साधारण २०१५/१६ सालच्या सुमारास You Tube वर आजच्या इतके रेसिपी चॅनल नव्हते. त्यावेळी पाककृतीच्या पुस्तकांना बरीच मागणी असल्याने आम्ही रसोई हे पाककृती विशेष नियतकालिक सुरु करण्याचा विचार केला. आमच्या कार्यकारी संपादिका मनीषा सोमण यांनी, पोळी-पराठे, भाताचे प्रकार, न्याहारी, भाजी विशेष, फक्त चिकन, अंडी विशेष, आमटी-सार, पक्वान्न अशा एकाच विषयावर आधारित अंकाची संकल्पना मांडली. त्यानुसार एकाच विषयावर आधारित, रसोई अंकाची कल्पना प्रत्यक्षात उतरली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी संपादक म्हणून त्यांचे नाव वापरण्यास मान्यता दिली.
यात रोज स्वयंपाकघरात केल्या जाणार्या पाककृतींसह, शेफ विवेक ताम्हणे, शेफ आरती निजापकर, शेफ प्रसाद कुलकर्णी, शेफ तुषार देशमुख यासारख्या नामवंत शेफ च्या सिग्नेचर रेसीपी, फ्युजन रेसिपी, पाक कुशल सुगरणीच्या पाककृतींचाही समावेश केला गेला. पारंपरिक पासून नाविन्यपूर्ण रेसिपींनी नटलेल्या या अंकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आजही रसोईच्या न्याहारी विशेष, गुजराती विशेष, महाराष्ट्राची खाद्ययात्रा, यासारखे अंक वाचकांनी जतन करून ठेवले आहेत आणि या अंकांना अजूनही नव्याने मागणी असते.
इमेजेस पब्लिकेशन चे संपादक महेश खर्द यांनी या अंकासाठी उत्कृष्ट छपाईसाठी पूर्ण सहकार्य केले.त्यामुळे सुबक, देखाण्या आणि आकर्षक स्वरुपातील रसोई अंक वाचकांच्या हाती दिला.