•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • दा. कृ. सोमण, खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते

    दा. कृ. सोमण

    खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते

    दा. कृ. सोमण हे सर्वांना ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक म्हणून परिचित आहेत. मागील ५० वर्षे ते पंचांग – दिनदर्शिका तयार करण्याचे कार्य ते करीत असतात. अगदी पहिल्या वर्षापासून श्री. दा. कृ. सोमण हे ‘साईनिर्णय दिनदर्शिका’ तयार करीत आहेत.

    दा. कृ. सोमण यांचा जन्म २१ मे १९४२ रोजी कोकणात झाला. ८० व्या वर्षात त्यानी पदार्पण केले असूनही ते पहाटे साडेचार वाजता आपल्या कामाला प्रारंभ करतात. जेव्हा पंचांगातील सण-उत्सव निर्णयात पंचांगकर्त्यांमध्ये मतभिन्नता निर्माण होते तेव्हा दा. कृ. सोमण यांचा सल्ला घेतला जातो.

    दा. कृ. सोमण यांनी मुंबईच्या व्ही. जे. टी. आय. मधून टेक्स्टाइलची पदवी घेतल्यानंतर त्यांनी मफतलाल मिलमध्ये २५ वर्षे नोकरी केली. वयाच्या ५० व्या वर्षी खगोलशास्त्र प्रचार व पंचांगकार्य करण्यासाठी श्री. सोमण यांनी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. खगोलशास्त्र प्रचारासाठी त्यानी आत्तापर्यंत सात हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत. सन १९८० मध्ये भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसले होते त्यावर्षी ‘ खग्रास सूर्यग्रहण ‘  या विषयावर शंभर व्याख्याने देण्याचा संकल्प करून त्यांनी तो पूर्ण केला. १९८६ मध्ये हॅले धूमकेतू दिसला त्यावेळी ‘धूमकेतू’  विषयावर शंभर व्याख्याने दिली.  आणि ‘गीतारहस्य’ या विषयावरही त्यांनी भाषणांचे शतक पूर्ण केले. दा. कृ. सोमण हे मुंबई आकाशवाणी, दूरदर्शन आणि इतर वाहिन्यांवरील खगोल विज्ञान विषयक कार्यक्रमात सहभागी होत असतात. लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतात.

    दा. कृ. सोमण हे निर्णयसागर व ढवळे पंचांगाचे संपादन करतात. तसेच महाराष्ट्रातील इतर दिनदर्शिकांचेही गणित ते करतात. दा. कृ. सोमण यांनी अमेरिका व यूरोपमधील वेधशाळांनाही भेटी दिल्या आहेत. माथेरान येथील आकाशगंगा प्रकल्पाचे ते मार्गदर्शक आहेत. ‘तारांगण आपल्या दारी’ या ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील आकाशदर्शन प्रकल्पाचे ते मार्गदर्शक आहेत.

    दा. कृ. सोमण हे मुंबई विद्यापीठ बहि:शाल विभागाचे व्याख्याते आहेत. मराठी विज्ञान परिषद ठाणे या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच ते मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे या संस्थेचे विश्वस्त आहेत. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना, नवाकाळ, लोकमत, सकाळ इत्यादी अनेक वृत्तपत्रातून ते सातत्याने लेखन करीत असतात. तसेच त्यांनी आपले सण-उत्सव, आकाशदर्शन, ग्रहणे चंद्र-सूर्याची, धूमकेतू – उल्कावर्षाव, आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, गणितशिरोमणी भास्कराचार्य इत्यादी पुस्तकेही लिहिली आहेत.

    दा. कृ. सोमण यांना ठाणे महानगरपालिकेतर्फे पहिला ठाणेभूषण हा पुरस्कार मिळाला आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारा पी. सावळाराम लेखन पुरस्कारही त्याना मिळालाआहे. लोकमतचा ‘ ठाणे आयकॅान ‘ हा पुरस्कारही दा. कृ. सोमण यांना मिळालाआहे. मराठी विज्ञान परिषद मुंबईतर्फे ‘उत्कृष्ट विज्ञान प्रचारक’ हा सन्मान श्री. सोमण यांना मिळाला आहे. रोटरी क्लब ठाणे या संस्थेतर्फे ‘ व्होकेशनल अवॅार्ड ‘ देऊनही श्री. दा. कृ. सोमण यांना गौरविण्यात आले आहे.

    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter