बर्याच घरात “शिस्त” हा कळीचा मुद्दा असतो. मुलांना वाढवताना कोणत्या गोष्टी
पाळाव्यात, कोणत्या गोष्टी पाळू नयेत यासाठीचे वेगळे वर्ग अस्तित्वात नाहीत. त्यामुळे स्वत:चे अनुभव समोर ठेवूनच पालक आपले पालकत्व निभावत असतात. ते स्वत: ज्या शिस्तीत वाढले तशीच परिस्थिती आपल्या मुलांच्या बाबतीत निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. शिस्त हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मनुष्याचा एकूण विकास हा याच्याशी बव्हंशी अवलंबून असतो. माणूस काही संकेत नियमितपणे पाळत आला आहे आणि अशा नियमांनुसार वागत आला आहे. अश्मयुगीन मानवाने शांतता राखण्याचे नियम अनुसरले नसते तर आपण “आज” पाहू शकलो असतो का?
शिस्त म्हणजे नेमके काय? – आपण आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत शिस्त आणण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपण जेव्हा शिस्त लावत असतो तेव्हा तसे करण्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे आवश्यक असते. आजही आपण किंवा आपल्यासारखे कितीतरी जण कित्येक गोष्टींचे आंधळेपणाने अनुकरण करीत असतो. माझ्या आजोबांनी किंवा बाबांनी केले म्हणून मीही तसेच करणार. नियम म्हणजे नि-यम. मी तो पाळणारच असा विचार अनेकदा होताना दिसतो. स्वत:ला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करून घेताना दिसतो. असे बंदिस्त करून घेताना “आज” त्याची खरच गरज आहे का, याचा सारासार विचारही कधी कधी केला जात नाही. परिणामी, अशा व्यक्ती घराबाहेर आणि घरात दोन्ही ठिकाणी तशाच वागतात आणि आपल्या शिस्तीचा बडगा दाखवित राहतात. त्यांनी मात्र या विशिष्ट शिस्तीची गरज किंवा महत्व लक्षात घेतलेले नसते, तसेच दुसर्या व्यक्तीची याबाबतीत वेगळी भूमिका असू शकेल, याचा ते विचारच करीत नाहीत. यातूनच अनेकदा पालकांवर त्यांच्या बालपणीचा काळ व अनुभव -यांचा पगडा जास्त असतो. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर घालण्यात आलेले निर्बंध, अनेक बाबतीत करण्यात आलेली सक्ती या सर्वांचा जसाच्या तसा वापर ते त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्याच मुलांना शिस्त लावण्यासाठी करतात. मात्र त्यावेळचा काळ व सांस्कृतिक वातावरण आणि आजचा काळ यात कमालीचा झालेला फरक त्यांच्या ध्यानात येत नाही. वस्तुत: शिस्तीमुळे जीवन सुलभ होते. आयुष्याला एक वळण लागते. मात्र जीवनाला नियमात बांधून घातल्यामुळे अनेकदा त्यातून प्रश्न निर्माण होतात. मग शिस्त असूच नये का? वडीलधार्यांचा आदर करूच नये का? असा याचा अर्थ नव्हे, पण त्यामागची कारणमीमांसा समजून घेतली आणि मुलांना असे वर्तन करायला लावले तर यातूनच त्याचे योग्य परिणाम मिळतील. पालकांनी मुलांना शिस्त जरूर लावावी. त्यासाठी ते ताठ असावेत. मात्र त्यामागची गरज व वातावरणातील परिवर्तन इ. बाबी विचारात घेण्याइतपत आपले धोरण लवचिकही ठेवावे. पालकांनी मुलांना अवास्तव, अमर्याद स्वातंत्र्य द्यावे असा याचा अर्थ नाही. मुलांमध्ये अनुभवांचे शहाणपण नसते. तसेच प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणेही शक्य नसते. अशावेळी दिपस्तंभाप्रमाणे मुलांना वाट दाखवण्यासाठी पालकांनी त्यांना वळण लावावे. त्यांना कोणताही निर्णय घेताना तो तारतम्याने घेणे जोवर साधत नाही, तोवर मुलांवर त्यासाठी पालकांचे मत घेण्याची सक्ती नव्हे, मात्र जबाबदारी टाकावी. कोणताही निर्णय मुलांवर लादण्यापेक्षा त्याचे चांगले-वाईट परिणाम त्यांना समजावून सांगून त्याची आवश्यकता स्पष्ट करावी. त्यातूनच हेतू साध्य होऊ शकतो. पालकांनी मुलांना विचार करण्याची मोकळीक द्यावी. एखाद्या परिस्थितीशी कसा सामना द्यायचा? त्यातून काय निष्पन्न होईलं िकंवा कसे वागले तर योग्य परिणाम मिळतील याचा विचार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. त्यांना अशक्यता, स्वप्न, आशा, आकांक्षा आणि वास्तव यातील फरक जाणवून द्यावा, नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता, समज-गैरसमज यातील तफावत जाणवण्याइतपत सक्षमता त्यांच्यात निर्माण करावी.
एखादे वेळी, पालकांचे समज मुलांनी योग्या रीतीने खोडून काढले तर त्या समजांना चिकटून राहण्याची गरज नाही किंवा तुमचे मूल तुम्हाला जुमानत नाही असा समज करून घेण्याचीही गरज नाही. मुलांना समजून पालकांनी योग्य असे बदल स्वत:मध्ये करून घेतल्यास मुलं त्यांच्या अधिक जवळ येतील. एक पालक आपल्या मुलाला सर्वोत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते शिक्षण असो, सोयीसुविधा असोत किंवा जीवनशैली असो. त्यासाठी त्याने एखादी मागणी केल्यास, पालकांनी त्याला, त्याची खरच गरज आहे का, याचा विचार करून त्याची पूर्तता केली पाहिजे. मात्र एखाद्या गोष्टीची मागणी अवास्तव किंवा अनावश्यक असल्याचे वाटले तर त्याबाबत त्याला विश्वासात घेऊन तशी मागणी अजिबात न पुरवणे श्रेयकर ठरेल! तुमचे एकुलते एक मूल आहे म्हणून त्याची मागणी पुरवणे, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे म्हणून किंवा तुमच्या बालपणी ती वस्तू तुमच्या पालकांनी तुम्हाला नाकारली म्हणून आज तिची गरज नसताना ती अजिबात देऊ नका. मुले त्यांच्या पालकांना “इमोशनल ब्लॅकमेल” सहज करु शकतात. पालकांच्या भावुकतेचा फायदा अशा मुलांना सहजपणे उठवता येतो. मग मुलांमधील आक्रस्ताळेपणा वाढतो. अनेक पालकांना तो मोडून काढणे अवघड वाटते. अशा वेळी मुलांना मारणे किंवा धाक दाखवणे याचा काहीच उपयोग होत नाही आणि शिस्तीचा मात्र पुरता बोजवारा उडतो.
पालकांनी मुलांना शिस्तीचे नियम लावताना स्वत:ला तशाच नियमांमध्ये अडकवून घेतले पाहिजे. घरातील सर्वांनाच काही नियम लावण्यात आलेले आहेत आणि सर्वजण त्या नियमांचे पालन करत आहेत. याची जाणीव मुलांना आपसूक होणे आवश्यक असते. काही नियम केवळ मुलांपुरतेच असले तरी पालकांनी सतत त्यासाठी मुलांना शिक्षा न देता माफीचे धोरण ठेवणे अधिक योग्य ठरेल.
मुलांबरोबर सुसंवाद ठेवावा. मुलांना बोलण्याची मुभा द्यावी त्यांची मते त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात, त्यामुळे त्यांना मोकळे होऊ द्यावे. त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करावी. पालक म्हणून घेतलेला निर्णय त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हितावह कसा आहे, याची जाणीव त्यांना करवून द्यावी. तसेच एकदा हाताला, मनाला, एकूणच वागण्याला लागलेली शिस्त मोठेपणी किती व कशी उपयुक्त ठरेल याची समज वेळोवेळी मुलांना त्यांच्याशी सुसंवाद साधून, प्रसंगी त्यांना बोलते करून आणावी.
मूल म्हणजे जणू मातीचा गोळा. त्याला आकार द्यावा त्याप्रमाणे तो घडतो. त्याच्या वैचारिकतेला, भावनिकतेला, मानसिकतेला आकार देण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिस्तीचा वापर करावा. शिस्तीमुळे त्यांच्यामध्ये उत्तम संस्कार, भावना व्यक्त करण्याची कुवत निर्माण करता येईल. शिस्तीखाली त्यांना नामोहरम करू नका तर त्यांचे जीवन फुलवा, विकसित करा.
मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा देण्यात आली असली तरी तो जिवंत गोळा आहे. तो भावना, आकलनशक्ती व उपजत स्वभाववैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आहे, याचा पालक या नात्याने कधीच विसर पडू देऊ नका.