात्र “व्यक्ती तितक्या वल्ली” या म्हणीनुसार तुमच्या जोडीदाराच्या भावना तुम्हाला पटल्या नाहीत तरी कमीत कमी त्यांचा आदर नक्कीच राखा.

    लाईफ पार्टनरला प्रथम प्राधान्य द्या

    (Give Priority To Your Spouse)

    आयुष्यात समतोल साधायचा असेल तर कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं हे माहीत असायला हवं. म्हणूनच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रथम प्राधान्य नेहमी जोडीदारालाच द्या. कारण आयुष्यभर तुम्हाला साथ देणारी आणि तुमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणारी व्यक्तीच तुमच्यासाठी सर्वस्व असू शकते. वैवाहिक जीवनात सुखी (प्aज्ज्ब् स्arrग्‌ त्ग्fा ग्ह स्araूप्ग्) राहण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. करिअर, पैसे, इतर नाती यामध्ये सर्वात आधी जोडीदाराला प्राधान्य दिल्यामुळे तुमचाच संसार नेहमीच सुखाचा होईल हे लक्षात ठेवा.

    Read more

    मार्च २०२५ – चैत्रातल्या चैतन्याचा नवसंवत्सर – गुढीपाडवा

    चैत्र महिन्याची शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा किंवा युगादी म्हणून ओळखली जाते. या तारखेपासून हिंदू नववर्ष सुरू होते, असे मानले जाते. गुढी म्हणजे विजय ध्वज, गुढीपाडव्याला चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा असेही म्हणतात. हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. अशा प्रकारे हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र महिन्यात येणार्‍या नवरात्रीला वासंतिक नवरात्र म्हणतात. यासोबतच गुढीपाडवाही येतो. या वर्षी गुढीपाडवा सण ३० मार्च, २०२५ रोजी येत आहे. सदर लेखातून आपण गुढीपाडवा सणाशी संबंधित विविध प्रकारच्या परंपरा, महत्त्व आणि चालीरीतींबद्दल जाणून घेणार आहोत.

    एका धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली, म्हणून गुढीपाडव्याला “नवसंवत्सर” असेही म्हणतात. याशिवाय महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही या तारखेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून “पंचांग” रचले होते. आंध्र प्रदेशात गुढीपाडव्यानिमित्त खास प्रकारचा प्रसाद वाटला जातो. असे मानले जाते की, जो कोणी काहीही न खाता-पिता या प्रसादाचे सेवन करतो तो नेहमी निरोगी राहतो आणि रोग त्याच्यापासून दूर राहतात. याशिवाय या प्रसादामुळे त्वचेच्या आजारांपासूनही मुक्तता मिळवून देतो. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या भारतीय राज्यांमध्ये हा सण ९ दिवस विशेष विधी आणि पुजेने साजरा करण्याची पद्धत आहे. रामनवमीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होते.

    आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी तयार केलेले सर्व अन्न आरोग्यदायी असते. या सणासाठी महाराष्ट्रात पुरणपोळी, श्रीखंडपुरी असे पदार्थ खास बनवले जातात. लोकांचा असा विश्वास आहे की, रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केल्याने त्वचेचे रोग तर दूर होतातच, पण आरोग्यही सुधारते. पुरणपोळी बनवताना गूळ, चणाडाळ, यांचा वापर केला जातो; हे सर्व आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यादिवशी सकाळी कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. असे मानले जाते की, असे केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील अशुद्धता दूर होते. कैरी घालून आंबाडाळ केली जाते. तसंच कैरीचं पन्हं केलं जातं. हे सर्व पदार्थ चैत्र ऋतूमध्ये शरीरासाठी आवश्यक आहेत.

    गुढीपाडव्याच्या दिवशी घराची साफसफाई करून लोक रांगोळी आणि तोरणाने घर सजवतात. ते त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गुढी म्हणजेच ध्वज उभारतात. तांब्याच्या भांड्यावर स्वस्तिक चिन्ह काढले जाते आणि ते रेशमी कापडात गुंडाळून ठेवले जाते. सकाळी सूर्यदेवाची पूजा करण्याबरोबरच सुंदरकांड, रामरक्षा स्रोत्र आणि देवी भगवतीच्या मंत्रांचा उच्चार करून पूजा करण्याची परंपरा आहे.

    पौराणिक कथेनुसार, रामायण काळात दक्षिण भारत सुग्रीवाचा मोठा भाऊ वाली याच्या जुलमी शासनाखाली होता. माता सीतेला शोधत असताना प्रभू श्रीराम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांना वालीच्या अत्याचाराची माहिती मिळाली, तेव्हा प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून तेथील लोकांना अत्याचारांपासून मुक्त केले. पौराणिक मान्यतेनुसार हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता.

    शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.

    भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवीदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकविण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

    ही गुढी म्हणजे फक्त ब्रम्हध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे. जेव्हा “प्रभू श्रीराम” लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुध्द प्रतिपदेच्याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते. तसेच, असे ही सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा श्री रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter